फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकर्नाटकी व्यभिचार आणि मोदींचे मौन!

कर्नाटकी व्यभिचार आणि मोदींचे मौन!

देशाला हादरवून सोडणा-या घटनेप्रति मोदी गप्प का? समाज माध्यमांवर तीव्र संताप

महिलांप्रति देशातील तिसरी संतापजनक घटना

लिंगपिसाट प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला आता मोदींनी जवाबदारी ही घ्यावी: जनतेची अपेक्षा

नागपूर,ता. १ मे २०२४: संपूर्ण देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करीत असताना त्याच दिवशी १४ अप्रेल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये अश्‍या खासदाराचा व उमेदवाराचा प्रचार करीत होते, हासन मतदारसंघातील जनतेला त्याला मत देण्यासाठी आवाहन करीत होते ज्याचे वेगवेगळ्या वयोगटातील २,९७६ महिलांसोबत बलात्काराचे व्हिडीयो व्हायरल झाले होते! एक प्रकारे कर्नाटकी व्यभिचारावर पंतप्रधानाच्या समंतीची मोहोर उमटवणारी ही घटना होती तर दूसरीकडे ज्या महामानवाने देशाला संविधान दिले,लिंगभेदा पलीकडे या देशातील महिलांना समानतेचे व तितक्याच सन्मानाचे स्थान दिले त्याच संविधानाचा आधार घेऊन, खासदार झालेल्या एका लिंगपिसाट खासदाराने, त्याच्या राज्यातील महिलांना फक्त एक भोग्या समजून त्यांच्या अब्रू आणि आत्मसन्मानाचे खुलेआम धिंडवडे उडवले,बाबासाहेबांचा आदर्शवाद पायाखाली तुडवण्याचे काम केले.

महत्वाचे म्हणजे,गेल्या वर्षीच देशाचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नातवाचे प्रज्जवल रेवण्णा याच्या महिलांवरील अत्याचाराचे व्हिडीयो व्हायरल झाले होते मात्र,मिडीयावर बंधने आणण्यासाठी कोर्टातून या दिवट्या खासदाराने गॅग(गप्प राहण्याचा आदेश)ऑर्डर आणून माध्यमांवर बंदी आणली होती.या दिवट्या खासदाराचे महामहिम आमदार वडील व मंत्री एच.डी.रेवण्णा यांच्यावर देखील अनेक महिलांनी बलात्कारचे गंभीर आरोप केले आहेत.आजोबा पंतप्रधान,काका राज्याचे मुख्यमंत्री,बाप आमदार व मंत्री अश्‍या घराणेशाहीतून निपजलेला हा खासदार पूत्र, याने एखाद्या राजा-महाराजाला लाजवावे असे कृत्य लोकशाही असलेल्या राज्यात केले व तरीही संपूर्ण पोलिस यंत्रणा गप्प होती,याचेच आश्‍चर्य देशातील जनतेला वाटत आहे.

त्यामुळेच आपल्या पुतण्याच्या कर्तुत्वावर पांघरुन घालताना,राज्याचे मुख्यमंत्री राहीलेल्या कुमारस्वामी हे,मला व देवीगौडांना या विषयी माहिती नव्हती,अशी मखलाशी करतात त्यावेळी घराणेशाहीतील ही कीड किती खोलवर रुजली आहे,याची प्रचिती देशातील जनतेला येते.कर्नाटकी व्यभिचारात कुमारस्वामी व देवीगौडा प्रत्यक्ष सहभागी नसले तरी माणूसकीला काळीमा फासणा-या व संविधानाचाच मखोल उडवणा-या कृत्याला अप्रत्यक्ष पाठींबा दिल्याचा आरोपातून त्यांची सुटका होत नाही.

अनेक व्हिडीयोमध्ये लाचार व हतबल असलेल्या महिला,मुली या रडत असताना दिसून पडतात.एक दोन नव्हे तर चक्क तीन हजारच्या जवळपास महिलांचे उत्पीडन,ते ही पुरुषी अहंकारातून,राजकीय उन्मतपणातून करणा-या अवघ्या ३३ वर्षीय या खासदाराच्या अंगी एवढा ‘कामदेवपणा‘ आला कुठून?घरकाम करणा-या ६७ वर्षीय तसेच ४७ वर्षीय महिलांना देखील भोगण्यास या बाप-लेकांनी मागे-पुढे पाहीले नाही.कर्नाटक राज्यातील महिला या,या राज्यातील देवगौडा राजकारण्यांसाठी ‘देवदासी’होत्या का?(एकदा देवाला अर्पण केली की ती कन्या संपूर्ण समाजाला उपभोगण्यासाठी मोकळी होत असे!)

कहर म्हणजे,या दिवट्या खासदार पुत्राचे सर्व प्रताप पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचले असतानाही फक्त देवगौडा यांनी हासनची सीट जिंकून देत असल्याचे आश्‍वासन मोदींना दिल्यामुळे, हासन मधून पुन्हा या लिंगपिसाटाला तिकीट देण्यास भाजपचे शीर्षस्थ नेते राजी झाले?कर्नाटकमधील भाजपचे नेते,कार्यकर्ते यांनी हासन मधून या लिंगपिसाटाचा प्रचार करणार नसल्याचे आधीच सांगितले असताना ४ एप्रिल रोजी दिल्लीवरुन त्यांना प्रचारात सहभागी होण्याचे आदेश येतात?स्वत: मोदी हे डॉ.बाबासाहेबांच्या जयंती दिनी एका लिंग पिसाटाचासाठी सभेत मत मागताना दिसून पडतात!कर्नाटकाचे भाजप प्रदेशाध्यक्ष पासून तर दिल्लीतील भाजपचे महासचिव पी.एल.संतोष यांच्यापर्यंत या दिवट्या खासदार पुत्राचे प्रताप पोहोचले असताना मोदी यांच्यापर्यंत त्याचे व्हिडीयो पोहोचले नाहीत,असे देशाची जनता मानू शकते का?

तरी देखील लिंगपिसाट बलातका-यासाठी देशाचे पंतप्रधान मत मागताना दिसून पडतात तेव्हा या देशातील महिलांना उत्तर देण्याची जवाबदेही देखील मोदींवर आहे,हे विसरता येत नाही.कारण,१४ एप्रिलच्या याच सभेत मोदी यांनी कर्नाटकमधील हुगली शहरातील कॉलेज कॅम्पस मध्ये मुस्लिम मुलाने सगळ्यांसमोर चाकूने वार करीत एका निष्पाप विद्यार्थिनीचा जीव घेतला,या घटनेवर मोदी यांनी भरपूर तोंडसुख घेतले होते.हुगलीमध्ये आपल्या मुलीसोबत जे घडले ते किती जघन्य होते,या घटनेनंतर कनार्टकमधील प्रत्येक आई-वडीलांना चिंता सतावतेय,काय काँग्रेस पक्ष कर्नाटकच्या बेटीची रक्षा करु शकते?वोट बँकचे भूके लोग पाप से बचा लेंगे,असं त्या गुन्हेगाराला वाटलं आणि त्याने ते जघन्य कृत्य केले.कर्नाटकमध्ये आपल्या मुलींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्‍न उभा झाला असल्याचे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.त्यावेळी कर्नाटकामधील बहू-बेटींना आपल्या बाप दादांची जागीर समजून दिवस-रात्र जबरीने उपभोगणा-या खासदाराचे कृत्य मोदींना माहिती नव्हते का?कर्नाटकमधील जनतेला ते माहिती होतं मात्र मोदींना नाही,असं समजण्याची कोणी हिंमत करु शकतो का?

देशातील बहू-बेंटींची इभ्रत,अस्मिता आणि आत्मसन्मानाच्या बाबतीत फक्त तकलादू राजकारणासाठी दुहेरी मापदंड संविधानाने निवडून दिलेला या देशाचा पंतप्रधान कसे लाऊ शकतात?‘चारशे पार’साठी महिलांवर जघन्य बलात्कार करणा-यांनाही निवडून देण्यासाठी मोदी सभा घेतात!

२६ एप्रिल रोजी दुस-या टप्प्यात कर्नाटकमध्ये मतदान झाले व २२ एप्रिल रोजी या लिंगपिसाट खासदाराचे हजारो-हजारो बलात्कार करतानाचे व्हिडीयोज पेन ड्राईव्हच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात व्हायरल झाले.रेल्वे स्टेशन,बस स्टॅण्ड इत्यादी सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी हजारो पेन ड्राईव्ह पडलेले लोकांना दिसले,ते त्यांनी उचलून घरी नेले व त्यात त्या राज्यातील बहू-बेटियो की इभ्रत लुटताना त्यांच्याच राज्यातील घराणेशाहीतील राजपुत्र दिसून पडतो !त्या लिंग पिसाटाला तर लोकलाज नव्हतीच मात्र ज्या, त्याच्या मनोविकृत वासनेला बळी पडल्या,त्यांचा काय दोष होता?त्या का व्हायरल केल्या गेल्या? ?त्यांच्या आत्मसन्मानाचे काय?

या ढोंगी राजपुत्राने तर संतांना देखील नाही सोडले.कर्नाटकमधील अनेक संतांचे आर्शिवाद घेत असतानाचे त्याचे व्हिडीयोज सोशल मिडीयावर आहेत.गो-मातेचे आर्शिवाद घेताना तो स्वत:ही एखाद्या साधुसंतापेक्षा कमी वाटत नाही,मात्र कर्माने राक्षसाला ही लाजवेल असे कृत्य या अधर्माने केले.बंगालच्या संदेशखालीच्या अत्याचार पिडीत बहू-बेटींची प्रत्यक्ष भेट मोदी यांनी घेतली होती.तितकी तळमळ कर्नाटकमधील बलात्कार पिडीत बहू-बेटींसाठी का दिसून पडली नाही?भाजपने या सर्व कृष्णकृत्यातून,त्यांचा काहीही संबंध नाही,ही जनता दल(सेक्यूलर)पक्षाची अंतर्गत बाब असल्याचे सांगून अंग काढून घेतले असले तरी,गठबंधनातील पक्ष आणि बलात्का-यासाठी मतदानाचे आवाहन,याची जवाबदारी भाजप कसा झटकणार?

देशाच्या महिला व बाल विकास मंत्री स्मृति इराणी या तरी एवढ्या गंभीर घटनेवर गप्प का?केंद्रिय महिला आयोगाची भूमिका या संपूर्ण घटनेवर काय असणार आहे?याची उत्तरे समाज माध्यमांवर मागितली जात आहे आणि प्रत्येक गोष्टींचे श्रेय घेणा-या पक्षाने,पक्षातील नेत्यांनी अश्‍या घटनांची जवाबदारी देखील घेण्याचे धाडस का दाखवित नाही?

मोदी यांची ५६ इंचची छाती ही मणिपूरमध्ये हतबल महिलांची नग्न धिंड काढली जात होती त्यावेळी कुठे होती?त्या कुकी समाजाच्या असो किवा मैतई समाजाच्या,त्या दिल्लीतील सरकारच्या गठबंधनातील असो किवा विरोधातील पक्षाच्या,अफूची शेती पिकविणा-या समाजाच्या असो किवा देशद्रोह्यांच्या कंपूतल्या,त्यांच्या देहाची अशी सार्वजनिक विटंबना करण्याचा,खुलेआम त्यांच्या र्निवस्त्र देहाला विकृतीने स्पर्श करण्याचा,शेतात नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार होता?देशाला हादरवून टाकणारी एवढ्या पराकोटीची हिंसा देशातील एका राज्यात वर्ष भर घडत होती मात्र,एकदाही ५६ इंचच्या छातीवाल्या पंतप्रधानांना त्या राज्यातील बहू-बेटींचे अश्रू पुसण्यासाठी जावेसे नाही वाटले?हाच का भगवान श्रीरामाचा आदर्श?फक्त मूर्ती पुजल्याने रामभक्त होत नाही तर कर्माने देखील भगवान श्रीरामाच्या आदर्शवार चालणा-याच श्रीरामाचे नाव घेण्याचा अधिकार शास्त्र देतात.रामभक्ती ही देखील दिखावू किवा सोयीस्कार होऊ शकत नाही.

देशासाठी सुवर्ण जिंकून आणणा-या आणि देशाचा नावलौकिक जगात वाढवणा-या कुश्‍ती पटू महिला खेळाडूंच्या डोळ्यातील अश्रू ही पंतप्रधानाना दिसले नाहीत,हे संपूर्ण देशाने बघितले.उत्तर प्रदेशातील बाहूबली खासदारासाठी त्यावेळी देखील मोदींनी मौन बाळगणे पसंद केले.ज्या पंतप्रधान मनमाेहनसिंग यांना भाजप ‘मौनी बाबा’म्हणून हिणवते त्या मौनीबाबांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत ११७ पत्रकार परिषदा घेऊन देशातील जनतेच्या प्रश्‍नांना उत्तरे दिलीत,हा इतिहास आहे.भलेही त्यांची काही नीती,कायदे हे हिंदू विरोधी होते,हे मान्य केले तरी.

प्रत्येक सभेत काँग्रेस ही कशी टूकडे टूकडे गँगशी जोडली गेली आहे,‘देश को बांटने और विभाजित करने का खतरनाक इरादा रखनेवाली पार्टी’,अश्‍या शब्दात विरोधकांना धारेवर धरणा-या पंतप्रधानांनी देशातील माय-लेकींची इभ्रत लृटणा-याचाच प्रचार करीत त्याला जिंकून देण्याचे आवाहन केले,ते खतरनाक इरादाच्या श्रेणीत येत नाहीत का?देशातील जनतेला मोदी हे दुधखुळी समजतात का?२०१९ मध्ये हा लिंगपिसाट रेवन्ना सव्वा लाख मतांनी जिंकून आला होता,यंदा त्याच्या समोर आलेल्या व्यभिचारामुळे कर्नाटकात भाजपला तरी माय-लेकींची मते मिळणार आहेत का?

(छायाचित्र : गळ्यात ‘कमळ’चिन्हाचा दुपट्टा घातला असला तरी या देशाला एक श्राप आहे,हा देश पराकोटीच्या भ्रष्टाचा-याला तर माफ करुन देते पण?व्याभिचा-याला नाही..हाच तो लिंगपिसाट,मनोविकृत बलात्कारी प्रज्वल रेवन्ना)

कुणाल पांडे,सक्षम पटेल यासारख्या भाजपच्या पदाधिका-यांनी कॅम्पस मध्ये बंदूकीच्या नोक वर असंख्य विद्यार्थिनींचे कपडे उतरवलेची घटना अद्याप भारतीयांच्या विस्मरणात गेली नाही,हे दोन उन्मत पदाधिकारी सध्या कारागृहात आहेत,हे ही नसे थोडके.

महाराष्ट्रातही मोदींच्या सभेत व्यभिचारी व त्या व्यभिचारातून हत्या घडवून आणनारा आमदार उपस्थित होताच ना?व्यभिचाराला राज्य,प्रांत,भाषा,जात किवा धर्मांचे कोंदण लागत नाही!महाराष्ट्रातील एका मंत्र्याने तर दुस-या पत्नीच्या बहीणीसोबत व्यभिचार करुन तिला चक्क बाहूबळाचा वापर करुन, तिने माध्यमात आवाज उठवला म्हणून खंडणीचा गुन्हा दाखल करुन तिला तुरुंगात टाकल्याची घटना निदान सुजाण,सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनता विसरली नाही.माेदींच्या सभेत तेच कुकर्मी व्यासपीठावर असतात!

महाराष्ट्रात येऊन मराठीत दोन-चार वाक्ये मराठीत ठोकून, मराठी भाषिकांचे मत घेण्यासाठी आसुसलेले मोदी यांनी माय-मराठीला ‘अभिजात’दर्जा देण्यासाठी काय केले?मराठीला अभिजात दर्जा मिळू नये म्हणून केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने चक्क नियमच बदलले!महाराष्ट्रात येऊन आपल्या भाषणात दोन-चार मराठी वाक्ये तोंडावर फेकल्याने मराठीचा आदर होत नाही.आज १ मे,महाराष्ट्र दिन,किमान या दिवशी तरी आपल्या सभांमध्ये ते मराठी भाषेसाठी काय करणार आहेत?याचा उल्लेख करावा,अशी अपेक्षा राज्यातील मराठी भाषिक करतो आहे.एक प्रकारे गुजराती अस्मितेतून निपजलेल्या मराठी द्वेषातून कारभार करणा-यांना मराठी मत मागण्याचा तरी अधिकार उरतो का?

थोडक्यात,एका पराकोटीच्या लिंगपिसाटासाठी देशातील दोन-दोन पंतप्रधान पद भूषविणा-यांनीच मते मागावी,ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून,कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने या लिंगपिसाटाच्या विरोधात ‘एसआयटी’गठीत केली असली, तरी तो सुरक्षीतरित्या ‘जर्मनीत‘ पोहोचला आहे.गुन्हा सिद्ध झाल्यास कायद्यानुसार दोषी विरुद्ध कारवाई होणार,अशी मखलाशी कुमारस्वामी यांनी केली तसेच या लिंगपिसाट खासदाराला पक्षातून निलंबित देखील केले.प्रश्‍न असा आहे,गुन्हा सिद्ध करण्यासाठी आधी तर या पळपुट्या राजपुत्राला जर्मनीतून भारतात आणावे लागेल,अतिशय प्रामाणिकपणे खटला चालवावा लागेल व एका बलात्काराची शिक्षा जन्मठेप होऊ शकते तर तीन हजार बलात्कारासाठी जलद न्यायालयाने या नराधमाला सरळ फाशीवर लटकवावे,तरंच कुमारस्वामी म्हणतात तसे पिडीतांना न्याय मिळू शकेल.

……………………………….

 

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या