(भाग-१)
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २९ एप्रिल २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजता एका खासगी वृत्त वाहीनीला प्रदीर्घ मुलाखत दिली.देशात लोकसभेच्या निवडणूका सुरु आहेत.आदर्श आचार संहिता लागू आहे मात्र,शीर्षस्थ स्तरावरील भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व हे देशाच्या प्रतिष्ठित वृत्त पत्रे तसेच वृत्त वाहीन्यांवर मुलाखती देत सुटले आहेत.दहा वर्ष आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत एक-दोन अपवाद वगळता मोदी यांनी वृत्तपत्रे किवा वृत्त वाहीनींना मुलाखती तर सोडा साधी एक ही पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.अर्थात प्रेम आणि युद्धात सर्व क्षम्य आहे, हा सिद्धांत निवडणूकांमध्ये देखील अगदी चपखल बसतो.मिडीयाशी शेकडो मैलाचे अंतर राखणारे मोदी हे अचानक माध्यमांवर इतके मेहरबान का झाले?याची चर्चा झडली नसती तरच नवल.
आज ज्या मराठी वृत्त वाहीनीला हिंदीत त्यांनी मुलाखत दिली ती आधीच एडिट झाली होती यात शंका नाही.कारण,मोदींची उत्तरे नंतर येत होती त्या पूर्वीच स्क्रीनवर खाली त्यांच्या उ्त्तरांची पट्टीका चालत होती! थेट मोदींना प्रश्न विचारणारे महाभाग ,विरोधक तुम्हाला सर फोड देंगे,आईवरुन शिव्या देतात,कसं सहन करता?आपल्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक अडचणींचा सामना कसा केला वगैरे-वगैरे,(भाजपला)अपेक्षीत प्रश्ने विचारत होते,यावर मोदींचे उत्तर हे ऐकण्यासारखे होते,यात वाद नाही.मतदाता हेच माझे कुटूंबिय असून विरोधक जे टिका करतात त्यांचा निर्णय मी देशवासीयांवरच सोडून देतो,कारकीर्दीत अनेक संकटांचा सामना केला कारण मला परमेश्वरानेच कार्य करण्यासाठी पाठवले आहे यावर माझा ठाम विश्वास आहे,माझ्याकडून सगळं काही ईश्वरी शक्ती करुन घेते,ही ईश्वराचीच देण आहे,अशी उत्तरे त्यांनी दिली.या प्रदीर्घ मुलाखतीत काँग्रेस अल्पसंख्याकांचे करीत असलेले तुष्टिकरण,मोदींच्या जिवंतपणी ओबीसी आरक्षणातून मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही,शरद पवार यांचे नाव न घेता ३५ वर्षां आधी एका नेत्याने खेळ सुरु केला इत्यादी राजकीय प्रहार, निवडणूकीची आचार संहिता लागली असताना संपूर्ण देशवासियांनी ऐकले.आता विरोधक यालाही मोदींची ’जुमलेबाजी’ ठरवतील,हा भाग अलहिदा.
मूळात महाराष्ट्रातील पुणे शहरात मोदींचा आज मुक्काम असून दोन दिवसांत मोदींच्या सहा सभा आहेत.निवडणूकीचे दोन टप्पे पार पडले असून या दोन्ही टप्प्यांमध्ये मतदान कमी झाल्याने ‘चारसौ पार’ साठी उत्तर प्रदेशच्या ८० जागांसोबतच महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा या निर्णायक राहणार आहेत,याची मोदींनाही जाणीव आहे.उवर्रित पाच टप्प्यांच्या निवडणूकीत,झालेल्या दोन टप्प्यातील कमी मतदानाची उणीव भरुन काढण्यासाठी, मोदींच्या मुलाखतींचे फंडे वापरण्यात येत असल्याची टिका विरोधक करीत आहेत.
मात्र,आज मीडियावर भरभरुन व्यक्त होणारे मोदी यांनी,पंतप्रधान पदाच्या दहा वर्षांच्या काळात मीडियाला दूर ठवले होते,या मागे मीडियानी एकेकाळी युपीए सरकारला खुश करण्यासाठी त्यांच्याशी केलेला पक्षपाती व्यवहार याचे किस्से मीडिया जगतात आज ही चर्चिले जातात.हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००७ पर्यंत म्हणजे मुख्यमंत्री पदाचा आपला पहीला कार्यकाळ संपेपर्यंत, पत्रकारांसोबत खूप मनमोकळे राहत होते,त्यांना मुलाखती देत असत.२००२ च्या गुजरात दंगलीनंतर देखील मोदी यांनी सातत्याने मीडियाला मुलाखती दिल्या.जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जवाबदारी सोपविण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी मोदींना फोन केला त्यावेळी देखील मोदी हे एका टीवी कॅमरामनच्या अंत्य संस्कारासाठी श्मशान घाटावर होते.त्या टीवी कॅमरामनचा मृत्यू काँग्रेसचे कद्दावर नेते माधवराव सिंधिया यांच्यासोबत विमान दुर्घटनेत झाला होता.मोदी हे एकमेव असे राष्ट्रीय स्तरावरील नेते होते जे त्या दूर्देवी कॅमरामनच्या अंत्य संस्कारात सहभागी झाले होते.
पंतप्रधान बाजपेयी यांच्या बोलावण्यानंतर ते सरळ श्मशान घाटावरुन दिल्लीला पोहोचले व गुजरातचे मुख्यमंत्री होऊन परतले.मीडियाच्या प्रति मोदी यांनी २००७ मध्ये गुजरात विधान सभा जिंकल्यानंतर आपला दृष्टिकोण बदलला.या मागे अनेक कारणे होती.२००७ मध्ये दिल्लीतील अनेक मोठ्या नावाचे पत्रकार हे गुजरातमधील निवडणूकांचे वार्तांकन करीत होते.हेच पत्रकार २००२ च्या गुजरात दंगलीसाठी मोदींना वारंवार दोषी ठरवित आले होते.पुढे सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी गठीत केली,त्या एसआयटीने देखील मोदी यांना त्या दंगलीसाठी निर्दोष सिद्ध केले होते,हे विशेष.
२००७ मध्ये ही मोदी यांनी गुजरात विधान सभेत बहूमताने जिंकून तिस-यांदा मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली त्यावेळी या मीडियाने मोदींच्या त्या विजयासाठी गुजरातच्या जनतेची सांप्रदायिक मानसिकतेला जवाबदार धरले होते!इतकंच नव्हे तर मोदींसारखे नेते हे फक्त गुजरातसारख्या प्रदेशातच निवडूण येऊ शकतात,अश्या आशयाच्या बातम्यांनी रकाने भरले!
याच काळात ‘सीएनएन,‘आईबीएन’साठी वरिष्ठ पत्रकार करण थापर यांनी मुख्यमंत्री मोदींची एक मुलाखत घेतली.ही मुलाखत या स्तरापर्यंत अवमानकारक होती की मोदी यांनी अवघ्या पाच मिनिटात संपवली व करण थापर यांना ‘आप इसे खत्म कीजिए,हमारी आपकी दोस्ती बनी रहे,यही काफी है!‘असे सांगून निघून गेले
करण थापर यांनी त्या मुलाखतीत पहीलाच प्रश्न मोदींना केला होता,की गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर राजीव गांधी फाऊंडेशनने तुम्हाला देशातील सर्वाधिक चांगला मुख्यमंत्री मानले,इंडिया टूडे सारख्या पत्रिकेने आपल्या दोन अंकांमध्ये तुम्हाला देशातील सर्वात प्रभावशाली मुख्यमंत्री मानले मात्र,खरं हेच आहे की देशातील जनता आज देखील गुजरातमधील नरसंहारासाठी तुम्हाला दोषी मानते,तुम्ही मुस्लिमांना घेऊन पूर्वग्रह दूषित असून, आज देखील तुमची प्रतिमा ही डागळलेली आहे!
यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की,देशातील जनता असा विचार नाही करत,दोन-तीन लोकच असे आहेत जे असा माहोल बनवित असतात.तेच लोक आपला लॉजिक यासाठी वापरतात,देव त्यांचे भले करो जर त्यांना यातच आनंद येत असेल तर..
यावर थापर यांनी पुन्हा प्रश्न केला,तुमचं म्हणनं आहे की फक्त दोन-तीन लोकच असं मानतात?
यावर मोदी म्हणाले,नाही,मी असे नाही म्हणालो,माझ्याकडे जी माहिती आहे,हा जनतेचा आवाज नाही जे तुम्ही सांगत आहात.
यावर करण थापर म्हणाले,सप्टेंबर २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी होती की, तुम्ही देशातील जनतेचा विश्वास गमावला आहे.एप्रिल २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची टिका होती की,तुम्ही नीरो सारखे आहात,ज्यांच्या राज्यात निष्पाप जनता आणि मुले मरत होते आणि तुम्ही शांतपणे बासंरी वाजवत होते.मिस्टर मोदी,प्रॉब्लेम तो सुप्रीम कोर्ट को भी आप से है?
यावर मोदी उत्तरले,की करण माझी लहानशी विनंती आहे की हे जे काही तुम्ही सांगितले तो आदेश वाचून दाखवा,मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नक्कीच आनंद होईल जर सर्वोच्च न्यायालयाने असा काही आदेश दिला असेल तर.
यावर थापर म्हणाले,ठिक आहे,हे लिखित मध्ये नाही आहे.
यावर मोदी म्हणाले,जर हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असेल तर मी यावर उत्तर देईल.
यावर करण थापर म्हणाले,सांगू तुमचा वैताग काय आहे?गुजरात नरसंहारला पाच वर्षांचा कालावधी जाऊनसुद्धा गोधराचे भूत तुमचा पिच्छा सोडत नाही आहे.तुम्ही यातून सुटका का करुन घेत नाही?कायद्याचा आधार का घेत नाही?
यावर मोदी उत्तरले,काही मीडियाकर्मींना यातच आनंद मिळतो.जसे करण थापर.तुम्हाला वाटतं गोधराचे भूत सोबत घेऊन चालत राहू,तुम्हीच ते भूत पाळत आहात.यातच तुम्हाला मजा येते.
यावर करण थापर म्हणाले,तुम्ही का यावर बोलत नाही?का तुम्ही तुमच्या कार्यकाळात झालेल्या नरसंहारबाबत दिलगिरी व्यक्त करत?जे काही घडलं त्यावर माफी का मागत नाही?
यावर मोदी म्हणाले,मला जे काही सांगायंच होते ते त्याच वेळी मी सांगितलं आहे.सारखं-सारखं त्यावरच का बोलू?तुम्हीच लोक यातून बाहेर का पडत नाही?
यावर थापर म्हणाले,एकदा पुन्हा बोलून द्या यावर,तुम्हाला तुमची छवि सुधारण्याची संधी आहे,तुम्ही तुमची छवि का व्यवस्थित करीत नाही?हे गुजरातच्या हिताचे आहे.
यावर मोदी यांनी पाण्याचा ग्लास उचलून एक घोट पाणी घेतले आणि हताश होऊन हाताने कॅमरा बंद करण्याचा इशारा केला.‘करण खत्म कीजिए!आप खुश रहिए!आनंद लिजिए!हमारा संबंध बना रहे बस….!’
त्या मुलाखतीत करण थापर यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खुलेआम हत्यारा संबोधले होते.कोणत्याही तथ्य आणि पुराव्यांशिवाय.तथ्य आणि पुराव्यांची तोडमरोड करुन मोदींच्या विरोधात त्यावेळी देशातील काही वरिष्ठ व नामांकित पत्रकारांनी व माध्यमकर्मींनी एक कारस्थान रचले होेते.त्याचीच प्रचिती या मुलाखतीत देखील उमटली होती.इतकी अवमानकारक मुलाखत देशाच्या इतिहासात त्या पूर्वी कधीही प्रसिद्ध झाली नव्हती.
याच मुलाखतीने मोदींचा दृष्टिकोण मीडियाप्रति पार बदलून टाकला.सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या एसआयटीने मोदी यांना गुजरात दंगलीसाठी क्लिन चिट दिल्यानंतर देखील देशातील काही प्रतिष्ठित पत्रकार गुजरात दंगलीसाठी सातत्याने मोदींना देशातील जनतेसमोर हत्यारा सिद्ध करण्यास कटिबद्ध झालेली आढळली….!
याच अनुभवातून मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अपवादात्मक जे काही एक किवा दोन मुलाखती दिल्या त्याच्या शेवटी,‘इसमे कोई तोड-मरोड मत कीजिएगा’असे सांगताना आढळतात.
सोनिया गांधी यांनी भारताच्या राजकीय परिपेक्षात प्रवेश केल्यानंतर देशाप्रति त्यांची विचारधारा,धोरणे इत्यादी बाबत कोणतेही प्रश्न न करता वरिष्ठ पत्रकार राजीव शुक्ला(जे पुढे जाऊन काँग्रेसचे पहील्या फळीतील नेते बनले) आपल्या पहील्याच मुलाखतीमध्ये इंदिरा गांधींंसोबत सासू-सूनेचे नाते,राजीव गांधीसाेबत प्रेमप्रसंग इत्यादी या पुढे ती मुलाखत गेली नव्हती,हे देशवासियांनी बघितले होते.
थोडक्यात तेच मोदी आणि तीच मीडिया मात्र,आज संदर्भ बदलले असून,मीडीयाच्या इतिहासातील फ्लॅश बॅकमध्ये डोकावले असता,देशातील एका सर्वात शक्तीशाली झालेल्या पंतप्रधानाची मुलखात तीन-तीन मीडीयाकर्मींनी ज्या प्रकारे घेतली ते बघता ‘कालाय तस्मे नम:’म्हणायची वेळ भारतातील जनतेसमोर आज आली,असेच आता म्हणावे लागेल.
…………………………………………….
(संदर्भ आभार-‘पत्रकारिता का काला अध्याय’-वरिष्ठ पत्रकार मनीष ठाकूर)