
कन्हान,मोदींचे भाषण आणि गावक-यांचं पलायन!
आयेगा तो माेदी ही…गावक-यांचा विश्वास
मोदींच्या योजनांमुळे आम्ही खुश:महिला मतदारांचा आनंद
गाव का आदमी गाव मे नही जा पा रहा: हाय लेवल सुरक्षेमुळे कन्हानमध्ये ट्रॅफिक‘जाम’
हम काँग्रेसवाले मगर वोट मोदींको देंगे!ईडी का नोटीस मिला है क्या?जनतेचीच जनतेची फिरकी
नागपूर,ता.१० एप्रिल २०२४: देशाचे पंतप्रधान हे आज नागपूर व रामटेक लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कन्हान येथे आले असता मोदींविषयी जनतेच्या मनात दुपार पासून तर सायंकाळपर्यंत गजबचा उत्साह होता.कन्हान येथील ग्रोवर संदेश हिंदूस्थान इस्टेटच्या खासगी मैदानावर ही सभा भरली होती.आजू बाजूच्या अनेक गावांवरुन गावक-यांनी मोदींना बघण्यासाठी,ऐकण्यासाठी रस्त्याच्या दूतर्फा तसेच सभास्थळी चांगलीच गर्दी केली होती.जनतेचा उत्साह ओसंडून वाहत होता,सगळं वातावरण हे ‘मोदीमय’झालं होतं मात्र,ज्यांना ऐकण्यासाठी,बघण्यासाठी भर दूपार पासून रामटेक तालुक्यातील गावकरी जनता ही सभास्थळी जमली होती तीच जनता मात्र,मोदींचे भाषण सुरु होताच अवघ्या पाचच मिनिटात जागेवरुन उठून घराकडे निघू लागली,शेवटी ’ये जो पब्लिक है…’ती काहीही करु शकते,सध्या तीच ‘राजा’आहे,मग पाच वर्षे कोणताही राजकारणी त्यांची सुध घेत नाही तरी चालतं, या पब्लिकचा हाच संपूर्ण मूड ‘सत्ताधीश’ने खास आपल्या वाचकांसाठी ’ऑन द स्पॉट’कॅच केला.
अनेकांनी भूकेचं कारण सांगितलं,अनेकांनी करंगळी उंचावून बाथरुमला जात असल्याचे कारण सांगितले.अनेकांनी गाव लांब असल्याने निघत असल्याचे सांगितले तर अनेकांनी आम्ही मोदींचे भाषण न ऐकताच निघत असलो तरी आम्ही मोदींचे चाहते असल्याचे सांगून पोबारा केला.या मैदानात एकूण तीन डोम उभारण्यात आले होते.या ९ ते १० एकर जागेवर जवळपास दीड लाख लोकांची गर्दी जमली होती.अनेकांनी ते दूपारी २ वाजता पासून सभास्थळी आले असल्याचे सांगितले.सायंकाळी ७ च्या सुमारास मोदींचे भाषण सुरु झाले अन् अवघ्या पाचच मिनिटात डोमधील पब्लिकने काढता पाय घेतला…..!
मोदींच्या आगनामुळे काटोकोर सुरक्षा ठेवण्यात आली होती.सामान्य पब्लिकसाठी कन्हान नदीवरील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होेती,संपूर्ण वाहतूक जुन्या पुलावरुन वळवण्यात आल्याने रेल्वे ट्रॅकच्या अलीकडे व पलीकडे चांगलीच वाहतूक कोंडी झाली.आमच्या गावात आम्हालाच पोहोचता येत नसल्याचा संताप रेल्वे सिग्नलवरील एका वाहनधारकाने व्यक्त केला.एवढेसे अंतर कापायला मला दोन तास लागले,आता ही पुढे मला माझ्या गावापर्यंत पोहोचायला किती तास लागेल?असा सवाल तो सुरक्षा सांभाळणा-या पोलिसांना विचारत होता.
रस्त्याच्या कडेला मोदींच्या आगमनासाठी डोळे लाऊन बसणा-या जनतेला बोलते केले असता,आयेगा तो कमल ही,असे उत्तर त्यांनी दिले.मात्र,रामटेकमध्ये तर शिवसेनेचे धनुषबाण आहे,कमळ नाही,याची आठवण करुन दिली असता,देशात माेदीच येणार असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.एका महाभागाने तर मी काँग्रेसी असून यावेळी मी मोदींना मत देणार असल्याचे जोशात सांगितले.यावर,जनतेमधूनच…त्याला ईडीची नोटीस मिळाली असल्याची मिश्कली केली!पब्लिक ही ईडी,मोदींचा कारभार आणि विरोधी पक्षांना घेऊन किती जागरुक आहे,याचीच जणू ही चूणूक होती….!
कन्हानमधील रस्त्यावर लावलेल्या फलकांमध्ये मोदी किवा आमदार जयसवाल यांचेच फलक सर्वाधिक होते.त्या फलकांवर महायुतीचे उमेदवार राजु पारवेंचे छायाचित्र नसल्याकडे पब्लिकचे लक्ष वेधले असता,ही मोदींची निवडणूक आहे,उमेदवारांची नाही,असे उत्तर मिळाले!
४ जून रोजी जेव्हा मतदान मोजणीनंतर निकाल लागतील तेव्हा जय-पराजयचे विश्लेषण पब्लिक कशी करणार आहे,याचेचे हे द्योतक होते.नागपूरात गडकरी हरले तर तो त्यांचा पराभव मानला जाईल,दहा वर्षांच्या कारभारावर जनतेची मोहर मानली जाईल, विजयी झालेत तर तो मोदींचा विजय मानला जाईल..!रामटेकमध्ये देखील अशीच स्थिती असून लोकसभेची ही देखील निवडणूक देशाच्या प्रत्येक मतदारसंघात नरेंद्र मोदी हेच लढत आहेत,उमेदवार नाही,पब्लिकचा मूड हेच सांगत होता…..!
सभा स्थळी आत जाण्यासाठी व्हीव्हीआयपी,व्हीआयपी तसेच सामान्य लोकांसाठीचे असे तीन प्रवेशद्वार होते.गेट क्रमांक २ मधून अशाच पत्रकारांना प्रवेश देण्यात आले ज्यांची ओळखपत्र बनली होती.यात ही डिजिटल मिडीयासाठी ओळख पत्र बनविण्यात आलेच नाही.दूसरीकडे प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मिडीयाकर्मींना मात्र ,प्रेस क्लबमधूनच वातानुकूलीत कारमध्ये सभास्थळावर घेऊन जाण्यात आले.ज्या डिजिटल माध्यमकर्मींना मोदींची सभा कव्हर करायची होती त्यांनी स्वत:च्या दुचाकीने सभास्थळ गाठले.एक किलोमीटर आधीच त्यांनाही आपली दुचाकी पार्किंगस्थळावर ठेवावी लागली.कन्हानचा सत्रापूरचा बोगदा पायी पार करावा लागला.नागपूरातील आरओबीप्रमाणे तो ही पाण्याने भरला होता!
जनता ही बोगद्यातील चिखल तुडवीत सभास्थळी जात असताना जेमतेम एका वर्षा पूर्वी तो रेल्वेने बांधलेला आरओबी असल्याचे गावक-यांनी सांगितले.पाऊस असो किवा नसो पाण्याने सतत भरलेल्या त्या ही बोगद्याचे छायाचित्र सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले असून जनतेच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या या ‘विकासाची’देखील तक्रार काही जागरुक नागरिकांनी रेल्वेच्या वरिष्ठांकडे केली असल्याची माहिती समोर आली.
याच प्रवेशद्वारावर दोन वेगवेगळ्या गावावरुन आलेले एक दिव्यांग पुरुष आणि एक महिला यादेखील अनेक तास ताटकळत आतमध्ये जाण्यासाठी बसून होते.मात्र,सुरक्षेच्या कारणावरुन कर्तव्यावर असणा-या पोलिसांनी त्यांना शेवटपर्यंत आत सोडलेच नाही.या दिव्यांगांपासून व्हीआयपींच्या सुरक्षेला कोणता धोका उद् भवणार आहे?असा सवाल ’सत्ताधीश’ने पोलिसांना केला असता,आम्हाला तसे आदेश आहेत,यांनी सर्वसामान्यांच्या गेटमधून आत जावे,असा उरफाटा सल्ला त्यांनी दिला.यावर पायाने चालू न शकणा-या माजी महिला सभापतींनी,याच गेटमधून अनेक नेते आत गेले त्यांच्यासोबतच्या शेकडो कार्यकर्त्यांना कोणतीही तपासणी न करता कसे आत सोडले?असा सवाल केला,याचे कोणतेही उत्तर पोलिसांकडे नव्हते.पोलिस विभाग नियम सर्वांनासाठी सारखे राबवित नसली तरी किमान दोन दिव्यांगाना नियम बाजूला सारुन आत सोडले असते तर पोलिस विभागातील वर्दी खालील ‘संवेदनशीलता’दिसली असती मात्र,असे घडले नाही.
सर्वसामान्यांसाठी असणारे प्रवेश द्वार आणखी लांब असून या दोन्ही दिव्यांगांची शारीरिक स्थिती एवढा मोठा फेरा मारुन आत जाण्याची नव्हती….!त्या प्रवेशद्वारातून आत जरी गेले असते तरी अतिशय ओबडधोबड असणा-या मैदानात प्रवेश केल्यानंतर, डोमपर्यंतचे अंतर कापणे त्यांना शक्यच झाले नसते,एवढे अंतर डोम आणि त्या प्रवेशद्वारापर्यंतचे होते.नियमांवर बोट ठेवणा-या पोलिस विभागाने मग नेत्यांसोबतच्या शेकडो कार्यकर्त्यांनाही सर्वसामान्यांच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश घेण्याची सूचना का केली नाही?तिथे खाकी वर्दीचा रुबाब चालला नाही मात्र,दोन दिव्यांगांवर वर्दीचा चांगलाच रुबाब पोलिसांनी झाडला व आपल्या कर्तव्याची इतिश्री केली.
व्हीआयपींना सुरक्षीत जाऊ देणे पोलिसांचे कर्तव्य असले तरी सर्वसामान्य जनतेचीही सुरक्षा ही पोलिस विभागावरच असते याचा मात्र, मोदींच्या सभेतील सुरक्षा सांभाळणा-या पोलिस विभागाला विसर पडला.सभा संपल्यानंतर जे एकमेव प्रवेश द्वार सर्वसामान्य जनेतसाठी होते तेच अनेक तास पोलिसांनी बंद करुन ठेवले!व्हीआयपींच्या गाड्या आधी सुरक्षीत जाऊ देण्यासाठी पोलिसांनी सभास्थळावरुन बाहेर निघू पाहणा-या लाखो गावक-यांना अडवून ठेवले.त्यामुळे एकसाथ गर्दीचा प्रचंड रेटा प्रवेशद्वारावरच अडकल्याने चेंगराचेंगरीची घटना घडू शकली असती,याचेही भान पोलिस विभाग तसेच आयोजकांनी ठेवले नाही.
अशा कोणत्याही कार्यक्रमात काेणताही व्हीआयपीं नव्हे तर सर्वसामान्य पब्लिक चेंगरल्या जात असते,भारतात घडलेल्या अनेक दुर्घटनांचा इतिहास हेच सांगतो. निवडणूकीत सत्ताधा-यांच्या साड्या वाटपात अनेक माता-भगिनींचे प्राण गेलेत तर नुकतेच नागपूरमधील सुरेश भट सभागृहातही हजारो कामगार महिलांना एकसाथ बोलावल्यामुळे भाजपच्या किचन किटच्या वाटप कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन, एक महिला मृत्यमुखी तर ५० महिला या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.मोदी तसेच इतर व्हीव्हीआयपींची सुरक्षा महत्वाची असली तरी निवडणूक हा,लोकशाहीचा उत्सव लोकांचा आहे,हे विसरता येत नाही.अश्यावेळी व्हीआयपींसोबतच सर्वसामान्य जनतेची देखील सुरक्षा पोलिस विभाग तसेच आयोजकांसाठी तितकीच महत्वाची होती मात्र,मोदींच्या या सभेत असे घडले नाही.
असे असले तरी पब्लिकमधील नेत्यांचे काही कार्यकर्ते यांनी माध्यमकर्मी हे जनतेचे बोल ‘ऑन कॅमरा’ रेकॉर्ड करीत असल्याचे बघून ’जय श्री राम’,’चारसो पार’चा नारा देऊ लागले.त्यांच्याकडे कॅमरा वळवला असता,आम्हाला कोणताही त्रास नसल्याचे ते म्हणाले.लाखोंच्या संख्येने आलेल्यांना एकच प्रवेशद्वार का?असला तरी मुख्य रस्त्यावर दुभाजक असल्यामुळे एक रस्ता पब्लिकसाठी मोकळा ठेऊन दुसरा रस्ता व्हीआयपींसाठी का ठेवला नाही,असा प्रश्न त्यांना केला असता,ते माध्यमांचे काम आहे सांगणे,अामचे नाही,असे चमत्कारिक उत्तर या रामभक्तांनी दिले.
थोडक्यात,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतक्या लांबून खास नागपूर तसेच रामटेक लोकसभेचे उमेदवार असणारे नितीन गडकरी व राजू पारवे यांच्यासाठी मत मागण्यासाठी कन्हानलाआले,आपल्या या दोन्ही उमेदवारांसाठी त्यांनी मत देखील मागितले.अधिकांश गावक-यांनीही मोदींनाच मत देणार असल्याची ग्वाही ‘सत्ताधीश’च्या कॅमरासमोर दिली मात्र,त्याच मोदींचे भाषण जेव्हा सुरु झाले त्याचवेळी गावक-यांना घराकडचा रस्ता आठवला,असे का घडले?याचे उत्तर कोणालाही देता येणार नाही कारण ‘ये जो पब्लिक हैे वो….!’




आमचे चॅनल subscribe करा
