फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकेदार,कुंदा विजयकर,नागपूरे आणि...सोसायटीचा प्लॉट

केदार,कुंदा विजयकर,नागपूरे आणि…सोसायटीचा प्लॉट

Advertisements

५,६३८ चौ.फूटांच्या हक्काच्या प्लाॅटसाठी विनय नागपूरेंचा बाहूबळींशी प्रदीर्घ लढा

नगर भूमापन कार्यालय,महानगरपालिकेतील दस्तावेजांमधील गौडबंगाल अखेर रद्द

न्यायालयात सेल डीड रद्द करण्याचा लढा अद्याप सुरुच

नागपूर,ता.३ जानेवरी २०२४: सिव्हिल लाईन्ससारख्या अतिशय पॉश कॉलनीत ‘दुग्ध विकास कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था’नामक सोसायटीचे एकूण १५ प्लॉट्स आहेत.यातील २०६/१२ हा प्लाट तक्रारकर्ते विनय भूपेंद्र नागपूरे यांच्या कुटूंबियांचा असून २०६/१३ हा प्लॉट माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांचा आहे.मूळात १९८१ साली हा प्लाट सुनील केदार यांचे सख्खे काका हरिभाऊ केदार यांच्या नावे होता.सिटी सर्व्हेमध्ये देखील याची नोंद आहे.२००५ साली सुनील केदार हे अंदाजे ५ हजार ४०० चौ.फूटांच्या या जागेवर राहावयास आले.याच दरम्यान जिल्हा बँकेचा घोटाळा समोर आला.परिणामी बजाज नगर येथील घरातून सुनील केदार सिव्हिल लाईन्स येथे वडीलांच्या तीव्र नाराजीतून राहावयास आल्याची चर्चा होती. या घरात आर.रमण नामक भाडेकरु राहत होते,त्यांच्याकडून घर रिकामे करुन घेण्यात आले.

या सोसायटीमध्ये एकूण १५ प्लॉट्स होते त्यातील २०६/११ हा रस्त्यासाठी आरक्षीत होता तर २०६/१४ ही सार्वजनिक वापरसाठीची(पीयु) जागा होती.२०६/१ ही चिटणवीस यांची जागा होती तर २०६/२ हा प्लॉट एमएससीबीचे सबस्टेशन आहे.अशा प्रकारे १५ पैकी कोणत्याही प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारामध्ये कोणताही घोळ नव्हता मात्र माजी मंत्री सुनील केदार यांच्या घराला लागून असलेल्या प्लॉट क्रं २०६/१२ या ५ हजार ६३८ चौ.फूटांच्या प्लॉटाबाबत मात्र अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे..

ही एक लहानशी सोसायटी असून केदार या ठिकाणी २००५ मध्ये राहावयास आले.२५ जानेवरी २००६ रोजी माजी महापौर कुंदा विजयकर यांनी सोसायटीत एक अर्ज सादर केला.या अर्जात या प्लॉटचे मूळ मालक असलेले हरिभाऊ केदार यांच्या पत्नी उषा हरिभाऊ केदार यांच्या ऐवजी मला सोसायटीचे सभासद करा,अशी मागणी करणारे पत्र त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांना लिहले.या पत्रामध्ये नंतरच्या काळात खूप खोडाखोडी झाल्याचे दिसून पडतंय. याच अर्जात,जोपर्यंत सोसायटीचा हा प्लॉट माझ्या नावे ट्रांसफर होत नाही तोपर्यंत उषा हरिभाऊ केदार तसेच कुंदा विजयकर अशी आमच्या दोघींचीही नावे सभासद म्हणून समाविष्ट ठेवण्याची मागणी कुंदा विजयकर यांनी केली.कुंदा विजयकर या सुनील केदार यांच्या सासू आहेत,हे विशेष.

(छायाचित्र : माजी महापौर कुंदा विजयकर यांचा सोसायटीचे सभासद होण्याकरीता अर्ज व प्लाट ट्रान्सफरसाठीची मागणीचा अर्ज)

मूळात एक पत्र सभासद होण्यासाठी विजयकर यांनी लिहले त्यात, त्याच अर्जात दोघींनाही सभासद म्हणून ठेवण्याची मागणी त्यांनी केली.नियमानुसार यातील कोणतीही एकच बाब होऊ शकत होती.या अर्जात खोडाखाडी करुन हाताने लिहण्यात आले होते.विशेष म्हणजे ज्या तारखेला कुंदा विजयकर यांनी हा अर्ज सोसायटीच्या पदाधिका-यांना दिला अगदी त्याच तारखेला म्हणजे २५ जानेवरी रोजीच सोसायटीचे सचिव निर्मलकुमार शंकरराव आठवले यांनी तो प्लॉट १५ हजार रुपये ट्रांसफर फी म्हणून चेकने स्वीकारले व प्लॉट कुंदा विजयकर यांच्या नावे करुन दिला.

[छायाचित्र :  वाटनीपत्र दि. १२-१४/५/२००४ ने आखीव पत्रीकेला नामांतरनास विनय नागपुरे चा आक्षेप दि १६.०६.२००४]

अर्ज आला होता सोसायटीचा सभासद होण्यासाठी मात्र,आठवले यांनी प्लॉटच त्यांच्या नावे ट्रांसफर केला.हा व्यवहार करीत असताना  सोसायटीने नियमानुसार मृत्यू पत्र,विक्री पत्र,बक्षीस पत्र,आखिव पत्रिका(सिटी सर्व्हे प्रॉपर्टी कार्ड)कोणतेही दस्तावेज यांची नोंद घेतली नाही व कुंदा विजयकर यांच्या नावे हा प्लॉट ट्रांसफर केला.

(छायाचित्र : वाटनीपत्र दि. १२-१४/५/२००४ ने आखीव पत्रीकेला नामांतरनास विनय नागपुरेचा आक्षेप दि १६.०६.२००४)

२४ मार्च २००३ रोजी केदार यांच्या प्लॉटला अगदी लागून असलेल्या २०६/१२ या प्लॉटचे मूळ मालक भूपेंद्र रामचंद्र नागपूरे यांचे निधन झाले.परिणामी नागपूरे यांच्या तीन मुले व एक मुलगी यांच्या कुटूंबियांमध्ये वाटणी पत्र तयार करण्यात आले.मात्र,सर्वात मोठा भाऊ असलेले अमोल नागपूरे यांनी या वाटणी पत्रात आई वत्सला नागपूरे यांचे नाव टाकले नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.या वाटणी पत्रा विरोधात याचिका दाखल केली.७ डिसेंबर २००६ रोजी अमोल नागपूरे यांनी नागपूर महानगरपालिकेत अर्ज करुन वाटणी पत्रानुसार नामांतरणासाठी अर्ज केला.या अर्जाच्या विरोधात आई वत्सला आणि अमोल यांचा धाकटा भाऊ विनय नागपूरे यांनी आक्षेप नोंदवला,जो मनपाच्या रेकॉर्डवर देखील आहे.

८ जानेवरी २००७ रोजी सिटी सर्व्हेत एक अर्ज दाखल करण्यात आला.नगर भूमापन अधिकारी नागपूरच्या कार्यालयात आलेल्या या अर्जात सर्व नागपूरे कुटूंबियांच्या म्हणजे अर्जदारांच्या चक्क खोट्या सह्या होत्या!याची साक्षांकित प्रत वाटणीपत्रासोबत ‘अज्ञातांनी‘ जोडली.मूळात या विभागात असा कोणताही अर्ज आल्यास रेकॉर्डवर असणा-या नावाच्या व्यक्तींना नोटीस पाठविल्या जातात.(फॉर्म क्र.९).मात्र,या अर्जात आई वत्सला,अमोल,योगेश आणि बहीण अल्पना यांच्या खोट्या सह्या होत्या.विनय नागपूरे यांची स्वाक्षरी नव्हती कारण त्यांनी सिटी सर्व्हे कार्यालयात आधीच आक्षेप नोंदवला होता.

(छायाचित्र : माहीतीच्या अधिकारा अंर्तगत प्राप्त नामांतरन अर्ज व वाटणीपत्राची खरी सत्यप्रत)

८ जानेवरी २००७ रोजी हा अर्ज दाखल झाला आणि ३० एप्रिल २००७ रोजी नामांतरन घडविण्यात आलं.महत्वाचे म्हणजे शाहाकार नामक जो अधिकारी ३१ मार्च २००७ रोजी सेवानिवृत्त झाले,त्यांनीच १२ एप्रिल २००७ रोजी नोटीस पाठवली!

३० एप्रिल २००७ रोजी आखिव पत्रिकेवर हे नामांतरन घडले आणि ६ ऑगस्ट २००७ रोजी अवघे ४६ वय असणारे थोरले बंधू अमोल नागपूरे यांचे ह्दयघाताने निधन झाले.२००६ मध्ये नागपूरे बंधूंना सावनेर येथील खापा तसेस रामटेक येथील लोह डोंगरी येथील मॅग्नीजच्या खाणी आवंटित झाल्या होत्या.मात्र,सावनेर हे क्षेत्र सर्वस्वी केदार यांची राजकीय भूमी असल्याने नागपूरे यांना कायदेशीररित्या आवंटित झालेल्या खाणींचे कंत्राट रद्द झाले,याचा जबर मानसिक धक्का अमोल यांना बसला असल्याचा दावा विनय नागपूरे यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना केला.अमोल यांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचे विनय सांगतात.

६ ऑगस्ट २००७ रोजी अमोल यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोनच वर्षात आई वत्सला यांचाही मृत्यू १७ ऑगस्ट २००९ मध्ये झाला.परिणामी,अमोल यांच्या पत्नीने अविभाजित हिस्सा ज्याचा वाद (पार्टीशन डीड)न्यायालयात प्रलंबित असताना तो विकण्याचा निर्णय घेतला.यावर विनय नागपूरे यांनी अमोल यांच्या पत्नीला बाजार मूल्य किवा रेडीरेकनरच्या हिशेबाने त्यांनाच संपत्ती विकण्याचा प्रस्ताव दिला.

(छायाचित्र : सोसायटी द्वारे दिलेली माहिती)

मात्र,१० मे २०११ रोजी विनय नागपूरे यांनी प्रस्ताव दिला असतानाही, माजी महापौर कुंदा विजयकर यांच्या दबावात मनपात १२ ऑक्टोबर २०११ रोजी वारसदारांमध्ये कोणतीही नोटीस न देता अमोल यांच्या पत्नी व तिन मुलींचे नाव चढवण्यात आले,असा आरोप विनय करतात.२००९ मध्ये न्यायालयाचे आदेश असताना की या मालमत्तेच आई वत्सला या देखील समसमान भागीदार असताना न्यायालयाच्या आदेशाची अवमानना मनपा अधिका-यांनी केली.नोटशीट न लिहता ७ ऑक्टोबर २०११ रोजी अमोल यांच्या पत्नीचा अर्ज सादर झाला व अवघ्या पाचच दिवसात १२ ऑक्टोबर २०११ रोजी नामांतरन करण्यात आले.

मालमत्तेवर अमोल यांच्या पत्नीचे नाव चढताच त्यांनी ११ जानेवरी २०१२ रोजी साेसायटीचे सचिव आठवले यांची ‘स्माईल रिअलेटर्स प्रा.लि’या कंपनीला जी २००८ मध्ये स्थापन झाली होती,या कंपनीला आपली मालमत्ता विक्री केली.या संपूर्ण व्यवहारात जी मालमत्ता अस्तित्वातच नाही त्यांचं ही विभाजन झालं!मनपाच्या फाईलमध्येच सोसायटीत पहीला माळा व दूसरा माळा अस्तित्वात नसल्याचा उल्लेख असताना त्यांचे ही विभाजन झाल्याचे दाखविण्यात आले!

या संपूर्ण व्यवहाराला विनय नागपूरे यांनी कोर्टात आव्हान केले.ज्या घरात ते रहात आहेत ते घर खरेदी करण्याचा प्रथम अधिकार हा त्यांचाच आहे,अशी याचिका त्यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केली.जानेवरी मध्ये आठवले यांच्या कंपनीला ही मालमत्ता विक्री झाल्यावर फेब्रुवरीत विनय नागपूरे यांनी नोटीस पाठवली व मार्चमध्ये याचिका दाखल केली.

(छायाचित्र : निर्मलकुमार आठवले, सोसायटी सचिव विरुद्ध २००५ डिसेबंर पासुनची पोलिस ठाण्यातील तक्रार)

कोर्टाने २३ मार्च २०१६ मध्ये संबंधित मालमत्तेवर विनय नागपूरे यांचा दावा मान्य केला.आजतागत ही मालमत्ता विनय नागपूरे यांच्या ताब्यात आहे.१९९५ पासून सर्व प्रकारचे कर,वीज बिल,टेलीफोन बिल,झालेले पत्रव्यवहार इत्यादीची दखल न्यायालयाने घेतली.मात्र,दोन जागी माझ्या पत्र व्यवहाराची दखल न्यायालयाच्या निकालात सुटली असल्याचे विनय नागपूरे सांगतात.सिटी सर्व्हेत दोन जागी नागपूरे यांनी आक्षेप नोंदवले होते.माहितीच्या अधिकारात सिटी सर्व्हे कार्यालयात तसेच मनपामध्ये त्यांचा प्लॉट हडपण्यासाठी जो बोगस व्यवहार झाला,त्याची संपूर्ण माहिती विनय नागपूरे यांनी मिळवली.

याच दरम्यान अनेकदा सुनील केदार यांनी घरी येऊन ‘घर खाली कर,आम्ही हे घर खरेदी केले आहे’‘बाहेर उचलून फेकून देऊ’अशा धमक्या दिल्या असल्याचा आरोप विनय नागपूरे यांनी केला.केदार ही फार-फार मोठी राजकीय हस्ती असल्यानेच आतापर्यंत सोसलेली वेदना,जिवाची भीती ही आत दाबून ठेवली होती,असे ते सांगतात.मॉर्निंग वॉक,सायंकाळचे फिरणे सगळं बंद केलं होतं.योगेश आणि माझे कुटूंबिय आज ही या सहा खोल्यांमध्ये रहात असल्याचे त्यांनी सांगितले.

रेंट कंट्रोल ॲथोरिटी ही उपजिल्हाधिकारी यांच्याकडे असते.त्यांनी देखील केदार यांच्या दबावात न्यायनिवाडा केला,ज्याला न्याय म्हणता येणार नाही,तो माझ्यासारख्या अगदी सामान्य माणसासोबत सरकारी नोकरशाहीने केलेला अन्यायच होता,असे विनय नागपूरे सांगतात.

आठवले यांच्या कंपनीतर्फे मला माझी मालमत्ता मिळू नये यासाठी न्यायालयात धाव घेण्यात आली होती मात्र, कोर्टाने त्यांची याचिका खारीज करण्यापूर्वीच त्यांनी आपली याचिका मागे घेतली…!

हा सर्व दुष्प्रकार केदार आणि माझा प्लॉट,२०६/१२ आणि २०६/१३ लागून असल्यामुळेच झाला असल्याचे विनय सांगतात.हा लढा मी २०११ पासून प्रत्यक्षरित्या लढत आहे मात्र, अप्रत्यक्षरित्या हा लढा केदार तसेच स्वत:च्याच काही कुटूंबियांविरुद्ध २००६ पासून सुरु असल्याचे ते म्हणाले.

याच मालमत्तेच्या संदर्भात सुप्रिडेंट ऑफ लॅण्ड रेकॉर्ड या अधिका-याला सदर पोलिस ठाण्यात बयाणासाठी बोलविण्यात आले होते.मात्र,त्यांचे बयाण एवढ्या मोठ्या राजकीय पुढा-याच्या दबावा पुढे कसे झाले असेल?असा प्रश्‍न नागपूरे करतात.सध्या हे अधिकारी नगर येथे कार्यरत आहेत.

२०१९ साली मी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.तत्कालीन पोलिस आयुक्त व्यंकटेशन यांनी चौकशीचे आदेश दिले होते तर भूषणकुमार उपाध्येय यांनी सीआयडी हस्ताक्षर परिक्षणा नंतर खोटे हस्ताक्षर करणा-या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या संपूर्ण सत्य-असत्याच्या लढाईत दिवंगत संजय मानापूरे यांनी फार-फार मोलाची साथ दिली.जो काही गैरव्यवहार कुंदा विजयकर यांच्या काळात सोसायटीच्या सचिवांनी केला होता,त्या १५ हजार रुपयांच्या धनादेशाची प्रत तसेच सोसायटीची संपूर्ण मूळ कागदपत्रे त्यांनी त्यांच्या मृत्यू पूर्वी मला बोलावून सुपुर्द केली,असे नागपूरे सांगतात.उपनिबंधक सहकारी संस्थेत प्लॉट क्र.२०६/१२ हे आज ही कुंदा विजयकर यांच्या तर प्लॉट क्र.२०६/११ हे भूपेंद्र नागपूरे यांच्या नावे असल्याचे माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेल्या तब्बल ४१३ पानांमध्ये नमूद असल्याचे नागपूरे यांनी सांगितले.

आज ही कोर्टात लढा सुरु असून प्लॉटची सेल डीड रद्द झाली पाहीजे यासाठी लढत असल्याचे नागपूरे यांनी सांगितले.खोट्या सह्यांनी केलेली नामांतरणे,सिटी सर्व्हेतील रेकॉर्ड इत्यादी कोर्टाच्या आदेशातून रद्द झाले आहे.

वडीलोपार्जित कष्टाचे घर म्हणजेच आयुष्यभराचा निवारा असतो,या निवा-याशी निगडीत कुटूंबातील भावी पिढ्यांचे भविष्य असून, निदान भारतासारख्या देशात कोणत्याही माणसासाठी स्वत:चे घर ही फार-फार संवेदनशील बाब असते.अश्‍या या घरावरच एखाद्या राजकीय पुढा-याचा डोळा आल्यास एखाद्या सर्वसामान्य माणसाला किती तप,किती दशके अशी मानसिक आणि शारीरिक वेदना भाेगावी लागत असते,याचे ज्वलंत उदाहरण विनय नागपूरे यांचे सांगता येईल.त्यांच्या जिद्दीला व त्यांच्या चिवट लढ्याला ‘सत्ताधीश’चा सलाम.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या