

‘सोलर’चे दाेषी कोण?व्यवस्था,लोभ की नेते?
४८ तास उलटले तरी दोषींवर कठोर कारवाईची भाषा ना नोकरशाहीने केली ना विधी मंडळात उच्चारली गेली
दहा हजार पगारात लाख मोलाचे जीव हकनाक बळी
नागपूर,ता.१८ डिसेंबर २०२३: संरक्षण साहित्याचे उत्पादन करणा-या बाजारगाव येथील ‘सोलर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड’ या कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लान्टमध्ये रविवारी सकाळच्या पाळीत पॅकिंग सुरु असताना भीषण स्फोट झाला व या पाळीत काम करणा-या एकूण १२ श्रमिकांपैकी ९ श्रमिकांचा मृत्यू झाला,तीन श्रमिक हे त्यावेळी नेमके त्या यूनिटच्या इमारतीच्या बाहेर असल्यामुळे दैव बलवत्तर म्हणून बचावले.मृत्यू पावलेल्यांमध्ये ६ महिला तर तीन पुरुष होते.मृतकांची नावे युवराज चारोडे राहणारा बाजारगाव,आेमेश्वर मच्छीके राहणारा चाकडोह ता.नागपूर,मीता उईके राह.अंबाडा सोनक ता.काटोल,,आरती सहारे रा.कामठी ता.कोटोल,श्वेताली मारबते रा.कन्नमवार जि.वर्धा,पुष्पा मानपुरे रा.शिराळा जि.अमरावती,भाग्यश्री लोणारे रा.भुज तुकुम जि.अमरावती,रुमिता उईके रा.ढगा.जि. वर्धा,मोसम पटेल रा.पाचगाव जि.भंडारा अशी नावे आहेत.मृतकांची ही नावे नेमकी काय सूचित करतात?स्फोटके हाताळणारे त्यांचे हात आणि त्यांचे कौशल्य हे त्यांच्या मृत्यूसाठी जबावदार ठरले का?कोणत्याही कंपनीतील अधिकारी किवा अभियंते यांच्यासोबत अश्या दूर्घटना का घडत नाही?या ही घटनेत एक सुपरवाईजर सोडल्यास फक्त श्रमिकांचाच मृत्यू झालेला आढळतो,हे सर्व श्रमिक पोटाची खळगी भरण्यासाठी व आपापल्या कुटूंबियांचा आधार बनून या कंपनीत अतिशय कमी पगारावर काम करीत होती,निर्धन असणं आणि गरजू असणं हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले,हेच या ही दूर्घटनेतून स्पष्टपणे अधोरेखित झाले.आज विविध माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक मृतकाच्या घरच्या परिस्थितीचे वर्णन हे काळीज हेलावणारे होते.
ही कंपनी भारतीय लष्करासाठी पूर्णत:स्वदेशी मल्टी मोड हँडग्रेनेड्स व ड्रोन तसेच नौदलासाठी स्वदेशी बनावटीच्या फ्यूज वायडीबी-६० ची निर्मिती करीत होती.ही कंपनी अनेक देशांमध्ये संरक्षण साहित्याची निर्यात करते.विशेष म्हणजे २०१४ पूर्वी ही कपंनी बारुद बनवित असे,असे सांगितले जात आहे.२०१४ नंतर केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात फार मोठा बदल करीत ऑडिनन्स फॅक्टरीत ४० टक्के खासगी गुंतवणुकीला परवानगी बहाल केली,परिणामी अश्या कपंनीत काही मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी गुंतवणूक केल्याची खासगीत चर्चा आहे,या ही कंपनीचे टर्नओवर बघता बघता २५ हजार कोटींचे झाल्याची माहिती याच कंपनीच्या वेबसाईटवर वाचायला मिळते!२०१४ नंतर सोलर कंपनीचेही नशीब पालटले मात्र, अश्या कंपनीत सर्वात जास्त जोखिमेेचे काम करणारा निर्धन श्रमिक हा दूर्घटनेनंतर १३ पॉलिथिनमध्ये छिन्नविछिन्न अवयवांच्या रुपात त्यांच्या कुटूंबियांना सोपवला जात आहे!

(छायाचित्र : झाकपाक कशासाठी?)
विशेष म्हणजे केमिकल टीएनटी,आयुधे ज्वलनशील ,साहित्य,स्फोटके हाताळणा-या या श्रमिकांना सुरक्षेचे प्रशिक्षण दिल्या गेले होते का?दररोज एकाच प्रकारचे काम करीत असल्यामुळे या कंपनीचे व्यवस्थापन अश्या जोखिमेप्रति निष्काळजी झाले होते का?दूर्घटना नेमकी कशामुळे घडली हे अस्पष्ट असल्याचे सांगून या ही दूर्घटनेसाठी समिती गठीत करुन राज्य सरकार मोकळी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन देखील ‘दोषींना’शिक्षा देण्याविषयी एक शब्द ही उच्चारला नाही,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आज विधान सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील औचित्याच्या या मुद्दावर उत्तर देताना,दुर्घटना घडली,त्यात ९ श्रमिकांचा मृत्यू झाला व चौकशी समिती गठीत केल्याचे ‘सरकारी’उत्तर सभागृहाला दिले,यात कुठेही मानवता,श्रमिकांसाठी संवेदना आणि दोषींना कठोर शिक्षेचा उल्लेख किवा लवलेष ही आढळला नाही,अशी टिका त्यामुळेच समाज माध्यमात उमटली.
ज्या युनिटमध्ये ही दुर्घटना घडली अश्या अनेक यूनिट्स कंपनीमध्ये आहेत.स्फोटके तयार करणा-या कंपनीतील अश्या युनिट्समधील छतांच्या भिंती या इतर सामन्य इमारतींपेक्षाही चार पट जाड असतात.याचे कारण एका युनिटमध्ये स्फोट झाला तरी कंपनीच्या इतर यूनिट्सला धोका उद् भवू नये.या दूर्घटनेत देखील एवढा भीषण स्फोट होऊन देखील कंपनीतील इतर यूनिट्सला तसेच संपूर्ण प्लान्टला कोणताही धोका निर्माण झाला नाही.जितकी खबरदारी अश्या कंपन्या आर्थिक नुकसान होऊ नये,कंपनीचे दिवाळे निघू नये यासाठी घेते,तशी खबरदारी अमूल्य असे कष्टकरी श्रमिकांचे जीव धोक्यात येऊ नये यासाठी करताना का नाही आढळली?असा सवाल आता विचारला जात आहे.
या कंपनीचे मालक हे ‘सत्यनारायण नुवाल’ हे आहेत.हे नाव नागपूरांसाठी फार मोठे आहे.अनेक राजकीय नेते,मंत्री यांच्यासोबत नुवाल यांची घनिष्ट ओळख अनेक कार्यक्रमात दिसून पडली.कदाचित त्यामुळेच एवढी मोठी दूर्घटना घडल्यानंतरही शासनस्तरावर व राजकीय पातळीवर दोषींना शिक्षा देण्याची भाषा उच्चारलीच गेली नाही,असा आरोप केला जात आहे.कंपनीने मृतकांना प्रत्येकी २० लाख तर मुख्यमंत्र्यांनी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली व २५ लाखांचा मोल हा जरी मृतकाच्या कुटूंबियांना मिळणार असला तरी या कागदी तुकड्यांपेक्षा घरचा माणूस हा लाख मोलाचा असतो हे सांगायला कुण्याही तत्ववेताची गरज आहे का?
ज्यांची रविवारची सकाळ ही मृतकांसोबत शेवटची भेट ठरली,त्या प्रत्येक घरात एक जिवंत ‘श्मशान’कायमचे आता वसले आहे आणि श्मशानात जिवनातील कुठलाही आनंद साजरा केला जात नसतो,अगदी लाखो रुपये मिळून देखील अश्या रितीने गेलेल्या आपल्या माणसाची उणिव भरुन निघत नसते.
मृतकांमधील आरती सहारे हिने घरी कोणीही कमावता नसल्याने लग्नच केले नव्हते.तिच्या वडीलांना पक्षाघाताचा धक्का बसल्याने ते घरीच अंथरुणावर खिळून आहेत. आई वनिता या मुक्या आहेत!घरात एक धाकटी बहीण आहे जिच्या शिक्षणाची जबावदारी आरतीवरच होती.१२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या २३ वर्षाच्या आरतीने ४ वर्षांपासून स्फोटके हाताळायला सुरवात केली होती.तिच्या घरातल्या वेदनाही आता कायमच्या मुक्या झाल्या आहेत,२५ लाख रुपयांची मदत मिळून देखील तिची उणिव कशी भरुन निघणार?
पाचगाव येथे राहणा-या मोसम पटलेच्या वडीलांचे निधन तो १० वर्षाचा असतानाच झाले.आई शीला पटले यांनी दोन्ही भावांना हिंमतीने मोठे केले.पॉलिटेक्नीक केल्यावर मोसमने संभाजीनगर येथे नोकरी केली.अवघ्या ४ महिन्यांपूर्वीच तो सोलर कंपनीत कामाला लागला…!ज्या मुलाने आईचा आधार बनायचे वय होते त्याला या कंपनीच्या निष्काळजी व ढिसाळ व्यवस्थापनाने मृत्यूच्या दाढेत ढकलले,हे वास्तव नाही का? त्याला न्याय मिळणार का?कोण देणार?प्रशासन?राजकीय नेते?मायबाप सरकार?ते तर २५ लाखांची मदत जाहीर करुन कालच मोकळे झाले आहेत.
स्वेताली मारबते हिला आणखी दोन बहीणीच आहेत.घरची परिस्थिती हलाकीची असून आईवडील मोलमजुरी करतात.२० वर्षाच्या स्वेतालीने ३ वर्षांपूर्वी सोलर कंपनीत नोकरी स्वीकारली.नोकरीमुळेच स्वेतालीने कारखान्याजवळच कोंढाली येथे एक खोली भाड्याने घेतली होती व दररोज कंपनीच्या गाडीतून कामावर जात असे….!
३९ वर्षीय पुष्पा श्रीरामजी मानापुरे कारंजा येथे आपला मुलगा व मुलीसोबत राहत होती.नोकरी सांभाळून आपल्या मुलांचे संगोपन करीत होती.रविवारी सकाळी नेहमीसारखीच आपल्या दोन्ही मुलांचा निरोप घेऊन पुष्पा सोलर कंपनीत आल्या होत्या.घरी मात्र छिन्नविछिन्न अवयवांनी गेल्या…!
रुमीला विलास उईके हिच्याही घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची होती.तालुक्यातील जंगल क्षेत्रात असलेल्या ढगा या गावची रहीवाशी होती.बाजारगावला इतक्या लांबून येणे-जाणे शक्य नसल्याने तिने देखील कोंढाळील भाड्याची खोली घेतली होती.तिच्या अपघाताची बातमी गावात येऊन धडकताच…संपूर्ण गाव सुन्न झाले.
चंद्रपूर ब्रम्हपुरीपासून ३० किलोमीटर अंतरावर जंगलात वसलेले भूज हे छोटेसे गाव.येथील भाग्यश्री सुधाकर लोणारे या २३ वर्षीय तरुणीचा देखील मृत्यू कालच्या सोलर कंपनीच्या दुर्घटनेत झाला.घरात सर्वात लहान असणा-या भाग्यश्रीचा विवाह करण्याचा विचार तिच्या आई-वडीलांचा होता पण….?तिच्या तेरवीची तयारी आता केली जाईल…!
ही सर्व मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनद्वारे आधी परिसराची रेकी करावी लागली.स्फोटके नसल्याची खात्री करावी लागली.त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी तिथे पोहोचले.नमुने गोळा केले.पेट्रोलियम ॲण्ड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या पथकाने मलब्यात मृतदेहांचा शोध सुरु केला.कष्टकरी श्रमिकांचे छिन्नविछिन्न अवयव १३ पॉलिथिनमध्ये गोळा करण्यात आले……!
‘चमडी जाये पर दमडी ना जाये’या वृत्तीला बळी पडणा-या या श्रमिकांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा ख-या दोषींना शिक्षा मिळेल.इतक्या जोखिमेचे काम अश्या अकुशल श्रमिकांकडून करुन घेण्याला मायबाप सरकारकडून पायबंद बसेल,कुणालाही पाठीशी न घालता सर्वस्वी मानवी चूक असणा-या या घटनेमागील सत्य आणि तथ्य या घटनेची चौकशी करणारी समिती ही समोर आणेल,तेव्हा त्या कृतीचे मोल २५ लाखांहून अधिक असेल यात दुमत नाही.या कंपनीत आणखी कोणकोणत्या राजकीय नेत्यांची खासगी गुंतवणूक आहे का?याचा ही शोध समितीने घ्यावा,अशी मागणी केली जात आहे.
आज सर्व प्रसार-प्रचार माध्यमांमध्ये दोन बातम्या लक्ष वेधून घेणारे होते.‘नागपूरची आयटी हबच्या दिशेने झेप’आणि दूसरी बातमी होती ‘सोलर कंपनीतील भीषण स्फोटात ९ श्रमिकांचा मृत्यू’एकच शहर,माणसे,नेते,मंत्री मात्र….किती हा विरोधाभास!
१० जानेवरी २०२१ रोजी घडलेल्या अशाच एका दूर्घटनेनंतर अशीच एक समिती गठीत करण्यात आली होती.भंडारा जिल्ह्या सामान्य रुग्णालयात बालकांच्या अतिदक्षता विभागात १० नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू…!तिथे शॉर्ट सर्किट हे कारण ठरले तर बाजारगावात अकुशल कामगारांकडून अधिकाधिक जोखमिचे काम काढून घेण्याचा निष्ळकाळजीपणा भाेवला,इतंकच….!
…………………………..




आमचे चॅनल subscribe करा
