फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबेनी दयालचा ‘बँग बँग’ परफॉर्मन्‍सने तरुणाईला लावले वेड

बेनी दयालचा ‘बँग बँग’ परफॉर्मन्‍सने तरुणाईला लावले वेड

Advertisements

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या सातवा दिवस

नागपूर, ३० नोव्‍हेंबर २०२३: पांढ-या फ्रेमचा काळा गॉगल, गुळगुळीत टक्‍कल, चट्टयापट्याचे स्‍टाईलिश कपडे अशा अवतारात मंचावर अवतरलेल्‍या गायक, गीतकार परफॉर्मर बेनी दयालचे एक एक गाणे युवकांच्‍या अंगात ‘नशेसी चढ गई’ सारखे भिनत गेले आणि संपूर्ण पटांगण ‘नाचो नाचो’ म्‍हणत नाचू लागले.

खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाचा आज सातवा दिवस होता. बेनी दयाल यांच्‍या ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ साठी तरुणाईने चांगलीच गर्दी केली होती. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विभागीय आयुक्‍त विजयालक्ष्‍मी बिदरी, ज‍िल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, एनएमसीचे प्रशासक अभिजीत चौधरी, जीएसटीचे सहआयुक्‍त संजय बंगारतले, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, विभागीय माहिती आयुक्‍त राहूल पांडे, मणिकांत सोनी, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ. संजीव चौधरी यांच्‍या उपस्थितीत दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले.

बेनीचे ‘जो चाहे उल्‍फत हो गया’ या गीतासह मंचावर आगमन झाले. त्‍यानंतर त्‍याने ‘जिंदगी सितार हो गई’ हे गाणे सादर केले. ‘कैसे मुझे’, ‘तु मेरी दोस्‍त है’ अश्‍या त्यांच्या प्रत्येक गाण्‍यासह युवकांमध्‍ये उत्‍साह संचारत गेला. बसलेले लोक ‘इतना सोणा क्‍यू रब ने बनाया’, ‘दिल की यही खता है’ या गाण्‍यांसाठी जागीच उभे राहिले आणि ‘साथ हम चले’, नशेची चढ गई , ‘आदत से मजबूर’, ‘जादू होने को है’, या गाण्‍यावर थिरकू लागले. संगीताची नशा नंतर इतकी भिनत गेली की ‘के घुंगरू टूट गये’ म्‍हणत युवावर्गाने बेधुंद नृत्‍य केले. ‘चल छय्या छय्या’, ‘बत्‍तमीज दिल’ सारखी गाणी सादर करून बेनी दयाल ने युवकांना वेड लावले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
…….
‘मोहजाल’ ने दिला व्‍यसनमुक्‍तीचा संदेश –

एकटेपणा, रिकामपणामुळे युवक मोठ्या प्रमाणात व्‍यसनाकडे वळत असून नैराश्‍य, आत्‍महत्‍या, हत्‍यांसारखे प्रकार वाढत आहे. या व्‍यसनाच्‍या मोहजालातून मुक्‍ती मिळवायची असेल तर कुटुंबाचे सहकार्य हवे, असा संदेश देणारे प्रबोधनात्‍मक नाट्य ‘मोहजाल’ राधिका क्रियेशन्‍सतर्फे आज प्रस्‍तुत करण्‍यात आले.

प्रा. प्रसन्न शेंबेकर लिखित या नाटिकेचे दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले होते तर निर्मितीची बाजू सारिका पेंडसे यांनी सांभाळली.नृत्य दिग्दर्शन कुणाल आनंदम, सौरभ मसराम यांचे होते. नेपथ्‍य व प्रकाश योजना सतीश पेंडसे व किशोर बत्तासे, ध्वनी संयोजन मधुरिका एड यांचे होते. सारिका पेंडसे, डॉ भाग्यश्री चिटणीस, कांचन गोहणे, स्वप्निल जतकर, डॉ रवी गिरहे, सुधीर चिटणीस यासोबत चेतन अहिरे, दुर्गेश टीचुकले, आर्यन भाटी,पुष्पक उके,मिहीर आयाचित,हिमांशू मेहेर, वेदश्री अग्निहोत्री, सानवी जतकर, सिद्धी अंबाडे, शिप्रा विंचुरकर,मंगेश धनवटे, श्रेयस डोंगरे, मीमांसा जोशी, मेघश्याम बडकस, शांभवी खानविलकर अशा एकुण २५ कलावंतांचा यात सहभाग होता. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते या स्‍थानिक कलावंतांचा सत्‍कार करण्‍यात आला.

हजारो गजानन भक्‍तांनी ग्रहण केला खिचडीचा महाप्रसाद: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते झाले उद्घाटन

श्री गजानन विजय ग्रंथाच्‍या पारायणाने वातावरण भक्‍तीमय झाले –

ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर गुरुवारी गजानन भक्‍तांचा जनसागर लोटला. श्री गजानन विजय ग्रंथाच्‍या पारायणात सहभागी झालेल्‍या भक्‍तांसह हजारो भक्‍तांनी प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांनी तयार केलेल्‍या ३ हजार किलोच्‍या खिचडीचा महाप्रसाद ग्रहण केला.

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवामध्‍ये ‘जागर भक्‍तीचा’ उपक्रमांतर्गत आज सातव्‍या दिवशी श्रीगजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोज‍ित करण्‍यात आले होते. पारायणात हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.

सुरुवातीला संस्‍कार भारतीच्‍या अध्‍यक्ष कांचन गडकरी, निखिल गडकरी, अविनाश घुशे, गजानन भक्‍त गिरीश वराडपांडे, जयप्रकाश गुप्ता यांच्‍या हस्‍ते गजानन महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्‍यात आले. त्‍यानंतर ‘समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय’ , ‘अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक योगिराज गजानन महाराज की जय’ असा गजानन महाराजांच्या नामाचा जागर करत अत्यंत भक्तीमय, अज्ञात्मिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायणाला प्रारंभ झाला.

त्‍याचदरम्‍यान, प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांनी खिचडी करायला सुरुवात केली. तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंब‍िर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी अशा सुमारे तीन हजार किलो साहित्‍याचा वापर करून खिचडी तयार करण्‍यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते खिचडी महाप्रसादाच्‍या उपक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले व त्‍यानंतर महाप्रसाद वितरणाला प्रारंभ करण्‍यात आला. हजारो भक्‍तांनी या महाप्रसादाचा आस्‍वाद घेतला.

श्रीरंग वराडपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी यावेळी नलिनी वंजारी, अतुल साळगोळे यांच्‍यासह खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.

सामूहिकता व एकतेचा भाव: नितीन गडकरी

खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवात साहित्‍य, कला, संस्‍कृतीचा मेळ साधला जात असून त्‍यातून समाजात सांस्‍कृतिक मूल्‍य वृद्धींगत व्‍हावी, असा प्रयत्‍न आहे. यावर्षी ‘जागर भक्‍तीचा’ हा उपक्रम राबवला गेला. त्‍यालाही जनतेचा उत्‍स्‍फूर्त प्रत‍िसाद लाभला. आज संत गजानन महाराजांचे पारायण आणि महाप्रसादाचा भक्‍तांनी लाभ घेतला, याचा आनंद होत आहे. यातून सामूहिकता, एकतेची भावना निर्माण होण्‍यास मदत झाली. विष्‍णू मनोहरांनी एक चांगला उपक्रम महोत्‍सवात केला, त्‍याबद्दल त्‍यांचेही अभिनंदन करतो, अशा शब्‍दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.

.आज महोत्‍सवात …
सकाळी ६.३० वाजता – श्री विष्णूसहस्त्रनाम पठण व गीता अध्याय १२/१५ पठण
सायंकाळी ६.०० वाजता – आनंदी ग्रुपची नृत्‍यनाटिका ‘राम रतन धन पायो’
सायंकाळी ६.३० वाजता – गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेते पीयूष मिश्रा यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
……..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या