

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सहाव्या दिवशी ‘गण गण गणात बोते’ चा सर्वांगसुंदर प्रयोग
नागपूर, २९ नोव्हेंबर : अन्नाचा कधीही अपमान करू नका. अन्नाची नासाडी करू नका. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ आहे, भूक भागण्यापुरतेच अन्न खा, असा संदेश ‘गण गण गणात बोते’ या महानाट्यातून देण्यात आला. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सहाव्या दिवशी भव्य मंचावर गीत, संगीत, नृत्य, चलचित्र असा संगम असलेल्या या महानाट्याने संत गजानन महाराजांच्या जीवनकार्याचा पट उलगडला.
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, प्रा. संजय भेंडे, संजय दुधे, सामाजिक कार्यकर्ते हरीश सारडा, विजय मोलोकर यांच्या उपस्थिती दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
बैलगाडीतून श्री गजानन महाराज यांचे आगमन होताच पटांगणावर आतषबाजी आणि एकच उत्साह संचारला. काडीने चिलीम पेटवणे, कोरड्या विहिरीला पाणी लागणे आदीं चमत्कारिक प्रसंग प्रत्यक्ष मंचावर बघून प्रेक्षक थक्क झाले. एलएडी स्क्रीनवरील दृश्य आणि नाटकातील प्रसंग यांचा सुरेख मेळ साधत कलाकारांनी अतिशय तयारीने श्री गजानन महाराजांचे जीवनकार्य प्रेक्षकांसमोर जिवंत केले. प्रसंगानुरूप गीतांनी नाट्यरसिकांना खिळवून ठेवले. हे गज वंदना, गण गण गणात बोते, शंकराचे तांडव, चमत्कार घडला सारखी गीते, संगीत, नृत्य याची बहार आणली. गजानन महाराजांच्या समाधीच्या प्रसंगाने संपूर्ण सभागृह भावूक झाले.

१५० कलाकारांचा सहभाग असलेल्या ‘गण गण गणात बोते ‘ या नाटकाची निर्मिती स्व. सचिन सराफ मेमोरियल ट्रस्टच्या अनघा सराफ व वृंदा सराफ यांची होती तर लेखक व दिग्दर्शक देवेंद्र बेलणकर होते. संयोजिका व सहदिग्दर्शक रुपाली कोंडेवार-मोरे या होत्या. गजानन महाराजांची भूमिका डॉ. पीयूष वानखेडे यांनी अतिशय ताकदीने सादर करून रसिकांना महाराजांच्या दर्शनाची प्रचिती दिली. संगीत शैलेश दाणी यांचे, गीते मनोज साल्पेकर व शैलजा नाईक यांची होती तर संकलन मनोज पिदडी यांचे, रंगभूषा बाबा खिरेकर यांची होती. नृत्य दिग्दर्शन अमोल मोतेवार यांचे, प्रकाश योजना विशाल यादव यांची तर नेपथ्य सतीश काळबांडे यांचे होते. दिग्दर्शन सहाय्य अभिषेक बेल्लारवार व अमित सावरकर यांचे होते. प्रयोग व्यवस्थापनाची जबाबदारी अभय अंजीकर व दीपक गोरे यांनी पार पाडली. योगेश हटकर यांच्या स्पेशल इफेक्टमुळे नाटकात जीवंतपणा आला. नरेश गडेकर, मुकुंद वसुले आणि सारंग जोशी यांचेही नाटकासाठी विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व अभिजीत मुळे यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
उदयोन्मुख वादकांची सुरेल जुगलबंदी –
खासदार सांस्कृतिक महोत्सवात उदयोन्मुख कलाकरांना संधी देण्यात येत आहे. याच शृंखलेत आज प्रसिद्ध संवादिनीवादक श्रीकांत पिसे यांच्या नेतृत्वातील चमूने विविध वाद्यांचे ‘फ्यूजन’ सादर केले. संवादिनी, तबला, ड्रम्स, शहनाई, सरोद, दिलरुबा या वाद्यांची सुरेल जुगलबंदी यावेळी चांगलीच रंगली. संवादिनीवर श्रीकांत पिसे होते तर तबल्यावर राम खडसे, ड्रम्सवर कौस्तुभ घाटबांधे, शहनाईवर निखील खडसे, सरोद निरज ताटेकर, दिलरुबावर ऋषिकेश करमरकर यांनी अतिशय ताकदीने वादन केले. युवा वादकांचा नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या हस्ते कलाकरांचा सत्कार करण्यात आला.

खासदार सांस्कृतिक महोत्सवात आज ३००० किलोच्या खिचडीचा महाप्रसाद –
खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्या पटांगणात आज गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात सकाळी ६.३० वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण होणार असून ३००० किलोच्या खिचडीचा महाप्रसाद तयार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहणार आहे.
गजानन महाराजांच्या पारायणाला सकाळी ६.३० वाजता प्रारंभ झाल्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर खिचडी करायला सुरुवात करतील. तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंबिर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी या साहित्याचा वापर करून ही ३००० किलो खिचडी तयार केली जाणार आहे. पारायण झाल्यानंतर सुमारे ४५ हजार भक्तगणांना या महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय, जनतेला आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी घरून डबे घेऊन यावे व हा महाप्रसाद आपल्या कुटुंबियांसाठी घेऊन जावे.
……
उद्या गुरुवारी महोत्सवात …
सकाळी ६.३० वाजता – श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण व महाप्रसाद
सायंकाळी ६ वाजता – राधिका क्रियेशन्सचा नशामुक्ती अभियानांतर्गत ‘मोहजाल’ पथनाट्य
सायंकाळी ६.३० वाजता –बेनी दयाल यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’




आमचे चॅनल subscribe करा
