फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमफडणवीस मागच्या दारातून निघून गेलेत...!

फडणवीस मागच्या दारातून निघून गेलेत…!

Advertisements


राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्याच शहरात नाही ऐकला पिडीतेवरील अन्याय!

पिडीता सुनयनाने मांडली पत्रकार परिषदेत व्यथा

जीवनसाथी शादी डॉट.कॉमवर झाली फसवणूक,बलात्कार,हत्येचा प्रयत्न आणि न्यायासाठी ‘ती‘चा संघर्ष

नागपूर,ता.१८ जुलै २०२३: फर्राटेदार इंग्रजी बोलणा-या व आठ वर्ष शिक्षिका असणा-या कन्हान निवासी या तरुणीचं नाव सुनयनना खंडेलवाल.लग्नानंतर ती सुनयना गौरव जगनानी म्हणून ओळखू जाऊ लागली. ती मारवाडी समाजाची असून तिचे वडील हे एमएससीबी खापरखेडातून निवृत्त अभियंते आहेत.थोरल्या पीएच.डी.धारक मुलीचे मोठ्या थाटात लग्न केल्यानंतर त्यांनी धाकट्या मुलीसाठी जीवनसाथी शादी डॉट.कॉमवर स्थळ नोंदवले.गौरव आनंद जगनानी हा इसम ३० ऑगस्ट २०२१ रोजी आपले वडील आनंदकुमार जगनानी व धाकटा भाऊ सौरव जगनानीसोबत सुनयनाला बघण्यास आला. १७ जानेवरी रोजी साखरपूडा ठरला व २ मे रोजी लग्न ठरविण्यात आले.

हूंडा देण्यासही वडील तयार होते मात्र साखरपुड्याच्या तीन दिवस आधी दहा लाख रुपयांची मागणी करुन जगनानी यांनी साखरपुडा करण्यास नकार दिला.मात्र,अचानक सहा महिन्यांनतर पुन्हा तुझ्याशीच लग्न करायचे आहे असा आग्रह धरुन सुनयनासोबत भेट घेतली.गौरव हा मूळ पुण्यात स्थायिक असून ५ सप्टेंबर रोजी तो नागपूरात आला.जबरीने त्याने सुनयनासोबत लग्न होणार असल्याचे सांगून ५,६,७ व ८ सप्टेंबर रोजी शारीरिक संबंध जोडले.७ सप्टेंबर रोजी अश्‍लील व्हिडीयो तयार केला.महत्वाचे म्हणजे एक खोटे लग्नाचे प्रतिज्ञापत्र भरले ज्यावर गौरव जगनानी याने खोटी स्वाक्षरी केल्याचा आरोप सुनयना जगनानी हिने आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

९ सप्टेंबर २०२१ रोजी गौरव जगनानी परत पुण्याला पळून गेला व पुन्हा जीवनसाथी डॉट.कॉमवर अविवाहित असल्याचे स्टेटस त्याने ठेवले.यावर जाब विचारला असता मला शारीरिक संबंधांची सवय असल्याचे उत्तर त्याने दिले.मी माझ्या वडीलांनी दिलेल्या हूंडा परत मागितला,यावर गौरव जगनानी हा हिंदू असून देखील मला तोंडी ट्रिपल तलाक त्याने दिला,असा धक्कादायक आरोप सुनयना हिने केला.इतकंच नव्हे तर Annulment च्या तसेच लग्न रद्द करणा-या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास यानंतर तो बाध्य करीत असल्याचे सुनयना यांनी सांगितले.

या कटात गौरवचे वडील आनंदकुमार नाथमल जगनानी व धाकटा भाऊ सौरव जगनानी हे देखील सहभागी होते.गौरवने सुनयनाला एक कायदेशीर नोटीस पाठवली व मुंबईच्या एकता नावाच्या मुलीसोबत लग्न करीत असल्याचे सांगितले.यानंतर सुनयनाने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गौरव जगनानीविरुद्ध बलात्काराची व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यास गेले असता, सीताबर्डीतील एएसआय श्रीमती देवकर यांनी माझी तक्रार नोंदविण्यास नकार दिला.इतकंच नव्हे तर माझ्याकडून गौरव याचा मोबाईल क्रमांक घेऊन त्याला देवकर यांनी कॉल केला असल्याचे सुनयना यांनी सांगितले!

(छायाचित्र: सुनयना यांच्या घरी लग्नासाठी मागणी करण्यासाठी आलेले गौरव,आनंदकुमार व सौरव जगनानी)

१६ ऑक्टोबर २०२१ रोजी सुनयना या परत सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेल्या असत्या देवकर यांनी पुन्हा नकार दिला!त्याच दिवशी झोनल २ च्या तत्कालीन डीसीपी विनिता शाहू यांच्याकडे गेले असता शाहू यांनी सीताबर्डी पीएसला फोन करुन सुनयना यांची तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले व वैद्यकीय तपासणीसाठी नोटीस दिली.

मात्र,माझी तक्रार अर्धवट नोंदविण्यात आली,सकाळी १० वाजता पासून रात्री १० वाजेपर्यंत मला सीताबर्डी पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले आणि माझा वाहन परवाना देखील ठेऊन घेण्यात आल्याचा आरोप याप्रसंगी सुनयना हिने केला.

१६ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा नोंदवल्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी मेयोचे डॉ.भारत मडावी यांनी सीताबर्डी ठाण्यातील श्रीमती देवकर तसेच पोलिस ठाण्याचे प्रमुख अतुल सबनीस यांच्यासोबत षडयंत्र रचून मला मानसिक रोग असल्याचे प्रमाणपत्र दिले.यासाठी या सर्व लोकांनी जगनानी कुटूंबियांकडून सात ते दहा लाखांची लाच घेतल्याचा आरोप सुनयना यांनी पत्रकार परिषदेत केला.

२२ ऑक्टोबर रोजी गौरव जगनानी याने नागपूरचे पोलिस अायुक्त अमितेश कुमार यांना जे पत्र लिहले होते त्या पत्राची प्रत श्रीमती देवकर यांनी एफआयआरमध्ये जोडलीच नसल्याचे सुनयना यांनी सांगितले.यासोबतच गौरव जगनानीने जे पत्र पुण्याच्या पोलिस आयुक्तांना लिहले ते देखील देवकर यांनी जोडले नाही.विशेष म्हणजे २२ ऑक्टोबर २०२१ रोजी नागपूरच्या कौटूंबिक न्यायालयात गौरव जगनानीने पीए १३६५/२०२१ लग्न रद्द करण्याचा खटला दाखल केला त्या कागदपत्रांची देखील चार्टशीट मध्ये श्रीमती देवकर यांनी नोंद केली नाही.

२३ ऑक्टोबर २०२१ मध्ये सुनयना यांनी पुन्हा डीसीपी विनिता शाहू यांना मदतीसाठी पत्र लिहले.२७ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या पोलिसांनी गौरव व सौरव जगनानीला नागपूरातील एका लॉजमधून अटक केली.या विरोधात गौरव जगनानीचा अंतरिम जामीनाचा अर्ज ही रद्द झाला.२८ व ३० ऑक्टोबर २०२१ रोजी गौरव जगनानीचा पुन्हा जामीनाचा अर्ज रद्द झाला तर ३ नोव्हेंबर २०२१ रोजी दिवाळी सुट्ट्यांच्या काळातही गौरव जगनानीचा अर्ज सत्र न्यायालयाने नाकारला.

त्याच दिवशी सासरे आनंद जगनानी व दिर सौरव माझ्या घरी आलेत व त्यांनी माझी मानसिक प्रताडना केली,माझा व्हिडीयो देखील काढला,मला ब्लॅकमेल केले माझी मानसिक व शारीरिक कुंचबना केल्याचा आरोप सुनयना यांनी याप्रसंगी केला.या घटनेनंतर मी या दोघांविरुद्ध एनसी केली.

मी मानसिक रुग्ण असल्याच्या मेयोच्या खोट्या कागदपत्रांच्या अाधारे गौरव जगनानीला मुंबई उच्च न्याया लयाच्या नागपूर खंडपीठातून १८ नोव्हेंबर रोजी जामीन मिळाला.या कटात मुज्जमील हुसैन हे देखील सहभागी होते,असा आरोप सुनयना यांनी केला.

आश्‍चर्यची बाब म्हणजे याच मेयो रुग्णालयातील डॉ.आनंद सावजी यांनी मला तपासून मी मानिसिकरित्या सशक्त असल्याचे प्रमाणपत्र दिले! या पूर्वी १८ ऑक्टोबर २०२१ रोजी याच मेयो रुग्णालयातील डॉ. भारत मडावी यांनी मला मानसिक रुग्ण ठरवले होते,एक मानसिक रुग्ण एका महिन्याच्या आतच सशक्त आणि बरा होत असतो का?तो ही कोणत्याही औषधांशिवाय?असा प्रश्‍न सुनयना यांनी उपस्थित केला.

गौरव याने वडील,भाऊ आणि काही पोलिस अधिकारी यांना हाताशी धरुन वेळोवेळी माझे मानसिक खच्चीकरण केले.अखेर न्यायालयाने फक्त चार आठवड्यांचाच तात्पुरता जामीन त्याला दिला असल्याने गौरव हा मला २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पुण्याला बसने घेऊन गेला.त्या बसची तिकीट देखील त्याने सुनयना शाह नावाने बूक केली होती.पुण्यात मला एका दोन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये कोंडून ठेऊन माझ्यावर वारंवार बलात्कार केला व जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप सुनयनाने केला.

१८ डिसेंबर २०२१ रोजी गौरव याने माझ्या शरीरावर केमिकल फेकले व मला नागपूरात आणून सीताबर्डी पोलिस ठाण्यासमोर आणून सोडून दिले.२० डिसेंबर २०२२ रोजी सुनावणीच्या वेळी जगनानी कुटूंबियांनी मुझम्मील हूसैनसोबत मिळून कोर्टात गौरव विरुद्ध काहीही न बोलण्यासाठी दमदाटी केली. १८ फेब्रुवरी २०२२ रोजी गौरवने मला भर न्यायालयात ‘ट्रिपल तलाक’दिल्याचा आरोप सुनयना यांनी केला.

५ मार्च २०२२ रोजी गौरव जगनानी उच्च न्यायालयात शरण गेला.२९ मार्च रोजी खोटेनाटे बोलून गौरवला कंडिशनल जामीन मिळाला.यानंतर जगनानी कुटूंबियांनी सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केलेत.महत्वाचे म्हणजे कंडीशनल जामीनमध्ये घराचा पत्ता बदलता येत नाही मात्र याच दरम्यान गौरव ने घर बदलले.१७ ऑगस्ट २०२२ रोजी अखेर सत्र न्यायालयात गौरवने आणखी एक खोटा पत्ता सादर केला.४ नोव्हेंबर रोजी मी पुण्यातील विमान नगर पोलिस ठाण्यात गौरव विरुद्ध तक्रार दिली.३ डिसेंबर २०२२ रोजी मी पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात देखील गौरव विरुद्ध तक्रार देण्यास गेले असता भर पोलिस ठाण्यात मला तेथील महिला पोलिसकर्मीने मारहाण केल्याचा आरोप सुनयना यांनी केला.

सीताबर्डी पोलिस ठाण्यात गौरव व सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पीएसने माझ्याचविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली,माझे पुरावे नष्ट करण्यात आले.गौरव जगनानीचे वकील रोहीत मासूरकर यांनी देखील सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पीएससोबत मिळून आणखी एक खोटी एनसी माझ्या विरोधात केली असल्याचा आरोप सुनयना यांनी यावेळी केला.

सातत्याने माझ्यावर प्राणघातक हल्ले होत असल्याने मी नागपूर ग्रामीणचे एसपी व पुण्याच्या पोलिसांना हत्येचा प्रयत्न या आरोपात गौरव जगनानी व त्याच्या कुटूंबियांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पत्र लिहले.नागपूर ग्रामीणच्या एसपीचे मला पत्र मिळाले की माझी तक्रार सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पीएसकडे वर्ग करण्यात आली आहे!सीताबर्डी पीएसने माझी तक्रार न घेतल्याने मी क्रिमिनल डब्ल्यू पी केले. मी सर्व कायदेशीर यंत्रणांकडे निवेदन पत्र पाठवले.सदर पोलिस ठाण्यात मला जीवे मारण्याचा प्रयत्न ही माझी तक्रार दाखल करण्यात आली नाही मात्र २४ मे २०२३ रोजी मला राष्ट्रपती कार्यालयातून पत्र मिळाले.१ जुलै २०२३ रोजी मला मुंबई उच्च न्यायालयाचे देखील पत्र प्राप्त झाले असून माझी तातडीने मदत केली जावी असे त्यात नमूद केले आहे.

पंतप्रधान कार्यालयातूनही पत्र प्राप्त झाले की डीसीपी झोनल २ चे मदाने यांनी माझ्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी.मात्र मदाने यांनी कोणतीही कारवाई केली नाही.मला नागपूरच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे वारंवार विनाकारण थांबविले जाते.सगळी कागदपत्रे,परवाना,हेलमेट घालून असताना देखील माझ्याकडून दोनवेळा २७५० आणि एकदा १७५० रुपयांचे चालान वसूल करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत सुनयना यांनी केला.

सर्वात खेदजनक बाब म्हणजे मी न्यायासाठी या राज्याचे गृहमंत्री जे नागपूर शहराचेच आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले असता, त्यांना,मला भेटू देण्यात आले नाही.झोनल २ चे डीसीपी मदाने आपल्या अनेक सहका-यांसोबत तिथे उपस्थित होते.ते मला व माझ्या वडीलांना एका कोप-यात घेऊन गेले व दमदाटी केली.फडणवीस हे मागच्या दारातून निघून गेलेत.त्यांना त्यांच्याच शहरातील एका तरुणीला न्याय द्यावासा वाटला नाही,मी राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयातील पत्र घेऊन गेले होते मात्र, पोलिस विभागाचे प्रमुख असणारे फडणवीस, यांनाही माझ्यावरील बलात्कार व वारंवार जीवे मारण्याचा प्रयत्न,या अन्यायाची दखल घ्यावीशी वाटली नाही,असा धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेत सुनयना यांनी केला.

हाच कित्ता नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार गिरवितात.मला अमितेश कुमारांसोबत सदर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी भेटूच देत नाही.दर वेळी माझ्यासारख्या ३० वर्षीय, एनिमियाची रुग्ण असणा-या, फक्त ४० किलो वजन असणा-या व जिचे शरीर गौरव जगनानीने केमिकल टाकून खराब केले व नुकतेच जिच्यावर सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हल्ला करण्यात आला, ज्यात माझ्या दूचाकीचा संपूर्ण चुराडा झाला व मी वेळेवर उडी घेतल्याने आपले प्राण वाचवू शकले,अश्‍या तरुणीवर जोरजबरदस्ती करण्यासाठी सदर पोलिस ठाण्यातून २० ते २५ पोलिसकर्मी हजर होतात व मलाच अटक करण्याची वारंवार धमकी देतात,हेच सदर पोलिस ठाण्यातील अधिकारी मात्र गौरव जगनानी व त्याच्या वडील व भावाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याची तक्रार मात्र नोंदवण्यास टाळाटाळ करतात,शहराचे पोलिस आयुक्त देखील अश्‍या तरुणीला भेटण्यासाठी,तिची व्यथा ऐकून घेण्यासाठी दोन मिनिटांचाही वेळ काढत नाहीत,असा आरोप आज पत्रकार परिषदेत सुनयना यांनी केला.

आजची पत्रकार परिषद घेण्या मागे मला न्याय मिळावा हाच उद्देश्‍य असल्याचे सुनयना यांनी सांगितले.मी सनद घेतली असल्याने हायकोर्टात मीच माझा खटला पूर्ण ताकदीनिशी लढते.माझं अायुष्य उधवस्त करणा-यांना मी शिक्षा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही,असा निर्धार व्यक्त करीत,माझ्याकडे आता ना सुंदर शरीर राहीले आहे ना मन,मी किडलेल्या,संपूर्णत: सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध लढत- लढत आता खूप कणखर झाल्याचे सुनयना सांगतात.मी संपूर्णत:उधवस्त झाले,न्यायासाठी दर दर भटकते आहे आणि दिर सौरव जगनानी अद्यापही पर्सिस्टन्समध्ये नोकरी करीत असल्याचा संताप त्या व्यक्त करतात.

एक दिवस सगळ्यांनाच मरायचे आहे,माझ्यावर कितीही भेकड हल्ले झाले तरी मी घाबरुन गप्प बसणार नाही,हे शहर,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नागपूरचे पोलिस आयुक्त आणखी एका ‘निर्भया’कांडची वाट बघतात आहेत का?असा जळजळीत प्रश्‍न याप्रसंगी सुनयना यांनी केला. नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ओळख लपवून फसवणूक करुन लग्न किवा बलात्कार करणा-यांविरुद्ध कठोर कायदा संसदेत पारित केला आहे.जगनानी कुटुंबिय नेमके कोणत्या जाती-धर्माचे आहेत हे मला तरी सांगता येणार नसल्याचे सुनयना सांगते.मात्र,आता त्याच कायद्याच्या आधारे मी जगनानी त्रिकूटांना कारागृहात डांबणार असल्याचे सांगून, जगातील कोणत्याही स्त्रीचे शरीर हे लग्नाचे आमिष दाखवून फक्त उपभोगण्यापुरती नाही.भोगून सोडून देणे ही पुरुषी वृत्ती तिचा आत्मा आणि विश्‍वासालाही घायाळ करुन जात असतो,आणि घायाळ स्त्री ही सामान्य स्त्रियांपेक्षा फार कठोर आणि कणखर होऊन पेटून उठत असते,असे सुनयना सांगते.

मी मेल्यावर माझ्यासाठी समाज म्हणून मेणबत्ती जाळू नका,जिवंतपणी मला आणि माझ्या वृद्ध वडीलांना साथ द्या असे सुनयना त्वेषाने सांगते. सुनयना यांचे ७० वर्षीय वडील यांनी डोळ्यात अश्रू आणून, माझ्या मुलीच्या न्यायासाठीच्या लढ्यात समाजाने साथ द्यावी असे आवाहन केले.

संपर्क क्रमांक-सुनयना- 9021496879

…………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या