

डॉ.चैतन्य शेंबेकर यांनी उलगडली मानवी देह व मनाची संरचना
नव्या पिढीच्या सासूबाई आईसारख्याच:सूनेची बाळंतपणात काळजी घेताना दिसतात:डॉ.मनीषा शेंबेकर
रक्तगटाचा अपत्यप्राप्तीशी संबंध नाही: जस्ट ‘बी पॉझिटीव्ह’
‘ती’ ने उलगडले स्त्रियांचे भावविश्व
नागपूर, ४ जून २०२३:वयाच्या पंचेचाळीशीनंतर ज्याप्रमाणे महिलांमध्ये मॅनोपॉजचा काळ सुरु होतो त्याचप्रमाणे पुरुषांमध्येही ४५,५० किवा ५२ व्या वर्षात ॲण्ड्रोपॉज होत असतो.महिलांची मासिक पाळी जाते हे तिच्या रजोनिवृत्तीचे ठलक लक्षण असतं मात्र पुरुषांमध्ये ॲण्ड्रोपॉजचे असे कोणतेही विशिष्ट लक्षण नसतात अशी मोलाची माहिती शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.चैतन्य शेंबेकर यांनी दिली.
ओम चॅरिटेबल ट्रस्ट आणि ओमेगा हॉस्पिटल प्राय. लिमिटेड यांच्या सौजन्याने ऋतुराज प्रस्तुत ‘ती’ हा स्त्रियांच्या आयुष्यावरील संगीतमय कार्यक्रम आज रविवारी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात संपन्न झाला. संगीत व चर्चा असे स्वरूप असलेल्या या विशेष उपक्रमातून प्रतिथयश स्त्रीरोग तज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर आणि भूलतज्ज्ञ डॉ. मनीषा शेंबेकर यांनी स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या, त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, रजोनिवृत्ती, वंध्यत्व यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बोलताना, गरम वाफेसारखा अनुभव येणे,चिडचिड वाढणे,आत्मविश्वास गमावणे,घाम येणे इत्यादी अशी लक्षणे पुरुषांमध्ये ॲण्ड्रोपॉजदरम्यान दिसल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांना दाखवा,असा सल्ला त्यांनी दिला.रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये ह्दयविकाराचा धोका अनेक पटीने वाढतो.त्यामुळेच स्त्री असो किवा पुरुष दोघांनीही नियमित व्यायाम आणि योग्य आहाराकडे लक्ष द्यावे.नियमित व्यायाम व योग्य आहाराचा अर्थ दोन महिन्यात वीस किलो वजन कमी करने नव्हे.तीन महिन्यानंतर रिबाऊंड वजन वाढू शकतं त्यामुळे तीन महिन्यात फक्त ५ टक्के वजन कमी करा.७० किलो वजन असेल तर ३ महिन्यात ३ किलो वजन कमी करा.हारर्मोनल रिप्लेसमेंटच्या गोळ्या ५ वर्षांपेक्षा जास्त काळ घेऊ नये,असा सल्ला देखील त्यांनी दिला.
लग्न करताना जन्मकुंडलीसोबत मेडिकल कुंडली देखील बघावी. रक्तगटाचा अपत्यप्राप्तीशी काहीही संबंध नसून, समाजाने ‘बी पॉझिटीव्ह'(सकारात्मकता) रहावे. रक्तगटाऐवजी ‘पती-पत्नीच्या’ मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या निकषांचा विचार करावा, असे मत सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी मांडले. मुलींचे लग्नाचे वय २५ ते २८ असावे आणि वय वर्षे ३० च्या आत पहिले मूल व्हायलाच हवे. मुलींची वयाची तिशी उलटली कि अंडाशयामधील स्त्री बीजची संख्या कमी होत वाढत जाते ज्यामुळे अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येतात, अशी माहिती त्यांनी दिली.
निवेदक किशोर गलांडे यांनी त्यांना बोलते केले. मुग्धा तापस यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमास मूर्त स्वरूप आले. सुप्रसिद्ध गायिका मंजिरी वैद्य अय्यर व गुणवंत घटवाई यांनी सादर केलेल्या ‘अपार हा भवसागर दुस्तर, तुझ्या कृपेविण कोण तरे’ या गीतगायनाने स्त्रीशक्तीला मानवंदना देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या गीतातून त्यांनी ‘स्त्री-पुरुष’ मिलन आणि दांपत्यजीवन वाटचालीच्या भावविश्वाचे नाजूक क्षण उलगडले.
तसेच श्रेया खराबे टांकसाले यांनी गायलेल्या ‘आज मैं उपर जमाना है नीचे’ या गाण्याने अपत्यप्राप्तीनंतर स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या मातृत्वभावनेला स्पर्श केला.
आजकाल लग्न होऊन पाच-पाच वर्षे उलटली तरी मातृत्वाबाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येते. वंध्यत्वाची व्याख्या हीच आहे कि, लग्नाच्या ६ महिने वा दोन-चार वर्षात मूल झाले नाही तर डॉक्टरांना भेटावे. वेळेत उपचार न झाल्यास याचा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, अशी माहिती देत ,आयुष्य म्हणजे फक्त मूल हेच नसून मूल होणे हा संपूर्ण आयुष्याचा फक्त एक भाग असतो त्यामुळे मूल नसलं तरी आयुष्य हे भरभरुन जगा, असा सल्ला डॉ. चैतन्य यांनी यावेळी उपस्थितांना दिला. यावेळी त्यांनी लेझर उपचार तसेच योनी मार्गाचा कोरडेपणा यावर देखील भाष्य करीत, शरीराने नव्हे तर मनाने सदैव चिरतरुण राहण्याचा सल्ला दिला.
सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचे उदाहरण देत,वय येतं व पाया पडून निघून जात असतं.बदल येणारच आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही.त्यामुळे हेमा मालिनीसारखे सदैव चिरतरुण राहण्याचा सल्ला त्यांनी दिला,यावर गेल्या २५ वर्षांपासून डॉ.चैतन्य शेंबेकर हे देखील अद्यापही चिरतरुणच दिसतात,यावरचे रहस्य काय?असे गलांडे यांनी विचारताच सभागृहात हास्य फूलले.
ओमेगामध्ये येणा-या आजच्या पिढीच्या अनेक सासू या मला आईसारख्याच जाणवल्या असल्याचे डॉ.मनीषा म्हणाल्या.आपल्या सूनेची त्या आईसारख्याच तिच्या बाळंतपणात काळजी घेताना दिसून पडतात.त्यामुळे मलाच प्रश्न पडतो या रुग्णाच्या आई आहेत की सासू,असा भावस्पर्शी अनुभव देखील यावेळी डॉ.मनीषा यांनी सांगितला.
स्त्रियांमधील सहनशक्ती कमी झाली असून अर्भकाचे वजन, मातांचे वजन वाढले आहे. ज्यामुळे सिझेरियनचे प्रमाण वाढले असल्याचेही शेंबेकर दाम्पत्य म्हणाले.
पॉर्न या विषयाला देखील त्यांनी यावेळी हात घातला. पुरुषांमध्ये सेक्स ड्राइव्ह कमी होण्यास, कालांतराने वंध्यत्व येण्यास ही सुद्धा गोष्ट घातक ठरत असल्याचे मत त्यांनी मांडले. बदलती जीवनशैली, प्रदूषण, पिढीजात आजार यामुळे प्रजननक्षमतेचे प्रमाण घटत असून योग्य आहार, दैनंदिन व्यायाम, समतोल जीवनशैलीतून आरोग्य अबाधित राखावे असे ते यावेळी म्हणाले.
वयाच्या पन्नाशी नंतर आयव्हीएफला कायदेशीर परवानगी नाही.आम्ही देखील वयाच्या ४५ नंतर शक्यतोवर आयव्हीएफ टाळतो.याविषयी यशाची टक्केवारी किती?असा प्रश्न गलांडे यांनी करता,पूर्वी ३० टक्के आयव्हीएफ हे यशस्वी होत असे आता प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे हीच शक्यता ५० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुलींमध्ये सिगारेट व दारुचे व्यसन याबाबत खूलून बोलताना, आजच्या पिढीसोबत,आजच्या पिढीचा डॉक्टर होऊनच संवाद साधता येतो.तिच्या आत्मसन्मानाला तडा न जाता,तिच्या व्यसनाविषयी प्रश्न विचारणं अवघड असतं मात्र शेवटी नियतीने तिच्यावर मातृत्वाचा भार दिला असल्याने, होणा-या अपत्याविषयी व गर्भाशयवर होणारे व्यसनामुळे दुष्परिणामांची जाणीव करुन देणे भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वयाच्या ३५ व्या वर्षी रजोनिवृत्ती होणे हे निश्चितच धोकादायक असल्याचे ते म्हणाले कारण निसर्गाचा नियमच आहे वयाच्या ५० नंतर रजोनिवृत्ती व्हावी.असे प्री-मॅच्यूअर मोनोपॉज घडल्यास कॅलशियमच्या गोळ्या घेणे,नियमित व्यायाम करने गरजेचे आहे.वयाच्या ६० किवा सत्तरीत रक्त्रस्त्राव झाल्यास हे धोकादायक लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.हे कर्करोगाचेही लक्षण असू शकतं.
स्त्रियांनी आपल्या आरोग्याविषयी जाणून घ्यावे, आपल्या आयुष्यातील घटना जसे कि गर्भपात, मानसिक स्थिती, वय याबाबत डॉक्टरांना अनभिज्ञ ठेवू नये, असे मार्गदर्शन डॉ. मनीषा यांनी केले. यावेळी त्यांनी सोशल एग फ्रिजिंग, आयव्हीएफ, मासिक पाळी या नाजूक विषयाबाबत देखील जागृती केली. स्त्री व पुरुष दोघांनीही लग्नपूर्व, मातृत्वपूर्व समुपदेशन करावे, असेही त्या म्हणाल्या.
२५ वर्षांपासून ओमेगा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही नागपूरकरांच्या सेवेत असून आमच्या निरामय योजनेतंर्गत कर्करोग निदान अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात राबवतो याशिवाय आमच्या स्मार्ट कार्ड योजनेत, फ्री सोनोग्राफी सारख्या सुविधा आम्ही रुग्णाच्या सोबत आलेल्या आई किवा सासू अश्या स्त्रियांना मोफत देतो. यासह नॉर्मल व सिझेरियन दोन्ही प्रसुतीचे दर आम्ही सामान ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी अनेक दिलखुलास प्रश्नांना शेंबेकर दाम्पत्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
आजकाल वयाच्या ८ व्या किवा ९ व्या वर्षी मासिक पाळी सुरु होणे सामान्य बाब असल्याचे डॉ.चैतन्य शेंबेक र यांनी सांगितले.आमच्याकडे अश्या अनेक माता येतात ज्यांची मुलगी तिसरी,चौथीत असतानाच पाळी येत असल्यामुळे चिंतित होतात.असं का होतं?याचं निश्चित निदान सांगता येत नाही मात्र वजन जास्त असेल तर इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं असे त्यांनी सांगितले.
रजोनिवृत्तीबाबत ही अनेक भ्रामक संकल्पना आहेत त्यामुळेच १९९७ पासूनच रजोनिवृत्ती व अडोलसन्स यावर नागपूर महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये जाऊन जनजागृतीपर कार्यक्रम केले असल्याचे ते म्हणाले.
ज्या ओमेगामध्ये १९९२ साली एका आईची प्रसुती झाली त्याच स्त्रीच्या मुलीचीही प्रसुती करण्याचा योग जुळून आला व याचे फार नवल वाटले असे सांगत, मी तर तिस-या पिढीचेही बाळंतपण करण्यास सज्ज असल्याची कोटी त्यांनी केली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत घटवई, मंजिरी वैद्य अय्यर, श्रेया खराबे टांकसाळे यांनी गायलेल्या ‘नया कोई गिल खिलेगा’, ‘उगा का काळीज माझे’, ‘ऋतू हिरवा’, ‘मेरे महबूब मे क्या नही’ सारख्या विषयाशी संबंधित विविध गाण्यांनी स्त्रियांचे भावविश्व व आयुष्यातील स्थित्यंतरे यावर प्रकाश टाकत कार्यक्रमाला बहार आणली. त्यांना परिमल जोशी, गौरव टांकसाळे, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र व मुग्धा तापस यांनी साथसंगत केली.
या अनोख्या संगीतमैफिलीला नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाने सर्जन आणि सृजन दोहोंचे स्वरूप असलेल्या स्त्रीशक्तीचा नागपूरकरांमध्ये जागर केला. आपल्या संस्कृतीने कायमच स्त्री जीवनाचा विचार केला असून खरोखरच ‘ती’ आपल्याला परिचित व्हावी म्हणून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवेदक किशोर गलांडे यांनी दिली. जीवनाच्या उत्तराधार्थ ‘ती‘फार महत्वाची असते,याच वेळी ‘ती‘ची गरज दुपटीने असते,म्हणून तिला निरामय ठेवणे गरजेचे असते,तिच्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक असतं,असे गौरवोद् गार गलांडे यांनी मांडले.

कार्यक्रमादरम्यान ऋतूराज संस्थेचे अध्यक्ष गुणवंत घटवई यांनी डॉ. चैतन्य व मनीषा यांचा आदरपूर्वक सत्कार केला.




आमचे चॅनल subscribe करा
