

(संग्रहीत छायाचित्र)
नागपूरात पत्रकारितेतील निकोप स्पर्धा हरवली!
तक्रार मागे घेतल्यावर त्याच तक्रारीवर गुन्हा नोंदविल्यामुळे संशयाला बळ:पोलिस आयुक्तांवर कोणाचा दबाव?
तक्रारीत पत्रकारावर अनेक गंभीर आरोप: नागपूरातील काही राजकारण्यांचे अनधिकृत बांधकामे व भ्रष्टाचार बाहेर काढल्यानेच पत्रकारावर उगवला सूड:बुद्धीजीवींचे मत
अनेक हॉटेल्स,रिसॉट्समध्ये होतो राडा: नावानिशी किती एफआयआर दाखल होतात?पत्रकार जगतात उठला सवात
नागपूर,ता.१ जून २०२३:मागील दोन तीन दिवसांपासून एका नामांकित इंग्रजी दैनिकाच्या ज्येष्ठ पत्रकारावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटच्या संचालकाला धमकाविण्या संबंधी तक्रार दाखल झाल्याची पोस्ट, अनेक व्हाॅट्स ॲप ग्रूप्सवर व्हायरल झाली.अनेक गंभीर आरोप त्या तक्रारीत नमूद आहे.ती पोस्ट वाचून नागपूरातील माध्यम जगतात हलकल्लोळ माजला.या दैनिकाच्या या पत्रकाराने शहरातील अनेक ‘सत्तानशीन’ राजकारणी व भ्रष्टाचाराने बरबटलेले अनेक प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या अभद्र सहभागितेतून जनतेच्या पैशांची लृट तसेच ‘जमीन माफिया‘ संबधी अनेक प्रकरणे विस्तृतपणे छापली.त्यामुळे या पत्रकारावर अनेकांचा राग असने स्वाभाविक आहे.
त्यातच, टाईम्स ग्रूप ही स्वतंत्र मालकीची असल्याने, भारतात मोठमोठ्या राजकारण्यांच्या विरोधात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जपण्यात, या माध्यमाची गणना होते.त्यामुळे निदान या वृत्तपत्रातील वार्ताहरांच्या बातम्या या निकोप मानल्या जातात.भारतात याचा वाचक वर्गही अभिजात वर्ग असून, पुराव्यानिशी,सविस्तर तसेच गोपनीय बातम्या देण्यात अद्याप तरी टाईम्स ग्रूपचा हात भारतात कोणीही पकडू शकला नाही.
त्यामुळेच नागपूरसारख्या शहरात एखादा हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या वेळेस तरुणाईच्या हातून काही गोंधळ होणे,हॉटेल व्यवस्थापनाच्या कर्मचा-यांशी बाचाबाची होने हे मेट्रो सिटी झालेल्या नागपूर शहरात आता नागपूरकरांसाठी सामान्य बाब झाली आहे.सिव्हिल लाईन्स मधील अनेक क्लब्समध्ये तर पोलिसांना दररोजच राडा सोडविण्यासाठी धाव घ्यावी लागते.मात्र हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये १३ मे रोजी रात्री २.४५ वाजताच्या सुमारास चार मुले व मुली हॉटेलच्या लॉबीत आले व त्यांनी मद्य पुरविण्याचा आग्रह धरला,यानंतर झालेल्या तथाकथित गोंधळात या वृत्तपत्रातील या वार्ताहराचा मुलगा सहभागी असल्याने. अनेकांना आयते कोलित गवसले.जो काही गोंधळ झाला तो कळल्यानंतर हा पत्रकार हॉटेलच्या व्यवस्थापक,सुरक्षा अधिकारी आदींशी भेटला,मी एका मोठ्या इंग्रजी दैनिकाचा वार्ताहर असल्याने हॉटेलची बदनामी करेल इत्यादी- इत्यादी अनेक गंभीर आरोप या पत्रकारावर आपल्या तक्रारीत हॉटेल सेंटर पॉईंटच्या मुख्य सुरक्षा अधिकारी पराग वालिया यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे,ही तक्रार नंतरच्या वाटाघाटीत मागे ही घेण्यात आली.मात्र,अचानक सूडनाट्यातील सारीपाटावरील सोंगट्या फिरल्या,,आज १ जून रोजी रात्री सव्वा आठ वाजेदरम्यान, मागे घेण्यात आलेल्या तक्ररीवर चक्क एफआयआर दाखल करण्यात आला!
यामुळे,नागपूरच्या पत्रकार जगतात तीव्र नाराजी पसरली,एवढंच नव्हे तर या वार्ताहराच्या अनेक बातम्यांचा संदर्भ आपल्या न्यायालयीन प्रक्रियेतील पीआयएलमध्ये समाविष्ट करणा-या अनेक बुद्धीजीवींनी देखील याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.या वार्ताहराला, नागपूरातील काही राजकारण्यांचीच, मागच्या दाराने फूस असल्याने ,गोवण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय.महत्वाचे म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या संदर्भात दोन्ही बाजूने सगळं काही सुरळीत झाल्यानंतरही पोलिस आयुक्तांवर नेमका कोणाचा दबाव होता ज्यामुळे या वार्ताहरावर गुन्हा नोंदविण्यात आला,या विषयी ही चर्चेला उधाण आले आहे.
या संपूर्ण घटनेबाबत इतर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने नावानिशी सविस्तर वृत्त छापले.यामुळे पत्रकार जगत स्तब्ध झाले!गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहीजे मात्र जोपर्यंत न्यायालय आरोपीला दोषी ठरवत नाही तोपर्यंत कायद्याच्या लेखी ताे निर्दोष असतो.मात्र,हा न्याय वृत्तपत्र जगतात पाळला गेला नाही.जी निकोप स्पर्धा लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाचा मूळ गाभा आहे,त्यालाच या घटनेमुळे चांगलाच तडा गेला.
एखादे वृत्तपत्र दुस-या एखाद्या वृत्तपत्राच्या व त्या वृत्तपत्राच्या वार्ताहराच्या नावानिशी इतकी सविस्तर बातमी छापते,या मागे निश्चितच काहीतरी गौडबंगाल असल्याचे उघडपणे आता बोलले जात आहे.आजही वृत्तपत्रांवर वाचकांचा विश्वास अढळ आहे .त्यामुळेच वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी बातमी ही जरी ‘बदनामीकारक’असली किंबहूना ‘बदनामी’करण्यासाठीच छापली गेली असली तरी, वाचकांच्या नजरेत ती सत्य असते,त्यामुळेच या प्रतिष्ठित समजल्या जाणा-या वृत्तपत्राचा हा ‘कारनामा’नागपूरात अनेकांच्या मनाला रुचला नाही.
दररोजच्या विविध हॉटेलमधील राड्याच्या अशा किती बातम्यांना हे वृत्तपत्र ठलकपणे प्रसिद्धी देते?मग एखाद्या वृत्तपत्राच्या नावानिशी त्या वृत्तपत्राच्या एखाद्या पत्रकाराचे प्रतिमा भंजन करणारी बातमी इतकी सविस्तर छापण्या मागे या वृत्तपत्राचा काय हेतू होता?असा सवाल आता विचारला जात आहे.
या तक्रारीत तर तीन मुलांची नावेच चुकीची दिली असल्याचा दावा केला जात आहे मग त्या तक्रारीत किती तथ्य आहे?हे कोण पडताळून पाहणार?पोलिस आयुक्त वृत्तपत्राच्या मालकाच्या दबावाला बळी पडले असल्याचा देखील कयास लावल्या जात आहे.जी तक्रार मागे घेण्यात आली,पुन्हा त्याच तक्रारीवर गुन्हा कसा नोंदवला जाऊ शकतो?काय घडले पडद्या मागे?किंबहूना काय घडवले गेले पडद्या मागे?कोणी घडवले?यात राजकारणी किती?राजकारण्यांचे वृत्तपत्रीय मालक किती?अशा पोस्ट आता अनेक व्हॉट्स ॲप ग्रूप्सवर व्हायरल होत आहेत.
जे घडले ते योग्य नव्हते मात्र लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभात ‘व्यवसायिक’ स्वार्थासाठी जे घडवले गेले ,ते ही नैतिकतेच्या कुठल्याही चौकटीत न बसणारेच असल्याने, त्या वृत्तपत्राच्या या कृतीचाही धिक्कार करणा-या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
काय आहे प्रकरण?
हॉटेल सेंटर पॉईंटच्या संचालकाला टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार अंजया अनापर्थी यांनी धमकाविल्याची तक्रार सीताबर्डी पोलिस ठाण्यात करण्यात आली.सेंटर पॉईंटचे मुख्य सुरक्षा अधिकारी पराग वालिया यांनी केलेल्या तक्रारीनुसार १३ मे रोजी रात्री २.४५ वाजेच्या सुमारास चार मुले व मुली हॉटेलच्या लॉबीत आले व त्यांनी मद्य पुरविण्याचा आग्रह धरला.फ्रंट ऑफिस असोसिएट असलेल्या कर्मचा-याने त्यांना नियमांचा हवाला देत नकार दिला.यावरुन त्या मुलांनी संबंधित कर्मचा-याला धमकावले.कर्मचा-याने हा प्रकार सुरक्षा अधिका-यांच्या कानावर देखील टाकला.त्यानंतर दुस-याच दिवशी अंजया अनपार्थी यांनी हॉटेलचे संचालक जसबीर सिंह अरोरा यांना दुबईत फोन केला व त्याच्या मुलाच्या मित्रांसांबत कर्मचा-यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप लावला.
अरोरा यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले.चौकशी दरम्यान सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये अनपार्थी यांचे आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले.तसे अरोरा यांनी अनपार्थीला कळविले.मात्र,त्यांनी अरोरा यांनाच धमक्या देण्यास सुरवात केली.मी ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये मोठ्या पदावर कार्यरत असून,तुमच्या हॉटेलची सहज बदनामी करु शकतो,अशी धमकी दिली.
त्यानंतर प्रत्यक्ष भेटीदरम्यान अंजया यांनी दुस-या मुलाच्या वाढदिवसासाठी एक चेंबर बुक केले व सवलत देण्याची मागणी केली.१६ मे रोजीच्या पार्टीत मुलाच्या दोन मित्रांनी १३ मे रोजी वाद झालेल्या कर्मचा-याला जबरदस्तीने बोलविले व त्याच्याशी असभ्य वर्तन केले व त्याला धमकी देखील दिली.त्यांनी हॉटेलच्या नियमाप्रमाणे हॉल देखील रिकामे केले नाही.पहाटे ३.४५ वाजता त्या पार्टीतील सात जण आले व त्यातील एकाने संबंधित कर्मचा-याला जिवे मारण्याची धमकी दिली.
अनपार्थी तुमच्या विरोधात त्यांच्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करुन संपूर्ण महाराष्ट्रात हॉटेलची प्रतिष्ठा मातीत मिसळून टाकेल,अशी भाषा वारण्यात आली.
दुस-या दिवशी अंजया यांनी अरोरा यांची भेट घेतली.अरोरा यांनी सीसीटीव्ही फूटेज अंजया यांना दाखविले.मात्र,तरी देखील अंजया यांनी अरेरावीची भाषा वापरली व मी तुमचे हॉटेल बंद करु शकतो,अशी धमकी देण्यास सुरवात केली.तुमच्या हॉटेलची नियमावली मला व माझ्या मित्रमंडळीला लागू होत नाही,असे म्हणत ते आक्रमक झाले.अखेर अरोरा यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून अनपार्थीला हॉटेल बाहेर नेण्यास सांगितले.असे तक्रारीत नमूद आहे.
एवढंच नव्हे तर अंजया यांनी वृत्तपत्राच्या नावाखाली अनेकदा चुकीच्या पद्धतीने हॉटेलमधील लाभ घेतले अाहेत.एप्रिल महिन्यात त्यांनी अरोरा यांना फोन केला होता.त्यांच्या मित्रमंडळींना मध्यरात्रीनंतर ३ वाजता ही मद्य न पुरविल्याने दंड म्हणून वेगळी पार्टी देण्यास त्यांनी सांगितले.या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी हॉटेल व्यवस्थपनाने आपल्या तक्रारीत केली होती.
अंजया अनपर्थी यांनी मात्र या सर्व आरोपांचे खंडण केले.या मागे कोणाचे ‘राजकारण’आहे हे लवकरच उघड होईल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.पार्टीचे मुलांनी क्रेडीट कार्डने हॉटेलचे फेडलेले बिल,सीसीटीव्ही व्हिडीयो फूटेज हे सर्व माझ्या प्रामाणिकपणाची साक्ष देतील,असे सांगून त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.
थोडक्यात,नागपूरातील वृत्तपत्र जगतात अंजया यांचा स्वभाव आक्रमक असल्याचे सर्वविदीत आहे मात्र या एका घटनेने त्यांना ‘अनैतिक’व ‘गुन्हेगार’ठरविण्याचा अट्टहास, हा अनेकांना रुचला नाही.विशेष म्हणजे अंजया यांनी तीन राजकारण्यांचे अनाधिकृत अतिक्रमण व जमीन माफियागिरीचे प्रकरण उघड केले होते.त्यांच्या बातमीमुळे त्या राजकारण्यांवर गुन्हे देखील दाखल झालेत.त्यामुळेच अंजया यांच्यावर अनेक राजकारणी,मनपातीच भ्रष्ट अधिकारी,नासुप्र,एमएमआरडीतील काही भ्रष्ट अधिकारी चांगलेच खार खाऊन बसले होते.
अशातच या एका घटनेने त्यांची पत्रकारिताच धोक्यात आणण्याची उठाठेव, शहरातील अनेक पत्रकारांना व बुद्धीजीवींनाही रुचली नाही.विशेष म्हणजे एका प्रतिष्ठित दैनिकानीच फक्त एका तक्रारीवर याबाबत छापलेले वृत्त याविषयी देखील तीव्र नापसंती उठली आहे.
……………….




आमचे चॅनल subscribe करा
