
आईने मांडली पत्रकार परिषदेत व्यथा
चुकीचा औषधोपचार,लाखांचे बिल अन् जिवतं रुग्णाचे झाले पार्थिव!
शुभम-विम्स रुग्णालयाचे संचालक डॉ.राजेश सिंघानिया यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणी
डॉक्टरला वाचविण्यासाठी शवविच्छेदन अहवालात घोटाळा होऊ नये:न्यायावर विश्वास
नागपूर,ता.९ मे २०२३: डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संबंधात सर्वात जास्त जर कोणते मूल्य महत्वाचे असेल तर तो असतो ‘विश्वास’.आपल्या आप्तजणाला एका ओळखी-अनोळखी डॉक्टरच्या सुर्पर्द जगातील कोणतेही आप्तजन याच विश्वासाच्या आधारे करतात,मूळात डॉक्टर आणि रुग्ण हे जगातील सर्वात नाजूक असं नातं असतं कारण या नात्यात जीवन-मृत्यूचा संबंध येत असतो.जगातील कोणताही डॉक्टर हा रुग्णाचा जीव घेत नसतो तर त्याला पूर्णपणे बरे करने हेच त्याचे एकमेव कर्तव्य मानलं जातं,मात्र,प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतच असे नाही.नागपूरातील टेकडी वाडी येथील गौतम नगर येथील प्रणय तभाने हा अवघा २९ वर्षाचा तरुण हा पाठदुखीमुळे मागील महिन्यात २४ एप्रिल रोजी डॉ.राजेश सिंघानिया यांच्या शुभम रुग्णालयात चालत गेला होता मात्र डॉ. सिंघानिया यांच्याच विम्स या दूस-या रुग्णालयातून त्याचे पार्थिवच त्याच्या परिजनांना मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली.
प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत मृतक प्रणय याची आई सविता नामदेव तभाने व दोन्ही विवाहित बहीणींनी डॉ.सिंघानिया यांच्यावर अनेक गंभीर आरोप करीत न्यायाची मागणी केली.सविता यांना प्रणय हा एकमेव मूलगा असून त्यांना दोन विवाहीत मुली आहेत.तरणाताठा प्रणय हा वाडी येथे इंजिन ऑईलचा व्यवसाय करीत होता.२४ एप्रिल रोजी सकळी पाच वाजता पासून त्याने पाठ दुखत असल्याची तक्रार केली. सकाळी १० वाजता शुभम नर्सिंग होम,छावणी सदर येथे तो नातेवाईक पुतण्या शुभम तभाने तसेच मित्र उमेश गायकवाड सोबत उपचारासाठी गेला.

[प्रणय तभाने]
यावेळी शुभम नर्सिंग होमचे संचालक डॉ.राजेश सिंघानिया उपस्थित नव्हते.तेथील परिचारिकेने डॉ.राजेश यांच्याशी फोनवर संवाद साधला व प्रणय याला सरळ भर्तीच करुन घेतले.डॉ.सिंघानिया आल्यानंतर सर्व तपासण्या करतील असे प्रणय याला सांगण्यात आले.जवळपास तीन ते साढेतीन तासांनंतर डॉ.सिंघानिया रुग्णालयात आले.त्यांनी प्रणय याच्या अनेक तपासण्या केल्या.सर्व तपासण्या या नॉर्मल आल्या.पत्र परिषदेत सविता यांनी प्रणय याच्या वेळोवेळी केलेल्या सर्व तपासण्या नॉमर्ल आल्याची कागदपत्रेही सादर केली.विशेष बाब म्हणजे डॉ.सिंघानिया यांनी वेळोवेळी ज्या ज्या तपासण्या सांगितल्या त्या सर्व प्रणय याने चालत जाऊन करुन घेतल्या.
सर्व तपासण्या नॉर्मल आल्यानंतर देखील डॉ.सिंघानिया यांनी प्रणयला भर्ती करुन घेतले व सलाईन लाऊन ठेवली.सलाईनमधून त्याला औषध देण्यात येत होते.यावेळी प्रणय याची विवाहित बहीण,मावशी व इतर नातेवाईकही प्रणयला बघण्यासाठी रुग्णालयात आले.२५ एप्रिल रोजी प्रणय याची प्रकृती अगदी ठणठणीत होती.त्याने नाश्ता देखील केला.चालत-फिरतही होता.दूपारी मात्र प्रणयचे नख हे पिवळे दिसायला लागले.२५ एप्रिल रोजी दिवसभर डॉ.सिंघानिया हे रुग्णालयात आलेच नाही.रात्री ८.३० वाजता ते रुग्णालयात आले मात्र प्रणय याला तपासले नाही,फक्त तोंडी माहिती घेऊनते परतत असताना,प्रणय याच्या बहीणीने पल्लवीने प्रणयचे पिवळे नखांबाबत माहिती दिली.
यानंतर डॉ.सिंघानिया यांनी प्रणयची काविळची तपासणी करण्यास सांगितले.त्याही रात्री रुग्णालयातील परिचारितेने प्रणयला तीन इंजेक्शन्स लावले!
२६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता प्रणयच्या काविळच्या तपासणीचा अहवाल आला,त्यात ५ मि.ग्रॅ काविळ असल्याचे नमूद होते.दुपारी १ वाजता डॉ.सिंघानिया यांनी हा अहवाल नॉर्मल असून प्रणय दोन-तीन दिवसात बरे होईल असे सांगितले व ते शस्त्रक्रिया करण्यासाठी निघून गेले.मात्र,आम्ही आता प्रणयला दुस-या रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे रुग्णालया प्रशासनाला सांगितले.काळी वेळाने प्रणय याची मावशी विशाखा ढोले या डॉ.सिंघानियांच्या रुग्णालयात प्रणयला बघण्यासाठी आल्या असत्या त्याचे अंग भयंकर तापले होते,त्याने डोळे वर केले होते जे पांढरे झाले होते.
हे बघून परिचारिकेला बोलावून आणले असता तिने प्रणयला तपासून,काहीच झाले नाही तुम्ही कशाल आरडाओरड करता?असे नातेवाईकांनाच सुनावले.याचवेळी एक ज्यूनिअर डॉक्टरने प्रणयला तपासले व त्याला काहीच कळत नाही आहे,असे सांगून निघून गेला.यानंतर प्रणय याची मावशी सरळ डॉ.सिंघानिया यांच्याकडे गेली तोपर्यत…या रुग्णालयातील अटेंडन्सने कोणालाही न विचारता प्रणयला ऑक्सीजन लावले.ऑक्सीजन लावताच प्रयणचा देह तीन फूट वर उडाला...!
डॉ.सिंघानिया यांनी प्रणयला तपासले व अटेंडन्सने ऑक्सीजन लेवल ४ वर लावल्यामुळे प्रणयला झटका बसल्याचे नातेवाईकांना सांगितले.प्रणयला याला त्वरित एम्समध्ये घेऊन जाण्यासाठी प्रणयच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका बोलावली मात्र डॉ.सिंघानिया यांनी रुग्णवाहिकेत विम्स रुग्णालयातील काही स्टाफ बोलावून खूप विनंती करुन प्रणयला त्यांच्याच दुस-या रुग्णालयात विम्स येथे भर्ती केले.फक्त एक दिवस आणखी मला उपचार करु द्या,मग वाटल्यास प्रणयला दुस-या रुग्णालयात घेऊन जा,अशी हमी डॉ.सिंघानिया यांनी प्रणयच्या नातेवाईकांना दिली.
प्रणयचे आप्तस्वकीय हे अत्यधिक तनावात होते,त्यांना फक्त प्रणय बरा व्हावा हीच ओढ लागली होती.डॉ.सिंघानिया यांच्या हमीनंतर त्यांनी डॉ.सिंघानिया यांना विम्स मध्ये उपचाराची परवानगी प्रदान केली.डॉ.सिंघानिया यांच्यावर विश्वास ठेऊन प्रणयसाठी बोलविण्यात आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्यात आली.दुपारी ३ वाजता डॉ.सिंघानिया यांनी त्यांच्या सदर येथील विम्स रुग्णालयात प्रणयला आयसीयूत दाखल केले होते.
डॉ.सिंघानिया यांनी वेळोवेळी काढलेले जवळपास पावणे तीन लाखांचे बिल प्रणय याच्या नातेवाईकांनी भरले होते याशिवाय डॉ.सिंघानिया यांनी काही कागदपत्रांवर स्वाक्ष-या देखील घेतल्या.२६ एप्रिल पासून प्रणय हा विम्समध्ये उपचार घेत होता.त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे प्रणय याच्या नातेवाईकांना सांगितले जात होते मात्र प्रणय याची कोणतीही हालचाल नातेवाईकांना दिसून पडत नव्हती.याबाबत त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर वशिष्ट यांच्याशी संपर्क साधला.डॉ.वशिष्ट यांनी रुग्णालयाशी संपर्क ही साधला मात्र जोपर्यंत डॉ.सिंघानिया यांची परवानगी त्यांना मिळत नाही तोपर्यंत ते प्रणयला तपासू शकत नव्हते.यावर डॉ.सिंघानिया यांना विचारणा केली असता डॉ.वशिष्ट हेच फोन उचलत नसल्याचे सिंघानिया सांगत राहीले.
२८ एप्रिलच्या रात्री २ ते ३ वा.दरम्यान विम्समधील डॉक्टरांनी प्रणय मृत झाला असल्याची माहिती कळवली.सर्व कागदपत्रांवर डॉ.सिंघानिया यांच्या स्वाक्ष-या होत्या पण ते स्वत:त्यावेळी रुग्णालयात हजर नव्हते.शेवटपर्यंत डॉ.सिंघानिया हे प्रणयच्या सर्व प्रकारच्या चाचण्या नॉमर्ल येऊन देखील त्याच्यावर चुकीचे उपचार करीत होते,असा गंभीर आरोप मृत प्रणय याच्या आईने पत्र परिषदेत केला.डॉ.सिंघानिया यांनी शेवटपर्यंत प्रणयला दुस-या रुग्णालयात रेफर करु दिले नाही,असा टाहो त्यांनी फोडला.
शेवटपर्यंत डॉ.सिंघानिया हे प्रणय बरा होईल अशी हमी देत राहीले मात्र त्यांच्या रुग्णालयात फार विश्वासाने उपचारासाठी दाखल झालेल्या अवघ्या २९ वर्षाच्या प्रणयचे पार्थिवच विम्समधून आप्तजनांना मिळाले.डॉ.राजेश सिंघानिया,शुभम नर्सिंग होम तसेच विम्स रुग्णालयाच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करुन डॉ.सिंघानिया यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
डॉ.सिंघानिया यांच्याविरुद्ध सदर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून अद्याप प्रणयचा मेडीकलमधील शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नाही.मेडीकल प्रशासनाने स्वत:च्या व्यवसायातील एका डॉक्टरला वाचविण्यासाठी चुकीचा अहवाल देऊ नये व न्यायाचे रक्षण करावे,अशी मागणीही याप्रसंगी युवक काँग्रेसचे राज्य सचिव अश्विन बैस व विकी ढोके यांनी केली.
या घटनेबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना डॉ.सिंघानिया यांनी, रुग्णालयाने मृतक रुग्ण प्रणय तभाने याच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सांगून हे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले.तो पोटदुखीच्या कारणाने दाखल झाल्याने सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या.त्या अनुषंगाने औषधोपचार करण्यात आले.दरम्यान काविळसारखा आजार वाटत असल्याने आमच्याच दुस-या रुग्णालयात पालकाच्या संमतीने दाखल केल्याचे सांगितले.परंतु,तिथे त्याची प्रकृती अजून खालावली.नेमके त्याला कोणता आजार झाला हे आम्ही समजू शकलो नाही.आजार वाढल्याने त्याचे निधन झाले.आता शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.

[प्रणय च्या फेसबुक वरील एक पोस्ट….]
डॉ.सिंघानिया यांच्या या खुलाशावर बोलताना,प्रणय हा पोटदुखीसाठी नाही तर पाठ दुखीमुळे तपासणीसाठी शुभम नर्सिंग होेममध्ये गेला होता,असे सविता यांनी सांगितले,डॉ.सिंघानिया सांगतात त्यांना प्रणयला नेमके काय झाले हे कळलेच नव्हते तर तीन-तीन इंजेक्शन्स रुग्णालयाच्या परिचारिका कशासाठी लावत होत्या?अंटेडन्टने ऑक्सीजन लेवल शून्यावर न आणता एकदम कसे चालू केले आणि प्रणय तीन फूट वर उडाला?याचेही उत्तर आम्ही न्यायालयातून मिळवू,असा इशारा पत्र परिषदेत ॲड.उमेश डोंगरे यांनी दिला.
संपर्क क्रमांक
मयुर तभाने- 7385609922
……………




आमचे चॅनल subscribe करा
