

न्यायालयाची सिरमला नोटीस: प्रकाश पोहरे यांच्या कार्याला यश
नागपूर,२१ एप्रिल २०२३: सिरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, तर अनेकांना गंभीर आजार झाले आहे. त्यामुळे सिरम इन्स्टिट्युटने दहा हजार कोटींची नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती करणारी याचिका दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक, शेतकरी नेते व लोकनायक प्रकाश पोहरे यांनी दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीनंतर प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालयाने सिरम इन्स्टिट्यूटसह तिघांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाच्या या निर्देशाने अनेकांच्या न्यायाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. न्यायाधीश एस.बी. पवार यांनी हे निर्देश दिले आहेत.
ही याचिका दाखल करण्यासाठी प्रकाश पोहरे यांना तीन लाख रुपये न्यायालयात जमा करावे लागले. त्यानंतर १५ एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी झाली. दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावला आणि अधिकृत अधिकारी विवेक प्रधान यांना नोटीस बजावून २० एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. स्वत: उपस्थित राहून अथवा वकिलांमार्फत उत्तर न दिल्यास, न्यायालय त्यांच्या गैरहजेरीमध्ये या प्रकरणाचा निर्णय देईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. लसीकरण सुरक्षित आहे, अशी खोटी माहिती पसरवून लसीकरण करण्यास बंदी का घातली नाही, असा प्रश्नही न्याायलयाने याप्रसंगी उपस्थित केला.
या याचिकेवर २० एप्रिलला पुन्हा सुनावणी झाली. यावेळी प्रतिवादींच्या वकिलांनी उत्तर सादर करण्यास वेळ मागून घेतला. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावला यांनी कोव्हिशिल्ड लसीपासून होणार्या गंभीर दुष्परिणामाची माहिती जनतेपासून लपवून ठेवली, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या खासकरून युवकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. युवकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूपच वाढले आहे. सोबतच लखवा, गुडघ्याचे दुखणे, जॉइंट पेन, आंधळेपणा, बहिरेपणा, मधूमेह, किडनी फेल होणे, कर्करोग, त्वचा रोग आणि मेंंदूशी संबंधित समस्या सामोर आल्या आहेत. तसेच कोणत्याही आजाराशी लढण्याची शरीराची प्रतिकार क्षमता कमी झाल्याच्या समस्यासुद्धा कोव्हिशिल्ड लसीशी जुडलेल्या आहेत. कोरोना या आजारापेक्षा लसीकरणामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे जगभरातील संशोधनातून पुढे आले असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. सिरम इन्स्टिट्यूट आता काय उत्तर देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्त्याततर्फे माजी न्यायमूर्ती ओंकार काकडे यांनी बाजू मांडली.
चळवळीला यश-
लसीकरणाच्या गंभीर व जीवघेण्या दुष्परिणामामुळेच एकवीस युरोपीयन देशांनी कोव्हिशिल्ड लसीवर बंदी घातली. परंतु, अदार पुनावाला व त्यांचा भागीदार बिल गेटस् यांनी देशातील केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याशी हातमिळवणी करून संपूर्ण देशात कोव्हिशिल्ड लसिकरण चालवले. ही लस सुरक्षित असल्याचे खोटे सांगून जबरदस्तीने लसीकरण करून देशातील कोट्यवधी नागरिकांचे जीव धोक्यात घातले. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. अवेकन इंडिया मुव्हमेंटद्वारे चळवळ उभी करण्यात आली. या चळवळीत इंडियन लायर्स अॅण्ड ह्युमन राईटस असोसिएशन, इंडियन बार असोसिएशन आदी संघटना सहभागी झाल्या. या चळवळीमुळे सर्वोच्च न्यायालय आणि कनिष्ट न्यायालयानेही वेळोवेळी लसीकरणाच्या जबरदस्तीविरोधात आदेश दिले. हे या चळवळीचे यश असल्याची माहिती याचिकाकर्ते प्रकाश पोहरे यांनी शुक्रवारी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ही एकट्याची लढाई नाही. मानवजातीची लढाई आहे. त्यामुळे या चळवळीशी जुळणार्यांचे स्वागत असल्याचेही पोहरे यांनी यावेळी स्पष्ट केले.




आमचे चॅनल subscribe करा
