

पाच महिन्यांपासून होता फरार घोषित!मनपाच्या शासकीय सेवेत मात्र दररोज हजर!
मनपा आयुक्तांना निलंबनासाठी कोणाची वाट?
नातेवाईक तरुणीने केला होता लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
नागपूर,ता.१७ एप्रिल २०२३: नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रभारी प्रमुख राजेंद्र उचके याला राजनांदगाव(छत्तीसगढ) पोलिसांनी १३ एप्रिल रोजी अटक करुन राजनांदगाव येथील न्यायालयात हजर केले.तेथील सिटी कोतवाली पोलिसांनी उचके याला पाच महिन्यांपासून बेपत्ता(फरार) घोषित केले होते.विशेष म्हणजे १३ एप्रिल रोजी उचके याला अटक झाल्यानंतरही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी अद्याप त्याच्या निलंबनाचे आदेश काढले नसल्याची माहिती समोर आली आहे.कायद्याप्रमाणे सरकारी अधिका-याला एक दिवस ही पोलिस कस्टडी मिळाल्यास त्याचे निलंबन करण्यात येते.
२ नोव्हेंबर २०२२ रोजी उचके याची नातेवाईक असलेल्या २७ वर्षीय तरुणीने, गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रभारी प्रमुख म्हणून पदावर कार्यरत राजेंद्र उचके याच्या विरोधात राजनांदगाव येथील पोलिस ठाण्यात कलम ५०९(ख)५०६(ब)४२१/२२,भादंवि च्या आयटी कलमच्या ६७ अन्वये तक्रार नोंदवली होती.
पिडीत तरुणीने आपल्या तक्रारीत आरोपी उचके याने १७ जून २०२२ रोजी १२.४० पासून १४.३० दरम्यान अतिशय अश्लील संभाषण व्हॉट्स ॲपवर पाठविले असल्याचे नमूद केले.एवढंच नव्हे तर हस्तमैथून करीत असल्याचे स्वत:चे व्हीडीयो देखील आरोपीने तरुणीला पाठवून लाज वाटेल असे धक्कादायक वर्तन केले.याशिवाय स्वत:च्या आवाजातील अतिशय अश्लील संभाषण आरोपीने तरुणीला पाठवले.तरुणीने आरोपीच्या या गैरवर्तनाविषयी विरोध केल्यास,मी नागपूरातील मनपाचा उच्च अधिकारी असल्याने माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नसल्याचे आरोपीने पीडीत तरुणीला दम दिला.
एवढंच नव्हे तर त्याच्या या गैरवर्तनाविषयी इतर कोणालाही सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली असल्याची तक्रार या तरुणीने राजनांदगाव येथील पोलिस ठाण्यात नोंदवली.या पूर्वी राजनांदगाव येथील न्यायालयाने आरोपी उचकेचा जामीन अर्ज ही फेटाळला होता,हे विशेष.उचके विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयात सादर झाले असून एका उच्च पदावरील सरकारी अधिका-याकडून एवढ्या अश्लील वर्तनाची अपेक्षा समाज करीत नसल्याची टिपण्णी देखील सन्माननीय न्यायालयाने केली होती व उचके याचा जामीन अर्ज २ नोव्हेंबर २०२२ रोजी फेटाळला होता.
तृतीय अपर सत्र न्यायाधीश सिद्धार्थ अग्रवाल राजनांदगाव,छत्तीसगढ यांनी उचके याचा जामीन अर्ज फेटाळताना ‘आरोपी/आवेदक का शासकीय सेवक होने के बावजूद प्रार्थिया द्वार उसके साथ कामूक बाते किया करती थी’के रुप मे अपने आवेदन पत्र धारा ४३८ दं.प्र.सं.के अंतर्गत की गई ‘स्वीकारोक्ति’ को ध्यान मे रखते हुये उसके उपर लगाये गये आक्षेपो की प्रकृति उसे अग्रिम जमानत हेतु अपात्र बनाती है,अतएव अग्रिम जमानत आवेदन निरस्त किया जाता है’असा निकाल दिला होता.
त्याच वेळी उचके याची अटक अटल असतानाही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी एवढ्या गंभीर आरोपानंतर देखील उचके याला ‘अल्पकाळ‘ सक्तीच्या रजेवर पाठवण्या पुरती इतिकर्तव्यता पार पाडली.अल्पकाळाच्या ‘विश्रांती’नंतर पुन्हा उचके आपल्या विभागात त्याच पदावर कार्यरत झाले.मात्र उचके याला अटक झाल्याने आता तरी मनपा आयुक्त कोणती भूमिका घेतात याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
उचके हे उच्च पदस्थ अधिकारी असल्याने राजनांदगाव पोलिसांनी या घटनेसंबंधी त्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिक्षक अभिषेक मीना यांना या बाबत माहिती दिली.त्यांच्या सूचनेबरहकूम अतिरिक्त पोलिस अधिकक्षक लाखन पटले व नगर पोलिस अधिक्षक अमित पटेल राजनांदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणा प्रमुख भोला सिंह राजपूरत यांच्या नेतृत्वात चमू गठीत करण्यात आली व कारवाई पार पाडण्यात आली.
१३ एप्रिल रोजी अारोपी राजेंद्र उचकेला अटक करुन राजनांदगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले.विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून उचके याला फरार घोषित करण्यात आले होते.अखेर उप अधिक्षक अजित सिंह राजपूत यांनी नागपूरातील महल येथील पाण्याच्या टाकीजवळील घरातून उचके याला अटक केली.राजनांदगाव पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली असता अारोपीने गुन्हा कबूल केल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नायडू यांनी गेल्या वर्षीच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांना वारंवार उचके यांच्या विरोधात काय कारवाई केली?अशी विचारणा करणारी अनेक पत्रे देऊन सुद्धा त्यांना याचे कोणतेही उत्तर देण्याचे सौजन्य मनपा आयुक्तांनी अद्याप तरी दाखविले नाही.
‘सत्ताधीश’ने अति.आयुक्त राम जोशी यांना उचके याचा जामीन अर्ज निरस्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर, उचके यांच्यावरील कारवाईबाबत विचारणा केली होती,जोशी यांनी त्यावेळी ’जे कायद्यात आहे त्याप्रमाणे कारवाई होईल’असे सांगून एवढा गंभीर मुद्दा टोलवून लावला होता.
याशिवाय एवढ्या महत्वाच्या पदावर ‘कायम ‘नियुक्ती न होता ‘प्रभारी’ पदावर एकाच अधिका-याला गेल्या दहा वर्षांपासून कार्यभार सोपविण्यात आल्याबाबत विचारणा केली असता,आम्ही शासनाकडे अग्निशमन विभागच्या प्रमुख पदासाठी योग्य अधिका-याच्या नियुक्तीसाठी वारंवार पत्रे लिहली मात्र अद्याप शासनाकडून कोणाचीही नियुक्ती झाली नसल्याचे त्यांनी सांगितले होते.याशिवाय उचके यांच्या शिवाय अग्निशमन विभागात इतर कोणताही अधिकारी ‘योग्य पात्रतेचा ’ नसल्याने त्यांच्याचकडे प्रभारी पद कायम ठेवल्याचे देखील राम जोशी यांनी सांगितले होते.
एकीकडे राज्याचे गृहमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.दुसरीकडे नागपूर मनपात गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्याच पक्षाची सत्ता होती.अश्या वेळी फडणवीस यांच्याच शहरातील अवघ्या २७ वर्षीय तरुणीने एका उच्च पदस्थ अधिका-यावर एवढे गंभीर आरोप केले असता व या घटनेला सहा महिने एवढा काळखंड लोटला असतानाही, चारित्र आणि वर्तनाच्या बाबतीत एवढे गंभीर आरोप असलेल्या व न्यायालयाने जामीन फेटाळला असताना अश्या आरोपी अधिका-याला पाठीशी सातत्याने घालण्यात भाजपच्या पदाधिका-यांच्या भूमिकेविषयी,जनसामान्यांमध्ये तीव्र संताप उमटला आहे.
गृहमंत्री फडणवीस यांनी निदान आता तरी अटक झालेल्या या अधिका-याला तातडीने निलंबित करण्याचे आदेश देऊन आपल्या आत्मसन्मानासाठी प्रदीर्घ काळापासून लढत असलेल्या तरुणीला न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.
महत्वाचे म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी उचके याने पोलिस विभागातील उच्च अधिका-यांसोबत आपल्या ओळखीचा फायदा घेऊन, या तरुणीच्या पतीलाच एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बोलावून घेऊन,त्याने एक कोटीची लाच मागितल्याचा आरोप करीत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.हे प्रकरण देखील न्यायालयात विचाराधीन आहे,हे विशेष.
……………………




आमचे चॅनल subscribe करा
