
ज्वाला धोटे यांचा पत्र परिषदेत खुला प्रश्न
७७ कोटींचे सुसज्ज सर्जिकल कॉम्प्लेक्स मात्र सलाईनच्या बाटलीसाठीही रुग्णांचे हाल बेहाल
एक्सपायरी डेटच्या औषधांची दलालांकडून सर्रास होते विक्री:रुग्णांच्या जिवाशी खेळ
संचालक डॉ.बिजवे धृतराष्ट्राच्या भूमिकेत!
नागपूर,ता.२५ फेब्रुवरी २०२३: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचाराला येणाऱ्या रुग्णांना बेकायदेशीररित्या औषध विक्री केली जात असल्याचे धक्कादायक व्हिडीयोज नुकतेच सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले. मेयोतील डॉक्टरांच्या मदतीने औषध विक्रीतले दलाल रुग्णांची सर्रास लूट करीत असल्याचे धक्कादायक वास्तव त्यातून समोर आले. वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराची निवृत्त न्यायाधीश किवा तत्सम अधिकाऱ्यांमार्फत निःपक्ष चौकशी करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,मेयोसारख्या रुग्णालयात आंदोलन करने व रुग्णांना वेठीस धरणे मनाला पटत नसले तरी, मेयो प्रशासन यासाठी बाध्य करीत असल्याचा आरोप ‘अन्याय निवारण समिती’च्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी शनिवारी पत्रकारांशी साधलेल्या संवादात केला.
मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये एका औषध विक्रेत्याने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून अवैध औषध विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी तहसील पोलिसांनी बेकायदेशीर औषध विकताना दोघांना अटक केली. त्यावरून नागपूर जिल्हा औषध विक्रेता संघटनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत धोटे यांनी ही भूमिका मांडली.
याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या,की स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हा जो काही गोरखधंदा उघडकीस आला आहे तो अतिशय दूर्देवी प्रकार असून केवळ वैद्यकिय व्यवसायालाच नव्हे तर माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे.कोट्यावधी,अब्जावधी रुपयांचा औषध पुरवठा केंद्र व राज्य शासनाचा मेयो रुग्णालयात होत असतो.७७ कोटी रुपये खर्च राज्य शासनाने मेयोमध्ये सुसज्ज असे ४०० बेडचे सर्जिकल कॉम्प्लेक्स उभारलं मात्र ज्यावेळी मी त्या कॉम्प्लेक्समध्ये गेले त्यावेळी रुग्णांना प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारी एनएस सलाईनची बॉटलही उपलब्ध नव्हती,ते देखील नातेवाईक रुग्णांसाठी बाहेरुन विकत आणून डॉक्टरांना देत होते.
विशेष म्हणजे कोणत्याही डॉक्टरचे प्रिस्किीपशन यावर त्यांचे नाव,पद,पदवीचा,रुग्णाचा आणि औषधांचा स्पष्ट असा उल्लेख छापला असतो मात्र मेयोमधील डॉक्टरांनी लहान लहान चिटो-यांवर मेयोच्या या कॉम्प्लेक्समध्ये भरती असणा-या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रिस्किीपशन लिहून दिले होते!ते बघून दहावी-बारावीच्या परिक्षांधील कॉपी बहाद्दरांची आठवण झाली.ती औषधे जर रुग्णालयात उपलब्ध नव्हती तर त्याच रुग्णालयाच्या परिसरात शासन मान्य असणा-या औषध विक्री करणा-या दूकानदारांकडे रुग्णांच्या नातेवाईकांना का लिहून देण्यात आली नाही?जे मुबलक किंमतीत व शासनाच्या सर्व अटी,शर्थींचे पालन करुन औषध साठा सुरक्ष्ीत ठेवतात त्यांच्याकडून मेयोमधील डॉक्टर्स यांनी का औषधे मागविली नाहीत?असा सवाल त्यांनी केला.
एवढ्या गंभीर घटनेवर मेयोचे संचालक डॉ.संजय बिजवे यांनी पाच जणांची समिती गठीत करुन कर्तव्याची इतिश्री मानून घेतली.समितीत सगळे डॉक्टर्स मेयो रुग्णालयाचेच घेतले!हे डॉक्टर्स स्वत:च्या सहका-यांना ,स्टाफला वचविण्याचा प्रयत्न करणार नाहीत का?
या समितीचा अहवाल हा आरोपी डॉक्टर्सच्या बाजूनेच लागेल हे सांगायला कुण्या ज्योतिषतज्ज्ञाची गरज नसल्याची टिका याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी केली.मग ही अशी हास्यासपद समिती डॉ.बिजवे यांनी कशी काय स्थापन केली?असा सवाल करीत, या समितीत त्यांनी निवृत्त न्यायाधीश किवा निवृत्त आयपीएस अधिकारी,निवृत्त मेडीकलचे अधिष्ठाता घेतले पाहिजे तसेच काही स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी घेतल्यास एवढ्या गंभीर घटनेची निष्पक्ष चौकशी होईल,असे त्या म्हणाल्या.
एकीकडे डॉ.बिजवे हे एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला सांगतात आमच्याकडे मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध आहे तर दुसरीकडे दुस-या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला सांगतात आमच्याकडे मुबलक पुरवठा नाही,आता अश्या संचालकाची चौकशी कोण करणार?राज्य शासनानेच या संचालकांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करावी आणि जोपर्यंत यातील संपूर्ण दोषी अधिकारी,डॉक्टर्स,कर्मचारी तसेच संबंधितांची चौकशी होत नाही तोपर्यंत या सर्वांचे निलंबन करण्याची मागणी केली.मेयोचे संचालक हे स्वत: पॅथोलॉजीचे व्याख्याते आहेत.शासनाने त्या इमारतीत अनेक पॅथोलॉजी लॅब्स आहेत मात्र या संपूर्ण इमारातीतच दलालांचा सुळसुळाट असल्याचा आरोप करीत, मेयो रुग्णालय हे शासनाचे रुग्णालय आहे की दलालांचे?असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.औषधांचे दलाल,पॅथोलॉजीचे दलाल,पीएम रिपोर्ट लवकरच देण्यासाठीचे दलाल,मृतदेहांचे दलाल,इथे फक्त दलालच कार्यरत आहेत का?डॉ.बिजवे हे त्यामुळेच संशयाच्या भोव-यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.
तेथील अनेक रुग्णांचे नातेवाईकच सांगतात सतत ८००,१२००,१५०० इतक्या पैशांची मागणी त्यांच्याकडून केली जाते,रक्तचाचणी करायला लावतात.मेयोमध्ये प्रत्येक विभागाची सुसज्ज पॅथोलॉजी असताना गरीब रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी बाहेरच्या पॅथोलॉजीचे दलाल मेयोत येऊन रक्त तपासणीसाठी घेतात,गरीब वर्गाचे हे शोषण मुर्दाच्या टाळूवरचे लोणी खाणे नव्हे का?आधी तर दोषींना कारागृहात डांबा नंतर डॉ.बिजवेंनी तपासणी समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय आहे का?या प्रश्नावर बोलताना,निश्चितच त्यांची देखील कारवाई संश्ायास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.मेयोचे अनेक डॉक्टर्स,स्टाफ नर्सेस,कर्मचारी यांचे मोबाईल नंबर या प्रकरणात पकडल्या गेलेल्या आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडले असूनही पोलिसांची चौकशी देखील थातूरमातूर असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिस विभाग तर या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागावर प्रकरण ढकळत असून, या विभागाने आम्हाला कलमांच लिहून दिल्या नाहीत की कोणत्या कलमां अंतर्गत आरोपींवर कारवाई होऊ शकेल!नीरज लोहकरे नामक अन्न व औषध पुरवठा अधिकारी यांनी पोलिसांना काहीच लिहून दिले नसल्याने हा अधिकारी आपल्या कर्तव्याला मुकला असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणात जे दोन आरोपी जे पकडले गेले ते देखील मुख्य आरोपी नसून लहान मासे आहेत,या प्रकरणातील ‘व्हेल‘ मासे पोलिसांनी जाळ्यात पकडले पाहिजे अशी मागणी करीत, या प्रकरणात तर काही औषधे जी रुग्णांना पुरवण्यात आली त्याची कालमर्यादा देखील संपली होती,त्यामुळे हा रुग्णांच्या जीवाशी सर्रास खेळ चालत असल्याचा धक्कादायक आरोप धोटे यांनी यावेळी केला.
परिस्थितीला शरण जाऊन गरीबातला गरीब माणूस या रुग्णालयात उपचारासाठी येत असतो,परंतूू शासकीय रुग्णालयात असा जर गरीब रुग्णांच्याच फसवणूकीचा गोरखधंदा होत असेल तर शासनाने आमच्यावर अशी वेळ आणू नये की आम्ही आंदोलन करावं.आमची तशी ईच्छा नाही व माझ्या तत्वात देखील ते बसत नाही.आमची फक्त महाराष्ट्र शासन व आरोग्य मंत्री यांना विनंती आहे की मेयोच्या संचालकांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी तसेच त्यांनी जी थातूरमातूर समिती गठीत केली आहे ती बर्खास्त करावी व निवृत्त न्यायाधीश,निवृत्त आयपीएस अधिकारी अश्या अधिका-यांची समिती गठीत करण्याची मागणी त्यांनी केली.यामुळे एवढ्या गंभीर घटनेची निष्पक्ष चौकशी होईल,असे घडले नाही तर संविधानाने न्यायालयाची पायरी चढण्याची देखील मुभा आम्हाला दिली असल्याचा सूचक इशारा देखील याप्रसंगी त्यांनी दिला.
औषध विक्रेता संघटनेची बाजू मांडताना सचिव हेतल ठक्कर म्हणाले, या गोरखधंद्यात अनेक बडे मासे गाळाला लागू शकतात. शिवाय या बेकायदेशीर औषध विक्रीमुळे अप्रमाणित औषध रुग्णांसाठीही घातक ठरू शकतात. त्यामुळे या घटनेची त्रयस्थांमार्फत निःपक्ष चौकशी करावी.
—————-
काय आहे प्रकरण?
गरिबांना लूटणाऱ्या या गोरखधंद्यात मेयोतील डॉक्टर आणि परिचारिकांचाही सहभाग असू शकतो, असे सांगत धोटे म्हणाल्या, हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतरही अन्न व औषध प्रशासनाने कसलीही कायदेशीर कारवाई केली नाही. मेयोत बेकायदेशीररित्या औषध विकणाऱ्यांजवळ औषध विक्रीचा कुठलाही परवाना नाही. शिवाय औषध साठवणूकीच्या नियमांनाही पायदळी तुडविले गेले. विक्रेत्यांनी गरीबांच्या माथी मारलेली औषधे मुदत संपलेली होती. तरी देखील ती विकली गेली. अप्रमाणित औषधे विकणे कायद्याने गंभीर गुन्हा असतानाही एफडीएने वेळीच कायदेशीर कारवाई देखील केली नाही. याची सखोल विभागीय चौकशी झाली नाही, तर आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही धोटे यांनी दिला.
औषध विक्रेता संघटनेची बाजू मांडताना सचिव हेतल ठक्कर म्हणाले, या गोरखधंद्यात अनेक बडे मासे गाळाला लागू शकतात. शिवाय या बेकायदेशीर औषध विक्रीमुळे अप्रमाणित औषध रुग्णांसाठीही घातक ठरू शकतात. त्यामुळे या घटनेची त्रयस्थांमार्फत निःपक्ष चौकशी करावी.
शहरातील विविध फार्मसींवर वॉच ठेवून प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करणाऱ्या फार्मसींवर पोलिस कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतरही शहरात सर्रासपणे अशाप्रकारे औषधांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याची बाब समोर आली. विशेष म्हणजे १५ फेब्रुवारीला तहसील पोलिसांनी अशाच एका व्यक्तीला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयासमोरून (मेयो) ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३५ हजार रुपयांच्या औषधी जप्त केल्या.
सुमित बंडू सोनुलकर (वय १९, रा. जुने बालाजी मंदिर, विश्वकर्मानगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सुमित एक बॅग घेऊन मेयो रुग्णालयासमोर उभा होता. यावेळी प्रवीण व्यंकटराव अंजीकर (वय ४५, रा. गोळीबार चौक) आणि त्यांचे सहकारी तेथून जात असताना सुमितच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. त्यांनी त्याला पकडून बॅग तपासली असता, त्यात मोठ्या प्रमाणात औषधी असल्याचे आढळले. त्यांनी त्याला तहसील पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याकडून ३५ हजार ९३९ रुपयांची औषधे जप्त केली. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांना बोलावून त्याची तपासणी केली. याशिवाय मेयो प्रशासनालाही माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे त्या औषधांचे कुठलेही प्रीस्क्रिप्शन नसल्याने सुमितला अटक करीत त्याच्यावर गुन्हा नोंदविला.
सुमित सोनुलकर स्वतःला औषध विक्रेता सांगायचा. तो दररोज मेयो रुग्णालयाबाहेर रात्रीच्या सुमारास उभा राहून तेथील रुग्णांना आवश्यक त्या औषधांची विक्री करायचा. त्यातून तो आर्थिक लाभ कमवायचा. याबाबत तेथील रुग्णांच्या नातेवाइकांचीही पोलिसांनी चौकशी केली. त्यात हे सत्य समोर आले.
………………………….




आमचे चॅनल subscribe करा
