
भाजपच्या गोटात नाराजीचा सूर!
शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत ‘इच्छूकांचेच’फटाके!
नागपूर,ता.१ फेब्रुवारी २०२३: भारतीय जनता पक्षाकडून या वेळी शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तिकीट मिळण्याची आस धरली होती,इतकंच नव्हे तर गेल्या दोन वर्षांपासून आपापल्या स्तरावर ‘प्रामाणिकपणे’पूर्व तयारी ही केली होती मात्र,‘सर्व्हे’झाला अन्….नागो गाणार यांच्याशिवाय इतर कोणताही उमेदवार दिल्यास, पदवीधरची पुनरावृत्ती होण्याचा खात्रीलायक ‘अहवाल’ मिळताच उशिरा का होईना, गाणार यांनाच समर्थन देण्याची घोषणा झाली,यामुळे भाजपजधील इच्छूकांचा चांगलाच हिरमोड झाला,गाणार यांना तिस-यांदा विधान परिषदेत पाठवण्याचा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय काही इच्छूकांच्या पचनी पडला नाही,तोच राग परवा पार पडलेल्या मतदानात ही उमटला असल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.
भाजपमधील यापैकी एक ‘इच्छूक’ तर चक्क मोहता सायंस समोरील विरोधकाच्या बूथच्या मागे विरोधी उमेदवाराच्या एका श्रेष्ठीसोबतच बराच वेळ गप्पांमध्ये रंगल्या होत्या!हे चित्र भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांना आश्चर्यचकीत करणारे होते.या इच्छूकाच्या ‘मंच व संचाच्या’ शिक्षकांनी नेमके कोणाला मतदान केले?याचीच चर्चा रंगल्याने भाजप श्रेष्ठींमध्ये सर्वच स्तरावर तीव्र नाराजी पसरली असल्याची बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे अलीकडच्या सर्वच निवडणूका,मग त्या नगर पंचायतीच्या असो,जिल्हा परिषद ते पदवीधर अश्या अनेक निवडणूकांमध्ये भाजपला पराभव पतकरावा लागला असल्याने किमान शिक्षक मतदार संघात तरी पक्षाची बूज राहावी,या उद्देशाने भाजप निवडणूकीत उतरला असला तरी, पक्षातीलच काही इच्छूकांच्या नाराजीचा फटका ही देखील ‘विजयश्री ’ हूकण्याचे कारण ठरु शकते,याची जाणीव झाली असल्यानेच भाजपमध्ये आता वरिष्ठ पातळीवर ‘फेस सेव्हिंग’म्हणजे अब्रू वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले असल्याचे बोलले जात आहे.
भाजपने ‘अधिकृतपणे’ गाणार यांना या निवडणूकीत समर्थन जाहीर केले असल्याने व या ही निवडणूकीत गाणार यांचा पराभव झाल्यास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याच गृहनगरीत या दोन्ही नेत्यांचा कंट्रोल संपला आहे का?असाच मॅसेज राज्यात जाऊ शकतो, किंबहूना भाजपने लोकांचा विश्वास गमावला आहे,असा ही अर्थ विरोधक यामुळे प्रभावीरित्या जगजाहीर करण्यात यशस्वी होतील,यात शंका नाही.
१ डिसेंबर २०२० रोजी पार पडलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा झाल्यावर भाजप मधील इतर काही इच्छूकांप्रमाणेच त्यावेळी भाजप सहकार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांनी थेट विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच फोनवरुन संपर्क साधून दावा केला असल्याचे वृत्त देखील त्याकाळी माध्यमात झळकले होते!
करोनावर मात करुन रुग्णालयातून सुटी होताच फडणवीस यांनी निवडणूक आणि संघटनेचा मोर्चा सांभळता होता.लोकसभा निवडणूकीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे निवडणूक प्रमुख असणारे संजय भेंडे यांनी पदवीधर मतदारसंघासाठी स्वत:ची दावेदारी सांगत त्यांनी पक्षासाठी आजपर्यंतच्या केलेल्या कार्यांचा पाढा देखील फडणवीस यांच्यासमोर वाचला हाेता.
मात्र,पदवीधरसाठी फडणवीस यांचे उजवे हात समजले जाणारे माजी महापौर संदीप जोशी यांचे नाव घोषित झाल्याने भेंडे यांना त्या ही वेळी आपली तलवार म्यान करावी लागली होती.
याशिवाय शिक्षण मंचाच्या कल्पना पांडे यांनी देखील शिक्षक मतदार संघासाठी गेल्या दोन वर्षांपासून चांगलीच मोर्चेबांधणी केली होती मात्र,ऐन वेळी त्यांचे ही नाव बाद झाले व पुन्हा गाणारांनाच समर्थन घोषित झाले.
यावेळी गाणारांना भाजपचे संघटन,कार्यकर्ते व पदाधिका-यांचे कितपत बळ लाभले?हे उद्या गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी घोषित होणा-या निकालातून कळेलच मात्र सध्या तरी भाजपच्या गोट्यात कमालीची ‘शांतता’असल्याचे दिसून पडत आहे.
भाजपमधील काही नाराज ‘इच्छूकांनी’ नेमके कोणाच्या पारड्यात वजन टाकले?याचा ही अदमास घेण्यात आल्याची चर्चा आहे. एकीकडे पदवीधर सारखेच आघाडीचे नेते यावेळी देखील आपला उमेदवार जिंकण्यासाठी एकजुट झाला असताना त्यामुळेच ‘हम तो डूबेंगे सनम तुमको भी ले डूबेंगे’ची इच्छूकांची मानसिकता ‘पार्टी विथ डिफरेन्स’पक्षासाठी किती तारक किवा मारक ठरते,याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे आघाडी समर्थित उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या मागे नेमके कशाचे ’बळ’आहे? याची एका केंद्रिय यंत्रणेद्वारे ‘छूपी’ झाडाझडतीही घेण्यात आल्याची चर्चा आहे.मात्र,अडबाले यांच्या मागे एकूण ३४ संघटनांचे बळ,निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळीच एकवटली असल्याचा अहवालच या यंत्रणेने दिल्याने,भाजपसमोर अडबाले यांना थांबविण्यासाठी कोणतेच ‘संवैधानिक’हत्यार गवसलेच नाही.
त्यामुळेच उद्या अजनी येथील मतमोजणी केंद्रासमोर नेमका कोणाचा गुलाल उधळल्या जातो,याकडे आता फडणवीस व गडकरी यांच्या गृहनगरीतील समस्त नागपूरकरच नव्हे तर संपूर्ण राज्याचेच लक्ष लागले आहे.

आमचे चॅनल subscribe करा