
‘पार्टी विथ डिफरेन्स’चे दोन क्रीडापटू चमकले छत्रपती नगरच्या क्रिकेट मैदानावर!
अश्लील शिव्यांसह केली पंचाना व धावांची नोंद घेणा-यांना मारहाण
कुप्रसिद्ध मुन्ना यादव यांच्या मुलांचे कृत्य
खासदार क्रीडा महोत्सवात घडलेल्या घटनेवर कार्यकर्त्यांची ‘झाकपाक’
नागपूर,ता.२० जानेवरी २०२२: छत्रपती नगर येथील मैदानावर खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यात भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेले कुप्रसिद्ध मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांनी स्पर्धा सुरु असताना धावांची नोंद घेणा-यांच्या व पंचाच्या अंगावर धावून जाऊन अतिशय खालच्या पातळीच्या शिव्या देऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना क्रिकेट खेळाच्या चौथ्या दिवशी घडली!
तीन दिवस ही स्पर्धा अतिशय योग्यरित्या पार पडली मात्र शहरातील कुख्यात गुंड म्हणून ज्याचे नावलौकिक आहे,ज्याच्यावर नागपूर शहरातील अनेक पोलिस ठाण्यात खंडणी वसूल करने,धाकदपटशाहीतून भूखंड हडपणे,महिलेचा विनयभंग,जीवे मारण्याची धमकी यासह अनेक गंभीर आरोप आहेत,न्यायालयातून सध्या जे जामीनावर बाहेर आहेत अश्या मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांचा सहभाग क्रिकेटच्या या स्पर्धेत असल्याने, खासदार क्रीडा महोत्सवाच्या नावलौकिकतेत यामुळे ‘भर’ घालणारी घटना काल घडली,मात्र कार्यकर्त्यांनी यामुळे पक्षाचे नाव खराब होत असल्याचे सांगून पडदा टाकण्याचा उद्योग चालवला आहे.
माध्यमांकडे या घटनेची वाच्यता न करण्याची तंबीच घटनेच्यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील या मैदानावर उपस्थित, क्रीडा महोत्सवाचे समन्वयक,पक्षाचे महामंत्री,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष,कार्यकर्ते व स्पर्धकांना देण्यात आल्याची चर्चा आहे.येत्या दोन तीन दिवसात या घटनेवर बैठकीत ‘वरिष्ठ’पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील दक्षीण-पश्चिमच्या युवा मोर्च्याचे शहराध्यक्ष मुन्ना यादवचा यातील एक मुलगा असून,या मतदार संघाच्या महामंत्र्यांसोबत मुन्ना यादवच्या या मुलाचे संबंध हे ताणलेले असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र,तीन दिवस शांततेत खासदार क्रीडा महोत्सवातील क्रिकेट स्पर्धा पार पडली असताना कुख्यात मुन्ना यादवच्या मुलांनाही भाजपमध्ये महत्वाचे पद आणि महत्वाचा ‘सहभाग’मिळत असल्याने हा पक्ष स्वत:ला दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत ‘पार्टी विथ डिफरेन्स’का म्हणवतो,याचे गूढ खासदार महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेत अश्यारितीने उलगडले!
खेळाचा निखळ आनंद घ्यायचा असतो, पंचांचा निर्णय सुसंस्कारीपणाने स्वीकारायचा असतो,खेळातील अपयश हिमतीने पचवायचा असतो,ही अशी नीती तत्वे मूळातच मुन्ना यादव यासारख्या कुख्यात गुंडाच्या सानिध्यात मुले शिकूच शकत नसल्यानेच, पंचांकडे धाव घेताना अतिशय खालच्या भाषेतील शिव्या देतानाचा व्हिडीयो बघून त्यामुळेच नागपूरकरांना आश्चर्य वाटले नाही.
गुरुवार दिनांक १९ जानेवरी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत खामला-११ आणि स्टार-११ या दोन संघामध्ये सामना सुरु होता.यातील एका संघामध्ये मुन्ना यादव यांची दोन्ही मुले करण व अजूर्न खेळत होती.सामना सुरु झाल्यावर अर्जुन यादवने थ्रो बॉलिंगवरुन पंचांसोबत वाद घातला.पंचांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र,यादव बंधूंनंी आम्ही सांगतो तसा निर्णय द्या,अशी मनमानी सुरु केली.
पंचांने नकार देताच पंचांशी वाद घालत त्यांना आणि सामन्याच्या धावांची नोंद(स्कोरर)घेणा-याला मारहाण करत त्यांना खाली पाडण्यात आले.
खेळ हा राजकारणासारखाच ‘बाहूबलीपणातून ’जिंकता येतो असाच समज या दोन्ही मुलांचा असल्याने, त्यांनी भाषेची व खेळाची कोणतीही गरिमा न राखता,अतिशय खालच्या पातळीवरच्या शिव्या पंचांना व स्कोररला हासडल्या.यादव बंधूंचे जिवलग समर्थक देखील त्यात सहभागी झाले व मैदानात उतरले.यामुळे हा सामनाच बंद करावा लागला.
यादव बंधूंच्या या गुंडगिरीमुळे अन्य ‘सुसंस्कारित‘खेळाडूंनी मैदानातून काढता पाय घेतला.सामन्याचे आयोजकांनी या घटनेची माहिती शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना देखील दिली.वरिष्ठांच्या बैठकीत येत्या दोन तीन दिवसात यावर चर्चा करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मारहाण झालेल्या पंचांनी व स्कोररने खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजक केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच पोलिसांकडे तक्रार करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
यापूर्वी मुन्ना यादव यांच्या मुलांनी मारहाण केल्याची अनेक प्रकरणे नागपूरकरांना मुखोदगत आहेत.मधल्या काळात मुन्ना यादव यांचा मुक्काम आघाडी सरकारच्या काळात न्यायालये,कारागृह ते जामिन असा असल्याने शहरात शांतता नांदत होती,मात्र २१ जूनला राज्यात आणि जगभरात ‘जागतिक योग दिवस’साजरा होत असताना,त्याच दिवशी शिंदे गटाने ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खूर्ची खाली खेचून त्यांना शीर्षासन करने भाग पाडले.
ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची खूर्ची जाताच महाविकासआघाडीची सरकार गडगडली,३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.फडणवीस यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणारे गृहमंत्री पद स्वत:कडेच ठेऊन घेतल्याने,त्यांचे खासमखास समर्थक असणा-या व समाजसेवी म्हणविणा-या मुन्ना यादव सारख्या खंडणीखोर व गावगुंडांचे ‘अच्छे दिन’आले,इतकंच नव्हे तर गावगुंडांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना देखील ‘लोकशाहीला लाथ घालून ठोकशाहीचे साम्राज्य प्रस्थापित’करण्यात वाव मिळाला, क्रिकेट मैदानातील ही घटना उदाहरणादाखल सांगता येईल.
शहरातील हूशार व प्रतिभावान खेळाडूंना या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून संधी मिळावी याकरिता केंद्रिय मंत्री नितीन गडकरी या महोत्सवाचे भव्य आयोजन गेल्या पाच वर्षांपासून करीत आहेत,मात्र प्रतिभावान व प्रामाणिक खेळाडूंना डावलून ‘राजकीय गावगुंडं’स्पर्धेत निर्धोकपणे उतरणार असतील,पंचांना मारहाण करुन खाली पाडणार असतील,अश्लील शिव्या देणार असतील तर पुढील क्रीडा स्पर्धेत किमान या शहरातील चांगल्या व सुसंस्कारी घरातील मुला-मुलींना या महोत्सवात सहभाग घेण्यास कोणतेही पालक सहमती देणार नाही याचाही विचार वरिष्ठांच्या बैठकीत व्हावा,असा देखील सूर या घटनेमुळे नाराज कार्यकर्त्यांमध्ये उमटला आहे.
आपली राजकारणाची पोळी शेकण्यासाठी,शहरातील मोक्याच्या जागेवरील प्रचंड संपत्तीचे मालक होण्यासाठी काही राजकारण्यांना जरी अश्या गावगुंडांची मदत लागत असली,प्रत्येक मंचावर त्यांना बरोबरीने वागणूक देत मिरविलेही जात असले, आमच्या जवळ आज सत्ता आहे,अधिकार आहे,गृह मंत्रालय,पोलिस विभाग आमच्या इशार-यावर काम करीत आहे,अश्या अहंकारातून अश्या गावगुंडांना आपल्याच मतदारसंघातील शहाणजोग मतदारांच्या छातीवर उभे केले जात असेल तर याचा ही विचार मतदारांनीच करायला हवा,अशी म्हणायची वेळ आली आहे.
सत्ताधीश‘ने या संदर्भात खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक व माजी महापौर संदीप जोशी यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता,कॉल रिसिव्ह झाला नाही.
भाजपचे कार्यकर्ते लोकलाजेतून आणि भाजपची उरली सुरली प्रतिष्ठा वाचविण्यासाठी जरी हा व्हिडीयो फार जुना असल्याची वल्गना करीत असले तरी फडणवीस आणि मुन्ना यादव यांच्या घनिष्ठ संबंधांच्या परिणामांची पोचपावती या घटनेतून नागपूरकरांना मिळाली आहे,असेच आता म्हणावे लागेल.
’




आमचे चॅनल subscribe करा
