फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमधक्कादायक!खंडणीच्या आरोपी पोलिस कर्मचा-याला आयुक्तांनी दिल ‘सक्त ताकीदची’शिक्षा!

धक्कादायक!खंडणीच्या आरोपी पोलिस कर्मचा-याला आयुक्तांनी दिल ‘सक्त ताकीदची’शिक्षा!

Advertisements

सामान्यांना याच गुन्ह्यासाठी डांबले असते कारागृहात:संविधानात मात्र कायदा सर्वाना समान!

वैयक्तीक खुन्नसवरुन एकाच व्यक्तीवर दाखल केली दोनवेळा अट्रासिटी

पोलिस कर्मचा-याच्या जाचामुळे एका आरोपीनेही केली आत्महत्या!

‘खब-यावर’ही झाला होता जीवघेणा हल्ला

‘पत्रकार’म्हणतो,तो ’जातीचा’म्हणून बातमी छापणार नाही!

नागपूर,ता.१२ जानेवरी २०२३: जरीपटका पोलिस ठाण्यात कार्यरत असताना वादग्रस्त पोलीस कर्मचारी आनंद पुरुषोत्तम वानखेडे याने एका अल्पवयीन मुलाचे प्रकरण दडवून ठेवण्यासाठी त्याच्या कुटूंबियांकडून ३० हजार रुपयांची बेकायदेशीर वसुली केली.एका प्रकरणात आरोपी असणा-या त्या अल्पवयीन मुलाला कारागृहात डांबण्यात येणार नाही,या सबबीखाली ही रक्कम उकळण्यात आली मात्र,त्या मुलाला कारागृहाची शिक्षा झाल्याने त्याच्या कुटुंबियांनी या वादग्रस्त पोलिस कर्मचा-याला पैसे परत मागितले,ते परत न केल्याने अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी राहूल कुमार शेंडे यांनी वानखेडेच्या विरोधात पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे व परिमंडळ ५ च्या उपायुक्त मनीष कलवानिया यांच्याकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीत शेंडे यांनी नमूद केले की आनंद वानखेडे व दोन इतर पोलिस कर्मचारी हे १२ जानेवरी रोजी त्यांच्या घरी पंचवटी नगर येथे आले व त्यांचा १७ वर्षीय मुलगा याच्या विरोधात चोरीच्या प्रकरणाची तक्रार आली असल्याचे सांगितले.यामुळे त्यांच्या घराची तपासणी करावी लागेल असे सांगितले.शेंडे कुटुंबियांनी या तिन्ही पोलिस कर्मचा-यांना घराच्या झाडाझडतीत पूर्ण सहकार्यही केले.

या झाडाझडतीत चोरीचे कोणतेही सामान या तिन्ही पोलीस कर्मचा-यांना गवसले नाही तरी देखील त्या अल्पवयीन मुलाला ते पोलीस ठाण्यात घेऊन आले.त्याची दूचाकी देखील जप्त करुन ठाण्यात आणली.मुलाला पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याने संपूर्ण कुटूंबच पोलीस ठाण्यात पोहोचले.कारवाईच्या नावावर त्यांना अनेक तास तसेच बसवून ठेवण्यात आले.मुलाच्या काकांनी वानखेडेला मुलाला कशासाठी पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले?अशी विचारणा केली,यावर वानखेडेने एका चोरीच्या लहानश्‍या प्रकरणात विचारपूस करायची असल्याचे सांगितले.याचे वय १७ वर्ष असल्याने फक्त कलम लाऊन त्याला सोडून देऊ,याला कोर्टकचेरी नाही करावी लागणार तसेच याला कोर्टात ही कधी जावे लागणार नसल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

ही केस माझ्याच हातात असल्याने मी सगळं काही सांभाळून घेईल मात्र मुलाचे भवितव्य खराब करायचे नसेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील,अशी मागणी वानखेडे यांनी शेंडे कुटूंबियांना केली.शेंडे कुटूंबियांनी जसेतसे आनंद वानखेडेला देण्यासाठी ३० हजार रुपये जमा केले.मात्र वानखेडे यांनी त्यांना जीरो माईल नावाच्या चहा ठेल्यावर असलेल्या अजय गिरडकर नावाच्या स्वाधीनते पैसे करण्यास सांगितले.

अजयने मात्र ती रक्कम त्याच्यासोबतच्या एका इसमाला देण्याची सूचना केली.पैसे दिल्यावर मुलाला रात्री आठ वाजता नंतर घेऊन जाण्यास सांगितले.मात्र दुस-याच दिवशी १३ जानेवरी रोजी शेंडे कुटूंबियांना कळले की आनंद वानखेडे याने पैसे घेऊन सुद्धा त्यांच्या मुलाच्याविरुद्ध कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला!एवढंच नव्हे तर जप्त केलेली दुचाकी परत करण्यासाठी पुन्हा २० हजार रुपयांची मागणी केली!यानंतर शेंडे कुटूंबियांनी काही पत्रकार व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आनंद वानखेडे यांच्यावर कारवाईसाठी उपायुक्तांकडे निवेदन दिले.आता वानखेडे हा वेगवेगळ्या माध्यमातून शेंडे कुटूंबियांवर सतत दबाब निर्माण करीत असल्याचा आरोप शेंडे कुटूंबिय करीत आहेत.

आनंद वानखेडे हा गणेशपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असताना एका रमी क्लबवर टाकलेल्या धाडीदरम्यान २ लाख २० हजार रुपये उडविल्याचे प्रकरण ही समोर आले होते.या प्रकरणात पीडित व्यक्तीने सहपोलीस आयुक्तांकडे ‘व्हिडीयो क्लिपिंगसह‘कारवाईची मागणी केली होती.वाडी येथील रहीवाशी शब्बीर शेख यांचा गंजीपेठ येथे विश्‍वनाथ बहूउद्देशीय क्रीडा मंडळ या नावाने रमीचा क्लब आहे.क्लब चालविण्यासाठी आनंद वानखेडे याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती.वानखेडे याने ठाणेदार गांगुर्डे यांच्या नावाने आणखी ५० हजार व इतरांसाठी २० हजार प्रति महिना देण्याचे देखील शेख यांना सांगितले.शेख यांनी नकार देताच २८ मार्च रोजी क्लबवर छापा मारण्यात आला.तेथे पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली.त्यावेळी शब्बीर शेख यांची दुचाकी क्लबच्या बाहेर उभी होती.त्यात २ लाख २० हजार रुपये होते.वानखेडेने ती रक्कम स्वत:कडे ठेऊन घेतली.क्लबमध्ये बसलेल्या इतर व्यक्तींच्या वाहनांमधूनही पैसे काढण्यात आले.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.विशेष म्हणजे पोलीस कर्मचा-यांनी दुचाकी वाहनांच्या डिक्कीमधून मिळालेल्या रकमेचा कारवाईत काहीही उल्लेख केला नाही,अशी तक्रार शब्बीर शेख यांनी केली.यासंदर्भात त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांकडे दाद ही मागितली मात्र वानखेडेंवर कोणतीही कारवाई झाली नाही.या दरम्यान गणेशपेठ पोलीस ठाण्यातून होणा-या वसूलीच्या प्रकारांमुळेच अवैध धंदे व गैरप्रकारांना अभय मिळाले असल्याची देखील चर्चा उठली होती.

गणेशपेठ पोलिस ठाणे सातत्याने नव्या नव्या कारनाम्यातून चर्चेत राहीला होता.या पोलिस ठाण्यातील दलानेच दिल्ली जाणा-या एका मेटलच्या ट्रकला तहसीलमध्ये थांबवून लाखो रुपये उकळले असल्याची देखील घटना समोर आली होती.तहसील ठाण्यात पोहोचल्यानंतर गणेश पेठ पोलिस दलाच्या या अवैध व गैरकायदेशीर वसूली बाबत मेटल व्यवसायिकाला माहिती पडले.

याचप्रकारे सेंट्रल एवेन्यूच्या एका हॉटेलमध्ये नकली नोटांची छपाई करणा-या एका दिल्लीतील गैंगकडून देखील याच पोलिस ठाण्यातील काही विशिष्ट कर्मचा-यांनी दोन लाखांच्या वर खंडणी उकळली होती.राजस्थान पोलिसांनी या नकली नोटा छापणा-यांना अटक केल्यानंतर गणेश पेठ पोलिस ठाण्यातील या ‘कर्तव्यनिष्ठ’पोलिस दलाचा ‘कारनामा‘समोर आला होता!मात्र,वरीष्ठ पातळीवरुनच ‘अभय’असल्याने त्यांचा कोणीच ’बाल भी बाका’करु शकला नाही.प्रसार माध्यमांमध्ये या सर्व घटनांना मात्र ठलकपणे प्रसिद्धी मिळाली होती.

वानखेडेच्या जाचाला कंटाळून तरुण आरोपीची आत्महत्या!
चोरीच्या आरोपात अटक झालेल्या नीलेश रामदयाल रजक नावाच्या एका तरुण आरोपीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर झोपडपट्टीत झाली.नीलेश हा एम्प्रेस मॉल येथील एका इलेक्ट्रानिक्स शोरुममध्ये काम करत होता.शोरुम मालकाने नीलेश सोबतच शोरुममध्ये काम करणा-या कपिल सिद्धार्थ मेश्राम(वय वर्ष २१,राहणार मूर्ती कारखाना इमामवाडा)आणि शिवम कमल सोनी(वय १८,राहणार भांडे प्लाट चौक)यांच्या विरोधात गणेशपेठ पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली होती.त्यांच्यावर गोडाऊनमधून ७ एलईडी चोरण्याचा आरोप करण्यात आला होता.

(छायाचित्र:आत्महत्या करणा-या तरुणाची चिठ्ठी व त्यात नमूद केलेले नाव)

गणेशपेठ पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी नीलेशसह अन्य तिघांना अटक केली.त्यांच्यापासून एलईडी हस्तगत केले.पोलिस कस्टडी संपल्यानंतर त्यांना तडीपार देखील करण्यात आले.या अटकेनंतर नीलेशने आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून जगाचा निरोप घेतला.या चिठ्ठीत गणेशपेठ पोलिस ठाण्यातील अनंता या कर्मचारीवर तसेच आनंद वानखेडे यांच्याद्वारे १० हजार रुपये त्याच्याकडून उकळल्याचा उल्लेख केला होता.या दोन्ही पोलिस कर्मचा-यांसोबत त्याने शोरुम मालक व आपल्या मित्रांना त्याच्या आत्महत्येसाठी दोषी धरले होते.

पोलिसांच्याच ‘पंटर’वर जीवघेणा हल्ला-
पोलिसांसाठी ‘पंटर’म्हणजे ‘खब-या’म्हणून काम करणा-या एका इसमावरच जीवघेणा हल्ला झाला.या हल्ल्यासाठी गणेशपेठ पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचा-यांवर शंका देखील व्यक्त झाली होती.या हल्ल्यात जखमी शेख अकबर शेख महबूबच्या कुटूंबियांनी ‘पोलिसांकडून’ त्याला धमकावल्याचा आरोप केला होता.शेख अकबर हा अनेक वर्षांपासून पोलिसांसाठी खब-याचे काम करीत होता.त्याच्या माहितीतून पोलिसांनी अनेक प्रकरणात कारवाई केली होती.

मात्र,नीलेशच्या आत्महत्या पूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमुळे अडचणीत आलेल्या गणेशपेठ पोलिस ठाण्यातील काही कर्मचा-यांना या मागे अकबरचा हात असल्याचा संशय होता.त्यांनी त्याच्या घरी जाऊन घर विकून वस्ती सोडून जाण्यासाठी अकबरला धमकावले होते.हा प्रकार अकबरच्या पत्नी नसरीन समोर घडला होता.

अकबरने दिलेल्या माहितीमुळेच पोलिसांनी बजेरिया निवासी शेख रफीक उर्फ मुन्ना तीन पत्ती आणि पवन सुंदरलाल गौर यांना अटक केली होती.त्यांचा संतरा मार्केटमध्ये हॉटेलचा व्यवसाय आहे.अकबर हा अनेकांच्या डोळ्यात खूपत असल्यानेच त्याच्यावर संतरा मार्केट येथील १३ क्रमांकाच्या नाक्याजवळ जीवघेणा हल्ला झाला.त्याला जीवानिशी मारण्यासाठी त्याच्या पोटावर व छातीवर ७ ते ८ चाकूचे घाव घालण्यात आले होते.एका ऑटोवाल्याने त्याला तात्काळ मेयाे रुग्णालयात पोहाेचवले.या घटनेनंतर झोन-३ चे डीसीपी एन.राजकुमार घटनास्थळी पोहोचले होते.

या घटनेनंतर पोलिसांच्या खब-यांमध्ये तीव्र संताप उमटला होता.पोलिस खात्यातील काही भ्रष्ट कर्मचा-यांमुळे संपूर्ण विभाग बदनाम होतो,त्यांच्याही जीवाला यातून धोका निर्माण हाेत असल्याचा संताप त्यावेळी व्यक्त झाला होता.

अमित दुबेचं प्रकरण-
सवर्ण असणा-या अमित दुबे नामक एका युवकाचे बौद्ध धर्मिय असणा-या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.२००६ ते २०१२ असे ६ वर्ष ते नात्यात होते.मात्र,त्यांच्या घरी या विवाहाला विरोध होता.२०१२ साली तरुणीचा भाऊ हा पोलिस खात्यात नोकरीच्या भरतीसाठी पोलिस मुख्यालयात गेला असता सरावा दरम्यान तिथे त्याची ओळख आनंद वानखेडेसोबत झाली.भावाने अमित दुबे व त्याच्या बहीणीच्या प्रेमसंबंधाविषयी वानखेडे याच्याकडे तक्रार केली.वानखेडे याने दुबे याला पोलिस ठाण्यात बालावले.

यावेळी तरुणीला देखील बोलावण्यात आले.तिने अमितसोबत तिचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली देखील दिली मात्र लग्नास तिने नकार दिला.यानंतर वानखेडे याने अमित दुबेला धमकी दिली.२०१४ मध्ये वानखेडे याने अमित दुबेच्या विरोधात पहीली अट्रासिटी दाखल केली.यानंतर दुबे यानी माहितीच्या अधिकारात वानखेडे याचे अनेक काळे कारनामे बाहेर काढण्यास सुरवात केली.यामुळे वानखेडेने खुन्नसपणा काढून दुबेवर २०१७ साली दुस-यांदा अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे आपल्या तिन्ही तक्रारीत वानखेडेने वेगवेगळे बयाण नोंदवले आहे.२०१२ साली त्याने दोघांचे ‘प्रेमसंबंध’ होते असे लिहले तर दुस-या तक्रारीत ’मैत्री’ लिहली तर तिस-या तक्रारीत ’ एक तर्फी प्रेम’असल्याचे नमूद केले!

एवढंच नव्हे तर पोलिस मुख्यालयाच्या कँटिनमध्ये हे दोघे आमाेरे सामोरे आले असता वानखेडे याने दुबेला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.माहिती अधिकारात माझी माहिती काढून वरिष्ठांना पुरवतोस का?या खुनशीपणातून वानखेडे याने दुबेला मारहाण केली.यात अमित दुबे याचा हात तुटला.दुबेच्या तक्रारीवरुन वानखेडेवर ३२५,५०४ चा गुन्हा गिट्टीखदान पोलिस ठाण्यात दाखल झाला.

ही घटना १८ जून २०१४ मध्ये घडली होती.वानखेडेवर गुन्हा दाखल होताच त्याने दुबेवर अट्रासिटीचा गुन्हा दाखल केला.

दुसरी अट्रासिटीची तक्रार वानखेडे याने २०१७ मध्ये तहसील पोलिस ठाण्यात नोंदवली होती.विद्यमान एसीपी खांडेकर त्यावेळी तहसील पोलिस ठाण्यात पीआय होते.सामाजिक कार्यकर्ता म्हणून दुबे हे खांडेकरांना भेटायला गेले असता फाटकावरच वानखेडे उभा होता.त्याने येथे ही दुबेला शिविगाळ करण्यास सुरवात केली.मात्र,दुबे याने जातिवाचक शिवीगाळ केली असल्याचा बनाव करुन दुसरी अट्रासिटी लावली.दुबे यांच्यावतीने ॲड.प्रकाश जायसवाल यांनी कोर्टात केस लढली.

दुबे यानेच जातीवाचक शिविगाळ केल्याचा आव वानखेडे याने आणला मात्र सीसीटीव्ही फूटेज तपासले असता दुबे हा सरळ आत आला होता व वानखेडेसोबत काहीही न बोलता निघून गेला होता,हे वास्तव समोर आले.या केसमध्ये कोर्टाकडून अमित दुबेला जामीन मिळाला.

या सर्व घटनांमुळे अमित दुबे सातत्याने आनंद वानखेडेंच्या विरोधात माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत होता.त्यात तथ्य आढळल्याने जानेवरी २०२२ मध्ये आनंद वानखेडेचे बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली.

मुख्यालयात कर्तव्यावर असणे म्हणजे पोलिस कर्मचा-यासाठी काळ्या पाण्याचीच शिक्षा असते,असे म्हटल्या जाते कारण त्यात ‘वरकमाई’चे सारे मार्ग बंद होत असतात.या कारवाईविरोधात चवताळून आनंद वानखेडे याने आपल्या पत्नीला नूतन वानखेडेला समोर करुन प्रेस क्लब येथे अमित दुबेच्या विरोधात पत्र परिषद घेतली.

या पत्र परिषदेत आनंद वानखेडेच्या पत्नीने अमित दुबेवर अत्यंत गंभीर आरोप लावले.आमच्या नातेवाईकासोबत एकतर्फी प्रेम संबंधातून अमित दुबे हा माझ्या पतीच्या मागे गेल्या १० वर्षांपासून लागला आहे,त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करतो,यात काही पोलिस कर्मचारीच दुबेची साथ देतात इत्यादी असे अनेक आरोप नूतन यांनी दुबे याच्यावर लावले होते.माध्यमांसमोर नूतन वानखेडे ढसाढसा रडल्याही ही होत्या.

महत्वाचे म्हणजे आनंद वानखेडेवर त्यावेळी अवैध वसूलीच्या बाबीवर चौकशी सुरु होती,निलंबनाच्या भीतीतून हा पत्र परिषदेचा डाव रचण्यात आला.पत्र परिषदेत एका पत्रकाराने पिडीत मुलगी दुबेविरुद्ध स्वत: का समोर नाही आली?असा प्रश्‍न केला असता,तिचे लग्न झाले असून आता तिला एक मूल देखील असल्याचे उत्तर नूतन वानखेडे यांनी दिले होते.

वाहन चोरांकडूनही उकळली ४९ हजार रुपयांची खंडणी:पत्नीच्या बँक खात्यात केली जमा

३२५, ५०४ व ५०६ (ब) सारख्या गंभीर कलमा लागलेल्या आनंद वानखेडे या पोलिस कर्मचा-याने जरीपटका पोलिस ठाण्यात कार्यरत असताना नदिम उर्फ असददुल्ला नजीब खानला अटक केली होती.त्याने वाहन चोरीचा गुन्हा कबूल केला होता. त्याने त्याचा साथीदार उदय मारूती पाटील कोल्हापुर निवासीचे नाव देखील सांगितले होते. आनंद वानखेडे आणि त्याच्यासोबतच्या भरारी पथकाचे कर्मचारी यांनी उदय मारूती पाटील सोबत संपर्क साधून ५ लाख रुपयांची खंडणी वसूल केली होती व उदय मारूती पाटीलचे नाव या गुन्हयातून हटवले होेते. नदिम आणि उदयने मिळून आनंद वानखेडेला चार वाहनांची जप्ती दिली होती.

या प्रकरणानंतर उदय मारूती पाटील आणि आनंद वानखेडे व डी बी ब्रांचचे कर्मचारी यांच्यात चांगली मैत्री रुजल्याने, उदय पाटील अपघात झालेल्या गाड्यांचे क्रमांक त्यांना देऊ लागला. आनंद वानखेडे व डी बी पथक मिळून ते वाहन वेगवेगळ्या ठिकाणाहून आणून अपघातग्रस्त वाहनांचे क्रमांक चाेरीच्या वाहनांवार टाकून गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये आणत होते.

एवढंच नव्हे ज्यांचे वाहन तो जप्त करीत होता त्याच्याकडून देखील लाखांची वसूली करीत असे. ही रक्कम,वानखेडे डी बी पथक व उदय पाटील आपापसात वाटून घेत असत.आनंद वानखेडे याने भंडारातून अनेक चोरीचे वाहन जप्त करुन त्यांना बेवारस दाखवून मोठ्ी कमाई केली. आनंद वानखेडे आणि उदय पाटील हे प्रतापगढ, उत्तर प्रदेश येथे गेले तिथून ते पुणे, शिर्डी, नाशिक येथे गेले व तिथून ईनोवा, फॉरर्चूनर, टवेरा सारख्या वाहनांना ताब्यात घेऊन नागपूरात आणले.

बाहेरील राज्य व जिल्ह्यातून चोरीचे वाहन जप्त करुन बोगस तपास करीत असे. नागपुरातून चोरीचे वाहन घेऊन जाण्यासाठी आनंद वानखेडे याने उदय पाटीलची मदत केली.त्या मोबदल्यात उदय पाटील याने आनंद वानखेडे याच्या पत्नीच्या नूतन आनंद वानखेडे च्या बैंक अकाउंट मध्ये १ जुन २०१९ रोजी ४९,००० रुपये जमा केले . बैंक ऑफ इंडिया खाता क्रमांक 875710110000843 यावर आनंद वानखेडे हा आरोपींकडून पैसे जमा करवून घेत असत.

इमरानखान उर्फ इस्माईल खान रा. सुफियान नगर अमरावती शहर तसेच उदय मारूती पाटील हे आनंद वानखेडेसोबत मिळून नागपुरातून वाहन चोरी करुन घेऊन जात असत,यानंतर वानखेडेला त्याचा वाटा बँकेत रक्कम जमा करुन मिळत होती. अप्रैल २०१९ मध्ये सर्वात जास्त हा व्यव्हार घडला.

या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी देखील झाली. अतिशय प्रामाणिकेतेने क्राईम ब्रांचच्या अधिका-यांनी आपला अहवाल सेवानिवृत्त जॉईंट सिपी कदम यांना २०१९ मध्ये सोपवला. आज चार वर्ष होत आले तरी पोलिस आयुक्तांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही,हे विशेष!

पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात या वादग्रस्त पोलिस कर्मचा-याने कोणत्याही पोलिस ठाण्यात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण केला नाही,हे विशेष!वानखेडेंच्या विरोधात कलम ३२५,५०४ आणि ५०६ दाखल होऊनही त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,फार फार तर पोलिस ठाण्यातून मुख्यालयात बदली होते इतकंच.

(छायाचित्र:वानखेडेंवर कारवाई करण्यात यावी असे नमूद असणार हा अहवाल)

थोडक्यात आनंद वानखेडे या वादग्रस्त पोलिस कर्मचा-याच्या विरोधात नुकतेच एसीपी खांडेकर यांनी शेंडे यांच्या प्रकरणात त्यांच्या विरोधातील ३० हजार रुपयांच्या खंडणीच्या आरोपात कारवाई करण्याची शिफारस आपल्या अहवालात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना केली असून, आयुक्तांनी मात्र वानखेडे याला फक्त ’सक्त ताकीद’ची’शिक्षा ठोठावल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे!

खाकी वर्दी अंगावर नसलेल्या एखाद्याने अशी खंडणी वसूल केली असती तर आतापर्यंत कारागृहात त्याला डांबण्यात आले असते मात्र खंडणीसारख्या गंभीर गुन्हयात पोलिस कर्मचारीच अडकला असतानाही त्याला मात्र निलंबित करण्या ऐवजी ’सक्त ताकीद’देणारी कडक शिक्षा पोलिस आयुक्तांनी दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पत्रकाराचा तो ’जातीचा’असल्याने बातमी छापण्यास नकार!

पोलिस विभागाच नव्हे तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असणा-या पत्रकारितेत देखील अश्‍या ‘चमत्कारीक’ घटना घडत असतात.शेंडे यांनी सगळ्या पुराव्यानिशी क्राईम बिट सांभाळणा-या एका ’विदर्भवादी’मालकाच्या वृत्तपत्रातील पत्रकाराला विषयाची माहिती दिली असता,या पत्रकाराने ‘तो माझ्या जातीचा आहे,मी बातमी छापली तर तो निलंबित होऊन जाईल,मी त्याच्या पोटापाण्यावर संकट नाही आणू शकत,त्याच्या बायको मुलाचे श्राप नाही घेऊ शकत’असे पत्रकारितेच्या मूल्यात व नीतीमत्तेत न बसणारे उत्तर,न्यायासाठी दाद मागायला गेले असलेल्यांना दिले!

ज्या मुलाने या पोलिस कर्मचा-याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली तो कोणत्या ‘जाती’चा होता?याचा ही विचार या पत्रकार महाशयाने केला नाही.त्याच्या कुटूंबियांच्या शिव्या श्रापाचे काय?’जाती बांधवाचेच’भले करायचे आहे तर ‘पत्रकारिता’ सोडून हे महाशय ’जाती सुधारणा मेळावे’का आयोजित करण्याचे काम सुरु करीत नाही?असा तीव्र संतापाचा सूर आता पत्रकारितेच्या जगतात उमटला आहे.

पुराव्यानिशी बातमी आली की ती छापणे व आपल्या वाचकांना घटनेची माहिती करुन देणे,एवढंच पत्रकाराचं काम असतं,मग ती बातमी कोणत्याही जाती,धर्म,पंथियांच्या विरोधातील असो.ख-या पत्रकाराची बांधिलकी ही जाती-पातीशी नव्हे तर बातमीशी असते मात्र हल्ली पत्रकारितेची गरिमा रसातळात घालवणा-या काही महाभागांचा शिरकाव या पवित्र समजल्या जाणा-या क्षेत्रात झाला असल्यानेच ,क्राईम बिट सांभाळणा-या या पत्रकाराच्या या कृत्याचं कोणालाही वावगं वाटेनासं झालंय,महत्वाचे म्हणजे हा पत्रकार इतरांशी संबधित त्यांच्या क्राईमच्या बातम्या मात्र, सर्व व्हॉट्स ॲप ग्रूप्सवर फॉरवर्ड करण्यात अग्रगणी असतो,पत्रकारितेची ‘नवी’ व्याख्या या पत्रकाराने निर्मित केली असून ’जाती’च्या गुन्हेगारांच्या अश्‍या किती तरी बातम्या हा पत्रकार दररोज दुर्लक्ष्त करीत असावा,ही चर्चा देखील यामुळेच चर्चिली जात आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या