

पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एचआर विभागातील महिलेचा मॅनेजरने केला विनयभंग
आरोपीवर तात्काळ कारवाई व व्यवस्थापनास सक्त ताकीद द्या:नीलम गो-हे यांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना
पुणे दि.४ जानेवारी २०२३ : पुण्यातील प्रसिद्ध पंच तारांकीत हॉटेल येथे एचआर विभागात काम करीत असलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात त्याच हॉटेलमध्ये मॅनेजर असणाऱ्या एकाने या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. या प्रकाराविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी ही दिली. या सर्व प्रकारानंतर या महिलेने मुंढवा पोलीस स्टेशन पुणे येथे तक्रार दिली आहे, याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र देऊन पुढील सूचना केल्या आहेत.
● आरोपीला तात्काळ अटक करावी. व त्याचेवर कडक कारवाई करण्यात यावी.
● सदरील हॉटेलमध्ये विशाखा समिती स्थापन आहे का ते तपासावे. विशाखा समिती स्थापन केली नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
● त्याचबरोबर पुणे शहरातील ज्या हॉटेलमध्ये विशाखा समित्या स्थापन केल्या गेल्या नाहीत त्यांना तात्काळ विशाखा समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात यावेत.
● भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून हॉटेल व्यवस्थापनास सक्त ताकीद देण्यात यावी असे निर्देश देखील डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनास केले आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
