फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकाय रवि भवन...काय अर्वाच्य शिव्या...काय ३५३!

काय रवि भवन…काय अर्वाच्य शिव्या…काय ३५३!

Advertisements

आमदार नितीन देशमुख पुन्हा एकदा चर्चेत

रवि भवनात राडा:कर्तव्यावर असणा-या पोलिसांशी घातली हुज्जत,केली अर्वाच्य शिवीगाळ

सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूर,ता.२८ डिसेंबर २०२२: माजी नगरविकास मंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदार व १० अपक्षांसह २० जूनच्या रात्री विधान परिषदेचे मतदान संपल्याबरोबर सूरतेत पलायन केले.यात अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे देखील सहभागी होते.मात्र,शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात सुरवातीला सहभागी झालेले आमदार नितीन देशमुख यांनी लगेच दुस-याच दिवशी ‘घूमजाव’करीत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.

२१ जून रोजी विधान परिषदेच्या निवडणूकीचे निकाल आले आणि यात शिवसेनेचेच आमदार पराभूत झाले.२२ जून रोजी अकोल्यात परतलेले नितीन देशमुख यांनी स्वगृही परतल्यानंतर,कश्‍याप्रकारे विधान परिषदेचे मतदान झाल्यावर पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना बंगल्यावर बोलावले,आणखी एका आमदारासह मला स्वत:च्या गाडीत बसवून घेऊन गेले,इत्यादी इत्यादी याचा पाढाच माध्यमांसमोर वाचला.

पालघर सोडल्यानंतर गुजरातकडे गाडी जायला लागली.काही तरी अघटित घडत असल्याची शंका मला आली.पुढे एका ठिकाणी आमदार अब्दुल सत्तारही आमच्या गाडीत येऊन बसले.सुरतमध्ये एका मोठ्या हॉटेलवर आम्हाला नेण्यात आले,तिथे दोन-अडीचशे पोलिसांचा ताफा हजर होता.त्या ठिकाणी भाजपचे तीन आमदारही उपस्थित होते.
मला काहीही झाले नसताना रुग्णालयात दाखल केले.यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही सगळे गुवाहटीला गेलो.सर्व आमदार हॉटेलवर गेले,मी मात्र,कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आणि तिथून विमानाने नागपूर गाठले.भाजपची मंडळी शिंदे यांना सोबत घेऊन काहीतरी षडयंत्र रचित असल्याची शंका मला आली होती.रात्री दोन वाजताच्या सुमारास बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशी वाद घालून मी हॉटेल बाहेर पडलो.चार-पाच किलोमीटर पायी चाललो,पोलिस माझा पाठलाग करतच होते,त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतच होतो मात्र,त्याच दरम्यान पाेलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास मला ताब्यात घेतले व आणि थेट सरकारी रुग्णालयात दाखल केले.

मला कुठलाही त्रास नसताना हार्ट अटैक आल्याचा बनाव रुग्णालय प्रशासनाने केला,मला बळजबरीने इंजेक्शन देण्यात आले,ही ‘पाचा उत्तराची सुफळ कथा ’ शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांना ऐकवली होती व संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांची ही सुरस कथा गाजली ही होती.

याचवेळी शिंदे व इतर आमदारांनी नितीन देशमुख यांना स्वत: टेक्सीत बसवले याचा फोटोच ट्टीट केला व विमान प्रवासाचे तिकीट काढून त्यांच्या सुखरुप प्रवासाची सोय केल्याचे सांगितले. या बंडात कोणावरही बळजबरी मला करायची नव्हती,असा खुलासाही माध्यमात यानंतर त्यांनी केला,हा भाग अलहदा.मात्र तेव्हापासून आ.नितीन राऊत ही विभूती पोलिसांशी वाद घालणे,केंद्राची फूलप्रूफ सुरक्षा शिंदे व शिंदे गटाच्या आमदारांना पुरवण्यात आली असतानाही,नितीन देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या तावडीतून सुटणे,यावर बरेच वादळ त्याकाळीही महाराष्ट्रात उठले होते.

काल देखील याच आमदार महोदयांच्या उपराजधानीतील आणखी एका प्रतापामुळे पुन्हा ते एकदा चर्चेत आले आहेत,शिंदे यांच्या बंडखोरीच्या काळात गुहावटीचे निसर्ग सौंदर्य बघून भारावलेले शहाजी बापू पाटील यांनी जरी आपल्या जवळच्या कार्यकर्ताजवळ ’काय हाटील,काय झाडी,काय डोंगार’या भावना व्यक्त केल्या व ती ऑडीयो क्लीप संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली असली तरी आता आमदार नितीन देशमुख यांच्याबाबतीतही ‘काय रवि भवन..काय अर्वाच्य शिव्या..काय ३५३’असा व्हिडीयो लवकरच व्हायरल होण्याच्या चर्चेला उत आला आहे.

काय आहे घटना?

सध्या राज्याची सरकारच उपराजधानीत आली असून, राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी निवडणूक लढणारे,त्यानंतर सत्तेवर येणा-या मंत्री आणि बहूतांश आमदारांची ‘बडदास्त’राखणारी  चोख व्यवस्था.रवि भवन येथे करण्यात आली आहे.  या ठिकाणी पोलिसांचा ‘तगडा’बंदोबस्त आहे. मात्र,काल अकोला जिल्हातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या साेबतच्या कार्यकर्त्यांना देखील आत सोडावे यासाठी, कर्तव्यावर असणा-या पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची केली,असभ्य वर्तन करुन अर्वाच्य शब्दात शिवीगाळ देखील केल्याचे प्रकरण समोर आले आहे!

सीसीटीव्ही फूटेजमध्ये आमदार महोदयांना कर्तव्यावर असणारे पोलिस हे वारंवार हात जोडून काही तरी समजावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून पडत आहे.मात्र आमदार साहेबांची गुर्मी, खाकी वर्दीवर भारी पडत असल्याचे, व्हायरल व्हिडीयोमध्ये चित्रबद्ध झाल्याने आज विधान भवन परिसरात दिवसभर याचीच चर्चा होती.

व्याहरल व्हिडीयोमुळे अखेर पोलिस विभागावर दबाव वाढून सदर पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाचे कलम ३५३ अ,१८६,४४८,२९४,५०६ तसेच कलम ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले असून याचे पडसाद आज विधान सभेत देखील उमटले.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार पोलिसांनीच आमदार नितीन देशमुख यांना ’तू आतमध्ये ये,तूला अटकच करतो’अशी धमकी दिल्याचे सांगितले.गुन्हा दाखल करणा-या पोलिसांवरच कारवाई करण्याची अजब मागणी त्यांनी गृहखाते सांभाळणारे उपराजधानीचेच असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

या प्रकरणात उच्चस्तरीय अधिका-यांमार्फत फेरतपासणी घेण्यात येईल,असे आश्‍वासन फडणवीसांनी दिले असले तरी,या ‘अभूतपूर्व’घटनेची चर्चा आज विधी मंडळ परिसरात चांगलीच रंगली.

‘मोजकेच’सीसीटीव्ही फूटेज-
ऐन अधिवेशन काळात आमदार व पोलिसांमध्ये घडलेल्या या हाय प्राेफाईल घटनेचे सीसीटीव्ही फूटेज हे ‘अस्पष्ट’ असून सुरवातीला आमदार देशमुखांनी पोलिसांना केलेल्या धक्काबुक्कीची घटना यातून नदारद आहे.पोलिस विभागातर्फे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असल्याची देखील चर्चा आहे,मात्र,व्हायरल व्हिडीयोमुळे पोलिसांना माननीय आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या या वर्तनामुळे,विधी मंडळात जनतेच्या प्रश्‍नांवर पोटतिडकीने बोलण्यासाठी उपराजधानीत आलेले हे आमदार  महाराष्ट्राच्या जनतेसमोर कोणता आदर्श घालत आहेत? असा सवाल समाज माध्यमात आज चांगलाच उमटला.

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या