
अन् मोदी म्हणतात ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा!’
अर्धा तासांच्या प्रक्रियेसाठी लावतात आठ-आठ तास
मृतकाच्या नातेवाईकांच्या दूखांवर फोफावली सरकारी ‘सावकारी’
सक्कदरा उड्डाण पुलावरील घटनेच्या चार मृतकांच्या नातेवाईकांकडूनही आठ हजार लाटले!कर्तव्यावर असणा-या पोलिसानीच दिली संचालकाकडे तक्रार!
अपघाती मृत्यू झालेल्या मृतकांचा चेहरा ठिक करण्याचे दर पंधराशे रुपये! परिजनांना शव लवकर सोपवण्याचा दर अडीच ते तीन हजार रुपये!
दिवसभरातून बारा ते पंधरा मृतकांचे करतात शवविच्छेदन:महिन्याभरात मृतकांच्या रक्तबंबाळ वेदनेतून कमावतात पावणे दोन लाख रुपये!
विभाग प्रमुखांची ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक:जनजागरण कृती समिती सदस्यांचा आरोप
नागपूर,ता. २४ डिसेंबर २०२२: ‘पैसा’हा कलियुगातील माणसांसाठी सर्वात मोठे दैवत आहे,हे जरी मान्य केले तरी हा पैसा कोणत्या मार्गाने कमवावा,याची काही नीतीमत्ता, किमान भारतीय समाज जीवनपद्धतीतील सर्वच धर्मिय आचरताना दिसतात मात्र , असे ही काही नीतीमत्ताशून्य माणसे याच जगात आहेत ज्यांनी नीतीमत्तेची सर्व पातळी ओलांडून, माणूसकीलाच ओरबाडून खाण्याचा सपाटा लावला आहे,असाच एक प्रकार मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय मानले जाणारे नागपूरातील शासकीय मेडीकल रुग्णालयातील शवगृहात घडत आहे.
या शवागृहात गेल्या अनेक वर्षांपासून शव विच्छेदन करणारे कर्मचारी राजेश शेंडे व राज चव्हाण हे राजरोसपणे मृतकांच्या नातेवाईकांकडून भ्रष्ट मार्गाने पैसे उकळतात आहेत.त्यांचे काही व्हिडीयो देखील आज, जनजागरण कृती समितीच्या सदस्यांनी पत्रकार भवन येथील पत्र परिषदेत दाखवले. वाठोडा येथील अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचा चेहरा औषध,केमिकल लाऊन थोडा बरा करुन कुटूंबियांना सोपवण्यासाठी हे कर्मचारी मृतकाच्या एका परिचिताकडून पंधराशे रुपये उकळताना यात दिसत आहे!
सरकारकडून मृतकांचे शव गुंडाळण्यासाठी पांढरी चादर,निलगीरीचे तेल इत्यादी साहित्य मोफत दिली जातात मात्र हे दोन कर्मचारी याच वस्तूंचे पैसेही मृतकांच्या शोकाकूल नातेवाईकांकडून उकळतात,एवढंच नव्हे तर शवविच्छेदनासाठी अर्धा तासाहून जास्त वेळ लागत नाही मात्र हे दोन्ही क्रूर मानसिकतेचे शासकीय कर्मचारी मृतकांच्या नातेवाईकांना आठ-आठ तास शवागृहा बाहेर फक्त पैश्यांसाठी तातकळत ठेवतात!
आप्तस्वकीयाचा मृत्यू!हाच मानवी मनावर झालेला फार मोठा आघात असताना,पैश्यांना चटावलेले व मृतकाच्या टाळूवरील लोणी ओरबाडून खाणारे हे दोन्ही कर्मचारी यांच्यात ना माणूसकीचा लवलेश दिसतो ना कर्तव्याप्रति प्रामाणिकता!या दोन्ही कर्मचा-यांना ७० हजारच्या घरात मासिक पगार मिळत असतानाही ‘वरकमाई’ला चटावलेल्या या दोन्ही कर्मचा-यांना ना वरिष्ठांची भीती आहे ना स्वत:च्या कर्मांची,याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शवागृहातील आपल्या जीवाभावाच्या देहाला डोळेभरुन बघण्याची ओढ ही नातेवाईकांना वेड लावते,अश्रूंच्या अविरत धारा शवागृहाबाहेर वाहत असतात मात्र या दोन्ही कर्मचा-यांचे वर्तन साक्षात यमाला देखील लाजवेल,या दर्जाचं असतं,असा आरोप जनजागरण कृती समितीचे अध्यक्ष गोपाल ठाकूर व उपाध्यक्ष सचिन देशभ्रात यांनी पत्र परिषदेत केला.
जे नातेवाईक अडीच हजार रुपये देण्यास नकार देतात त्यांच्याशी अतिशय उद्धटपणे हे कर्मचारी वर्तन करतात.त्यांना तातकळत उभे ठेवतात.मृतदेह घरी लवकर घेऊन जाणे व अंत्यसंस्कार करने हे प्रत्येक जिविताची आद्य प्राथमिक गरज असल्याची जाणीव या दोन्ही महाभ्रष्ट कर्मचा-यांना असल्यानेच त्यांनी याच गरजेला,आपल्या ‘वरकमाई’चे साधन बनवले!
विशेष म्हणजे या दोन्ही कर्मचा-यांची तक्रार अनेकवेळा विभागप्रमुख तसेच मेडीकलचे अधिष्ठाता व संचालकाकडे करण्यात आली असून देखील यांचा कोणीही ’बाल भी बांका’करु शकला नाही!विभागप्रमुख डॉ.मुखर्जी यांना सगळं काही माहिती असूनही ते ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक करतात,असा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.मेडीकल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्याकडे तक्रार आली असता,त्यांनी या दोन्ही कर्मचा-यांची बदली इतर विभागात केली होती मात्र,डॉ.सुधीर गुप्ता हे अधिष्ठाता पदी रुजू झाल्यानंतर त्यांनी तातडीने या दोन्ही कर्मचा-यांना ‘वरकमाई’च्या या शवागृहात परत पाठवले!असा आरोप सचिन देशभ्रातर यांनी केला.
नुकतेच अवघ्या तेरा वर्षीय वैष्णवी या चिमुरडीचा मृत्यू मेडीकलमध्ये तीन दिवसांनंतरही वेंटिलेटर उपलब्ध करुन न दिल्याने झाला.तीन दिवस तिचा जन्मदाता हा हाताने सतत दाबणा-या अम्बू बॅगने तिला श्वास पुरवत राहीला,तिला वेंटिलेटरची तातडीने आवश्यकता होती मात्र अतिशय असंवेदनशील झालेल्या मेडीकल या शासकीय रुग्णालयातील बेजबाबदार प्रशासनाने तिला वेंटिलेटर उपलब्ध असतानाही ‘अर्थपूर्ण’कारणातून उपलब्ध करुन दिलेच नाही आणि जिवंत राहण्यासाठी श्वासांची मदत मागायला येणा-या चिमुरड्या वैष्णवीचा क्रूर बळी मेडीकलच्या या अश्या अतिशय भ्रष्ट व्यवस्थेने घेतला!
माध्यमांमध्ये वैष्णवीचा बळी हा खूप गाजला,परिणामी डॉ.गुप्ता यांची सरकारने उचलबांगडी केली व आता डॉ.राज गजभिये हे या पदावरील जबाबदारी सांभाळत आहेत.
सक्करदरा उड्डाणपुलावरील अपघातील नातेवाईकांकडूनही उकळले आठ हजार रुपये-
ऐन अनंत चतुदर्शीच्या दिवशी म्हणजे १६ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अनियंत्रित झालेल्या एका कारच्या धडकेने उड्डाणपुलावरुन खाली पडून एकाच कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाला.या अतिशय दूर्देवी घटनेत किरण नावाच्या माऊलीने तेरा वर्षीय व ६ वर्षीय अशी आपली दोन्ही गोंडस मुले यांच्यासह आयुष्याचा जोडीदार व सासूबाई यांना गमावले. नवरा, दोन्ही मुले व आईसोबत मोठ्या भावाकडे गणपती विसर्जनासाठी गेले होते मात्र घरी परताना साक्षात मृत्यूने त्यांना गाठले.घरुन आपल्या आईला ’टाटा’करुन निघालेल्या त्या जन्मदात्रीला मृत्यूचा हा सापळा कळलाच नाही,आपल्या चिमुकल्यांना ती पुन्हा कधीही बघू शकणार नाही,ही कल्पना तिलाच काय ,जगातल्या कोणत्याही जन्मदात्रीला करता येणार नाही मात्र हे अघटीत घडले. या अपघताची वार्ता समजताच तिने मेडीकलमध्ये धाव घेतली.सैरभैर झालेल्या या जन्मदात्रीला मेडीकलमध्ये आल्यानंतर कळलेच नाही,निपचित पडलेल्या आपल्या पतीकडे धाव घ्यावी,काहीही बोलत नसणा-या आपल्या सासूकडे धाव घ्यावी की आपल्या दोन्ही चिमूकल्यांकडे धावावे!
या जन्मदात्रीने आपल्या चिमूकल्यांकडेच आधी धाव घेतली मात्र ते आपल्या आईसोबत काहीही बोलण्या पलीकडे निघून गेले होते!या चारही जणांचे मृतदेह मेडीकलच्या शवागारात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.एक आई,एक स्त्री,एक पत्नी,एक अतिशय चांगली सून या ही पलीकडे एक जिवंत संवेदनशील मन असणारी एक ‘माणूस’म्हणून त्या शवागारासमोर ही माऊली आकांत करुन-करुन वेडी झाली असताना, या दोन्ही कर्मचा-यांनी तिच्याही वेदनेचा सौदा केलाच!
तिच्या नातेवाईकांकडून त्यांनी मृतदेहांना औषध व केमिकल लावण्याचे कारण सांगून प्रत्येक मृतदेहाचे दोन-दोन हजार रुपये लाटले!याची तक्रार त्यावेळी कर्तव्यावर असणारे पोलिस ओमप्रकाश पांडे(बक्कल क्रमांक १८०६)यांनी सुद्धा तत्कालीन संचालक डॉ.सुधीर गुप्ता यांच्याकडे केली मात्र डॉ.गुप्ता यांनी नेहमीसारखीच या तक्रारीकडेही डोळेझाक केली!एकीकडे एका तरुण स्त्रीचे आयुष्य कायमचे उधवस्त झाले ,तिच्या देहातील गर्भाशयाने आकांत मांडला होता.दूसरीकडे तिच्या या आकांताची,उधवस्ततेची किंमत या दोन शासकीय कर्मचा-यांनी आठ हजार रुपयात मोजली होती!
करोना महामारीने देखील यांना लाखोच्या घरात मालामाल केल्याचा आरोप समितीच्या अध्यक्षांनी ऑन केमरा केला.
आमदार मोहन मते यांच्याकडे हा संवेदनाशून्य भ्रष्ट कारभार आला असता त्यांनी देखील मेडीकलचे संचालक यांना फोन करुन या दोन्ही कर्मचा-यांना तात्काळ शवागाराच्या कामापासून मुक्त करण्याचे आदेश दिले मात्र आमदारांच्या या सूचनेकडेही संचालक डॉ.सुधीर गुप्ता यांनी चक्क दूर्लक्ष केले!
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देखिल या माणूसकीलाच काळीमा फासणा-या दोन्ही कर्मचा-यांच्या विरोधात लिखित तक्रारी करण्यात आल्या.त्यांचे अतिरिक्त खाजगी सचिव अतुल मंडलेकर यांनी मेडीकलचे विद्यमान अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांना या दोन्ही कर्मचा-यांवर योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देणारे पत्र मागील महिनात ६ नोव्हेंबर रोजी पाठविले आहे.
याशिवाय हिंगणाचे आमदार समीर मेघे यांनी देखील या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून याला आळा घालण्याचे निर्देश देणारे पत्र पाठवले.
मात्र अद्याप या दोन्ही कर्मचा-यांवर कोणतीही कारवाई झाली नसून मेडीकलचे अधिष्ठाता डॉ.गजभिये यांनी या दोन्ही कर्मचा-यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी समिती सदस्यांनी केली.
डॉ.गजभिये यांनी या संदर्भात नुकतीच एका चौकशी समिती स्थापित केली असल्याचे समोर आले आहे.
थोडक्यात काँग्रेसच्या सत्ताकाळातही या देशातील अनेक शासकीय विभागांमध्ये भ्रष्टाचार होतच होता मात्र पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०१४ मध्ये देशातील लोकांकडे ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’असे वचन देत, मत मागितले होते.२०१४ ते २०२२ या काळखंडात देशातील भ्रष्टाचार कमी होण्या ऐवजी तो अगदी मृतकांच्या शवागारापर्यंत पोहोचला असल्याचे हे एक जळजळीत उदाहरण म्हणावे लागेल.




आमचे चॅनल subscribe करा
