Homeनागपूर न्यूजऐंशी कोटींचे काम,गडरचे झाकण व एम्बूलेंसचे चाक

ऐंशी कोटींचे काम,गडरचे झाकण व एम्बूलेंसचे चाक

(हिवाळी अधिवेशन विशेष)

विधान भवन परिसरातून.

नागपूर,ता.२२ डिसेंबर २०२२: उपराजधानीत तब्बल दोन वर्षांनंतर पार पडणा-या हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तब्बल ९५ कोटीं रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता व या कामांसाठी निविदा देखील काढण्यात आल्या होत्या.हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरु असतानाच या विभागाच्या ठेकेदारांनी १२२.७४ कोटींच्या थकबाकीची मागणी केली होती व नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने बहिष्काराचे अस्त्र देखील उगारले होते.

महाविकास आघाडी सरकाच्या सत्ताकाळात गेली दोन वर्षे उपराजधानीत अधिवेशनच झाले नाही.२०१९ पासून शासकीय इमारतींची दुरुस्ती व देखरेखीच्या कामांचे १२२.७४ कोटी शासनाकडे ठेकेदारांची थकीत होती.या अधिवेशनासाठी देखील जवळपास ८० कोटींच्या कामांना शासनाकडून मंजुरी मिळाली व या कामांचे कंत्राट देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध कंत्राटदारांना देण्यात आले होते.

यात विधान भवनाच्या रंगरंगोटीपासून तर आमदार निवास,रवि भवन,सुयोग इत्यादी सरकारी इमारतींचे देखभाल दुरुस्ती व रंगरंगोटीचे कंत्राट विविध कंत्राटदारांना देण्यात आले व युद्धस्तरावर नेहमीप्रमाणेच काम ’उरकून’ ही घेण्यात आली होती.

‘उरकून’घेण्याची हीच ‘पोलखोल’ आज इतर कुठे नाही तर चक्क विधान भवन परिसरातच झाली.अधिवेशनाचा आज जेमतेम चौथाच दिवस असताना मुख्य इमारती समोरील रस्त्याच्या मधोमध असणा-या एका गडरचे सिमेंटचे झाकण हे इतर कोणत्याही नव्हे तर दुपारी १२.३० वाजता चक्क एका एम्ब्यूलेंसच्या चाकाने तुटले व या एम्ब्यूलेंसचे मागील चाक चक्क गडरच्या खड्ड्यात फसले!

हे झाकण इतके तकलादू व हलक्या दर्जाचे होते की एम्बुलेंसच नव्हे तर लहान मुलांच्या खेळणीतील सायकलचे चाक जरी यावरुन गेेले असते तर अशीच अवस्था या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वितरीत झालेल्या तब्बल ८० कोटींचे कामांचे कंत्राट घेणा-या कंत्राटदारांकडून झालेल्या कामामुळे झाली असती,अशी मिश्‍किली या घटनेनंतर विधान भवन परिसरात ऐकू आली.

विशेष म्हणजे या घटनेनंतर तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी संबंधित कंत्राटदाराकडून नवे सिमेंटचे झाकण यावर बसवून घेतले ,इतकंच नव्हे तर त्याच्या चारही बाजूने लाल कुंड्या ठेऊन गडरचे ‘सुशोभिकरण’ही केले….!

विशेष म्हणजे आज सकाळच्या सत्रात भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना अस्थमाचा त्रास जाणवल्याने त्यांना कृत्रिम श्‍वास नलिका लाऊन तातडीने रुग्णालयात एम्ब्यूलेंसने नेण्यात आले.ही घटना बघता कोट्यावधींची कामे ‘उरकताना’शासनाचा साबावि हा विभाग किती गांर्भीयाने आपल्या लोकप्रतिनिधींच्या सुख सोयीसाठी सक्षमपणे कार्यरत आहे,याचेच दर्शन घडले.
………………………….
अन् उपसभापती म्हणाल्या मी तीन चार वेळा कपात चहा प्यायलेच कसे!

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान भवनातील एका घडामोडीवरील व्हिडीयो ट्टीटर हँडलवर टाकला आणि…हा व्हिडीयो बघून सर्वच पक्षाच्या सर्वच आमदारांच्या अंगावर शहारा आला!कारण…हा व्हिडीयो त्यांच्याच ‘खानपान’ संबंधित होता.तब्बल चार दिवसांपासून ते ज्या चहाच्या कपात नागपूरी चहाचा आस्वाद घेत होते ते सगळे कप….पुरुष शौचालयाच्या आतील एका नळावर विसळले जात होते!

ज्याला हे कंत्राट देण्यात आले होते त्या कंत्राटदाराचा एक तरुण कर्मचारी, आमदारांनी चहा प्यायलेले ते सगळे कप पुरुष शौचालयाच्या आतील एका नळावर विसळत असल्याचे किळसवाणे दृष्य त्या व्हिडीयोमध्ये होते.

हे दृष्य बघताच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी सकाळच्या सत्रात सभागृहातच,करोना जगभर वाढला आहे अशातच विधान भवनात नागपूरात अश्‍या कपांमध्ये चहा प्यायला मिळत असेल तर….!मी तीन चार वेळा आजही त्या कपात चहा प्यायलेच कसे….?असा मार्मिक प्रश्‍न उच्चारला!

अर्थातच त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाईचे तात्काळ निर्देश ही दिलेत.एवढंच नव्हे तर सभागृहातच त्यांनी सन्माननीय सदस्यांकडे दिलगिरी व्यक्त करीत,मीच सूचना केल्या आहेत की या पुढे आम्हाला कागदी कपात चहा देण्यात यावा!असे ही सांगून टाकले.

अगदीच लहान नाही पण मध्यम आकाराच्या कागदी कपात आम्ही चहा घेण्यास तयार आहोत,थोडी असुविधा होईल पण?आता किमान नागपूरात तरी काचेच्या पांढ-या शुभ्र कपात आम्हाला चहा नको…..!ही स्पष्टोक्ती त्यांनी उच्चारली.

या धक्कादायक घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे विधान जरी केले असले तरी उपसभापतींनी सदस्यांना या घटनेनंतर ‘चांगल्या’आरोग्याच्या ‘शुभेच्छा’ दिल्या हे विशेष….!

Latest बातम्या