फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमदादा, चाललय् काय...??? निषेधार्थ..आणि संतापजनकही.

दादा, चाललय् काय…??? निषेधार्थ..आणि संतापजनकही.

Advertisements

कायदाच करतो भेद! ॲड.सदावर्ते शाई फेक प्रकरणात सौम्य कलम मात्र मंत्र्यांच्या बाबतीत चक्क जीवे मारण्याचा गुन्हा!

सरकार बदलते तेव्हा भारतीय दंड संहितेच्या कलमा ही बदलतात का?

नागपूर,ता.१२ डिसेंबर २०२२: मंत्री पदाची शपथ घेताना संविधानाच्या शपथेवर भारत या देशातील मंत्री कोणाविषयीही.. भेदभावाशिवाय माझी कृती असेल,अशी शपथ घेतात मात्र मंत्री पदाची झूल पांघरताच ते ‘असामान्य’ होऊन जातात,इतके की,संविधानापेक्षाही मोठे स्वत:ला समजू लागतात, जणू जनसामान्यं त्यांचे गुलाम आणि ‘जनतेच्या सेवेसाठी’ राजकारणात येणारे,निवडणूक लढणारे ते जनसामान्यांचे ‘भाग्यविधाते’ होतात,असाच एक प्रकार पिंपरी चिंचवड येथील आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याबाबत पुरोगामी महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घडवून आणला!

चंद्रकातदादा पाटील यांच्यावर शाई फेक घटनेचे महाराष्ट्रातील कोणताही सुज्ञ व्यक्ती समर्थन करणार नाही मात्र दूर्देवाने अशी घटना घडली,एवढंच की ती घटना काही पत्रकारांच्या कॅमरा व मोबाईलमध्ये चित्रबद्ध झाली.राज्यातील एवढ्या मोठ्या मंत्र्यांसोबत अशी घटना घडने ही सामान्य बाब नसल्यानेच, अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत या घटनेची व्हायरल झालेली क्लिप पोहोचली.

दोषींबरोबरच मात्र,चंद्रकांत दादा पाटील यांनी गोंविद वाकडे यांनीच ही जणू संपूर्ण घटना घडवून आणली असल्याचा कांगावा केला व शाई फेकीची चित्रफीत माध्यमांकडे कशी पोहोचली असा सवाल करीत, या पत्रकाराच्या विरोधात चक्क जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणजे कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवला!

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांच्याबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ त्यांच्यावर शनिवारी शाईफेक झाली.या प्रकरणी मनोज भास्कर गरबडे(वय ३४,रा.स्टेशन रस्ता,पिंपरी)धनंजय भाऊसाहेब इजगज(वय,२९,रा.चिंचवड)आणि विजय धर्मा ओहोळ(वय ४०,रा.चिंचवड)या तिघांना पोलिसांनी तातडीने अटक केली.आरोपींना मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर १४ डिसेंबरपर्यंत त्यांना पोलिस कोठडी देखील मिळाली.

आरोपींनी संगनमत करुन पाटील यांच्या अंगावर शाई फेकली,पाटील यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे,ही बाब माहिती असतानाही आरोपींनी त्यांच्या चेह-यावर काळ्या रंगाचे द्रव्य टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला,तसेच चित्रिकरण करुन सोशल मिडीयावर प्रसारित केले.‘तुला सोडणार नाही’असे धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

शाईफेकीचे चित्रीकरण माध्यमांकडे कसे पोहोचले,असा सवाल करुन खुद्द पाटील यांनी या प्रकारात पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर जाहीर आरोप केला.यानंतर या पत्रकारावर देखील जीवे मारण्याचा प्रयत्न,ही कलम लावून गुन्हा नोंदवण्यात आला!यामुळे त्या पत्रकाराला अटक देखील झाल्याची चर्चा आहे.
अशा प्रकारची अटक बेकायदा असल्याचा दावा पुणे श्रमिक पत्रकार संघासह इतर पत्रकार संघटनांनी देखील केला.याच मुस्कटदाबी विरोधात राज्यात शेकडो व्हाॅट्स ॲप ग्रूप्सवर चंद्रकांत पाटील यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

नाही तेव्हा लहान लहान बाबींना देखील प्रसिद्धी मिळावी याकरिता या देशातील मंत्री हे माध्यम प्रतिनिधींना सोबत नेतात,वार्तांकन ही पत्रकारांची नैतिक जबाबदारीच असते,मात्र,अचानक कधी,केव्हा,कशी,कोणती घटना घडेल,यावर एखाद्या पत्रकाराचे नियंत्रण कसे असू शकेल?चंद्रकांत पाटलांनी शाईफेक घटनेसाठी चक्क पत्रकाराला गुन्हेगार ठरविण्यापूर्वी संविधानाची घेतलेली शपथ तरी आठवावी.

ही शाईफेकची घटना एस.टी.कर्मचा-यांच्या प्रदीर्घ अश्‍या आंदोलनादरम्यान प्रसिद्धीस आलेल्या ॲड.सदावर्ते यांच्यासोबत घडली तेव्हा दोषींवर ’कायदेशीर’कलमच लावण्यात आल्या होत्या मात्र,चंद्रकांत पाटील यांच्यासोबत घडलेली घटना सारखीच असताना देखील चक्क जीव मारण्याचा कट…..!

सरकार बदलते तेव्हा भारतीय दंड संहितेच्या कलमा ही बदलतात का?असा प्रश्‍न आता समाज माध्यमांवर पाटील यांना विचारल्या जात आहे.

तेव्हा देखील हीच महाराष्ट्र पोलिसच होती ना?कि आता शिंदे-फडणवीसांची सरकार आल्याबरोबर ती स्कॉटलॅण्डची पोलिस झाली?स्कॉटलॅण्डच्या दंड संहितांचे पालन करते?सारख्या गुन्हासाठी दोन वेगवेगळ्या सरकारच्या काळात वेगवेगळ्या कलमा कश्‍या लावता येऊ शकतात?ते ही एका पत्रकारावर आरोप ठेऊन!

त्यामुळेच आज समाज माध्यमांवर ’कायदाच करतो भेद’हा ‘सुविचार’चांगलाच व्हायरल झाला.

जालनातील एका वरिष्ठ पत्रकाराने तर त्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर पत्रकार जगताला अंतर्मुख करणारी अशी पोस्ट टाकली……

दादा, चाललय् काय…???
निषेधार्थ..आणि संतापजनकही...

Chandrakant Patil appointed BJP's Maharashtra chief | India News – India TV

चंद्रकांतदादा पाटील यांचं वक्तव्य मी या भिंतीवर चिटकवलंय्… ते काळजीपूर्वक ऐका… दादांच्या अश्लाघ्य वक्तव्यावर असांसदीय प्रतिक्रिया उमटली… दादांवर शाईफेक झाली… या शाईफेकी नंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिस बांधवांवर कारवाई झाली… काही पोलिस कर्मचारी निलंबित झाले आणि आता हे दृष्य चित्रित करणा-या पत्रकारावर कारवाई व्हावी, याकरिता दस्तुरखुद्द चंद्रकांतदादा पाटील यांनी अस्तन्या सावरल्या आहेत…. पत्रकारावर कारवाई व्हावी याकरिता आपलं दादापण पणाला लावलं आहे… छान आहे… चांगलं आहे… कर्तव्यावर असलेल्या पत्रकाराला जाब विचारण्याची ही कृती अभिनंदनिय आहे… याकरिता चंद्रकांत बच्चू पाटील सन्मानास पात्र आहेत…

खरं तर लोकशाही व्यवस्थेत शब्दांनीच मार दिला पाहिजे… अर्थात शब्दप्रयोग सांसदीय असले पाहिजेत… जिथे संसदेत असांसदीय शब्दप्रयोग आणि असांसदीय वर्तन घडतं, तिथं समाज जीवनात सांसदीय वर्तनाची अपेक्षा केली जाते…. गंमत म्हणजे सर्वाधिक असांसदीय, असंस्कृत, असंवेदनशील आणि अश्लाघ्य बोल राजकिय क्षेत्रातील मंडळींकडून उच्चारलं जातं… अशा परिस्थितीत एक राजकारणी आता पत्रकारांना वर्तनाचे आणि कर्तव्याचे धडे द्यायला सरसावलाय्… व्वा दादा, व्वा….

पत्रकार या नात्यानं अनेक वर्षांपासून मी काम करतोय… ग्रामीण पत्रकारितेपासून थेट संसदेपर्यंतचं वार्तांकन मी केलं…. अंडरवल्ड कव्हर केलं…. बॉलिवुड-टॉलिवुड कव्हर केलं… राजकारणातल्या कोलांटउड्या आणि कुरघोड्या कव्हर केल्या… पत्रकार या नात्यानं एक्सलन्स प्रुव्ह करताना आजवर माझ्या गुणकौशल्याचं समाजानं आणि व्यवस्थेनं कौतुक केलं…भारतीय गणराज्य व्यवस्थेनंही या करिता पत्रकारांचं कायम अभिनंदन केलं आणि पुरस्कृतही….

पत्रकार विसंगती शोधतो, मर्मावर बोट ठेवतो, परखडपणानं बोलतो-लिहितो-दाखवतो… हे करीत असताना तो चहुबाजुंनी असुरक्षित असतो आणि तरीही लोकशाही रक्षकाची भूमिका आणि कर्तव्य चौथा स्तंभ या नात्याने जमेल तशी पार पाडतो… पत्रकाराच्या या कर्तव्यबुद्धीवरच चंद्रकांतदादांनी आक्षेप घेतलाय… दादा म्हणताहेत, ‘शाईफेक प्रकारचं छायांकन एवढं व्यवस्थित कसं केलं गेलं? एवढा अचूक अँगल कसा घेतला गेला? म्हणजे तो पत्रकारच शाईफेक प्रकरणामागचा मास्टरमाईंड आहे.. त्याला अटक झाली नाही तर मी पोलीस स्टेशन समोर उपोषण करतो…

व्वा, दादा, व्वा…. मानलं बुवा… दादा, बातमी आणि छायाचित्र टिपणं हे पत्रकारांचं कामच आहे…शाईफेक प्रकरणात ते पत्रकारानं अचूकपणे केलं असेल तर पत्रकाराला तुम्ही मास्टरमाईंड ठरवणार….???? अनेकदा दंगली घडताना, मारामारी, मर्डर होत असताना पत्रकार घटनास्थळावर हजर असतात, जोखीम पत्करुन पत्रकार घटना कव्हर करतात, म्हणजे त्या घटनांमध्ये पत्रकारांचा हात आहे, असं आपण बोलणार ??? दादा, ऑन दी स्पॉट रिपोर्टींगचा अर्थ काय ? हे आपण कृपाकरुन सांगाल काय…??? आणि तुमचा हा तर्क ग्राह्य मानला तर चांगल्या वार्तांकनाबद्दलचे श्रेय तुम्ही पत्रकारांना द्याल काय…??? दादा, आपलं वक्तव्य माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे… मंत्रीपदाचा वापर करुन चालवलेलं दमन आहे, हे कळतय् का आपल्याला..???

दादा, एक लक्षात घ्या, तुम्ही हवं तेवढं दमन करा, पत्रकार आपल्या कर्तव्याला चुकणार नाहीत… जे घडलं, ते दाखवलं गेलं पाहिजे, जे चुकलं ते सांगितलं गेलं पाहिजे, जे चुकतील त्यांना जाब विचारला गेलाच पाहिजे आणि जे सकारात्मक घडतय् ते ही समाजापर्यंत पोहचवलं गेलं पाहिजे, हीच पत्रकारिता आहे…. बाळशास्त्री जांभेकरांपासून पत्रकारितेची ही परंपरा महाराष्ट्रात आहे…. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, हा अग्रलेख लिहुन टिळकांनी सरकारला जाब विचारला, हे याच महाराष्ट्रात घडलं… पत्रकार जाब विचारणार… वास्तव दाखवणार… एक्सलन्स प्रुव करणार… सरकार या नात्यानं दमन करण्याचा, मुस्कटदाबी करण्याचा तुम्हाला पुर्ण अधिकार आहे… एकच सांगणं, या देशात व्यवस्था आहे आणि व्यवस्था संविधान संमत आहेत… तुमची भाषा आणि विचार मग्रुर आहे, हे निर्विवाद….

आपल्याला पटत असेल, तर ही भिंत वाटून द्या… प्रतिक्रिया द्या… असहमत असाल, तर जरुर ट्रोल करा… मर्जी तुमची…

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या