Homeनागपूर न्यूजश्रीगुरूमंदिरात औदुंबर प्रदक्षिणा हर्षोल्हासात

श्रीगुरूमंदिरात औदुंबर प्रदक्षिणा हर्षोल्हासात

नागपूर: श्री गुरू मंदिर नागपुर येथे श्री गुरु द्वादशीच्या पुण्य पर्वावर कल्पवृक्ष औदुंबर वृक्षास अखंड प्रदक्षिणेचा सोहळा अत्यंत हर्षोल्हासात व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पहाटेचे झुंजूमुंजू होत असताना सकाळी सामूहिक संकल्पोच्चार होऊन अखंड प्रदक्षिणेस सुरुवात झाली.यात १०० ते १२५ भक्त प्रदक्षिणेसाठी आले होते. भक्तांचा हा ओघ सायंकाळपर्यंत कायम होता.

तद्नंतर श्रींच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. गुरुमंदिराचा संपूर्ण परिसर पणत्यांच्या प्रकाश व विद्युत रोषणाईने झगमगत होता. फटाक्यांची आतषबाजी व टाळमृदुंगाच्यासह दिगंबराच्या गजरात उपासनेच्या पाच प्रदक्षिणा यांचे गायन होत उपासकांच्या खांद्यावरून पालखी औदुंबरा भोवती झुलत होती.

जवळपास ७५० ते ८०० भक्तगणांनी हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. या संपूर्ण सोहळ्यास परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज जातीने उपस्थित होते. पालखी प्रदक्षिणेनंतर महाप्रसादाने या भक्तीमय कार्यक्रमाची सांगता झाली. जवळपास बाराशे भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

Latest बातम्या