

धोकेबाज माणसाची माध्यमांनीच वाढवली विश्वासहर्ता:जनतेचा संताप
नामांकित डॉक्टरांसह शासकीय अधिका-यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून २० कोटींची माया जमविल्याचा आरोप
‘पेड न्यूज’समाजस्वास्थासोबतच माध्यमांनाही घातकच:बुद्धीजीवींचा सूर
नागपूर,ता.१३ ऑक्टोबर २०२२: लाेकशाहीचा चौथा स्तंंभ म्हणून ‘मिरवून’ घेणा-या प्रसार-प्रचार माध्यमांवर एका घटनेमुळे जनतेचा चांगलाच रोष ओढवला आहे.प्रकरण आहे स्वत:ला सोशल मिडीया विश्लेषक म्हणून घेणा-या ‘स्वयंघोषित‘ व मुद्रित माध्यम ‘समर्थित’ अजित पारसे संबंधीचे. पारसेने एका सुप्रसिद्ध होमियोपॅथी डॉक्टरला धोकेबाजी करुन हजार,लाखांनी नव्हे तर तब्बल साढे चार कोटींनी गंडवल्याची माहिती उजेडात आली आहे.अजित पारसे याचे शहरातील काही मुद्रित माध्यमांनीच सोशल मिडीया तज्ज्ञ,सायबर तज्ज्ञ,विश्लेषक आदी बिरुदावलीने जे ‘बारसे’केले त्याच मुद्रित माध्यमाला आज त्याच्या धोकेबाजीचेही वृत्त ठलकपणे प्रसारित करताना, वृत्तपत्र माध्यमांच्या नीतीमूल्यांच्या चौकटीला जो जबर धक्का बसला,याचे ही आत्मचिंतन करण्याची वेळ आली असल्याचे नागपूरातील काही बुद्धीजीवींचे मत आहे.
याच वर्षी २१ जुलै रोजी ‘मुद्रित आशय’ अधिक परिणामकारक’म्हणून मोठ्या मथळ्यातील वृत्त या मुद्रित माध्यमांनीच प्रसिद्ध केले होते.यावर अनेक वृत्तपत्रांत ‘संपादकीय’रकानेही छापून आलेत.मेंदूशास्त्रावर आधारित संशोधनाच्या एका निष्कर्षामुळे मुद्रित माध्यम समूह, पराकोटीचे सुखावले होते.
इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडीयाच्या सध्याच्या युगातही कागदावर प्रसिद्ध झालेला आशय आणि जाहिराती आपल्या मेंदूशी थेट संपर्क करण्यात विशेष फायदेशीर होतात,असा मेंदूशास्त्रातील संशोधनाचा निष्कर्ष सांगत,कागदावर प्रसिद्ध झालेला मजकूर,जाहिरात ‘डिजिटल’माध्यमापेक्षा अधिक ‘परिणामकारक’ असल्याच्या या निष्कर्षातून मुद्रित माध्यमांनी आपली चांगलीच पाठ थोपटून घेतली होती.
मात्र आपल्या या एवढ्या पराकोटीच्या ‘विश्वासहार्य’माध्यमातून आपण नेमकी कोणाची,किती आणि कशी प्रसिद्धी करतोय?याचेही भान राखण्याची जबाबदारी पार पाडली असती तर आज ‘तथाकथित ‘ सोशल मिडीया विश्लेषक’ अजित पारसेला २० ते ४० कोटींचे घबाड लाटण्याची संधी समाजातील पांढरपेश्यांकडून मिळालीही नसती,असा संताप आता व्यक्त केला जात आहे.
मुळात सोशल मिडीया विश्लेषक असा कोणताही पदवी किवा पदव्यूत्तर अभ्यासक्रमच देशात अस्तित्वात नाही,मग कशाच्या आधारे मुद्रित माध्यमांनी अजित पारसेला हे ‘विशेषण’बहाल केले?सायबर गुन्ह्यांच्या संबधी अनेक बातम्यांमध्ये अनेक वेळा किंबहूना गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरातील अनेक मुद्रित माध्यमांनी ‘एकमेवद्वितीय’अजित पारसे याचेच मत प्रामुख्याने बातमी सोबत छापले!
विविध उपक्रमात देखील इतर मान्यवरांसोबत मार्गदर्शनासाठी अजित पारसेला ‘विशेषत्वाने’व ’अगत्याने’बोलवले जात होते.नशीब त्याने मुद्रित माध्यमांच्या या व्यासपीठाचा उपयोग सायबर गुन्हे कसे करायचे?शासकीय नावाने खोट्या वेबसाईट्स कश्या बनवायचा?या वेबसाईट्सच्या माध्यमातून समाजातील पांढरपेश्यांना गंडा कसा घालायचा?हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी कशा गोळा करायच्या?याचे मार्गदर्शन मुद्रित माध्यमांच्या व्यासपीठावरुन नाही केले!
एकीकडे मुद्रित माध्यमे आपल्या विश्वासहर्ताचे ढोल बढवतात मात्र दुसरीकडे कोणतीही शहनिशा न करता फक्त ‘पेड न्यूज’सारख्या ‘तात्कालीक’ व ‘अल्पकालीन’आर्थिक फायद्यासाठी वाचकांच्या अमूल्य अश्या मुद्रित माध्यमांवरील ‘विश्वासला’ वेठीस धरण्याचे कृत्य करतात आणि याचे भान ही ते राखत नसल्याने काय हाेत असतं?याचे ‘उत्तम’ व ‘सर्वोकृष्ट’ अजित पारसे नावाचे उदाहरण , मुद्रित माध्यमाच्या इतिहासात आता कायमचे समाविष्ट झाले असल्याची टिका केली जात आहे. .
नागपूरात गेल्या अनेक वर्षांपासून अजित पारसेला काही मुद्रिम माध्यमात जे ठलक महत्व मिळाले किवा मुद्रित माध्यमांच्या विविध उपक्रमात जी संधी प्रदान करण्यात आली त्या मागे मुद्रित माध्यामातील काही ‘बेवड्यांचाही’समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे, नाव न छापण्याच्या अटीवर मुद्रित माध्यमातीलच काही मान्यवर सांगत आहेत!
दारुच्या पार्ट्यांसाठी किवा पैश्याच्या पाकिटांसाठी अश्या, कोणतीही विश्वासहर्ता नसलेल्या व कायदेशीर पदवी नसलेल्यांना मुद्रित माध्यमात तज्ज्ञ,विश्लेषक म्हणून प्रसिद्धी देने किती घातक ठरत असतं, यावर आता बरंच चर्वितचर्वण केलं जात आहे!
मुद्रिम माध्यमांवरील विश्वासामुळेच शहरातील एक नामांकित होमियोपॅथी डॉक्टर मग अलगद अश्या धोकेबाज तथाकथित तज्ज्ञाच्या जाळ्यात अडकतो कारण त्यांना वाटतं मुद्रिम माध्यमे हे, जे काही छापतात,ज्यांच्या विषयी छापतात,ज्यांच्या अनुषंगाने छापतात ते सगळं काही खरं असतं!
याच गैरसमजूतीतून वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्याच्या बहाण्याने पारसे यानी होमियोपॅथी डॉक्टरला तब्बल साढे चार कोटींचा गंडा घालण्यात यश मिळवले,असा सरळ आरोप आता समाज माध्यमात उमटला आहे.कोतवाली पोलिस ठाण्यात आता या तथाकथित ४२ वर्षीय(राहणार. महर्षी मणाल अपार्टमेंट,दूसरा माळा,राऊतवाडी,भेंडे ले आउट) सोशल मिडीया विश्लेषकाविरुद्ध उर्फ सायबरतज्ज्ञाविरोधात खंडणी व फसवणूकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. प्रकृती बरी नसल्याने मात्र त्याला अद्याप अटक झाली नाही.
२०१९ मध्ये या डॉक्टरसोबत या सायबरतज्ज्ञाची ओळख एका नातेवाईकाच्या माध्यमातून झाली.होमिओपॅथी महाविद्यालय सुरु करायचे असल्याचे डॉक्टरने पारसेला सांगितले.माझी पंतप्रधान कार्यालयात ओळख असून,महाविद्यालय सुरु करण्यासाठी तुम्हाला ट्रस्ट स्थापन करावे लागेल,असे पारसे याने डॉक्टरांना सांगितले.त्यानंतर त्याने ट्रस्टसाठी चार नावे सुचवली,यापैकी एक नाव नीती आयोगातर्फे आपल्याला मिळू शकतं.तसेच सीएसआरअंतर्गत निधीही मिळवून देण्याचे आमिष पारसेने डॉक्टरांना दाखवले.
यानंतर या सायबरतज्ज्ञ पारसेनी पंतप्रधान कार्यालयाच्या नावे ‘बनावट’ ई-मेल आयडी तयार केला व निधी जारी करण्यात आल्याचा मेल डॉक्टरला केला.पंतप्रधान कार्यालयातून मेल आल्याचे बघून पारसेवर डॉक्टरांचा विश्वास आणखी दृढ झाला.त्यांनी पारसेला २५ लाख रुपये दिले मात्र पारसेने हे पैसे डॉक्टरांच्या खात्यात जमा केले नाहीत.
याशिवाय एका बँकेने एका ग्राहकाला दिलेल्या कर्जात डॉक्टर हे जामीनदार असल्याची माहिती पारसेला कळली.त्याने या ग्राहकाविरुद्ध सीबीआयमध्ये तक्रार झाल्याची थाप डॉक्टरांना मारली.या प्रकरणात सीबीआयने तुमच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला अशी धमकी देत डॉक्टरांच्या वॉट्स ॲपवर पारसेने तो बनावट अटक वॉरंट पाठवला.वॉरंट रद्द करण्यासाठी पारसेने दीड कोटींची रक्कम डॉक्टरांकडून उकळली.यानंतरही विविध कारणांवरुन डॉक्टरांना धमकी देत चार कोटी ५० लाखांची खंडणी पारसे नावाच्या या काही ‘मुद्रित माध्यमांच्या’ सोशल मिडीया विश्लेषकाने उकळले.
पारसे याने डॉक्टरांच्या व्यतीरिक्त शहरातील अनेक मोठ्या पदावरील शासकीय अधिका-यांना देखील हनीट्रॅपमध्ये अडकवून सुमारे वीस कोटींची उगाही केल्याची माहिती समोर आली आहे.दिल्लीतील बड्या नेत्यांसोबत ओळखी असून,काम करवून देत असल्याची बतावणी करीत पारसे या अधिका-यांना दिल्लीची वारी घडवून आणित असे.त्यांना नामांकित हॉटेल्समध्ये थांबवायचा.या दरम्यान त्यांच्या खोलीत तरुण मुलींना पाठवून त्यांच्यासाेबतची अश्लील छायाचित्रे काढायचा.हे छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत पारसे हा खंडणी उकळायचा.आतापर्यंत त्याने आठ ते दहा जणांकडून खंडणी उकळल्याचे समोर आले आहे,अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली.
थोडक्यात,पारसे याच्यासारख्याचा खंडणीचा व्यवसाय तेजीत आणण्याच्या ‘पुण्यकर्मात’ काही मुद्रित माध्यमांचाही तेवढाच हात आहे,हे सत्य नाकारता येणार नाही.कोणत्याही माणसाला आपल्या माध्यमात ओळख घडवून देण्या पूर्वी त्याचा इतिहास,भूगोल आणि रेखागणित तपासून बघण्याचा ‘धडा’ या घटनेमुळे आता तरी मुद्रित माध्यम घेणार आहे का?असा सवाल आता विचारला जात आहे.
एकीकडे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला संरक्षण देण्याची ‘न्याय’मागणी सर्वोच्च न्यायालयात लढत असताना व त्यासाठी कायदेशीर लढा देत असताना दूसरीकडे आपल्या माध्यमांवरील दृढ विश्वासातून, समाजातील कोणत्याही वर्गाच्या वाचकांची फसवणूक होऊ नये,ही देखील नीतीमत्ता ‘पारसे याच्या प्रकरणावरुन नागपूरातील काही मुद्रित माध्यमे आता तरी जोपासणार का?असा सवाल आता शहरातील बुद्धिजीवींकडून विचारला जात आहे.
पारसे नावाच्या खंडणीखोरसारख्यांचे ‘बारसे’आता पुरे झाले,या पुढे अश्या वृत्तीच्या लोकांचे ‘बारसे’ किमान मुद्रित माध्यमांनी या पुढे तरी घडवून आणू नये,अशी देखील ‘रास्त’ अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
