

२०१५ साली दीक्षाभूमी मुख्य कार्यक्रमात दिले होते आश्वासन:यंदा पुन्हा मुख्य कार्यक्रमातील आहेत प्रमुख पाहूणे
कॉटन रिसर्च कर्मचा-यांचा वारंवार खोडा:स्मारक समितीच्या सचिवांची खंत
नागपूर,ता.१ ऑक्टोबर २०२२: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१४ च्या विधान सभेच्या निवडणूकीनंतर पहील्यांदा युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर २०१५ सालच्या दीक्षाभूमी येथील मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहीले,त्यावेळी त्यांनी नागपूरची ही दीक्षाभूमी जागतिक स्तरावरील ऐतिहासिक वारसा असून या स्मारकाच्या विकासासाठी साढे तीनशे कोटी उपलब्ध करुन देणार असल्याचे अभिवचन लाखो बौद्ध अनुयायांसमोर दिले होते.त्यांच्या त्या अभिवचनाला ७ वर्षे उलटली तरी स्मारकाच्या विकासासाठी एक पैसा ही मिळाला नसल्याची खंत आज दीक्षाभूमी येथे आयोजित पत्र परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ.सुधीर फुलझेले यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी मंचावर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, स्मारक समितीचे सदस्य ॲड. आनंद फुलझेले,एन.आर.सुटे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ चंद्रशेखर मेश्राम, भंते नागदिपांकर व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य बी.ए.मेहरे, मिलिंद गाणार आदी उपस्थित होते.
एका प्रश्नाच्या उत्तरात फुलझेले म्हणाले की, दर वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जगभरातील लाखो अनुयायी या भूमीला वंदन करण्यासाठी येतात.लाखांच्या गर्दीसाठी योग्य नियोजन असने गरजेचे आहे.सध्या दीक्षाभूमीला तीनच द्वार असून काछीपूरा भागाच्या बाजूने म्हणजे दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील भागातून अनुयायांना ,वंदन झाल्यानंतर बाहेर निघण्याचा रस्ता मिळणे फार गरजेेचे आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शासनाचा कॉटन रिसर्च हा विभाग त्यात सातत्याने खोडा घालीत असल्याचा आराेप त्यांनी केला.
फडणवीस यांनी २०१५ साली स्वत:हून या दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून विकास करणार असल्याचे याच भूमीतून घोषणा केली होती.आम्ही अशी कोणतीही मागणी केली नव्हती.यासाठी त्यांनी खुल्या मंचावरुन साढे तीनशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली .त्यांच्याच सूचनेवरुन नागपूर सुधार प्रन्यासने दिल्लीतील सुप्रसिद्ध वास्तूविशारदला पाचारण केले.याच वास्तूविशारदाने उत्तर प्रदेशात देखील स्तूपाचा उत्कृष्ट आराखडा तयार केला होता.त्यांनी १५ दिवसात तो आराखडा तयार करुन नासुप्रला दिला.
यावेळी तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे,तत्कालीन जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त,नासुप्र सभापती यांच्या समक्ष आराखड्याचे सादरीकरण झाले.यात काही बदल व सूचना फडणवीस यांनी सूचवल्या.त्याप्रमाणे आराखड्यात बदल करुन तो स्मारक समितीसमोर सादर करण्यात आला.समितीने दीक्षाभूमीवर दरवर्षी येणा-या लाखो अनुयायांसाठी सोयीस्कर व्हावे अश्या प्रवेश द्वारातून बाहेर पडण्यासाठी काछीपूरा भागाकडील कॉटन रिसर्च विभागाच्या जागेची मागणी केली.
दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी आरोग्य विभाग तसेच कॉटन रिसर्चच्या जागेची मागणी मंजूर झाल्यास मुख्य परिसरात आरोग्य विभागपासून भुयारी मार्गाचा विचार प्रस्तावित होता.कॉटन रिसर्चच्या जागेशिवाय दीक्षाभूमीचा चौकोण पूर्ण होत नाही,परिणामी मुख्य प्रवेश द्वारामधून आत येणारी लाखांची गर्दी त्याच बाजूने बाहेर वळवावी लागते.यासाठी समता सैनिक दलाचा व पोलिस यंत्रणेचा दरवर्षी कस लागतो मात्र एखाद्यावेळी चेंगराचेंगरीचाही दूर्देवी प्रसंग उद् भवू शकतो,अशी शक्यता फूलझेले यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षात अनेक राजकीय नेत्यांनी दीक्षाभूमीवरील मुख्य कार्यक्रमात हजेरी लावली असून त्यात सीताराम केसरी,बलराम जाखड,तत्कालीन कृषि मंत्री शरद पवार,रा.सु.गवई यांचा समावेश आहे.गवई यांना दीक्षाभूमी स्मारकाच्या विस्ताराबाबत तर दिल्लीलाही बोलावण्यात आले होते मात्र कॉटन रिसर्चच्या अधिका-यांनी आणि कर्मचा-यांनी यात सतत खोडा घालण्याचे काम केले.
महत्वाचे म्हणजे कॉटन रिसर्चची जागा ही केंद्रिय शासनाची नसून ती राज्य शासनाचीच जागा आहे.चाळीस वर्षांपूर्वी ही जागा त्यांना मिळाली होती.पंजाबराव कृषि विद्यापीठाला ही जागा राज्य शासनाने दिली होती आणि कृषि विद्यापीठाने ही जागा कॉटन रिसर्च विभागाला दिली.या ठिकाणी कर्मचा-यांची वसाहत असल्याचा दावा केला जातो मात्र या विभागाचे ३० टक्केही कर्मचारी या ठिकाणी राहत नसल्याचा दावा याप्रसंगी फुलझेले यांनी केला.
सहा महिन्यापूर्वी याच ठिकाणी ऑडिटोरियमची योजना मंजूर करण्यात आली.या प्रस्तावाला दीक्षाभूमी अनुयायांनी प्रखर विरोध केला.ज्यांनी विरोध केला त्यांना धमकावले जाऊ लागले.ही घटना स्मारक समितीला कळताच आम्ही या दडपशाहीचा विरोध केला,असे फुलझेले यांनी सांगितले.जो रस्ता दीक्षाभूमीचा उत्तरद्वार आहे त्या रस्त्याच्या मधोमध ऑडिटोरियमचे हेतुपुरस्सर भूमिपूजन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हाधिकारी यांना अधिकार आहे की ते काही काळासाठी जागा अधिकारात घेऊ शकतात.माजी जिल्हाधिकारी सुर्वे यांनी तसे पत्र ही काढले होते मात्र या विभागाचे कर्मचारी न्यायालयात गेले आणि स्टे आणला.आता विद्यमान जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांसाठी ती जागा स्मारक समितीला द्यावी,अशी मागणी फुलझेले यांनी केली.
यंदा आम्ही पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी लावून धरणार आहोत असे ते म्हणाले.पूर्वी नगरविकास मंत्रालय, स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी देणार होता मात्र नंतर सामाजिक न्याय विभागाकडून साढे तीनशे कोटी देण्याचे ठरले.यातील शंभर कोटी मंजूर होऊन त्यातील चाळीस कोटी रुपये नागपूर सुधार प्रन्यासकडे पडून आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निधी मंजूर केला आहे मात्र मंत्रालयाचे काही अधिकारी बारिकसारिक समस्या काढून काम थांबवित असल्याचा आरोप फुलझेले यांनी केला.‘हाय पॉवर कमेटीने’ मान्यता दिल्यानंतरच नासुप्र निविदा काढू शकते.अनेकदा या निधीसाठी मंत्रालयात गेले असता त्यांच्या ‘नाकावरची माशी ही हलत नसल्याचा संताप’ याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.सतत खोडा घातल्या जात असून गेल्या ७ वर्षांपासून दीक्षाभूमीचा विकास प्रलंबित आहे.फडणवीस यांना आम्ही विनंती करु व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असल्याचे फूलझेले यांनी सांगितले.आता हाय पॉवर कमेटीची बैठक येत्या दहा दिवसात घेणार असल्याचे आम्हाला कळवण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
निदान आम्हाला धम्मचक्र प्रवर्तन साेहळ्यानिमित्त तरी अल्पकाळ हे उत्तर द्वार वापरु देण्याची परवानगी मिळावी,यासाठी फक्त थोडीसी भिंत फोडावी लागेल व अनुयायांना बाहेर पडण्यासाठी दरवाजा करावा लागेल.सोहळा संपल्यानंतर स्मारक समिती ती भिंत पुन्हा बांधून देईल,असे आश्वासन देखील यावेळी फुलझेले यांनी दिले.
धम्मचक्र प्रवर्तनाच्या मुख्य साेहळ्यात यंदा देखील केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी राजकीय नेत्यांनाच का प्रमुख पाहूणे म्हणून बोलावण्यात आले?असा प्रश्न विचारला असता,गेल्या ७० वर्षांपासून ही परंपरा चालत आली असल्याचे उत्तर त्यांनी दिले.पक्ष कोणताही असो,काँग्रेस,भाजप,जनता दल,बहूजन समाजवादी पक्ष इत्यादी मात्र कोणत्याही राजकीय नेत्याने राजकीय भाष्य करण्यासाठी हा मंच उपयोगात आणू नये,अशी अट स्मारक समिती घालत असते आणि आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी या मंचावरुन राजकीय भाष्य केले नसल्याचे फुलझेले यांनी सांगितले.या मंचावर विलासराव देशमुखांपासून तर शरद पवारांपर्यंतचे राज्यातील महनीय नेत्यांनी हजेरी लावली आहे मात्र ही भूमी क्रांतीसूर्य असली जरी धम्मभूमी असल्याची जाणीव शासनाच्या प्रतिनिधींना स्मारक समिती करुन देत असल्याचे ते म्हणाले.
समितीमध्ये राष्ट्रीय सेवक संघाशी संबधित तीन सदस्यांची वर्णी कशी काय लागली?या प्रश्नावर बोलताना,लोक फक्त ब्राम्हण-अब्राम्हण असा आरोप करीत आहेत.समाज माध्यमांवर यावर खूप काही व्हायरल झालं.या आरोपात तथ्य नसून याला ना शेंडा ना बूड आहे.फक्त स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न काही लोकांनी चालवला आहे.ज्यांची नियुक्ती झाली असल्याची नावे प्रसिद्ध झाली ते तिन्ही सदस्य याच संस्थेतील कर्मचारी असून कर्मचा-यांची वर्णी समितीमध्ये होत नाही,असे त्यांनी सांगितले तसेच राजकीय नेते हे शेवटी शासनाचे प्रतिनिधी असतात.यात घोळ करु नका.कार्यक्रम करायचा तर लोकांचे सहकार्य गरजेचे असते.ते शेवटी जनप्रतिनिधी आहेत त्यांना लोकांनीच निवडून दिले असल्याचे फुलझेले म्हणाले.
अलंकार चौकापासून सेंट्रल मॉलचा अत्यंत रहदारीचा रस्ता आजपासून सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी बंद करण्यात आला आहे,अनुयायांना याचा कितपत त्रास होईल?यावर,जिल्हाधिका-यांशी याबाबत बोलणे झाले असून सिमेंट रस्त्याचे काम ८ ऑक्टोबरपर्यंत थांबविले असल्याची माहिती त्यांनी दिली.
एक कोटी साठ लाखांचा भव्य पुतळा उभारणार-
स्मारक समितीचे माजी सचिव सदानंद फुलझेले हे सचिव पदी असताना त्यांची दीक्षाभूमी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या अष्टधातूच्या भव्य पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्याची तीव्र ईच्छा होती.यातूनच १ कोटी ६० लाखांचा भव्य असा अष्टधातूचा पुतळा या ठिकाणी येत्या दोन ते अडीच वर्षात साकारला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
थायलंडमधील दानदाते डॉ.पॅन सूनसवाड यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला असून हा पुतळा २०१९ पासून निर्माण होत आहेत.हा पुतळा दहा वेगवेगळ्या भागात दहा वेगवेगळ्या कंटेनरमधून भारतात येणार आहे.यानंतर तो या ठिकाणी जोडल्या जाईल.दहा हजार भिख्खूच्या प्रार्थनेद्वारे पुतळ्यांच्या निर्मितीचा शुभारंभ झाला.स्मारक परिसरात मात्र नेमका कोणत्या ठिकाणी बसवला जाईल,याचे योग्य नियोजन आताच सांगता येणार नसल्याचे फुलझेले यांनी सांगितले.
फडणवीस यांनी दिलेला दीक्षाभूमी विकास आराखडा थंड बसत्यात गेला नसता तर ही समस्या उद् भवली नसती,अशी पुश्तीही त्यांनी जोडली.आता हे पुतळे स्मारक परिसरात कुठेही बसवले गेले तरी धार्मिक विधीनेच प्रतिष्ठापित केले जातील,असे त्यांनी सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा म्हणजे दीक्षा घेताना मंचावरील धोतर कुर्ता घातलेला पुतळा असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
असे आहेत कार्यक्रम-
उद्या रविवार २ ऑक्टोबर पासून महिला धम्म मेळाव्याने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बाबासाहेबांना अपेक्षित भारत ‘, याविषयी परिसंवाद होणार आहे.
सोमवार ३ ऑक्टोबर रोजी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यातर्फे दीक्षा देण्याचा कार्यक्रम. त्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होणार आहे. दीक्षाभूमीवर थायलंड येथील भिकू संघातर्फे ५६ फुटांची बौद्ध प्रतिमा देण्यात येणार आहे. त्या जागेचे भूमिपूजन सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. सायंकाळी धम्मपरिषद होईल.
बुधवार ५ ऑक्टोबरला स्मारक समितीतर्फे धम्म पहाट, सकाळी नऊ वाजता सामूहिक बुद्ध वंदना व संध्याकाळी
सहा वाजता ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला शासनाने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे
यावर्षी प्रचंड मोठ्या संख्येने अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार असल्याची आयोजकांना अपेक्षा आहे. उद्यापासून येणारी अनुयायांची संख्या ३० लाखापर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
आकस्मिक पाऊस आल्यास दीक्षाभूमीच्या जवळपास असलेल्या शाळांमध्ये आश्रयाची सोय करण्यात आली आहे. तसेच शहरातील सर्व बुद्ध विहारांमध्ये अनुयायांची व्यवस्था बुद्ध विहार कमिटीने करावी,अशी विनंती आयोजकांनी केली आहे. पाच तारखेला दसऱ्याच्या पर्वावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण सायंकाळी पाच वाजेपासून सह्याद्री दूरदर्शन, आवाज इंडिया, तसेच युसीएन या नागपुरातील वाहिनीवरून होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात महानगरपालिका, पोलीस प्रशासन व अन्य सर्व यंत्रणा देश विदेशातून तसेच देशातील विविध भागातून येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.




आमचे चॅनल subscribe करा
