

काळ्या बाजारातून तिकीट घेणा-याच्याच डोळ्यात दाटेल ‘पाऊस!’
भ्रष्टाचार फोफावण्यासाठी सामान्य नागरिकच नाहीत का दोषी?
सोशल मिडीयावर बुद्धिजीवींचा जळजळीत प्रश्न
नागपूर,ता.२२ सप्टेंबर २०२२: तब्बल तीन वर्षांनंतर जामठा येथे भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान टी-२० क्रिकेट सामना रंगणार म्हटलं, की क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला अक्षरश:उधाण आले,त्यामुळे बीसीसीआय व पे-टीएम यांच्यातील झालेल्या कराराप्रमाणे ऑन लाईन बुकींगसाठी हे हजारो क्रिकेटप्रेमी ‘इमानदारीने’ तिकीट विकत घेण्यास सज्ज ही झालेत.अनेकांनी सहकुटुंब किवा मित्रमंडळीसोबत या दोन देशांमधील उत्कंठावर्धक क्रिकेट सामना ‘याचि देही याचि डोळा’बघण्यासाठी देव पाण्यात घातले व संगणकासमोर बसलेत मात्र अवघ्या काही मिनिटातच नव्हे तर अवघ्या काही ‘सेकंदातच’ ऑन लाईन तिकीट विक्रीच्या या ‘करिष्म्यामध्ये’ तब्बल ४१ हजार तिकीटे ‘सोल्ड’अर्थात विक्रीही झाली अन् सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी हा स्तब्ध झाला!यानंतर सुरु झाला तो मैदानाबाहेरील तिकीट विक्रीचा ‘ऑफ लाईनचा ’‘खरा’खेळ आणि या खेळात सर्वसामान्य वर्गातील क्रिकेट प्रेमींनीही भरभरुन ‘सहभाग’ नोंदवला,पाचशे रुपयांच्या तिकीटासाठी तब्बल अडीच-अडीच हजार रुपये देऊन काळ्या बाजारातून तीन-तीन,चार-चार तिकीटांची खरेदी केली,आता समाज माध्यमांवर शहरातील बुद्धिजीवी हाच प्रश्न विचारत आहे,आज पावसामुळे सराव तर रद्द झाला,उद्याचा सामनाच रद्द झाला तर?
कोणाला दोष देणार?निसर्गाला?ज्यांच्याकडून काळ्या बाजारातून तब्बल तिप्पट रक्कम देऊन तिकीटे खरेदी केलीत त्या ‘दलाल’नावाच्या भ्रष्ट लोकांना?क्रिकेट सारख्या एका सर्वसामान्य खेळातून स्वर्गातील ‘कुबेराची’जागा पटकावणा-या बीसीसीआयच्या धोरणाला?की स्वत: एका सर्वस्वी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन क्षणिक आनंद प्राप्त करण्यासाठी भ्रष्टाचाराचे पाईक झालेल्या स्वत:च्याच कोत्या मनोवृत्तीला?
उद्या शुक्रवारी भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्यावर पावसाचे सावट असून आज सकाळपासूनच नागपूर व आजूबाजूच्या भागात कोसळलेल्या पावसामुळे या दोन्ही संघामधील क्रिकेट सराव रद्द झाला.पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ जामठाच्या मैदानात सराव करणार होता मात्र पावसाच्या रिपरिपमुळे सराव रद्द करावा लागला.हवामान विभागाने उद्या ही पावसाचा अंदाज वर्तवला आहे,तो खरा ठरल्यास त्याची झळ, या दोन्ही देशांच्या क्रिकेट खेळाडूंना बसणार नाही कारण त्यांना त्यांचे या देखील सामन्याचे मानधन आधीच मिळाले आहेत,त्यामुळे सामना झाला किंवा नाही झाला तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही मात्र ज्या नागपूरकरांनी हा सामना बघण्यासाठी तिप्पट रक्कम मोजून काळ्या बाजारातून तिकीटे खरेदी केली,त्यांच्या मात्र डोळ्यात हा सामना रद्द झाल्यास, पाऊस निश्चितच दाटून येणार हे सांगण्यास कुण्या भविष्यवेत्याची गरज नाही.
सामांन्यांच्या नेमक्या याच प्रवृत्तीवर सोशल मिडीयावर बुद्धिजीवींनी कठोर ताशेरे ओढले आहेत.नियमानुसार उद्याच्या सामन्यात एक तरी चेंडू खेळला गेला तरी तिकीटाचे पैसे प्रेक्षकांना परत मिळत नाही.याशिवाय सामना रद्द झालाच तर पैसे कोणाला मिळतीळ?पाचशे रुपयांची तिकीटे ज्यांनी आधीच (गैर व्यवहारातून) खरेदी केली त्यांनाच तिकीटांची रक्कम परत मिळेल!तिप्पट रक्कम देऊन तिकीट खरेदी करणा-या अतिउत्साही क्रिकेटप्रेमींना पैसे परत करण्याचा सध्या तरी बीसीसीआयचा कोणताही नियम नाही!
या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला तर जामठामध्ये होणा-या क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त आर्थिक फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो दलालांचा झालेला दिसतो आणि सर्वात जास्त आर्थिक लृट जर कोणाची झाली असेल तर ती अतिउत्साही आणि भ्रष्ट कारभाराला प्रोत्साहन देणा-या नागपूरकर क्रिकेट प्रेमींची झालेली दिसते.
विशेष म्हणजे इनसाईडर पे-टीएमच्या माध्यमातून आधी प्रत्येकाला चार तिकीटे बूक करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते,यातून आधी तर तिकीट विक्रीला चांगलाच जोर चढवण्यात आला ,अचानक ऐन वेळेवर एका व्यक्तिला एकच तिकीट देणार असल्याचे धक्कादायक व तेवढाच तुघलकी निर्णय क्रिकेटप्रेमींवर ‘लादण्यात’ आला.एकच तिकीट मिळणार म्हणजे एकटेच बाबा जाणार का सामना बघायला?की मुलगा जाणार?की एकटी मुलगी जाणार?की एकटा मित्र जाणार?भारतीयांच्या याच मानसिकतेचे आणि गरजेचे ‘सपशेल बाजारीकरण’,व्यवस्था व दलालांनी करुन ,काळ्या बाजारातून तिप्पट किंमतीत चार-चार तिकीटे घेण्यास सर्वसामान्यांना बाध्य केले आणि हे फक्त नागपूर शहरात नाही घडत तर ज्या ज्या शहरात क्रिकेटचे आतंरराष्ट्रीय सामने होतात त्या सर्व शहरांच्या क्रिकेटप्रेमींच्या नशीबात बीसीसीआय ‘रचित’हेच ‘प्राकत्तन येतं,हे विशेष!
यावेळी तर शंभरपैकी फक्त दोन जणांनाच ऑन लाईन बुकींगद्वारे तिकीटाचा लाभ मिळाला,पूर्वी हेच प्रमाण १० पैकी २ जण असे होते.याचा अर्थ यावेळी किमान ५० कोटींचा गैरव्यवहार फक्त या एकाच सामन्यातून झाला असल्याची चर्चा समाज माध्यमात त्यामुळे झडली ,विशेष म्हणजे कोट्यावधीच्या या भ्रष्ट कारभाराला हातभार लावणारा इतर कोणी नसून या शहरातील सर्वसामान्य व पांढरपेशा माणूसच आहे,याचीही खंत ते व्यक्त करतात.
भ्रष्टाचार राेखणे हे केवळ शासकीय तपास यंत्रणांचे काम नसून, भ्रष्ट कारभाराला खतपाणी घालणा-या सर्वसामान्य नागरिकांचे देखील ‘कर्तव्यच’ आहे.जामठामध्ये जाऊन ‘दूरवरचा’जल्लोष करण्या ऐवजी घरी राहून दूरचित्रवाणीवर सामन्याचा तोच जल्लोष अनुभवता आला असता,मात्र असे घडले नाही अन्,व्हीसीए मैदानासमोरचे ओंगळवाणे चित्र नजरेत पडले .एकाच दलालाकडे एकाच ब्लॉकचे ११-११ तिकीटे एकाच मित्र मैत्रिणींच्या गटाला,कुटुंबियांना विकत असल्याचे ओंगळवाणे चित्र आज त्या ठिकाणी उमटले होते.
विदर्भ क्रिकेट असोशिएशनला तर हक्काच्या चार हजार तिकीटांचे आरक्षण मिळाले आहे,आपल्या सभासदांसाठी, त्यामुळे त्यांच्या मैदानाबाहेर क्रिकेट या खेळाप्रतिच्या व्यवहाराबाबत काय घडतेय?हे बघण्याची त्यांना गरजच काय?तिकीटांचा हा व्यवहार सर्वस्वी बीसीसीआय व पे-टीएम दरम्यान झालेल्या करार-मदाराशी निगडीत असल्याचे सांगून आपला पल्ला झाडून ही संस्था चक्क नामानिराळी होते.याचा अर्थ सर्वसामान्यांच्या लृटीशी,लुबाडणूकीशी त्यांचा काहीही संबंध येत नाही,हे विशेष!
फक्त एक ते दोन मिनिटात ४१ हजार तिकीटे विक्री होतात,यावर तर ‘नासाने’ संशोधन करायला हवे,असे मिम्स आता व्हायरल होत आहेत.एवढा गंभीर विषय आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा नसून चक्क गुन्हेगारी विभागाचा असल्याचे शासकीय व्यवस्थेमार्फतच आता टोलवलेही जात आहे.महत्वाचे म्हणजे पे-टीएमची गेल्याच आठवड्यात केंद्रिय तपास यंत्रणेद्वारे अश्याच आर्थिक गैरव्यहवहाराच्या संदर्भात चौकशी सुरु झाली आहे,तरी देखील याच यंत्रणेला बीसीसीआय क्रिकेटसारखी संस्था ,सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या खेळासंबंधीचे तिकीट विक्रीचे कंत्राट देते,यातच सर्व काही अालं.
भारतात १९९३ साली संपूर्ण शेअर बाजार नियंत्रित करणारा हर्षद मेहता कांड खूप गाजला होता.किमान भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यासंदर्भातही एकच पे-टीएम सारखी यंत्रणा काही दलालांना हाताशी धरुन किमान ५० कोटींचा, संपूर्ण तिकीट विक्रीचा गाेरख धंदा नियंत्रित करीत असल्याचे चित्र उमटले असल्याची चर्चा त्यामुळेच होत आहे.
यावर कहर म्हणजे काही शासकीय विभागांशी संलग्न होऊन, नागपूरातील काही ‘खासगी’ एंजसींच्या मार्फत, या क्रिकेट सामन्याची जी ‘पेड प्रसिद्धी ’ करण्यात आली,ती खरोखरच ‘काबिले-तारिफच’ म्हणावी लागेल!शहरातील या काही खासगी एजंसीजने क्रिकेट सामन्या संदर्भातील अगदी दररोजचे ‘अपडेट्स’ समाज माध्यमांवर व्हायरल केलेत.या एजंसीजचे सोशल मिडीयावरच किमान ३० ते ४० हजार फॉलोअर्स आहेत.कश्याप्रकारे जामठा सामन्यासाठी सज्ज झाला आहे,कश्याप्रकारे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता ताणल्या गेली आहे,कश्याप्रकारे या दोन्ही संघाच्या चमू ‘आसमंतातून जमीनीवर अवतरल्या,कश्या प्रकारे त्यांची एक झलक बघण्यासाठी तरुणी आसुसलेल्या आहेत,सर्व काही ‘विकाऊ’बातम्या!,सर्वसामान्यांना काळ्या बाजारातून तिप्प्ट रक्कम देऊन तिकीटा विकत घेण्या इतपत, मानसिकता तयार करण्याइतपत प्रभावी या बातम्या होत्या!
यातील एका एजंसीने तर नागपूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागासंदर्भात सोशल मिडीयावर काम करण्यासाठी एमआेयू देखील साईन केल्याची माहिती समोर आली आहे.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्यासोबतचे अनेक छायाचित्रे समाजमाध्यमांवर एका एजंसीच्या संचालकासोबत झळकलेली दिसून पडते.यामुळे देखील सर्वसामान्यांचा ‘विश्वास’अश्या एजंसीजच्या बातम्या किवा माहितीवर किती सहज बसत असतो,हे यातून अधोरेखित होतं.
महाराष्ट्रात जोपर्यंत टोलचा मुद्दा गाजला नव्हता तोपर्यंत सर्वसामान्यांनाही या कोट्यावधीच्या त्यांच्याच आर्थिक लृटीविषयी कळलेच नव्हते.नागरिक जागरुक झाल्यावरच काही प्रमाणात टोलद्वारे होणा-या आर्थिक लृटीला प्रतिबंध बसला.क्रिकेटचे सामने हे देखील अश्याच प्रकारचे सर्वसामान्यांचे लृटीचे एक प्रभावी माध्यम बनले आहेत,यात आता निखळ आनंद राहीला नसून संपूर्णत: आर्थिक गैरव्यवहाराने शिरकाव केला आहे,काळ्या बाजरातील तिप्पट किमतीत क्रिकेट सामन्याची तिकीट विक्री हे त्याचेच एक मूर्तीमंत उदाहरण आहे.
त्यामुळेच उद्याचा सामना हा पावसामुळे रद्द झालाच तर त्याचा सर्वाधिक व ‘एकमेव’ फटका हा, या गैरव्यवहाराला हातभार लावणा-या क्रिकेटप्रेमींनाच बसणार आहे,पुढील वेळी अश्याप्रकारे खिशाला कात्री लाऊन सामना बघण्यापेक्षा व भ्रष्ट व्यवस्थेचे हिस्सेदार बनण्यापेक्षा, एक जागरुक नागरिक म्हणून घरी बसून सामन्याचा आनंद घ्यावा असा देखील अनमोल सल्ला बुद्धिजीवी समाज माध्यमावर देतात.




आमचे चॅनल subscribe करा
