फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशनागपूरचा जलतरणपटू जयंत दुबळेने केला नवा विक्रम

नागपूरचा जलतरणपटू जयंत दुबळेने केला नवा विक्रम

Advertisements

युके येथील नॉर्थ चॅनेल पोहून नागपूरच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

जगातील सात समुद्रापैकी सगळ्यात कठीण अशी समजल्या जाणारी खाडी पोहून केली फत्ते

नागपूर,ता.२१ सप्टेंबर २०२२: नागपूरच्या वीस वर्षीय आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळेने दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी इंग्लंडच्या युनायटेड किंग्डम मध्ये येणाऱ्या नॉर्दन आयर्लंड येथील दोनागडी बंदरा जवळील नॉर्थ अटलांटिक महासागर व आयरिश समुद्रातील नॉर्थ चॅनल पोहून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

नॉर्थ चॅनलच्या सागरामध्ये पहाटे ६ वाजून ३१ मिनिटांनी सूर मारून नॉर्थ चॅनेल पोहण्याच्या धाडसी अभियानाला त्याने प्रारंभ केला. नॉर्दन आयर्लंड ते साऊथ वेस्टर्न स्कॉटलंड दरम्यानची नॉर्थ चॅनल १४ तास ३९ मिनिटांमध्ये जयंत ने आपल्या चमू सोबत पोहून नवा विक्रम प्रस्थापित केला .नॉर्दन आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यानची नॉर्थ चॅनेल पोहणारी आशिया खंडातील पहिली रिले टीम ठरली आहे .

आयरिश लॉंग डिस्टन्स स्विमिंग असोसिएशन (ILDSA) यांच्यानुसार नॉर्थ चॅनेल ही जगातील सात समुद्रापैकी एक सगळ्यात कठीण अशी समजल्या जाणारी खाडी आहे . तिचे अंतर ३४.४ किलोमीटर (२१.१ माईल) असले तरी प्रत्यक्षात जलतरणपटूला ४० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पोहताना पार करावे लागते. अतिशय थंड वातावरण १२ सेल्सिअस डिग्री पासून ते १५ सेल्सिअस डिग्री पाण्याचे तापमान असते. त्यासोबतच गतीने वेगाने वाहणारे वारे, समुद्रातील जेलीफिश हे अतिशय कॉमन असतात. त्यासोबतच नाटोरीयन सी लॉयन व अनेक जलचर प्राण्यांचा अडथळा हा जलतरणपटूंना पार करावा लागतो.

गत तीन दिवसापासून योग्य अशा वातावरणाची आम्ही वाट पाहत होतो. इन्फिनिटी चॅनल स्विमिंगच्या श्रीमती जॅकलीन यांनी दिनांक २० सप्टेंबरला पहाटे पाच वाजता आम्हाला स्टार्टिंग पॉईंट वर उपस्थित राहण्यासाठी सांगितले. त्यानुसार ते उपस्थित झाले. परंतु अतिशय वेगाने वाहणारे वारे यामुळे त्यांना सुरुवात करतानाच योग्य वेळेची दीड तास वाट पहावी लागली.

समुद्रातील बारा ते पंधरा सेल्सिअस डिग्रीच्या थंड पाण्यात पोहणे त्यासोबतच अतिशय वेगाने वाहणारे थंड वारे, समुद्रातील जेलीफिशचा सामना करने हे त्यांच्यासाठी अतिशय नवीन होते, या अाव्हानाला त्यांनी यशस्वीपणे शह दिला व हा विक्रम नोंदवला.

या विक्रमामुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील ओपन वॉटर युवा जलतरणपटूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास जयंतने याने व्यक्त केला. या सागरी साहसी धाडसी मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील शेवटच्या चार तासांमध्ये वातावरणात अचानक बदल झाला. वादळा सारखे वारे वाहू लागले त्यामुळे प्रचंड मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. अंधारही पडायला सुरुवात झाली होती, जयंतसाठी हा जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग होता परंतु अशा या बिकट परिस्थितीचाही सामना धाडसाने करून त्याने ही मोहिम यशस्वीपणे फत्ते केली.

नॉर्थ चॅनेल पोहण्याचा निर्धार त्याने गेल्या दोन वर्षांपूर्वीच केल्या होता. जयंत,त्याची आई व वडील तिघांच्याही विमानाची तिकीट काढले होते. परंतु कोरोनामुळे हे शक्य झाले नाही, त्यातच कोरोनामुळे जयंतच्या आईचे दुःखद निधन झाले. त्यानंतर जयंतने हा प्रयत्न करण्याचे सोडले होते परंतु जयंच्या वडिलांनी व कुटुंबियांनी त्याला धीर दिला.यासोबतच आईच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासोबत होते त्यामुळेच मी ही धाडसी सागरी मोहीम पूर्ण करू शकलो,असे तो सांगतो.

युनायटेड किंगडम येथील वातावरणामध्ये अचानक होणाऱ्या बदलाचा त्याचप्रमाणे थंड पाण्याचा सराव करण्यासाठी गत पंधरा दिवसापासून माझे प्रशिक्षक असलेले वडील डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्दन आयर्लंड येथे सराव प्रारंभ केला होता. माझा कठीण सराव हे अभियान पूर्ण करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरला असे जयंत पुढे म्हणाला.

मुंबई येथील मूळचे नागपूरचे असलेले प्रबोध हळदे व नागपूर येथील हळदे परिवार यांनी माझे मनोबल वृद्धिंगत केले तसेच माझ्या सर्व चहात्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल सर्वांचा आभारी असल्याचे जयंत याने सांगितले.

वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन (WOWSA) ने निर्धारित केलेल्या सात सागरातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या नॉर्थ चॅनल पोहण्याच्या जयंतच्या रिले टीम मध्ये मध्य प्रदेश पश्चिम, बंगाल, आसाम, हरियाणा व तामिळनाडू येथील एकूण सहा जलतरणपटूंचा समावेश होता .

जयंच्या या भरीव यशाबद्दल राज्यासह संपूर्ण देशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जयंत जयप्रकाश दुबळे हा ४ महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिटचा कॅडेट असून, ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमध्ये बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या तिसऱ्या वर्षीचा विद्यार्थी आहे. जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग ,डॉल्फिन स्विमिंग क्लब, एक्वा वॉयज तसेच या अभियानाच्या यशस्वीते करिता सहकार्याबद्दल व चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी आभार मानले .

जयंत ने यापूर्वी वेस्ट बंगाल येथील जगातील सर्वात लांब पल्ल्याची८१ किलोमीटर अंतराची जलतरण स्पर्धा बारा तास २९ मिनिटांमध्ये पोहून यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. तसेच गुजरात येथील ३५ किलोमीटर अंतराची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्याचबरोबर मुंबई व गोवा येथील १४० किलोमीटर अंतराचे स्टेजेस सी स्विमिंग अभियान पूर्ण केले आहे.

याशिवाय जयंतने गतवर्षी श्रीलंका व इंडिया या दरम्यानची PALK STRAIT नऊ तास वीस मिनिटांमध्ये पाहून जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वेगवान जलतरणपटू बनण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. जयंतच्या या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आलेली आहे.

जयंतच्या या धाडसी सागरी मोहिमे करिता आयरिश लॉन्ग डिस्टन्स स्विमिंग असोसिएशनचे ऑबजरवर श्रीमती जेन ह्या होत्या. जयंतच्या सुरक्षे करिता सुसज्ज असलेली इंफिनिटी चॅनल स्विमिंग , नॉर्दन आयर्लंडची अनंत्या ही बोट होती. बोट चे पायलट / स्किपर श्री पॅड्रिक हे होते. जयंतने नॉर्थ चॅनल पार केल्यानंतर नॉर्दन आयर्लंड येथील जेनिफर व जेफ यांनी ज्यांचे अभिनंदन केले.

जयंत ने आपल्या या धाडसी सागरी जलतरण मोहिमेद्वारे ड्राव्हनिंग प्रिव्हेन्शन व ग्लोबल वार्मिंग बाबतही जनजागृतीचा संदेश दिला. जयंतने या अभियानासाठी आपला जलतरणाचा सराव मुंबई जुहू बीच येथील भारतातील पहिल्या समुद्री जलतरण प्रशिक्षण केंद्र तसेच नागपूर येथील एम. एस. डी. स्कूल, ललिता पब्लिक स्कूल, ईस्टर्न स्पोर्ट्स क्लब, महानगरपालिका व एन. आय. टी. येथील स्विमिंग पूल तसेच अंबाझरी तलाव येथे डॉ जयप्रकाश दुबळे व डॉ. संभाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला होता.

युनायटेड किंगडम येथील नॉर्थ चॅनल पोहोण्याच्या विक्रमा बद्दल राज्यातून तसेच संपूर्ण भारतातून जयंत वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या