

– डॉ. मिलींद येरणे यांचा पत्रकार परिषदेतील आरोप
नागपूर, ता. ७सप्टेंबर २०२२: नव्याने नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी १०० खाटांचे रुग्णालय असावे लागते, ही शासनाची अट आहे. या अटीवर राज्यात अनेक खासगी नर्सिंग कॉलेजेस उघडली गेली आहेत. मात्र भंडारा येथे बोगस कागदपत्राद्वारे नर्सिंग कॉलेज मिळवण्यात आले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलींद येरणे यांनी आज येथे केला. बुधवारी (ता.७) नागपुरातील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहितीच्या अधिकारातील कागदपत्रेही वृत्तप्रतिनिधिंसमोर सादर केली.
शासनाचे निकष न पाळता परिचारिका महाविद्यालय कसे मिळाले हा सवाल करीत, ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी तर शहरी भागात जिल्हा शल्यचिकित्सकाचे नाहरकतर प्रमाणपत्र लागते. परंतु भंडारातील कोसरा (कोंढा) येथे स्व. लक्ष्मनराव मोटघरे चॅरीटेबल ट्रस्ट, कोसरा परिसरात कोणतेही १०० खाटांचे रुग्णालय नसतांना महाविद्यालयाला मान्यता मिळाली. दरम्यान माहितीच्या अधिकारात याच्याशी संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांनी या रुग्णालयाला १०० खाटांची परवानगीच नसल्याचे स्पष्ट केले. याशिवाय महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडूनही नर्सिंग कॉलेज उभारणीसाठी परवानगी लागते. परंतु मंडळाने माहितीच्या अधिकारात येरणे यांना या विभागाकडे या संस्थेबाबत कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रदुषण मंडळाचेही कागदपत्रे बनावट असल्याचा दावा येरणे यांनी केला.
बेकायदेशीर संलग्न-
मंजूर नर्सिंग कॉलेज येथील डॉ. एकनाथ नाफडे यांच्या रुग्णालयाशी संलग्नित दाखवले गेले. प्रत्यक्षात डॉ. नाफडे यांनी अड्याळ पोलिसात संबंधित संस्थेशी व व्यक्तिशी काहीही संबंध नसतांना त्यांचे नाव बेकायदेशीर जोडण्यात आले असल्याची तक्रार केली आहे. यावरून भंडाऱ्यात ४ तर राज्यातील इतरही भागात अशाप्रकारे बोगस नर्सिंग कॉलेजला मंजूरी मिळाली असण्याची शक्यता आहे. हे प्रकरण बघता राज्यात अनेक महाविद्यालये बोगस कागदपत्रावरून मंजूरी मिळवण्यात आले असतील ही शंका डॉ. येरणे यांनी व्यक्त केली असून नव्याने मान्यता मिळालेल्या सर्व नर्सिंग कॉलेजची चौकशी करण्याची मागणी केली.
.मी देखील एक प्रस्तावक होतो मात्र माझा प्रस्ताव प्रबंधकांनी रद्द करुन मोटघरे यांच्यासह इतर तीन प्रस्तावांना मंजुरी प्रदान केली मात्र ज्या प्रमाणे मोटघरे यांच्या बनावटी प्रस्तावाला मंजुरी प्रदान झाली त्याच प्रकारे मंजूरी प्रदान करण्यात आलेल्या इतर तीन प्रस्तावांची देखील सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी करीत, भंडारा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने खोट्या परवानगीने कागदपत्रे तयार करुन शासनाची दिशाभूल व फसवणूक केली जात आहे त्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातच आरोग्य व शिक्षणाच्या नावाखाली हा बोगस कारभार केला जात असेल,अशी शंका देखील डॉ.मिलिंद येरणे यांनी यावेळी व्यक्त केली.
मोटघरे या आरोपीवर गुन्हा दाखल व्हावा मात्र त्यासोबतच शासनाच्या ज्या अधिका-यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्याला सहाय्य केले त्यांची देखील तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी डॉ.येरणे यांनी केली.मी ५०-५० खाटांची परवानगी मागितली होती मात्र ते नियमात बसत नाही म्हणून माझा अर्ज निरस्त करण्यात आला,ज्यांची जमीनच अस्तित्वात नाही त्या मोटघरे यांना मात्र १०० खाटांचे नर्सिग होमची बेधडक परवानगी मिळत असल्याचा आराेप डॉ.येरणे यांनी यावेळी केला.
एकाच इमारतीत २५ ते ३० महाविद्यालय!
पत्र परिषदेत भाऊराव पंचवटे(राजकीय विकास परिषदेचे उपाध्यक्ष) यांनी मोेटघरे पती-पत्नीवर गंभीर आरोप करीत त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधील एकाच इमारतीत २५ ते ३० महाविद्यालय चालत असल्याचे सांगितले!कोंडा केसरी येथे मोटघरेंचे विविध उपक्रम चालतात मात्र एक ही शिक्षक दिसत नाही!बी.एड.अभ्यासक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य रामजी चव्हाण यांनी देखील मोटघरे यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.२०१४-१५ पासून मोटघरे यांनी डॉ.दादाराव रामजी चव्हाण,अमरावती विद्यापीठाचे उपकुलसचिव यांच्या बनावट प्राचार्य पदाची मंजूरी घेतली,त्यांच्या बनावट स्वाक्ष-या करुन शासनाचा पैसा लाटला,२०१६ मध्ये मोटघरे यांची हे धोकेबाजी उघडकीस आल्यानंतर चव्हाण यांनी देखील मोटघरे विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे पत्र परिषदेत पंचवटे यांनी सांगितले.
यासंदर्भात नर्सिंग कॉलेजचे संचालक अरूण मोटघरे आणि सुजाता मोटघरे यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.




आमचे चॅनल subscribe करा
