नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा उचलला आहे. संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर निर्माण हे देखील प्रभू रामासाठीचेच काम असल्याचे सांगत जे काही होत आहे ते प्रभू रामच करवून घेत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
राजाबाक्षा मंदिरातील हनुमान जन्मोत्सवात निघणाऱ्या शोभायात्रेच्या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, हनुमान हे प्रभू रामाचे सेवक होते. ते नेहमी रामनामाचा जप करायचे. आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा घेत रामसेवेत लागले पाहिजे. रामसेवा ही राष्ट्रसेवा असल्याचे सांगत समाजाची सेवा ही देखील रामाचीच सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भागवत यांनी अयोध्येचा उल्लेख करणे टाळले.
भागवत म्हणाले, हनुमान बुद्धिमान, विवेकी व सामर्थ्यवान होते. संघटन व नेतृत्वकुशल होते. एवढे गुणसंपन्न असतानाही ते भगवान रामाचे सेवक बनून राहत होते. आपण सर्वांनी त्यांच्या सारखेच प्रभू रामाचे काम करायला हवे. चांगल्या गोष्टींचे समर्थन करून त्याला चालना देखील हे देखील प्रभू रामाचे काम करण्यासारखेच आहे. प्रभू रामाचे काम करताना यश, सन्मान व कीर्ती प्रभू चरणी समर्पित करायला हवी.
प्रभू रामाचे काम करताना असे म्हणू नका की हे मी केले आहे. तर देवाने ते माझ्याकडून करवून घेतले, असे म्हणा. असे केले तरच हनुमान जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल, असेही डॉ. भागवत म्हणाले.