Homeक्राइममाध्यम प्रतिनिधींचे नेमके काय चुकले......?

माध्यम प्रतिनिधींचे नेमके काय चुकले……?

Advertisements

बेलतरोडी आगीच्या घटनेत छायाचित्रकाराला तरुणांची मारहाण

सोशल मिडीयावर माध्यम प्रतिनिधींवर कठोर ताशेरे:ज्यांचा काहीच दोष नाही तेच भरडले गेले

पोलिसांची भूमिका असमर्थनीयच

नागपूर,ता. १३ मे २०२२: सोमवार दि. १० मे हा दिवस बेलतरोडी येथील महाकाली वस्तीतील गरीब,मजूर वर्गासाठी अत्यंत वाईट व तितकाच उधवस्त करणारा दिवस म्हणून उजाडला मात्र त्या सोबतच या भयंकर आगीच्या घटनेचे वार्तांकंन करण्यासाठी गेलेल्या काही माध्यम प्रतिनिधींसाठीही हा दिवस तितकाच आत्मसन्मानाला धक्का देणारा होता.

सकाळी ९.३० च्या सुमारास या वस्तीत सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या भयंकर आगीत एकानंतर एक अश्‍या स्फोटांची मालिकाच सुरु झाली होती.अतिशय दाट अश्‍या वस्तीतील घरेच्या घरे क्षणार्धातात जळून खाक होऊ लागली,नेमकं काय घडलं?कशामुळे आग लागली?सध्या परिस्थिती काय आहे?सैरभैर झालेल्या वस्तीतील लोकांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे?प्रशासन आणि पोलिस कश्‍याप्रकारे काम करीत आहे?पत्रकारितेची मूल्य जपणारी ही प्रश्‍ने सोडून जेव्हा एका स्थानिक वाहीनीच्या प्रतिनिधीने कोणताही अभ्यास न करता वस्तीत जाऊन, बूम हातात धरुन, घटनेशी असंबद्ध प्रश्‍ने विचारणे सुरु केले त्यावेळी मात्र कोणतीही सारसार विवेकबुद्धी शाबूत नसणारी ही माणसे,हे तरुण यांचा राग माध्यम प्रतिनिधींवर निघाला.

सध्या यू-ट्यूबवर या एका स्थानिक वाहीनीच्या प्रतिनिधीचा व्हिीडीयो चांगलाच व्हायरल होत असून सुजाण नेटीझन्सने माध्यमांनाच झोडपणे सुरु केले.या प्रतिनिधीने प्रश्‍न तरी कोणते विचारावे?हूंदके देऊन-देऊन डोळ्याला पदर लावणा-या महिलांना हा माध्यम प्रतिनिधी विचारतोय,आता काय-काय शिल्लक राहीलं तुमच्या घरात?त्या सांगतात ’काहीच नाही उरलं…..’तरीही तो विचारतो ’काही सामान?’त्या उत्तरतात ’काहीच नाही हो काहीच नाही,मुलाने फोन लावला तेव्हा कळले आमच्या घराला आग लागली,मजूरीचे काम सोडून धावत आलो’,मग हा प्रतिनिधी विचारतो ’कोण कोण आहे घरी?ती उत्तरते ’दोन मुले आणि नवरा’मग हा प्रतिनिधी दुस-या पिडीतेला विचारतो ’क्या?क्या बचा क्या कुछ?’ती उत्तरते ’ कुछ भी नही बचा आप तो देखीच रहे हो,क्या बचेगा?मग हा प्रतिनिधी विचारतो’जब आग लगी तब आप क्या कर रहे थे?ती उत्तरते ’घर के अंदर थी’तो विचारतो ’फिर जैसे पता चला आग आपके घर तक पहोची,वो आग आपके घर तक कैसे पहोची?’ती उत्तरते ’सिलेंडर फूटा तब’मग तो विचरतो ’कितने सिलेंडर फूटे यहा पे?’ती उत्तरते ’बहोत सारे सिलेंडर फूटे होगे,बता नही सकते कितने फूटे होंगे’मग जो विचारतो ’आपके घर में बचा है कूछ’ती उत्तरते ’कुछ भी नही बचा सर……!’

परिस्थिती भयाण,सर्वत्र अरण्यरुदन,विध्वंसक दृष्ये,उधवस्त आयुष्ये,एवढ्या पराकोटीच्या संवेदनशील घटनास्थळी एखाद्या माध्यम प्रतिनिधीने एवढ्या रुक्षपणे वार्तांकन करावं हेच मुळी पत्रकारितेच्या मुल्यात बसत नाही मात्र हातात बूम आला व गळ्यात माध्यम प्रतिनिधीचे ओळख पत्र लटकले तर आपल्याला हवं ते विचारण्याचे ‘व्यक्ती व अभिव्यक्ती’स्वातंत्र्य मिळाले असाच अर्भिभाव आजच्या पत्रकारितेत सर्वदूर आढळतोय.अश्‍या पत्रकारितेची मग किंमत ही चुकविण्याची तयारी ठेवावीच लागत असते आणि महाकालीनगरात सोमावरी सकाळी नेमके हेच घडले…..!

काहीही दोष नसताना एका मराठी वाहीनीच्या छायाचित्रकाराला उगाचच मारहाण झाली,त्याच्या मागे ५-६ तरुण धावले,त्याला ढकलले,मान धरुन दाबली,त्याच्या ५ ते ६ लाखांच्या कॅम-याचे नुकसान केले.हे एका सोबतच नाही घडले तर या वस्तीतील तरुणांचा माध्यम प्रतिनिधींवरच रोष होता.अनेकांना त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला मात्र फक्त या मराठी वृत्तवाहीनीच्या छायाचित्रकारासोबत घडलेली घटनाच समोर आली,एवढंच.

या छायाचित्रकाराने या अज्ञात तरुणांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली असून या तरुणांवर कायदेशीर कारवाई होणे नितांत गरजेचेच आहे मात्र माध्यम प्रतिनिधी म्हणून अश्‍या घटनांमध्ये ‘संवेदनशीलतेचीही’तितकीच गरज आहे हे ही लोकशाहीच्या मूल्यात अपेक्षीत आहे,त्याचे काय?
पत्रकारांचं कामच आहे घडणा-या घटना आहे तश्‍या आपल्या वाचकांपर्यंत व प्रेक्षकांपर्यंत पाहोचवणे मात्र वार्तांकन करताना समाेरच्या व्यक्तींची मानसिक,भावनिक स्थिती नेमकी त्या वेळी काय आहे,याचे भान जपणे हे ही तितकेच गरजेचे नाही का?

या छायाचित्रकाराची काहीही चूक नसताना ते उगाच अश्‍या ‘उथळ’ पत्रकारितेत बळी पडलेत.आपलं सर्वस्व उधवस्त झालेले बघून आधीच सैरभैर झालेल्या महीलांना काेणते व कसे प्रश्‍न विचारावे याचे भान या घटनेत काही माध्यम प्रतिनिधींने जपले नाही आणि त्याचाच परिपाक अश्‍या मारहाणीमध्ये झाला,असाच सूर तो यू-ट्यूबवरील व्हिडीयो बघून अनेक नेटीझन्सने आवळला आहे.

पोलिसांच्या उपस्थितीत माध्यम प्रतिनिधींना पळवून-पळवून मारहाण करण्या इतपत वस्तीतील काही तरुणांची हिंमत होते याचा अर्थ नियतीने तर त्यांच्या सोबत क्रूर थट्टा केलीच केली,त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम घटनास्थळी काही माध्यम प्रतिनिधी करीत होते,असाच होतो.घटनास्थळी ’आपका क्या बचा?’असे वाहियात प्रश्‍ने विचारण्या ऐवजी प्रशासन,पोलिस,अग्निशमन यंत्रणा काय करीत आहे,हे दाखवणे गरजेचे होते.आपल्या मुलांबाळांसह उधवस्त झालेल्यांसाठी प्रशासनाने किती तातडीने मदत करण्याची गरज आहे,हे दाखविणे अपेक्षीत होते मात्र काही माध्यम प्रतिनिधी मूर्खासारखे वार्तांकन करुन तरुणांचा रोष ओढवत होते.सृष्टिचा नियमच आहे ’क्रियेला प्रतिक्रिया असतेच’माध्यम प्रतिनिधींच्या क्रियेला वस्तीतील काही तरुणांनी दिलेली ती सर्वस्वी चुकीची ’प्रतिक्रिया’होती.

एवढ्या संवेदनशील घटनास्थळी वार्तांकन करण्यासाठी कुणाला पाठवावे याचे भान ही काही वरिष्ठांचे सुटलेले या घटनेवरुन सिद्ध होतं.घटनास्थळी दुस-या एका वृत्तवाहीनीच्या छायाचित्रकारासोबतही दुव्यवहार झाला,खरं तर यांची कोणतीही चूक नव्हती मात्र तरीही लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे-वगैरे अश्‍या घोषवाक्यांचा अश्‍या संवेदशनशील घटनास्थळी काहीही उपयोग नसून अश्‍या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी फक्त माणसाच्या मनातली संवेदनशीलताच उपयोगी पडत असते,हे या मारहाणीतून सिद्ध झाले.

पोलिसांनी नंतर या तरुणांना अडवले असले तरी त्यांनी देखील त्वरित कारवाई करीत या तरुणांवर कायदेशीर कारवाई करने अपेक्षीत होते मात्र अख्खी वस्ती जळून खाक झाली होती,घरातले किडूक मिडूक,पैसा अडका सगळं,सगळं काही बेचिराख झाले असताना आधीच नियतीने उधवस्त झालेल्या काही टाळकी फिरलेल्या तरुणांना पोलिसांनी पकडून आत टाकले असते तर परिस्थिती आणखी चिघळली असती,ती योग्य वेळच नव्हती,आता मात्र पोलिसांनी ४-६ दिवसांनतर माध्यम प्रतिनिधींवर हात उगारणा-या त्या तरुणांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे,कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणे योग्य नाही हा त्या तरुणांना समज देणे हे पोलिसांचे कामच आहे,ते त्यांनी आता चोखपणे पार पाडावे.

घटनचे वार्तांकन करने हे प्रसार-प्रचार माध्यम प्रतिनिधींचे कामच आहे मात्र सोशल मिडीयावर आपल्या ‘पवित्र’ समजल्या जाणा-या प्रोफेशनची नेटीझन्सने केली तितकी शोभा आता पुरे,हे या घटनेवरुन तरी आपण शिकणार आहोत का?’

Latest बातम्या