
एके -४७ घेऊन बंदूकधारी घरामध्ये कसे शिरु शकतात?उकेंचा न्यायालयात उद्विग्न प्रश्न
फडणवीस ‘गृहमंत्री’ असतानाच उकेंवर झाला होता मनी लॉड्रींगचा गुन्हा दाखल
नागपूरात १५ दिवसात उकेंवर सलग ३ गुन्हे दाखल:इडीच्या धाडीची ‘पूर्वतयारी’ होती का?
इडी अधिका-यांनी सत्र न्यायालयात उके बंधूंवरील आरोपांचे केले वाचन :दोन सत्रात पार पडली सुनावणी
उके बंधूंना ६ एप्रिलपर्यंत इडीची कोठरी
नागपूर,ता.१ एप्रिल २०२२ :शहरातील बहूचर्चित वकील ॲड.सतीश उके यांच्या घरी काल पहाटे अचानक किंबहूना नागपूरात चर्चा झडतेय त्याप्रमाणे ’सोची समझी साजिश’अंतर्गत इडीची धाड पडली,पहाटे ५ ते सकाळी ११ पर्यंत घरीच त्यांची चौकशी झाली.मग त्यांचा संगणक,लॅपटॉप,मोबाईल,कागदपत्रे ताब्यात घेतली जातात.यानंतर सेमिनरी हिल्स येथील इडीच्या कार्यालयात त्यांचा चौकशीसाठी ताबा घेतला जातो,तिथे सायंकाळी ५.३० पर्यंत पुन्हा उके बंधूंची सखोल चौकशी होते.५.३० वाजता त्यांना अटक केली जाते,यानंतर मेडीकलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी होते,रात्री १०.३० पर्यंत त्यांना इडीच्याच स्थानिक कार्यालयात ठेेवले जाते रात्री पावणे अकरा वाजता विमानतळावर आणल्या जातं,विमानतळावरच रात्रभर मुक्काम करुन पहाटे ६ वाजताच्या विमानाने उके बंधूंना मुंबईत आणल्या जातं.सकाळच्या पहील्या सत्रात ११.३० वाजता सत्र न्यायालयात सुनावणीला प्रारंभ होतो,उके बंधूंवरील आरोपांचा,त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा पाढा वाचला जातो,यावेळी ॲड.सतीश उके हे स्वत:ची पैरवी करतात….भावूक होतात…त्यांच्या डोळ्यात पाणी येतं…माझ्या घरी भल्या पहाटे एके-४७ घेऊन सीआरपीएफचे जवान घूसतात!हा माझ्यावर अत्याचार नाही का?असा प्रश्न ते न्यायालयालाच विचारतात!
आरोप,चौकशी,अटक यासारख्या प्रक्रियेत एखाद्या वकीलाचे विषेशत:माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मुरलेल्या राजकारणाच्या विरोधात उघडपणे वैर घेण्याचं धाडस काँग्रेसी विचारधारेच्या ॲड.उके यांनी केलं आहे.फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीवर,चुकांवर,धोरणांवर उकेंची बारिक नजर होती.एका जमिनीच्या संदर्भात जवळपास पंधरा वर्षांपूर्वी या शत्रूत्वाची बिजे रोवल्या गेली.यानंतर मात्र उके यांनी वकीलीची पदवी मिळवून फडणवीस यांना कायदेशीर बाबींवर चांगलेच घेरायला सुरवात केली,त्या शत्रूत्वाची परिणिती उके यांच्यावर काल झालेली इडीची धाड,अटक आणि भर न्यायालयात अश्रू अनावर होईपर्यंत आज गेली.
मुंबईतील वरळी येथील पीजे हाऊस पुनम चेंबर्सच्या तिस-या माळ्यावरील इडीच्या कार्यालयातून सकाळी ११.३० वाजता उके बंधूंना न्यायालयात आणण्यात आले.दूपारच्या सत्रानंतर पुन्हा ४.३० पासून तर ६.१५ पर्यंत आज सुनावणी चालली.उके यांचे बंधू प्रदीप उके यांच्यातर्फे ॲड.रवि जाधव यांनी वकीलपत्र घेतले आहे तर ॲड.उके हे स्वत: आपली बाजू न्यायालयात मांडत आहेत.इडीच्या अधिका-यांवर वकीली क्षेत्रातील उके यांचा मित्रवर्ग उकेंच्या संवैधानिक अधिकारांचे हनन करीत असल्याचा आरोप करीत आहेत.उके यांना कोणालाही भेटू दिले जात नाही.सराईत गुन्हेगारासारखी वागणूक त्यांना दिली जात असल्याचा संताप उके यांचे वकील मित्र व्यक्त करतात.दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी हा गुन्हेगार समजला जात नाही मात्र इडीच्या अधिका-यांच्या लेखी उके हे सुनावणी पूर्वीच अट्टल गुन्हेगार जणू असल्यासारखी वागणूक त्यांना दिली जात आहे.ही देखील वेळ निघून जाईल,न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास व्यक्त करीत, अश्या ओढून ताणून दाखल केलेल्या गुन्हांच्या संदर्भात फार काळ ‘इडी’ उके बंधूंना ताब्यात ठेऊच शकणार नसल्याचा दावा उके यांचे वकील मित्र करीत आहेत.काल उके यांचे जवळपास ५० वकील मित्र हे सत्र न्यायालयात त्यांची पेशी होईल याची वाट बघत थांबले होते मात्र सायंकाळचे ६ वाजले तरी देखील इडीचे अधिकारी यांनी उकेंना न्यायालयात आणले नाही.इडी अधिका-यांनी स्वत: हजर राहून उके यांची पेशी ते मुंबईतील न्यायालयात करणार असल्याचे सत्र न्यायालयाला सांगितले.
कोणत्याही केंद्रिय तपास यंत्रणा असोत सीबीआय असो,इडी असो त्या संवैधानिक कायद्यांच्या वर नाहीत असे ॲड.रवी जाधव यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.उके यांच्याविषयी इडीने पक्षपातीपूर्ण धोरण अवलंबले आहे,त्यांचे संवैधानिक हक्क डावलले जात आहे, मूळात इडीने केलेली उकेंची अटक हीच असंवैधानिक असल्याचे ॲड.रवि म्हणाले.त्यांना नैसर्गिक न्याय नाकारण्यात आला.कोणालाही त्यांना भेटू दिले जात नाही.छगन भूजबळ प्रकरणात उच्च न्यायालयानेच निर्देश दिले होते की इडी कार्यालयात वकीलांना आरोपीसोबत भेटू देण्यात यावे,मात्र उके प्रकरणात इडीच्या अधिका-यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले नाही,यावरुन त्यांनी हेतूपुरस्सर पक्षपाती धोरण अवलंबले आहेत हे सिद्ध होतं असे ॲड.रवी म्हणाले.उके यांच्यावर जे दोषारोपण करण्यात आलेत त्यावर आधीच न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याचे माननीय न्यायलयाच्या निर्दशनास आणून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी शोभा राणे नलावडे या महिलेने भूखंड लाटल्याचा आरोप उके बंधूंवर केला होता,याची सखोल माहिती आज इडीच्या अधिका-यांनी न्यायमूर्तींसमोर ठेवली.याशिवाय मोहम्मद जाफर नावाच्या व्यक्तिने देखील उकेंविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात उकेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरणत आधीच न्यायालयीन प्रक्रियेत आहे.याच प्रकरणात न्यायालयाने ’नॉट टू फाईल’असा स्पष्ट शेरा देखील दिला असतानाही पुन्हा त्याच-त्याच गुन्ह्यांमध्ये चक्क इडी उकेंना अटक करते!याच ‘पुरातन’गुन्ह्यांचा धागा पकडून नव्याने अजनी पोलिस ठाण्यात त्याच महिलेतर्फे विनय भंगाचा गुन्हा दाखल होतो!भूखंड लाटणे आणि विनय भंग या दोन गुन्ह्याची चौकशी चक्क ’इडी’करते!उके बंधूनी लाटलेल्या त्या भूखंडाची किंमत १०० कोटींची आहे?अश्या प्रश्नांना आता उत आला आहे.
या अश्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी माझ्या घरी एके-४७ घेऊन सीआरपीएफचे जवान घूसतात!हा माझ्यावर अत्याचार नाही का?मग अशी उद्गिग्नता ॲड.उके आज माननीय न्यायाधीशांसमोर व्यक्त करतात आणि डोळ्यात आलेले अश्रू जबरीने गिळतात.हे वाक्य बोलताना ते खूप भावूक होतात.उके यांचा वकील मित्र वर्गही स्तब्ध होतो.न्यायालयाच्या कक्षात भावनेला थारा नसतोच,फक्त साक्षी आणि पुरावे बघितले जातात मात्र काल पहाटेपासून एखाद्या तगड्या राजकारणीच्या विरोधात षड्डू ठोकण्याची शिक्षा उके हे भावनिक व मानसिकरित्या पुरेपूररित्या भाेगत आहेत.याचा त्यांना खूप मानसिक थकवा देखील आलेला जाणवतो.
भूखंडाच्या प्रकरणात एवढ्या वर्षांनंतर मनी लाॅड्रींग सारखा गंभीर गुन्हा दाखल होतो.या पुढे कदाचित देशद्रोहाचा देखील संदर्भ पुढे येऊ शकतो.येनकेन प्रकरणे खूप काळासाठी ॲड.उकेंचं तोंड बंद करने,जुन्या उट्टेंयांचा हिशेब वसूल करने यासाठी त्यांना इडीच्या अटकेत ठेवणे विरोधकांना देखील गरजेचे असल्यानेच हे सर्व कूभांड रचल्या गेल्याचा संताप उके यांचे वकील मित्र व्यक्त करतात.ॲड.रवी जाधव,ॲड.वैभव जगताप व ॲड.मोहनीश बाराहाते उकेंच्या समर्थनार्थ मुंबईत या संपूर्ण कायदेशीर लढाईत सावलीसारखे उकेंसाठी वावरत आहेत.बळ आणि सत्तेचा गैरवापर करुन एखाद्याचे तोंड बंद करण्याची खेळी निदान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात तरी नाहीच चालू देणार असल्याचा निर्धार ॲड.रवी जाधव व्यक्त करतात.उकेंसोबत ज्या पद्धतीने केंद्रिय तपास यंत्रणांनी सूड भावनेतून कारवाई केली ती देशाच्या लोकशाहीलाच मारक असल्याचा पुनरोच्चार करीत,निदान भावी पिढीच्या संवैधानिक हक्कांच्या रक्षणासाठी आम्हाला ही लढाई जिंकायचीच असल्याचे ते सांगतात.
सत्ताधारी राजकारणी हे कसे ही वागोत,कोणतेही काळे कृत्य करोत,भ्रष्टाचार करोत,संविधानाची फसवणूक करुन निवडणूकीत प्रतिज्ञापत्र सादर करोत,गरिबांचे भूखंड जबरीने लाटणा-या गुंडांना सार्वजनिक मंचावर मिरवित राहोत,त्यांच्या करवी ‘हवं ते साध्य’ करीत राहो मात्र त्यांच्या या गैर व असंवैधानिक कृत्यांविषयी कोणीही या राज्यात पत्र परिषदा घेऊन सत्य बाहेर आणू नये,प्रतिष्ठेला धक्का लाऊ नये,जो असं दु:साहस करेल त्याचा आता ॲड.सतीश उके करण्याचा पायंडा नागपूरात रुजवल्या गेला आहे.उकेंनंतर आता कोण पुढे येणार? पांढ-या वस्त्रांखाली,आचरणाने हे किती नंगे आहेत हे धाडसाने दाखवणार? असा संताप आता व्यक्त केला जात आहे.
मुंबईवरुन नागपूरात पोहोचलेले माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी विमानतळावर दिलेल्या प्रतिक्रियेत, उके यांच्यावरची कारवाई ही नागपूर पोलिस व महाराष्ट्राच्या पोलिसांनी इडीकडे केलेल्या तक्रारीनंतर झाली असल्याचा खुलासा केला.उकेंवर एका न्यायाधीशांची अवमानना करण्याचा देखील गुन्हा दाखल झाला होता असे फडणवीस यांनी सांगितले तर नाना पटोले यांनी देखील उके यांच्यासोबत माझे फक्त ‘अशिल व वकील’ एवढ्यापुरतीच संबंध असल्याचा खुलासा केला.उके यांच्यासोबत माझे काही घरगुती संबंध नाहीत,अशी पुश्ती ही त्यांनी जोडली.काल उकेंवरील इडीच्या कारवाईला जे पटोले हूकमशाही व विरोधकांवर सूडबुद्धिची कारवाई मानत होते त्यांचाही अचानक सूर बदलल्याने नागपूरकरही अचंभित झालेत.एका महशूर शायरची शायरी आहे ‘समय के साथ हालात का बदलना कुदरत का खेल है,हम तो सिर्फ किरदार है….!कुरघोडीच्या राजकारणात कोण कोणावर कधी घसरेल काही भरवसा नाही अन् कालचा मित्र आज असेल असंही काही नाही,सुपातल्यांनी जात्यातल्यांना उगाच नावे ठेऊ नयेत,भरडणार मात्र दोघेही हे सुज्ञास सांगावे लागत नाही’अशी म्हणायची वेळ त्यामुळेच आता नागपूरकरांवर आली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
