
ज्वाला धोटे यांचा पत्र परिषदेत घणाघाती आरोप
पिडीताच्या कुटुंबियांना संवैधानिक हक्कापासून पोलिसांनी ठेवले परावृत्त:एफआयर,फोरेंसिक रिपोर्ट,पंचनामा अहवाल,सीसीटीव्ही फूटेज,मोबाईल रेकॉर्ड काेणतीही माहिती देण्यास पोलिसांचा नकार!
न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार:अमितेशकुमार यांच्या पोलिस विभागावर विश्वास नाही:सीबीआय किवा सीआयडीतर्फे चौकशीची मागणी
निकीताची आत्महत्या नाही हत्याच:पिडीतेच्या आईचा आरोप
नागपूर,ता. २९ मार्च २०२२: निकिता लखन चौधरी वय वर्षे २३ राहणार,गेडाम लेआउट या तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह नागपूरपासून २२ किलोमीटर दूर सुराबर्डी परिसरात सापडला आणि उपराजधानीत हादरुन गेली.वाडी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपशीलाच्या आधारावर नागपूर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी लगेच निकीता हिची हत्या नसून आत्महत्या असल्याचे प्रचार-प्रसार माध्यमांजवळ सांगितले मात्र आयुक्तांच्या या विधानामुळेच पोलिस विभागावर दडपण आले व सर्व पुरावे हे निकीता हिच्यावर सामुहिक बलात्कार करुन हत्या झाल्याचे दर्शवित असतानाही निकीता चौधरी हिची हत्या नसून आत्महत्या असल्याचा पोलिसांचा बनाव म्हणजे आयुक्तांची अकार्यक्षमता लपवण्यासाठीच पोलिस विभाग आत्महत्येचे थोतांड रचित अाहे व पिडीतेच्या कुटुंबियांना न्यायापासून वंचित ठेवीत असल्याचा घणाघाती आरोप आज राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.याप्रसंगी मृत निकीताची आई,भाऊ व समस्त आप्त परिवार उपस्थित होते.
यावेळी ज्वाला धोटे यांनी निकीता चौधरी प्रकरणात पोलिसांच्या तपास चौकशीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करुन खुलासा मागितला. पोलिसांनी ज्या तत्परतेने निकीताच्या हत्येला आत्महत्येचे पांघरुन घातले ते सर्व संशयास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.आत्महत्या करण्यासाठी एखादी तरुणी २२ किलोमीटर दूर का जाईल?ते ही दोन दोन ऑटो बदलून?तिच्या कमरेखालचा संपूर्ण भाग जाळण्यात आला आहे.यामुळे बलात्काराच्या तपासासाठी जो योनिमार्गाचा व्हिसेरा घेणे गरजेचे असते तो देखील पोलिसांना उपलब्ध होऊ शकणार नाही,त्यामुळेच तिला जिन्ससकट कमरेपासून पेटवण्यात आले,आत्महत्या करणारी मुलगी वरचे वस्त्र काढून फक्त वरच्या आंतरवस्त्रावर म्हणजे ’ब्रा’वर आत्महत्या करणार आहे का?ज्यावेळी पोलिसांना निकीताचा मृतदेह सापडला त्यावेळी तिच्या अंगावर फक्त ब्रा होती व कमरेपासूनचा भाग संपूर्ण जळाला होता याचा अर्थ तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या करुन नंतर तिला जाळण्यात आले.ज्या ठिकाणी निकीताचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी फक्त आजूबाजूचे थोडेसे गवत पेटलेले दिसून पडतंय,एक लिटर डिजेल अंगावर ओतून स्वत:ला आगिच्या भक्ष्यस्थानी देणारा जगातील कोणताही व्यक्ती वेदनारहीत मृत्यूची अशी वाट बघू शकतो का?की स्वत:ला त्या दाहक आगीच्या ज्वालांपासून वाचवण्यासाठी थोडीतरी पळापळ करेल की नाही?मृतक निकीताच्या मृतदेहाजवळ अशी कोणतीही पळापळ किवा स्वत:ला वाचवण्यासाठीचा प्रयत्न झाल्याचे पुरावे दिसतच नाही,असा दावा ज्वाला धोटे यांनी केला.
निकीता चौधरी जळीत कांड प्रकरणात पोलिसांच्या तथाकथित ‘सखोल’तपासात कुठेही पारदर्शिता दिसत नसल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला.तपास करणा-या पोलिसांचा अहवाल किवा फोरेंसिक लॅबचा अहवाल येण्या पूर्वीच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निकीताचा मृतदेह सापडल्याबरोबर अवघ्या दहा मिनिटात बयाण दिले की हे आत्महत्येचं प्रकरण दिसत आहे.पोलिस आयुक्तांच्या या अश्या बेजबादार विधानाने निकीता प्रकरणाचं जे गांर्भीर्य होतं ते नष्ट झालं.संपूर्ण तपास दिशाहीन झाला.जेव्हा पोलिस विभागाचा सर्वेसर्वाच असं विधान छातीठोकपणे करतो कि ’ही हत्या नाही आत्महत्या आहे’मग त्यांच्या विधानाला खोडून काढण्याची हिंमत त्यांच्याच विभागातील कनिष्ठ किवा तपास अधिकारी करतील का?पोलिस अायुक्त पदावरील अधिका-याने कोणतं विधान करायला हवं हाेतं?की तरुणीचा मृतदेह सापडला आहे पण ही हत्या आहे की आत्महत्या याचा आम्ही तपास करीत आहोत,पण आयुक्त तर छातीठोकपणे या घटनेला आत्महत्या ठरवून मोकळे झाले.
या घटनेचा नि:पक्ष तसेच पादर्शक तपास होत नसल्याचा निकीताचे परिजन वारंवार आरोप करीत आहे.त्यांना शवविच्छेदनाची,एफआयआरची रिपोर्ट,पंचनामाचा अहवाल,सीसीटीव्हीचे फूटजे किवा मोबाईल रेकॉर्डचा अहवाल असे कोणतेही पुरावे पोलिस विभाग पिडीतेच्या परिजनांना देत नसल्याचा धक्कादायक आरोप याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी केला.वाडी तसेच प्रताप नगर पोलिस ठाण्यात निकीताच्या भावाने आकाश चौधरी याने शेवटी शहरातील ज्येष्ठ वकील ॲड.राजेश नायक यांच्याकरवी प्रताप नगर पोलिस ठाण्यात लिखित अर्ज, हे सर्व कागदोपत्री पुरावे उपलब्ध करुन देण्यासाठी आज केला असल्याची माहिती ज्वाला धोटे यांनी दिली.यासाठी निकीताचा परिवार पोलिस विभागाला कागदपत्रांचा खर्चही देण्यास तयार असल्याचे लिखितमध्ये त्यांनी दिले.या घटनेचा तपास अचल कपूर करीत आहेत त्यांना फोन लागला नाही त्यामुळे व-हाडे या पोलिस अधिका-यांना वकील व भावाने संपर्क केला असता आधी ते पुरावे देतो म्हणाले यानंतर मात्र आम्ही पेट्रोलिंगमध्ये व्यस्त असल्याच्या सबबीखाली पुरावे देण्याचे टाळले.
पोलिसांचा दावा आहे त्यांच्याकडे १३-१४ सीसीटीव्हीचे पुरावे आहेत.या पुराव्यामध्ये निकीता व्हेरायटी चौकातून कापडी दुपट्टा विकत घेते यानंतर ती ऑटोने आठवा मैलला जाते.या ठिकाणी ती पुन्हा ऑटो बदलते आणि सुराबर्डीच्या विशिष्ट चौकात उतरते व पायी-पाची चालत जाताना दिसते.यानंतर ती सीसीटीव्हीच्या रेंजबाहेर निघून गेलेली दिसते.याचा अर्थ तो संपूर्ण परिसर किवा ती जागा तिच्या नेहमीच्या परिचयाची होती,अज्ञात जागा असती तर तिने थांबून कोणालातरी विचारणा केली असती,पण आत्मविश्वासाने ती वावरताना दिसतेय,ती जागा तिला परिचित असावी.पोलिसांचे म्हणने आहे तरी देखील ही आत्महत्याच आहे.पोलिसांकडे काय पुरावा आहे तिने आत्महत्या केली?पोलिसांकडे निकीताने स्वत:च्या अंगावार डिजेल ओतून काडी पेटविल्याचे फूटेज आहेत का?पुरावा आहे का?याचा अर्थ हाच तपासाचा भाग आहे मात्र तपास न करताच ,तिने स्वत:ला जाळून घेतल्याचे पुरावेच उपलब्ध नसताना पोलिस अयुक्तांनी निकीताने आत्महत्या केली हा निष्कर्ष काढलाच कसा?त्यांच्या एकाच वाक्याने या गंभीर घटनेतील संपूर्ण गंभीरता नष्ट झाली,एका कुटुंबावर कोसळलेला हा दु:खाचा,वेदनेचा डोंगर याच खाली पोलिस आयुक्तांनी या कुटुंबियांना दफन केले .
पोलिस तिच्या व्हॉट्स ॲप चॅटिंगचा पुरावा दाखला म्हणून देतात की तिने अक्षय मोर्हूले याला चॅट केले की तिच्या काकूच्या स्टोव्हमधले रॉकेल संपले आहे तिला रॉकेल हवं.त्यावर अक्षय तिला सांगतो स्टोव्ह हा डिजेलने देखील पेटतो आणि तिला एक लीटर डिजेल बाटलीत आणून देतो.आता या डिजेलचा उपयोग तिने गाडी ड्राय झाली असेल यासाठी देखील केला असू शकतो.मात्र एक लिटर डिजेल ती अंगावर टाकतेय तर खाली थोडं ही डिजेल पडू नये?एक लिटर डिजेलने फक्त कमरेखालचाच भाग कसा काय कोळसा झाला?ही बाब हास्यास्पद बाब आहे,पोलिसांनी थोतांड रचलं आहे. सामुहिक हत्याकांड आणि सामुहिक बलात्काराचं हे प्रकरण असल्याचा दावा ज्वाला धोटे यांनी केला.
जेव्हा ज्वलनशील पदार्थ अंगावर पडतो,माणूस इकडे तिकडे धावतो.कोणी जेव्हा स्वत:ला पेटवतो तर तो काय हाताची घडी करुन एकाच जागेवर बसून राहील की सैरवैर होऊन पळेल? मात्र निकीताचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तिथे तिची काेणतीच पळापळ झालेली दिसत नाही,फक्त मृतदेहाजवळचे गवतच थोडेसे जळालेले आहेत.पोलिसांनी तर टॉवर लोकेशन देखील अद्याप घेतले नाही कारण पोलिसांना ही घटना फक्त आत्महत्याच सिद्ध करायची आहे,असा संताप त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे पोलिस विभाग एवढी दूर्देवी घटना ज्यांच्यासोबत घडली त्या चौधरी कुटुंबियांना त्यांचा नैतिक,संवैधानिक न्याय तर देतच नाही उलट प्रतापनगरच्या पोलिस निरीक्षक जाधव,ज्या स्वत: एक महिला आहेत मृतक निकीताच्या घरी जाऊन तिच्या आईला दम देतात ’बहोत हो चूका तेरा नाटक,बस करो तमाशा,मुठ्ठी खोल दूंगी तो किसी को मुंह दिखाने के काबिल नही रहोगी’असा दम देता?अंगावर सज्जनांचे रक्षण करण्यासाठी घातलेल्या सरकारी वर्दीचा एवढा उपमर्द?एक स्त्री एका उधवस्त झालेल्या दुस-या स्त्रीच्या दु:खाला तमाशा ठरवते?उपायुक्त लोहित मतानी हे देखील आम्हालाच सांगतात या घटनेचे पुरावे आणा तुम्ही पण तपास करा,पिडीतेच्या कुटुंबियांनी देखील तपास करावा,पुरावे पुढे आणावे,हे आमचे काम आहे का?असा संताप व्यक्त करीत, आमच्याकडे तपासाच्या तांत्रिक यंत्रणा किवा अनुभव आहे का?की प्रशिक्षण आहे आम्हाला खूनाचा तपास करण्याचा?पोलिस विभाग मग कशासाठी आहे?फक्त महिन्याकाठी पगार घ्यायला?आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठीच नागपूर शहरात घडलेल्या एवढ्या गंभीर घटनेचा तपास पोलिस भरकवट असल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला.
निकीताचे काही प्रेम प्रसंग असेल व ती प्रियकराला भेटण्यासाठी त्या निर्जनस्थळावर गेली ही असेल तरी याचा हा अर्थ होत नाही तिच्यासोबत अज्ञात गुन्हेगारांनी सामुहिक बलात्कार करावा,तिचा मृतदेह डिजेल टाकून जाळावा,निकीता जळीतकांडात निकीताचा मृत्यू आठ ते दहा तासांपूर्वीच झाला होता यानंतर तिचा मृतदेह त्या निर्जनस्थळी जाळण्यात आला असल्याचा आरोप यावेळी ज्वाला धोटेने केला.पोलिसांनी त्या अज्ञात मारेकरींचा तपास करावा किवा अटक केलेला निकीताचा प्रियकर राहूल मनोहर बांगरे वय वर्षे २४, याच्याकडून सत्य वदवून घ्याव,हे सोडून राहूलवर आत्महत्येस प्रेरित केल्याची कलम लाऊन पोलिसांनी कर्तव्याची इतिश्री मानली असल्याचा संताप त्या व्यक्त करतात.
निकीताचा मृतदेह ज्या निर्जनस्थळी आढळला,त्या ठिकाणी ’डब्लींक ८८’नावाचे एक रिसोर्ट आहे,त्या रिसोर्टच्या चौकीदाराने निकीताच्या कुटुंबियांना सांगितले की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी एक पांढ-या रंगाची कार त्या ठिकाणी तीन-चार तास फिरत होती,राहूलकडेच अशी पांढरी कार होती मग निकीतासोबत जे काही अघटीत घडले त्यासाठी राहूल हाच मास्टरमाईंड आहे का?दवलामेटी,ऑर्डीनन्स फॅक्टरी,सूराबर्डी ते मृतदेह सापडला त्या ठिकाणचे टॉवर लोकेशन पोलिस का घेत नाही? सत्य समोर आणायचे सोडून वरुन निकीताने तीन-चार वर्षांपूर्वी हाताची नस कापली होती,हा जावईशोध पोलिस लावतात!यावरुन काय सिद्ध होतं?माझं जर दोन वर्षांपूर्वी कोणाशी भांडण झालं यानंतर त्याची हत्या झाली तर मला अटक करतील का?दोन वर्षांपूर्वी भावनेच्या भरात घडलेल्या एखाद्या घटनेचा अन्वार्थ पोलिस हे स्वत:ला पेटवून घेण्याशी कसा काय जोडू शकतात?याचा पुरावा तरी आहे का?पुरावाच नसताना नागपूरचा पोलिस विभाग कशाच्या आधारे निकीता बलात्कार व जळीत कांडाला आत्महत्येची घटना सिद्ध करण्यास तत्पर झाला आहे?
सर्वोच्च न्यायालयाचेच ललिता कुमारी खटल्यात स्पष्ट दिशानिर्देश आहेत.घडलेल्या एखाद्या घटनेत दखलपात्र जर काही आढळलं तर पोलिसांनी ताबडतोब त्या प्रकरणात गुन्हा दाखल करावा.चौधरी कुटुंबिय हे तर वारंवार संागत आहेत या घटनेत खूप काही संशयास्पद आहे आणि जे दखलपात्र आहे तरी ३०२,३७६ का नाही कलमा लावल्या? तपासाअंती सत्य समोर आल्यानंतर या कलमा काढता आल्या असत्या.मात्र हत्या आणि दुष्कर्मच्या कलमाच लावल्या गेल्या नाहीत.नागपूर पोलिस तर सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांनाही जुमानत नसल्याचा संताप ज्वाला यांनी व्यक्त केला.
माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच असल्याची वेदना याप्रसंगी पूजा लखन चौधरी यांनी केली.मला फक्त न्याय हवा एवढंच बोलून ती जन्मदात्री अबोल झाली……!
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगून ॲड.राजेश नायक यांच्यामार्फेत आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.प्रताप नगर येथे लहानश्या दोन खोल्यांमध्ये आपले अठरा विश्व दारिद्र्य घेऊन चौधरी कुटुंबिय हा लढा पोलिस विभागाशी लढू शकत नाही.त्यामुळेच आता शेवटची अाशा न्यायालयाकडूनच आहे.पोलिस आयुक्तांनी याआधी देखील मंत्री पुत्र कुणाल राऊत व मकोका फरारी आरोपी यांच्याविषयी बेजबाबदार वक्तव्य केले होते.त्यांना फक्त स्वत:ची कातडी वाचवायची असते मात्र आता सहनशीलतेच्या सर्वच मर्यादा संपल्या आहेत.मुर्दाड शासनाला तर आमदारांना फूकट मुंबईत निवासस्थाने देण्याचे धोरण सूचतंय,वाघा बॉर्डर किवा गडचिरोलीत आघाडी सरकारच्या आमदारांना घरे देण्यात यावी अशी टिका करीत, निकीता प्रकरणी वेळ पडली तर राज्य व राष्ट्रीय महिला अायोगाकडेही दाद मागणार असल्याचे त्या म्हणाल्या.
आपल्या नागपूर शहरातच राज्य महिला आयोगाच्या सन्मानिय सदस्या आभा पांडे राहतात मात्र ज्या प्रकारे त्यांनी जिवंत गंगा-जमुनातील महिलांचा प्रश्न हाताळला आहे ते बघता मृतक निकीता या अवघ्या २३ वर्षीय तरुणीसाठी त्यांना काही संवेदना असेल असे वाटत नसल्याचा टोमणा त्यांनी हाणला.




आमचे चॅनल subscribe करा
