Homeनागपूर न्यूजनिघालो घेऊन दत्ताची पालखी....

निघालो घेऊन दत्ताची पालखी….

-गुरुमंदिर वास्तुपूजन सोहळ्यात प्राणप्रतिष्ठा

-शोभायात्रेने दुमदुमले जयप्रकाशनगर

-घोडे, हत्ती, बॅण्डपथकाचा सहभाग

नागपूर, २७ मार्च:जयप्रकाशनगर येथील श्री गुरुमंदिराच्या नवनिर्मित वास्तपूजन तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रविवारी सायंकाळी मंदिरात स्थापित होणा-या मूर्तींची नगरप्रदक्षिणा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सहभागी चित्ररथ तसेच भजन मंडळाच्या सहभागाने संपूर्ण जयप्रकाशनगर दुमदुमून गेले होते.

पाहुण्यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर शोत्रायात्रा प्रारंभ झाली. त्यात सर्वप्रथम धर्मध्वज, श्रुंगारलेले अश्व, श्रीरंग फाटक यांच्या नेतृत्वात २० फेटेधारी उपासक, बॅण्ड पथक, विदर्भातील भंडारा, लाखनी, अमरावती येथून आलेल्या उपासकांचा समूह, देखावा रथ, तसेच दत्तसंप्रदायाची माहिती देणारा व्हीडीओ रथ, आदिवासी नृत्य पथक, श्रीक्षेत्र भांबेरी येथून आलेले भजन व ढोलकी पथक, मूर्ती आरुढ असलेला रथ तसेच संतप्रवरांचा रथ, तसेच वारकरी भजनी मंडळे शिस्तबद्ध मार्गक्रमण करीत होते.

नगरप्रदक्षिणा शोभायात्रेचा शुभारंभ नक्षलविरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, शंकरराचार्य नारायण विद्याभारती स्वामी, सदगुरुदास महाराज, दादासाहेब आवदे, नागोशास्त्री अंबुलगे यांच्या हस्ते मूर्तीपूजन करुन करण्यात आला. शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शोभायात्रेच्या मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या तसेच औक्षण आणि पुष्पवृष्टी करीत होते. गुरुमंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात श्री दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, विष्णुदास स्वामी महाराज तसेच टेंबे स्वामींच्या मूर्ती स्थापित होणार आहेत.

प्राणप्रतिष्ठा व संतांचे आशीर्वचन-
सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत प्राणप्रतिष्ठा, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ६.३० वा. संतपूजन आणि आशीर्वचन होणार आहे.

Latest बातम्या