

स्वरलता’ च्या सप्तसुरांनी जयप्रकाश नगर दुमदुमले
श्रीगुरुमंदिराचा वास्तुपूजन सोहळयाचा दुसरा दिवस
नागपूर, २६ मार्च :गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गीतांवर आधारित ‘स्वरलता’ या कार्यक्रमात गायकांनी विविध सुमधूर गीते सादर करीत जयप्रकाश नगरातील वातावरण सुरमयी केले. जयप्रकाश नगर येथील श्रीगुरुमंदिरच्या नववास्तूचा वास्तुपूजन सोहळयाच्या निमित्ताने शनिवारी हा कार्यक्रम सादर करण्यात आला तेव्हा हा परिसर स्वर्गीय सुरांना सुरांच्या आठवणीनी दुमदुमून गेला.
वास्तुपूजन सोहळ्याच्या दुस-या दिवसाची सुरुवात महारुद्राभिषेक व दुर्गा सप्तशती पाठाने झाली. वे.शा.स. अभिषेक जोशी व सहका-यांनी बिल्वार्चन अर्पण केले. त्यानंतर सायंकाळी आनंद मास्टे प्रस्तुत ‘स्वरलता’ हा संगीत कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. यात सायली मास्टे, अमर कुळकर्णी, आकांक्षा नगरकर श्रेया खराबे – टांकसाळे यांचा सहभाग होता.
या संगीतमय कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसन्न बारलिंगे यांनी गुरुमंदिर व सद्गुरूदास महाराज व त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या सेवेबद्दल माहिती दिली. वैदेही अजय मुळे हिने गीताने प्रारंभ केला. तिला शनाक्षी अजय मुळे हिने साथसंगत केली. त्यानंतर गायकांनी जयोस्तुते या गीताने ‘स्वरलता’ कार्यक्रमाची सुरुवात केली.
गायकांनी निघाली घेऊन, मोगरा फुलला, ऐरणीच्या देवा, श्रावणात घननीळा, ज्योती कलश, आएगा आनेवाला, ओ सजना या गीतांसह हे हिंदू शक्ती, शूर आम्ही सरदार अशी विररसाची गीते सादर केली. ने मजसी ने या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे निवेदन अमर कुळकर्णी यांनी केले. किबोर्डवर आनंद मास्टे, गीटारवर गौरव टांकसाळे, ऑक्टोपॅडवर विशाल दहासहस्त्र, तबल्यावर प्रशांत नागमोते यांनी साथसंगत केली.
.
आज भव्य नगर प्रदक्षिणा-
संध्याकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान श्रींची भव्य नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली असून याप्रसंगी कर्नाटकातील परमहंस आचार्य नारायण विद्याभारती स्वामी व संतांची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोबतच, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नृत्य, औदुंबरवाडी, भांबेरी परिसरातील ढोलकी भजने , शृंगार लेले अश्व , बँड पथक, डिजिटल व्हिडिओ रथ, विविध देखावे राहतील. गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक नागपूर स्थित संदीप पाटील यांच्या हस्ते शोभायात्रा रथाचे पूजन होणार आहे.




आमचे चॅनल subscribe करा
