
-शक्ति कायदा कधी आणणार? अर्चना डेहनकर यांचा सवाल
-गतिमंद मुलीवरील अत्याचार प्रकरण
नागपूर, २१ मार्च: इमामवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रामबाग भागातील गतिमंद मुलीवरील अत्याचार प्रकरणात पिडीत मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आज भाजपाच्या प्रदेश सचिव व माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी मेडिकल रुग्णालयाला भेट दिली तसेच याप्रकरणी त्वरित आरोपपत्र तयार करा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे, तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडी शासन महिलांच्या मागे आहेत असे सातत्याने शासनातर्फे विविध मंत्री बोलत असतात पण अशी गंभीर प्रकरणे सातत्याने होत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत, त्याचप्रमाणे आयोगाच्या नागपुरातील सदस्या आभा पांडे काय करीत आहेत असे प्रश्न यावेळी अर्चना डेहनकर यांनी उपस्थित केले.
महिलांच्या रक्षणासाठी राज्य शासन शक्ति कायदा आणणार असल्याचे बोलले जाते. सध्या राज्य विधी मंडळाचे अधिवेशन सुरू आहे, असे गंभीर प्रकार झाल्यानंतर या कायद्याची नितांत आवश्यकता आहे. यापूर्वी वाडी भागात देखील अशीच घटना झाली, नागपुरात सातत्याने महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना पोलिस आणि शासन ढिम्म पद्धतीने काम करीत आहे. पिडीत महिलेची भेट घेतल्यानंतर अर्चना डेहनकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मन खिन्न करणारी अतिशय विकृत मानसिकतेतून झालेली ही घटना आहे. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा त्वरित व्हावी अशी मागणी यावेळी अर्चना डेहनकर यांनी केली.
यावेळी अनिता शर्मा, अलका तायडे, अंतकला मनोहरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.




आमचे चॅनल subscribe करा
