फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशतेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही.....

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही…..

Advertisements

चराचरात व्यापलेला स्वर्गीय स्वर अजरामरच:पंचतत्व फक्त विलीन

‘लता’कुठेही गेली नाही,सुरांना शरीर असतंच कुठं?

नागपूर,ता.६ फेब्रुवारी २०२२: स्वरसाम्राज्ञी लताबाईंच्या हजारो गाण्यांपैकी त्यांचं एक गाणं आज अगदी त्यांच्या जीवनावर चपखळ बसतं ‘आंधी’चित्रपटातलं ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही…तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नही..जिंदगी नही..जिंदगी नही’.‘लता‘हा पंचतत्वाने बनलेला देह हा जर्जर झाला होता,गात्रे शिथिल झाली होती,महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अजूर्नाला उपदेश देताना हेच सांगितले ’आत्मा मरत नसते फक्त देह बदलत असतो’वयाच्या ९३ व्या वर्षी भारत देशाच्या या गानकोकिळेने जर्जर झालेल्या देहाचा फक्त त्याग केला आहे,त्यांचा सूरांचा दरवळ हा शतकानूशतके कायम असणार आहे.सात दशके त्या सूरांच्या सूरसाम्राज्ञी राहील्या आहेत,फक्त देहरुपात त्या आज नाहीत याचा अर्थ त्या आता कुठेही नाहीत असे समजणे म्हणजे जीवनाचा आणि जगण्याचा मर्मच समजला नाही,याचे निर्दशक आहे.कसल्या श्रद्धांजल्या नि कसलं दु:खं?त्या आहेत आणि पृथ्वी समुद्रात विलीन होईपर्यंत कायम असणार आहेत,आज सोशल मिडीयावर देखील ‘लतादीदी कुठेही गेल्या नाहीत,त्या माझ्या मोबाईल,लॅपटाप,लिव्हिंग रुम,आॅफीस,पेनड्राईव्ह,सीडी प्लेबर,रेडियोमध्ये आजही आहेत,कायम राहतील’अश्‍याच सर्वाधिक पोस्ट व्हायरल झाल्या.त्यामुळेच त्यांच्या या अश्‍या देहरुपाने वयाच्या ९२ व्या वर्षी जाण्यावर ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही…तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नही’असंच आज म्हणावसं वाटतंय,तू नाहीस तरी आयुष्याकडून कोणतीही तक्रार नाही…पण..तू नाहीस तर आयुष्य हे आयुष्य ही वाटत नाही, नागपूरकरांकडून याच श्रद्धांजलीपर भावना या सूरसाम्राज्ञीसाठी व्यक्त झाल्या.

सूरांना शरीर असतं थोडंच?लावा बरं ‘लग जा गले के फिर ये हंसी रात हो ना हो’यूट्यूब म्यूझिकवर आणि म्हणा बरं त्या आता नाहीत..लावा बरं ‘श्रावणात घननिळा बसरला’आणि म्हणा बरं त्या गेल्या,लावा बरं ‘होठो पे ऐसी बात मैं दबा के चली आई’लावा बरं ‘जिद ना करो अब तो रुको ये रात नही आयेगी’‘तेरे लिये पलको की झालर बूनू’‘क्या जानू सजन होती है क्या गम की शाम’,‘तूम सामने बैठे रहो पलके मेरी जम जायेगी’‘दूरी ना रहे कोई आज इतने करीब आओ’‘मेरे दिल में हलकी सी वो खलिश है जो नही थी‘ मुझे तूम मिल गये हमदम सहारा हो तो ऐसा हो’, ‘बेताब दिल की तमन्ना यही है’ ‘मेरे जीवनसाथी कली थी मै तो प्यासी’ लावा बरं मदन माेहनसोबतचं ’मेरा साया साथ होगा’,मै तो तूम संग नैन मिलाके हार गई सजना’ ‘बैया ना धरो’ ‘आजा पिया तो हे प्यार दूं’ ‘यू हसरतो के दाग मोहोब्बत मे धो लिये, ‘रहते थे कभी जिनके दिल मे हम जान से भी प्यारो की तरह’, बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’आणखी मागे जाऊन ‘तूने ओ रंगीले कैसा जादू किया’ ‘पर्बत के इस पार’ ‘डफलीवाले डफली बजा’त्या ही पूर्वीचे ’प्यार किया तो डरना क्या’, ‘ये जिंदगी उसी की है‘ ‘आयेगा आनेवाला आयेगा’किवा नव्वदीच्या दशकातले ’तुझे देखा तो ये जाना सनम’ ‘मेरे ख्वाबो मे जो आये’ ‘दिदी तेरा देवर दिवाना’लता दीदी त्यांच्या सर्वच भाषांमधील ५६ हजार गीतांच्या माध्यमातून कायम आपल्यासोबत  आहेत, कलावंत हा अमर असतो,सूरांच्या रुपात दरवळत असतो,तो कधीही विस्मरणात जात नाही हेच लता दिदी या’ द ग्रेट किशोर कुमार,मोहम्मद रफी,मुकेश,तलत महमूद,मन्नाडे,महेंद्र कपूर यांच्याच सारखं सिद्ध करुन गेल्या नाहीत का?

भारतरत्न लता दिदींना आज तिन्ही सैन्याने मानवंदना देऊन अखेरचा निरोप दिला,असे भाग्य आले का कोणाच्या वाटेला?त्यांच्या पार्थिवावर देशाचा तिरंगा होता,याचा अर्थ त्यांनी भारत या देशासाठी किती अतुल्य योगदान दिले याची ही साक्ष होती.

अश्‍या या महान सूरसाम्राज्ञी लता दिदींच्या अनेक आठवणी नागपूर शहराशी जुळलेल्या आहेत,त्या आठवणींनी सोशल मिडीया अख्खा व्यापून गेला.नागपूर हे असे शहर आहे ज्यांनी अनेक अनमोल‘माणिक-मोती’मुंबईच्या चित्रपटसृष्टिला दिले.त्यातील एक कोहिनूर हिरा म्हणजे सदर,गांधी चौक येथे राहणारे रामराव परसतवार हे कलावंत.लता बाईंच्या अनेक लोकप्रिय गीतांपैकी असणारे ‘ममता’चित्रपटातील ‘रहे ना रहे हम महका करेंगे बनके कली बनके सबा बागे वफा में‘या गीतात जे अविट गोडीचे जलतरंग वाजले आहे ते नागपूरच्या या महान कलावंताने वाजवले आहे.लता बाईंच्या अनेक आवडीच्या पैकी असणारे एक गीत संगीतकार मदन मोहन यांच्या ‘पंख होती ताे उड जाती रे’या गाण्यातील जलतरंग देखील रामराव परसतवार यांचेच सांगितीक सृजन आहे.हे गाणंच संपूर्ण जलतरंग या वाद्याच्या सुरावटींवर साकारलं आहे,आकारलं आहे.नागपूरातील याच महान कलावंतांच्या पिढीतील रसाळ फळे म्हणजे त्यांची दोन मुले पापाराव परसतवार व शामराव परसतवार ही आहेत.रामराव परसतवार हे लताबाईंच्या शोज चे शेवटपर्यंत अरेंजर राहीलेले अनिल मोहीले यांचे ‘गुरु’.शिवकुमार शर्मा यांचा मुलगा राहूल शर्मा यांचे संगीत असणारे २००० साली ‘मुझसे दोस्ती करोगे‘चित्रपटातील गाण्याच्या रेकॉडिंगसाठी लताबाई आल्या असत्या खास पापाराव परसतवार यांच्यासोबत त्यांनी छायाचित्र काढून घेतले.रामराव परसतवार हे जेव्हा जेव्हा सदर येथील त्यांच्या घरी येत असत संपूर्ण सदर हे त्यांना बघण्यासाठी,भेटण्यासाठी गर्दी करीत असत,तत्कालीन सर्व नामवंत संगीतकारांचे, जलतरंग वादनासाठी, सर्वात आवडीचे कलावंत हे रामाराव परसतवार होते. रामाराव यांचे पुतणे रघूनंदन परसरवार हे आज नागपूर शहरातील ज्येष्ठ ताल वादक कलावंत आहेत,हे विशेष.अनेक दशके विविध ऑकेस्ट्रामध्ये चित्रपटसृष्टितील अनेक नायक-नायिका,चरित्र अभिनेते,हास्य कलावंत,नृत्यांगना आदी यांच्यासोबत रघूनंदन यांनी अप्रतिम वादन केले आहे.गुणसूत्रातूनच ही कला त्यांच्या रक्तात भिनली असली तरी बँकेतील नोकरीमुळे ते मात्र नागपूर शहर सोडून मुंबई गाठू शकले नाहीत.

मूळ नागपूरातील असणारे पापाराव परसतवार यांना दादासाहेब फालके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,हे विशेष!’१९४२ अ लव्ह स्टोरी’या चित्रपटात लताबाईंच्या ’कूछ ना कहो,कूछ भी ना कहो’या गीतामध्येही पापाराव परसतवार यांनी साथसंगत केली.आज पापाराव यांचे वर्य ७७ वर्षांचं झालं आहे.मूळ नागपूरकर संगीत घराण्याचे असे ऋणानूबंध लता बाईंसोबत राहीले आहेत.

लताबाईंच्या आवठवणींना उजाळा देताना विद्यावाचस्पती स्वर्गीय राम शेवाळकर यांचे सुपुत्र आशुतोष शेवाळकर यांनी देखील मुंबईला निघण्यापूर्वी डबडबलेल्या डोळ्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे मनोगत व्यक्त केलं.सायंकाळी लताबाईंवर अंत्यसंस्कार केले जाणार होते,त्यासाठी आशुतोष हे तातडीने मुंबई गाठण्यास निघाले होते.राम शेवाळकर यांच्यासोबतही लताबाईंचे ऋणानूबंध नागपूरकरांना माहिती आहे.लताबाईंचं जीवन संगीताप्रति किती समर्पित होतं,याचं एक उदाहरण आशुतोष यांनी सांगितले.चतुरंग प्रतिष्ठानतर्फे लताबाईंना ‘जीवनगौरव’पुरस्काराने सन्मानित केले होते. हा सोहळा गोव्यामध्ये झाला होता.या सोहळ्यात सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांनी इतके अप्रतिम तबला वादन सादर केले की ते ऐकून प्रेक्षक स्तब्ध झाले हाेते.ताळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या सन्मानासाठी प्रेक्षक उभे झाले असतानाच झाकीर हुसैन यांनी थेट मंचावरुन खाली उडी मारली व समोर बसलेल्या लताबाईंचे चरण व तळपास आपल्या रुमालाने पुसले व तो रुमाल आपल्या कपाळावर लावला.लताबाई त्यांच्या या कृतीने एवढ्या भारवल्या की त्यांनी आर्शिवाद म्हणून आपल्या बोटातली हि-याची अंगठी काढून त्यांच्या बोटात घातली.हे दोन महान कलावंतांचं एकमेकांप्रतिचं भावनेचं समर्पण होतं.आज त्या आपल्यात नाहीत,जणू एका युगाचाच अंत झाला.त्या एक ईश्‍वरी अवतारच होत्या,हे आपलं भाग्य आहे की तो ईश्‍वरी अवतार आपल्याला अनुभवता आला,असे आशुतोष यांनी सांगितले.

लताबाई आजपर्यंत १९९६,१९९७,२००५ मध्ये नागपूरात आल्या होत्या.१९९६ मध्ये जॅकसन रेजन्सीमध्ये वार्तालाप कार्यक्रम झाला होता.याशिवाय राम शेवाळकर यांचा लताबाईंच्या हस्ते अमृत महोत्सवी सत्कार झाला होता,याशिवाय नागपूर महानगरपालिकेतर्फे लताबाईंचा सत्कार आयोजित केला होता यासाठी देखील त्या नागपूर शहरात आल्या होत्या.लताबाईंच्या सत्काराप्रसंगी कुंदाताई विजयकर या महापौर होत्या.

लताबाईंनी नागपूरच्या शैक्षणिक विकासात देखील योगदान दिले असून याची माहिती फार कमी लोकांना आहे.लता दीदी या राज्यसभेच्या सदस्य होत्या तेव्हा त्यांचा खासदार निधी खर्च होत नाही अशी टिका झाली होती.त्यावेळी कुलगुरु डॉ.सुधीर मेश्राम यांनी त्यांचे परिचित असणा-या शहरातील एका नामवंत पत्रकाराला बोलावले.नागपूर विद्यापीठाच्या राजीव गांधी बायोटेक सेंटरचे ते संचालक होते.डॉ.मेश्राम यांनीच सांगितले या सेंटरच्या विकासासाठी २७ लाख रुपयांचा निधी लता दीदींनी दिला आहे.त्यामुळे त्यांच्यावर होणारी टिका या पत्रकारानेच खोडून काढावी.ती बातमी प्रसिद्ध झाली व डॉ.सुधीर मेश्राम यांनी ती लता दीदींना पाठवली.काही दिवसांनी लता दीदींचे डॉ.मेश्राम यांना पत्र आले,त्यात बायोटेक सेंटर अधिक विकसित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

१९९८ या वर्षी यशवंत स्टेडियम येथील विद्यावाचस्पती राम शेवाळकर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात नागपूरकरांच्या आग्रही मागणी पुढे ही लता दीदींनी रात्री बाराच्या ठोक्याला फक्त दोनच ओळी गायल्या ‘मोगरा फूलला..मोगरा फूलला’.

लता दीदी जाहीर कार्यक्रमांसाठी नागपूरात जास्त वेळ आल्या नसल्या तरी वैयक्तीक समारंभासाठी त्यांचे नागपूरात आगमन होत असे.मोदी नंबर तीन मधील ‘महेंद्रकर अँड सन्स‘हे दूकान साडी खरेदीसाठी त्यांच्या पसंतीचे दूकान होते व या दूकानात लता दीदींचे अद्यापही छायाचित्र लागले आहे.स्वत:लता दीदींनी एका मुलाखतीत याचा उल्लेख देखील केला आहे.

लता दिदींना भारत भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राम शेवाळकर कुटुंबियांनी त्यांना आमंत्रित केलं होतं.द.भि.कुळकर्णी सरांना दिनानाथ पुरस्कार मिळाला होता तेव्हा देखील त्या यशवंत स्टेडियमला आल्या होत्या.
बाबासाहेब पुरंदरेंच्या अध्यक्षतेखाली धरमपेठ महाविद्यालयाच्या प्रांगणात देखील शेवाळकर यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमात लता दीदी नागपूरल्या आल्या असल्याचे प्रसंग समाज माध्यमात उमटले.

साठ वर्षांपूवी त्यांच्या कार्यक्रमात नागपूरात गोंधळ झाला होता.हा कार्यक्रम धंतोली येथील पटवर्धन मैदानावर झाला होता मात्र या कार्यक्रमात लता बाई फार उशिरा पोहोचल्याने श्रोत्यांचा संयम ढासळला होता.त्यांच्या दिशेने चप्पल देखील भिरकावण्यात आली होती,असे सांगितले जाते.अनेकांना धक्काबुक्की झाली,पार गोंधळ उडला,दंगल ही पेटली,याच कार्यक्रमात ‘बलात्कार‘देखील झाले,असे धंतोलीतील अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात,मात्र याची कुठेही बातमी प्रसिद्ध झाली नाही,साठ वर्षांपूवीची पत्रकारिता ही मूल्याधिष्ठित असल्याने कदाचित याची वाचत्यता झाली नसावी मात्र पटवर्धन मैदाना समोरील घरांच्या गच्चीवरुन संपूर्ण मैदान दिसत असल्याने हा प्रकार अनेकांनी पाहीला,असे बोलले जात आहे. लता दिदींना याच बाबीचा मानसिक धक्का देखील बसला व त्यांनी नागपूरात पुन्हा कोणताही कार्यक्रम करणार नसल्याचा निश्‍चय केला होता.लता दिदींनी हा कार्यक्रम त्यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवला होता मात्र नागपूरातील आयोजकांनी चक्क त्या कार्यक्रमाची तिकीटे विकली होती.त्यावरुन त्या चांगल्याच नाराज झाल्या व गाण्यास नकार दिल्याने श्रोते यांचा संयम ढासळला व हा संपूर्ण गोंधळ उडला होता.

अश्‍या अनेक आठवणी आज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या.

लताबाईंचं खासगी आयुष्य…..

लतादीदींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना कुतुहल होतं. आपल्या चारही भावंडांचा सांभाळ करण्यापासून त्यांना संगीत क्षेत्रात मदत करण्यापर्यंत लता दीदींनी अनेकदा मोठ्या बहिणीची भूमिका बजावली. परंतू लतादीदी या आयुष्यभर अविवाहीत राहिल्या होत्या. लतादीदींनी लग्न का केलं नाही असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आला असेल. यामागची कहाणी तितकीच हृदयद्रावक आहे.

लता मंगेशकरांच्या आवाजावर मोहीत होऊन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लतादीदींना भारताची गानकोकीळा ही उपाधी दिली होती. राजसिंग डुंगरपूर यांच्यासोबत त्यांची प्रेमकहाणी चर्चेत होती. राजसिंग डुंगरपूर हे राजस्थानच्या डुंगरपूर घराण्याचे राजकुमार होते. याव्यतिरीक्त भारतीय क्रिकेटमध्ये डुंगरपूर यांचं तितकंच मोठं योगदान आहे.

डुंगरपूर यांच्या बहिणीची मुलगी, बिकानेर राजघराण्याच्या राजकुमारी राज्यश्री यांनी आपल्या आत्मचरित्रात लता मंगेशकर आणि राजसिंग डुंगरपूर यांच्या भेटीबद्दलची कहाणी सांगितली आहे. राजसिंग आणि लता यांची ओळख त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांच्या माध्यमातून झाली. हृदयनाथ यांना क्रिकेटचं प्रचंड वेड होतं.

राजसिंग डुंगरपूर हे महाराजा डुंगरपूर यांचे तिसरे पूत्र होते. राजसिंग यांच्या तिन्ही बहिणींचा विवाह हा राजघराण्यात झाला होता. त्यामुळे राजसिंग हे देखील राजघराण्याचीच हीच प्रथा पुढे सुरु ठेवतील अशी अपेक्षा होती. राज्यश्री यांच्या सांगण्यानुसार, त्यांची आई सुशीला ज्यांनी बिकानेरचे अखेरचे महाराजा डॉ. कर्णी सिंग यांच्याशी विवाह केला आणि सुशीला यांच्या बहिण यांचा राजसिंग आणि लता यांच्या नात्याला तीव्र विरोध होता.

राज्यश्री आपल्या आत्मचरित्रात लिहीतात, “लता मंगेशकर यांना बॉम्बे येथील ओल्ड बिकानेर हाऊसमध्ये बोलावण्यात आलं होतं. मला असं मनापासून वाटत आहे (पण मी खात्रीशीर सांगू शकत नाही) की त्यावेळी लता मंगेशकरांना त्यांच्या भावापासून दूर रहाण्यासाठी सांगण्यात आलं. जेणेकरुन त्यांना राजघराण्यातील योग्य मुलीशी लग्न करता येईल.” (२९३ व्या पानावर याचा उल्लेख आहे.

राजसिंह आणि लता मंगेशकर हे एकमेकांच्या इतक्या प्रेमात होते की याच प्रेमापोटी त्यांनी मरेपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय केला. लता मंगेशकर आणि राजसिंग डुंगरपूर यांनी गुपचुप विवाह केल्याच्या अफवा काही वर्षांपूर्वी चर्चेत होत्या. परंतू राज्यश्री यांनी या अफवा फेटाळून लावल्या होत्या. राज्यश्री लंडनमध्ये वास्तव्यासाठी असताना मंगेशकर कुटुंबाशी कायम संपर्कात असायच्या.

लताबाईंविषयी एकच तक्रार…..
त्यांनी आपल्या जीवनात एक ही बुद्ध गीत किवा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणारे गीत गायले नाही.लताबाईंनी जरी वेगवेगळ्या भाषेत ५६ हजार गीत गायले असतील तरी देखील त्यांनी त्यांच्या हयातीत एकदाही भगवान गौतम बुद्ध तसेच डॉ.बाबासाहेब आंंबेडकरांना वंदन करणारे गीत गायले नसल्याचे शल्य अनेक आंबेडकरप्रेमी आज देखील व्यक्त करतात.कलावंत हा निधर्मी असतो,सूर हाच त्याचा धर्म मात्र लताबाईंनी भगवान बुद्धाचे व बाबासाहेबांच्या गीतांना गाण्यास नकार दिला होता,असा दावा केला जात आहे.किंबहूना त्यांना अशी संधी मिळाली नसावी,तरी देखील आज लता बाई कायमच्या अनंतात विलीन झाल्या.आपल्या सूरांच्या माध्यमातून त्या सदैव जिवंत असणार आहेत तरी देखील त्या दैवी व स्वर्गीय सूरांच्या सुरावटीत एखादे गीत तरी भगवान गौतम बुद्धाचे किवा बाबासाहेबांचे असते तर या हि-याचे पैलू आणखी प्रखर झाले असते,असे अनेक आंबेडकरवाद्यांचे मत आहे.

या शिवाय नागपूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने देखील लता दीदींची एक आठवण अशी शेअर केली आहे-

तुम्ही मला बोलवा, मी लगेच येते की नाही ते पहा…’

१९ नोव्हेंबर १९९६ ला मनपाने केला होता लतादिदींचा नागरी सत्कार : विदर्भ आणि नागपूरचे केले तोंडभरून कौतुक-

‘विदर्भात माणसाचा सच्चेपणा आणि मोठेपणा दिसतो. नागपूरला मी भारतीय पुरातन संस्कृतीची प्राचीन राजधानी मानते. नागपुरात एखादा कार्यक्रम उधळला म्हणून मी नागपूरला येणारच नाही, इतकी मी वेडी, नादान वा खाष्ट नाही आणि भित्री तर नाहीच नाही. नागपूरकरांवर मी रागावले म्हणून मी इथे येत नाही हा आरोप अगदी मिथ्या आहे. आज मनमोकळेपणाने संवाद होतोय. आता कार्यक्रम सादर करण्याची संधीही नागपूरकर लवकर आणतील अशी आशा करते. तुम्ही बोलवा, मी लगेच येते की नाही ते पहा’, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे शब्द नागपूर आणि विदर्भावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेसे ठरावेत.

नागपूर महानगरपालिकेद्वारे १९ नोव्हेंबर १९९६ रोजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी लतादीदींनी नागपूरकरांशी साधलेला हा संवाद. त्यावेळी सत्कार कार्यक्रमाला तत्कालीन महापौर कुंदाताई विजयकर, उपमहापौर निखारे, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दत्ता मेघे, गुलाबराव गावंडे, माजी महापौर अटलबहादूर सिंग उपस्थित होते.

सिव्हिल लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये हा नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती ही लक्षणीय होती. नागरी सत्कार कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांकडून लतादीदींना गीत गाण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी लतादिदींनी पसायदान गायले होते. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर सुद्धा उपस्थित होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नागपूर महानगरपालिकेद्वारे नागरी सत्कार व्हावा यासाठी तत्कालीन माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या विशेष पुढाकार घेतला होता. त्यावेळी भाषणात लतादीदींनीही अटलबहादूर सिंग यांच्यामुळे नागपूरकरांशी मनमोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली असल्याची भावना व्यक्त केली होती.

त्यावेळी भाषणात लतादीदींनी विदर्भ आणि नागपूरचे तोंडभरून कौतुक केले होते. ‘महाभारतात महाराष्ट्राचा उल्लेख कुठेही येत नाही पण विदर्भाचा वारंवार येतो. म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्र हे नावही अस्तित्वात नव्हते त्यावेळी विदर्भ हे वैभवशाली राज्य होते. माझ्या या विधानावर राजकारणी, विद्वान, संशोधक, समीक्षक यांच्यामध्ये वादावादी होणार. पण या साऱ्यांना एक कलाकार वितंडवादापेक्षा आणि कुठला आनंद देणार? असो. म्हणून मी नागपूरला पुरातन संस्कृतीची प्राचीन राजधानी मानते. आणि ही भारतीय पुरातन संस्कृती, त्या संस्कृतीची जीवनमूल्ये विदर्भाने अजून जपून ठेवली आहेत, याचा मला अभिमान आहे. जुन्या वास्तूत किंवा प्राचीन मंदिरात प्रवेश करताना जो भाव मनात रुंजी घालतो पण नंतर तो व्यक्त करता येत नाही. ते अव्यक्त भावविश्व आज माझ्या मनात कोंदाटले आहे, अशा शब्दांत त्यांनी नागपूर आणि विदर्भावरील प्रेम व्यक्त केले होते.

कवी ग्रेस यांच्या कवितेच्या ‘सगळ्याच ऋतूंना मिळते दु:खाचे उत्कट दान’ या दोन ओळींचे स्मरण करीत त्यांनी विदर्भाच्या उत्कटतेवर अत्यंत मार्मिक विवेचन केले. ‘निसर्ग जसे मानवाला उत्कट दान देतो, तसे उत्कट दान एखादी संस्कृती एका प्रांताला देते. प्राचीन संस्कृतीचे, जीवनमूल्यांचे, विद्वतेचे, शौर्याचे, साधेपणाचे, निष्कपट हृदयाचे व उदार मनाचे उत्कट दान विदर्भाला ईश्वराने दोन हातांनी दिले आहे. या अगत्याचा मी कालपासून अनुभव घेत आहे. उजव्या हाताचे दान डाव्या हाताला कळू द्यायचे नाही, हा मनाचा सच्चेपणा व मोठेपणा फक्त विदर्भातच दिसतो. जे मनापासून आवडले ते निर्भयपणे डोक्यावर घेणे व जे आवडले नाही ते तितक्याच निर्भयतेने फेकून देणे, ही विदर्भाला मिळालेली आणखीन एक देणगी, असेही त्या म्हणाल्या होत्या. विदर्भात कलावंतांची होणारी कदर यावर वडिल मा. दीनानाथ मंगेशकर नेहमी ‘लता, कंपनी तोट्यात आली की आम्ही विदर्भाचा दौरा काढतो. ६ महिन्यांत सारे ठिकठाक होते.’ असे सांगत असल्याचीही आठवण त्यांनी सांगितली होती.

१९९६ च्या ४०-४५ वर्षापूर्वी नागपुरात काही गैरसमजूतीमुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर मनपाच्या नागरी सत्कार कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शविली. तेव्हा त्यांनी त्या गैरसमजूतीवरही वक्तव्य करीत अनेक शंकांना मुठमाती दिली. ’४०-४५ वर्षांपूर्वी माझ्या कार्यक्रमात काही गैरसमजुतींमुळे गोंधळ झाला. तो राग मनात धरून मी नागपुरात येत नाही, असा काही लोकांचा गैरमज आहे. तक्रार आहे. टीकाही आहे. राग, तक्रार आणि टीका हेही विदर्भाला मिळालेले खास दान आहे. गेली ५० वर्षे मी माझ्या कामात इतकी व्यस्त आहे की, हिंदुस्थानातील मोठमोठ्या शहरी मी एक सुद्धा कार्यक्रम अजून केला नाही. त्या गोंधळात झालेल्या कार्यक्रमानंतर नागपुरात मला कोणी बोलाविले नाही आणि काळाच्या ओघात ४० वर्षे सहज विरून गेली.

नागपूरकरांवर मी रागावले म्हणून मी येथे येत नाही हा आरोप अगदी मिथ्या आहे. कारण ज्या सांगली शहरात माझ्या वडिलांच्या घरादाराचा लिलाव झाला, बेअब्रू झाली त्याच सांगली शहरात मी हॉस्पिटलच्या मदतीसाठी कार्यक्रमही केला आणि अनेक वेळा मी तिथे जाते. त्या शहरावर मी कधी राग धरला नाही. ज्या शहरात माझ्या वडिलांचा विपन्नावस्थेत मृत्यू झाला त्या पुणे शहराचाही मी द्वेष करीत नाही. उलट ‘दीनानाथ प्रतिष्ठान’ स्थापून त्या प्रतिष्ठानाद्वारे अनेक कार्यक्रम आम्ही पुणे येथे केले. ज्या शहरात आपण वाईट दिवस पाहिले, आपल्याला वाईट अनुभव आले, ते शहर वाईट किंवा दुष्ट असे मानण्याइतकी मी मूर्ख नाही आणि दीर्घद्वेषीही नाही. शहरं तीच असतात, माणसंही तीच असतात. कोणीही वाईट वा दुष्ट नसतं. वाईट असते ती आपली वेळ, वाईट असते ती नियतीची खेळी. एक गाणं खराब झालं म्हणून कोणी गाणं सोडून देत नाही. नागपुरात एक कार्यक्रम उधळला म्हणून नागपूरकरांचे तोंड पाहायचे नाही, इतकी मी वेडी, नादान वा खाष्ट नाही आणि भित्री तर नाहीच नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी जुन्या सर्व गैरसमजांना फेटाळून लावले.

हे सर्व सांगतानाच त्यांनी विदर्भातले प्राचार्य राम शेवाळकर ते गजलकार सुरेश भटापर्यंत अनेक स्नेही विदर्भात असल्याचे सांगितले.  साळवेसाहेब, वसंतरावजी साठे हे अगदी जवळचे स्नेही, वडिलधारे असल्याचे त्या म्हणाल्या. फक्त शहरी कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची संधी लाभली नाही. नियतीच्या ते मनात नसावे, अशी पुष्टीही शेवटी त्यांनी जोडली होती.

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नागरी सत्काराने नागपूर महानगरपालिकेचा गौरव झाला आहे. मनपातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या