
राज्यात लवकरच राष्ट्रपती शासन:ॲड.सतीश उके यांचा दावा
पोलिस आयुक्त अमितेशकुमार फडणवीसांच्या सूचनेनुसार लागले कामाला!
ॲड.उके,ज्वाला धोटे यांना गुन्ह्यात अडकवण्याच्या अमितेशकुमार यांच्या कनिष्ठ अधिका-यांना सूचना
नागपूर,ता.२३ डिसेंबर २०२१ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात फडणवीस यांनी कटकारस्थान करुन त्यांना खोट्या आरोपात कारागृहात डांबले कारण त्यांनी भाजपच्या काही गंभीर गुन्ह्यात सहभागी लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश, नागपूरच्या पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते मात्र अमितेश कुमार यांनी फडणवीस यांना सर्व गोपनीय माहिती पुरवली. एवढंच नव्हे तर राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीचा देखील अमितेशकुमार व काही भाजप धर्जिणे महसूल अधिकारी हे भाग झाले असून नागपूरचे पालकमंत्री मात्र अद्यापही गाफिलच आहेत.ज्याप्रमाणे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे फडणवीस यांच्या कटकारस्तानातून जात्यात गेलेत त्याचप्रमाणे, उर्जामंत्री नितीन राऊत हे आज जरी सूपात असले तरी, त्यांनी अमितेशकुमार यांच्या विरोधात प्रभावी पाऊल न उचलल्यास देशमुख यांच्याप्रमाणेच ते देखील जात्यात जाणार असल्याचा दावा ॲड.सतीश उके यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत केला.
याप्रसंगी मंचावर राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे उपस्थित होत्या.याप्रसंगी ॲड.उके यांनी पोलिस आयुक्त यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करीत,ज्वाला धोटे यांनी ज्या दिवशी पत्र-परिषद घेऊन अमितेशकुमार यांच्या सास-यांविरुद्ध, विमलचंद्रा गुप्ता तसेच साडभाऊ अमित मोहपात्रा यांच्याविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली,त्यामुळे संतप्त होऊन अमितेश कुमार यांनी त्यांच्या अगदी जवळच्या काही कनिष्ठ पोलिस अधिका-यांना,काहीही करा पण ॲड.उके व ज्वाला धोटे यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना अडकवा असा आदेश दिल्या असल्याचा दावा ॲड.उके यांनी याप्रसंगी केला.
उके व ज्वाला धोटे यांना एकवेळा कारागृहात डांबले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काहीच बोलणार नसल्याचा दावा अमितेश कुमार यांनी कनिष्ठ अधिका-यांकडे केला असल्याचा दावा ॲड.उके यांनी याप्रसंगी केला.लवकरच शरद पवार हे महाविकासआघाडी सरकारसोडून भाजपसोबत जाणार असल्याचेही, अमितेशकुमार यांनी कनिष्ठ अधिका-यांना उपरोक्त सूचना देताना सांगितले असल्याचा दावा ॲड.उके यांनी पत्र परिषदेत केला.
फडणवीस काळातील महापरीक्षा पोर्टलचा घोटाळा बाहेर काढल्याने अमितेशकुमार यांचा जळफळाट-
२०२० साली फडणवीस काळातील महापरीक्षा पोर्टल घोटाळ्यातील संपूर्ण माहिती, पुराव्यांसह तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखला मी दिली होती.या पोर्टलच्या मुख्य कार्यकारी व्यवस्थापक(सीईओ)पदावर फडणवीस यांनी आपल्या अतिशय जवळच्या माणसांची नेमणूक केली होती.या बातमीला काल २२ डिसेंबर रोजी मुंबईत एका खासगी वाहीनीने प्रसिद्ध केल्याने तसेच फडणवीस यांना न्यायालयाची नोटीस जारी झाल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा जळफळाट झाला.याच पार्श्वभूमीवर २० डिसेंबर २०२० रोजी माझ्या कार्यालयावर फडणवीस यांच्या गुंडांमार्फत जीवघेणा हल्ला झाल्यानंतर देखील पोलिस ठाण्यात अमितेश कुमार यांच्या सांगण्यावरुन तक्रार नोंदवण्यात आली नव्हती,असे उके म्हणाले.पोलिसांच्या या भूमिकेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देताच पोलिसांतर्फे जामिनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला.दुस-या दिवशी फडणवीस यांच्या जवळच्या खास माणसांनीच आरोपींचा जामीन न्यायालयातून घेतला,याचे संपूर्ण पुरावे व सीसीटीव्ही फूटेज माझ्याजवळ असल्याचे ॲड.उके यांनी सांगितले.
मी फडणवीस तसेच इतर भाजप नेत्यांच्याविरुद्ध हजारो कोटींच्या घोटाळ्यांची पुराव्यांनिशी अनेक तक्रारी नोंदवल्या आहेत.त्या तक्रारींवर एफआयआर दाखल झाल्या असत्या तर फडणवीस यांना न्यायालयीन शिक्षेपासून देखिल कोणीही वाचवू शकले नसते.फडणवीस यांचा कँसर हॉस्पीटलचा घोटाळा,काेराडीतील धरण बूजवून करण्यात आलेला जमीन घोटाळा,कोराडीतील मंदिराच्या जागेचा घोटाळा,हजारी पहाड येथील पोलिसांच्या जागेचा घोटाळा इ.अनेक घोटाळ्यांची पुराव्यांनिशी तक्रारी नोंदवण्यात आली आहे.फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या परीक्षा महापोर्टल घोटाळ्याविरुद्ध २७ ऑक्टोबर २०२० करण्यात आलेल्या तक्रारीत फडणवीस यांचा नातेवाईक कौस्तुभ ढवसे व निधी कामदार यांचे नाव देखील शामिल आहे.कौस्तुभ ढवसे व निधी कामदार हे गैरकायदेशीररित्या एका इस्त्रायली स्पायवेअरचा वापर करीत असल्याचे मी त्याच वेळी तक्रारीत नमूद केले होते.दोन वर्षांनंतर तेच गैरकायदेशीर पाळतचे प्रकरण ‘पॅगेसीस’नावाने देशाच्या समोर आल्याचे उके यांनी सांगितले.
२००७ मध्येही अमितेशकुमार यांचा गुन्हेगारांना अभय-
नागपूरातील बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा करणारा मुन्ना यादव हा फडणवीस यांच्या अतिशय जवळचा आहे.या घोटाळ्याविरुद्ध मी ६ एप्रिल २००६ रोजी तत्कालीन पोलिस उपायुक्त,परीमंडळ क्र-२ चे अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार नोंदवली होती मात्र त्यावेळी देखील अमितेशकुमार यांनी संपूर्ण माहिती दडवून ठेवली व त्या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून माझ्यावर व माझ्या भावाविरुद्ध ६ खोटे गुन्हे दाखल केले.पहील्याच गुन्ह्यात आमच्याविरुद्ध मोक्का कायदा लावण्याचा प्रस्ताव अमितेशकुमार यांनी दिला होता.हे सर्व गुन्हे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत व आम्ही निर्दोष सूटलो मात्र त्यावेळी आमच्याविरुद्ध मोक्का लागला असता तर तर मी किती वर्षे तुरुंगात असतो हे सांगू शकत नाही,जेव्हा कधी मी निर्दोष मुक्त झालो असतो तरी ती मुक्तता पाहण्यासाठी कारागृहात मी जिवंत ही राहीलो नसतो,अशी उद्विग्नता याप्रसंगी ॲड.उके यांनी प्रकट केली.
अमितेशकुमार हे मूळ बिहारचे असून ते नागपूरात बिहारची संस्कृती रुजवू पाहत आहेत मात्र महाराष्ट्र राज्याची संस्कृती ही वेगळी आहे,ती उदार आणि सहिष्णू आहे,अमितेशकुमार यांनी दडपशाही व दंडेलशाहीची बिहारची संस्कृती महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करु नये असे सांगून, अमितेशकुमार यांचे सासरे बिमलचंद्रा गुप्ता व साढभाऊ अमित मोहपात्रा यांच्या फेसबूक पोस्टमध्ये महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली आहे,पोस्ट टाकण्यात आल्या आहेत ते बघता, त्यांच्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडते,अशी खोचक टिका उके यांनी केली.
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी आत्मघातकी पाऊल उचलले आणि अनिल देशमुखांना व राज्य सरकारला अडचणीत आणले, त्याचप्रमाणे अमितेशकुमार हे फडणवीस यांना लाभ पोहोचवण्यासाठी कनिष्ठ अधिका-यांना आमच्या अटकेविषयी मौखिक आदेश देत असल्याचा आरोप ॲड.उके यांनी केला.
अमितेशकुमार यांनी नागपूरात सर्व पोलिस ठाण्यात त्यांचे कुटील हेतू पूर्ण करणा-यांची, हेतुपुरस्सर नेमणूक केली असल्याचा अारोप ॲड.उके यांनी केला.मात्र सगळेच पोलिस अधिकारी हे भ्रष्ट नसून आपल्या नोकरीच्या इमानाला जागणारे अनेक चांगले पोलिस अधिकारी या शहरात असल्याचे उके म्हणाले.
परी.क्र २ च्या उपायुक्त विनिता शाहू,आर्थिक गुन्हे शाखा,पोलिस ठाणे अजनी,सदर येथील काही पोलिस अधिकारी अमितेशकुमार यांचे खास आहेत.ज्याप्रमाणे पुणे येथील पोलिस आयुक्त सतपाल सिंग हे भाजपचे खासदार झालेत,त्याच वाटेवर अमितेशकुमार यांची वाटचाल असल्याचा आरोप याप्रसंगी ॲड.सतीश उके यांनी केला.
फडणवीस यांची सत्ता न आल्याने काही महसूल अधिकारी हे अद्यापही दु:खाच्या सावटात आहेत असे सांगून, शिरीष पांडे यांच्यासह किमान पाच अतिरिक्त जिल्हाधिकारी हे फडणवीस धर्जिणे असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी पार्श्वभूमी तयार करीत असल्याचा दावा याप्रसंगी ॲड.उके यांनी केला.
फडणवीस व अमितेशकुमार यांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला असल्याचा घणाघात करीत ,अमितेशकुमार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी केली.चौकशीची सुरवात माझ्या संपत्तीपासून करावी,असेही आव्हान ज्वाला धोटे यांनी केले.
लवकरच अमितेशकुमार यांच्या सास-यांविरुद्ध कारवाईसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगून, मी पत्र परिषद घेताच अमितेशकुमार यांचे सासरे व साढभाऊ यांनी आपला फेसबूक अकाऊंट ब्लॉक केल्याची माहिती त्यांनी दिली.त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जवाबदारी ही महाराष्ट्र शासनाचे पोलिस अधिकारी म्हणून अमितेशकुमार यांची होती मात्र त्यांनी मला व ॲड.सतीश उके यांनाच कोणत्याही गुन्ह्यात अडकवा,असे मौखिक आदेश आपल्या कनिष्ठ अधिका-यांना दिले असल्याची माहिती आम्हाला कळली आहे,असे त्या म्हणाल्या.
माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला ज्या दिवशी धक्का बसेल त्याला सर्वस्वी अमितेशकुमार हे जवाबदार असतील असे त्या म्हणाल्या.वाघ एकटा असतो मात्र १० कुत्र्यांच्या झुंडीसमोर कधीकधी तो ही हतबल होत असतो.ज्वाला धोटे मात्र अश्या कोणत्याही झुंडशाहीला घाबरत नसल्याचे त्या म्हणाल्या.
भविष्यात होऊ घातलेली राष्ट्रपती राजवट व फडणवीस व अमितेशकुमार यांचे कुटील कारस्थान याबाबत सविस्तर निवेदन विधान सभा उपाध्यक्ष,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,गृह विभागाचे अति.मुख्य सचिव,राज्याचे पोलिस महासंचालक यांना मेल केले असल्याचे उके यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
