Homeनागपूर न्यूजचित्रपट महोत्‍सव नागपूरसाठी अभिमानास्पद महोत्सव : नंदा जिचकार

चित्रपट महोत्‍सव नागपूरसाठी अभिमानास्पद महोत्सव : नंदा जिचकार

ऑरेंज सिटी आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाला प्रारंभ

नागपूर, १८ डिसेंबर: ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दर्शकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत असून हा महोत्‍सव नागपूर शहरासाठी अभिमानास्पद महोत्सव आहे, असे मत नागपूरच्या माजी महापौर नंदा जिचकार यांनी व्‍यक्‍त केले.
ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्या पाचव्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद् घाटन आयटी पार्क येथील पर्सिस्‍टंट सिस्‍टीमच्या कालिदास सभागृहात नंदा जिचकार यांच्‍या हस्‍ते पार पडले,याप्रसंगी त्या बोलत होत्या.

नागपूर महानगरपालिका, सप्तक आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय चित्रपट महोत्‍सवाच्‍या उद् घाटन कार्यक्रमाला चित्रपट अभ्यासक समर नखाते, ‘गोत’ चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे, तसेच फिल्मगुरु आणि यांची प्रमुख उपस्थिती होती.

सलग पाच वर्षे एवढा भव्यदिव्य महोत्सव साजरा करणे मोठी कामगिरी आहे. इथे येणे हा माझा देखील बहुमान असल्याची भावना जिचकार यांनी व्यक्त केली. डॉ. मेश्राम यांनी ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आपल्या भावना प्रकट केल्या. यावेळी त्यांनी नागपूर महानगरपालिका आणि अधिकारी वर्गाचे आभार मानले. या महोत्सवातून नागपूरची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली अशा शब्दात त्यांनी या महोत्सव आयोजनाचे यश व्यक्त केले.

यावेळी नंदा जिचकार यांच्या हस्ते ‘गो’त चित्रपटाचे दिग्दर्शक बागडे, ‘फिरस्ते’ चित्रपटाचे दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांचा सत्कार करण्यात आला. उदघाटनापूर्वी चित्रपट अभ्यासक समर नखाते यांनी चित्रपटाचे भावविश्व, व्यक्तिरेखा, रचनापद्धती प्रेक्षकांना समजावून सांगितल्या. त्यांनी दिवसभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे उत्तमरीत्या समीक्षण केले. साध्या सोप्या भाषेत त्यांनी सर्व चित्रपटांचे सार प्रेक्षकांसमोर मांडले.

ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर मेश्राम, सचिव विलास मानकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी सोवनी यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. उदय गुप्‍ते यांनी केले.
………
गोत’ चित्रपटाने सिनेरसिक अंर्तमुख-
चित्रपट महोत्‍सवात नागपूरचे दिग्‍दर्शक व निर्माते शैलेंद्र बागडे यांचा ‘गोत‘ हा आदिवासी प्रथेवर आधारित चित्रपट आज प्रदर्शित करण्यात आला. आदिवासी प्रथा आणि मानवी भावबंधांचे द्वंद्व या चित्रपटात बागडे यांनी उत्तमरीत्या मांडले असून किरण बागडे, पूजा पिंपळकर, सचिन गिरी, विजय रामटेके, मिंल‍िद रामटेके, सारनाथ रामटेके व मिकी रामटेके या नागपूरकर कलावंतांच्‍या यात भूमिका आहेत. चित्रपटाचा विषय एवढा नाजूक असूनही कलाकारांनी साथ दिल्‍यामुळेच ही अप्रतिम कलाकृती निर्माण झाली, असे ते म्हणाले.
………
आज “फिरस्त्या” होणार प्रदर्शित –
नागपूर शहराचे आयकर सहआयुक्‍त विठ्ठल भोसले यांचा ‘फिरस्‍त्‍या’ हा चित्रपटदेखील उद्या १९ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे.फिरस्‍त्‍या ही सत्‍य घटनेवर आधारित प्रेरणादायी कथा असून एका गावातल्‍या गरीब घरचा मुलगा शिक्षणासाठी किती फिरतो आणि शेवटी मोठा अधिकारी बनतो, हे यात दर्शविण्‍यात आले आहे. विठ्ठल भोसले यांची पटकथा व दिग्‍दर्शन असलेल्‍या या चित्रपटात समीर परांजपे, हरिश बारस्‍कर, मयुरी कापडाने, अंजली जोगळेकर, अदनेश मुडशिंगकर, श्रावणी अभंग व समर्थ जाधव यांच्‍या भूमिका आहेत. विठ्ठल भोसले हे मूळचे सोलापूर जिल्‍ह्यातील वानगी गावचे असून त्‍यांचे वडील शेतमजूर हेाते. सध्‍या ते नागपुरात आयकर सहआयुक्‍त म्हणून कार्यरत आहेत. ‘फिरस्‍त्‍या’ ची कथा त्‍यांच्‍याच जीवनावर आधारित आहे.
……..
आजचे चित्रपट –
रव‍िवार, १९ डिसेंबर
सकाळी १० वाजता – सिस्‍टर्स (नॉर्वे), दिग्‍दर्शक – सिलजे सालोमोन्‍सेन
दुपारी १२ वाजता – कॉट (भारत), दिग्‍दर्शक – इ. व्‍ही. गणेशबाबू
दुपारी ३ वाजता – फिरस्‍त्‍या (भारत), दिग्‍दर्शक – विठ्ठल भोसले, नागपूर
सायंकाळी ५.३० वाजता – टुवर्डस द बॅटल (फ्रांस), दिग्‍दर्शक – ऑरेलिन व्‍हर्नेस

Latest बातम्या