

शासनाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशीची मागणी
मनपा बर्खास्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र
नागपूर,ता. १७ डिसेंबर २०२१: उपराजधानीच्या महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये ६७ लाखांच्या स्टेशनरी साहित्याचा घोटाळा उघडकीस आला असून यामध्ये मनपाद्वारे संबंधित पुरवठाधारक कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.तसेच मनपा आयुक्तांनी लेखा अधिका-यासह संबंधीत इतर अधिका-यांना नोटीसी दिलेल्या आहे.तसेच मनपातील अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्त व अधिका-यांची चौकशी समिती नेमली आहे.
मात्र हा घोटाळा फक्त ६७ लाखांचा नसून जवळपास शंभर कोटींचा असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.मागील कालावधीमध्ये नागपूर मनपामध्ये याच प्रकारे क्रीडा साहित्य घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले होते.या प्रकरणावर चौकशीकरिता नंदलाल समितीची नियुक्ती करण्यात आली होती तथा चौकशी अंती नगरसेवकांसह अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते
त्याच प्रकारे सदर स्टेशनरी घोटाळा हा एकाच आरोग्य विभागातील लाखोंचा अपहार नसून मनपातील विविध विभागांसह शहरातील मनपाचे सर्व झोन कार्यालयातील स्टेशनरी पुरवठ्यांची देखील चौकशी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. हा घोटाळा जवळपास शंभर कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आ.विकास ठाकरे यांनी वर्तवली आहे.
मनपा प्रशासनावर सत्ताधारी व मनपा आयुक्तांचा प्रशासकीय वचक राहीला नसल्याने मनपातील प्रशासन हे निर्धास्त झाले आहे, परिणामी शासनाने उच्चस्तरीय चौकशी समितीची नेमणूक करुन या प्रकरणाची चौकशी करावी तसेच मनपा बरखास्त करण्याची कारवाई करावी अशी मागणी आ.ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली.




आमचे चॅनल subscribe करा
