

आमदाराची जाहीरात एजंसी:अंबाझरी पोलिसांची कारवाई गुलदस्त्यात: मनपा आयुक्तांचीही चुप्पी!
राजकीय नेते,शासकीय अधिकारीच नागपूरची करतात आहेत ‘दिल्ली’
नागपूर,ता. ४ डिसेंबर: नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता हॉस्पीटल परिसरातील वृक्षांच्या फांद्या कापणाऱ्या रामदासपेठ येथील क्रिम्स हॉस्पीटलविरोधात आज शनिवारी मनपातर्फे सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आली.
क्रिम्स हॉस्पीटल परिसरातील वृक्षांच्या फांद्या कापण्यात आल्याचे प्रकरण लक्षात येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आणि धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांना तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उद्यान निरीक्षक अनंत नागमोते यांनी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, पोलिस प्रशासनाद्वारे तक्रारीवरून एफआयआर नोंदविण्यात आली.

हॉस्पिटल परिसरातील गुलमोहर, बादाम आणि कडूलिंबाच्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या असून यासंबंधी मनपाची परवानगी घेण्यात आली नसल्याची बाब पुढे येताच, त्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हॉस्पीटलविरोधात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले.
मात्र याच नागपूरात ऑक्टोबर महिन्यात जाहिरातीचे होर्डींग दिसावे यासाठी रविनगर येथील एक डौलदार वटवृक्षच रात्रीच्या अंधारात भुईसपाट करण्यात आला. यावर शहरातील पर्यावरणवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत रितसर तक्रार नोंदवताच, रविनगरसह नागपूरातील इतर तीन भागातील वृक्ष, या जाहीरात एजंसीने विना परवानगी घेता कापले असल्याचे निर्दशनास आले. या एजंसीचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया जाहीरात विभागाने हाती घेतली होती तसेच संबंधितांवर गुन्हा नोदंवण्याची तयारी अंबाझरी पोलिस ठाण्याकडून सुरु असल्याचे मनपा आयुक्तांनीच माध्यमांनाही सांगितले होते.
मनपा आयुक्तांनी जेवढ्या तातडीने क्रिम्स हॉस्पीटलवर कारवाईचे आदेश दिले तसाच पाठपुरावा रविनगर येथील तसेच शहरात दररोज बेकायदेशीरपणे जी शेकडो वृक्षे कापली जातात त्याचा देखील पाठपुरावा करतील का? मनपा आयुक्त त्या विरोधात देखील कठोर पाऊले उचलतील का?असा प्रश्न आता पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत.
रविनगरसह,अमरावती मार्ग,शताब्दी चौक,लक्ष्मीनगर येथील वृक्षतोडीच्या विरोधात केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले?रविनगर वृक्षतोडीच्या प्रकरणात तर पोलिसांनी तेथील पेंटच्या दूकानदारावरच कारवाई केल्याची माहिती आहे मात्र या दूकानदाराने ,इतकी वर्ष मी हे झाड तोडले नाही तर आता तरी का तोडणार?असा युक्तीवाद केला,हे होर्डींग लावणारी एजंसी एका आमदाराची असल्यानेच ‘चोर सोडून सन्यासाला फाशी’दिली जात असल्याचा संताप त्याने व्यक्त केला.
शहरातील एका आमदाराचीच जाहिरात एजंसी असल्याने पोलिस देखील पर्यावरणवाद्यांनी केलेल्या तक्रारीची थातूरमातूर चौकशी करुन प्रकरण गुलदस्त्यात ठेवण्यात रस दाखवतात.

(छायाचित्र: ऑक्टोबर २०२१ मध्ये रविनगर चौकातील,माणसला सावली,प्राणवायू व पक्ष्यांना आश्रय देणारा डौलदार वृक्ष फक्त जाहीरातीचे होर्डींग दिसण्यासाठी एका रात्रीत असा भुईसपाट झाला होता!)
झाडच काय झाडाची फांदी जरी तोडायची असेल तर त्यासाठी महाराष्ट्र अर्बन ट्री फेलिंग ॲक्ट १९७५ अंतर्गत महापालिकेची किवा इतर नियोजन प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे.कुणी याचे उल्लंघन करत असेल तर कायद्यानुसार १ लाख रुपयांपर्यंत दंड ही आकारला जाऊ शकतो.सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.
मनपा आयुक्तांनी आज क्रिम्स रुग्णलयाविरुद्ध कठोर कारवाई केली याचे शहरातील पर्यावरणप्रेमी कौतूकच करीत आहेत मात्र आयुक्तांकडून माननीय आमदाराच्या त्या जाहीरात एजंसीवर देखील लगाम लावण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
भाजप नेत्याचा दुटप्पीपणा आणि पर्यावरण-
एकीकडे पश्चिम घाट क्षेत्रातील पूरस्थिती ही दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असून ही घसरण थांबवण्यासाठी नागरिकांनीच ‘लोकप्रतिधींवर’पुरेसा दबाव निर्माण करण्याची अपेक्षा देशातील सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ व्यक्त करतात,गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ‘वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल’ने एक विस्तृत अहवाल पश्चिम घाटांच्या संदर्भात २०११ मध्येच केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाला सादर केला होता.
मात्र निसर्गाचा -हास केरळमध्ये सुरुच अाहे.केरळमध्ये सातत्याने महापूर व दरडी कोसळून सतत जिविताची हानी होत आहे.विशेष म्हणजे संघपरिवाराच्या केरळमधील काही संघटना तसेच भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर हे २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी गाडगीळ यांच्या अहवालासाठी पराकोटीचे आग्रही होते मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना या अहवालाचे ‘सोयीस्कर’विस्मरण झाले,त्यांनी गाडगीळ यांच्या ई-मेल्सला देखील उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही!
गाडगीळ म्हणतात तसे नागरिकांनीच पर्यावरण -हास थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींवर पुरेसा दबाव निर्माण करण्यासाठी, नागपूरकर नागरिकांनी देखील आता शहरातील पर्यावरण रक्षणासाठी जाहिरात एजंसीधारक या आमदारालाच घरी बसवणे गरजेचे नाही का?असा प्रश्न आता पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत.

नागपूरात एकीकडे सीताबर्डी येथील तथाकथित एका २०८ वर्ष जुने झाड तोडण्यासंबधीचा वाद दररोज चर्चिला जात आहे.हे झाड अतिशय जीर्ण अश्या जागेवर असून ते एका वयोवृद्ध अश्या ८० वर्षीय खाजगी मालकाच्या जागेवर आहे. २०१७ मध्येच या जागेचे मालक पुरोहित यांनी मनपाकडे हे झाड तोडण्याची परवानगी मागितली होती मात्र मनपाचा उद्यान विभाग हा उदासीन राहीला.हा संपूर्ण वाद उद् भवण्यास तेथील त्यांच्या दोन भाडेकरु यांचाच स्वार्थ असल्याचा काही पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे.
(छायाचित्र: सीताबर्डी येथील पुरोहित यांच्या खासगी जागेवरील हेच ते शेकडो वर्ष जुने असण्याचा दावा असलेले झाड)
नागपूरची करणार दिल्ली!-
काही राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिका-यांची अभद्र युतीच एक दिवस ’हिरवे शहर सुंदर शहर’ख्याती असणा-या नागपूर शहराचे प्रदुषणाच्या बाबतीत ’दिल्ली’ करणार असल्याचे बोलले जात आहे.आज दिल्लीत दर तीन मागे एका बालकाला अस्थमा किवा गंभीर श्वसन विकार आहे.दिल्लीत फक्त प्रदुषणाने २५ लाख लोकांचा दर वर्षी मृत्यू होतो आणि ही संख्या वर्षागणिक वाढत चालली आहे.दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान केवळ प्रदुषणामुळे किमान साडेनऊ वर्षांनी घटल्याचे पर्यावरण अभ्यासकांची आकडेवारी आहे.
ग्रीनपिस संस्थेनुसार २०२० मध्ये भारतात कडक लॉकडाऊन होता तरीही लाखो लोकांनी प्रदुषणाने प्राण गमावले.जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार जगातील सर्वाधिक ३० प्रदुषित शहरे एकट्या भारतात आहेत.दिल्लीसह या सा-या शहरात २.५ इतक्या अतिसूक्ष्म विषारी वायूकणांचे(पीएम)प्रमाण व त्यांची घनता अतिशय वाढलेली आहे.
नागपूर शहर हे देखील ‘शाश्वत’ विकासाच्या अभावी आता त्याच वाटेवर जात असल्याचे शहरातील पर्यावरण संस्थांचे मत आहे.
अजनी इंटर मॉडलसाठी अजनी येथील ४९६ एकर जागेमधील जवळपास दहा हजार वृक्षांची कत्तल होणार असल्याने हा मुद्दा आता न्यायालयात पोहोचला आहे.‘शाश्वत विकासा’ची संकल्पना राबवित जगातील अनेक देशांनी, पर्यावरणाचे रक्षण करीत विकास साधला आहे मात्र नागपूरात दररोज कुठे ना कुठे शेकडे झाडांची कत्तल होत असून एक दिवस नागपूरची देखील प्रदुषणाच्या बाबतीत ‘दिल्ली’होणार,असा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे.
फूटाळा ,अंबाझरी ,शुक्रवारी ,सक्करदरा तलाव,सोनेगाव,नाईक तलाव इत्यादी नागपूर शहराला लाभलेल्या नैसर्गिक देणग्यांची ‘राजकीय’ तसेच ‘सरकारी ’अनास्थेने आधीच बळी घेतला आहे,या ठिकाणी झालेले अतिक्रमण,बांधकामे,चेंबर,गडर लाईन्स इ.मुळे आधीच निसर्गसृष्टिचा जीव गुदमरला आहे वरुन दरराेज अनेक पक्ष्यांचे अधिवास असणारी व मानवाला जगण्याचा श्वास पुरवणारी वृक्षे ही सर्रास तोडली जात असल्याने ,मनपा आयुक्तांचे लक्ष हे फक्त क्रिम्स पुरतेच मर्यादित न राहता फक्त त्यांच्या उद्यान विभागातील ‘पारदर्शक’ कारभारावर जरी राहीला तरी हजारो माणसे,पशु-पक्षी आणि वृक्षे त्यांना दूआ देतील,असा टोला पर्यावरणप्रेमी हाणतात.




आमचे चॅनल subscribe करा
