फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमअखेर आंबेडकरी कन्येची मृत्यूशी झूंज संपली.....

अखेर आंबेडकरी कन्येची मृत्यूशी झूंज संपली…..

Advertisements

अवघी सत्तावीस वर्षीय करिश्‍मा तामगाडगे काळाच्या पडद्याआड

एम्समध्ये घेतला शेवटचा श्‍वास

नागपूर,ता. ७ नोव्हेंबर: गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एका नवपरिणीतेसोबत सासरी अघटितच घडले,२० लाखांच्या हूंड्याच्या लोभापायी संगणक अभियंता असणा-या करिश्‍मा गायकवाड-तामगाडगे हिचे सासरे निवृत्त प्राध्यापक भीमराव तामगाडगे यांनी तिला चौथ्या मजलावरील स्वयंपाक खोलीच्या गॅलरीतून खाली ढकलले,परिणामी तिचे कमरेचे माकडहाड कायमचे मोडले आणि ती कायमची जायबंद झाली,गेल्या ११ महिन्यांपासून ती अंथरुणावरच खिळली असून तिला बेडसोर्स झाले,मूत्रपिंडामध्ये जबरदस्त इंफेक्शन झालं,तिच्या आईने कल्पना गायकवाड यांनी नागपूर शहरातील प्रसिद्ध अश्‍या केअर तसेच आयुष रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च करुन तिला बरे करण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र पाच दिवसांपूर्वी तिची प्रकृती पूर्णपणे ढासळली आणि आज सकाळी साढे अकरा वाजताच्या दरम्यान तिने अखेरचा श्‍वास घेतला,गेल्या ११ महिन्यांपासून सुरु असलेली तिची मृत्यूशी झूंज संपली.

आता मृत्यूनंतर तरी तिला न्याय मिळेल का?असा आक्रोश करिश्‍मा हिची आई व्यक्त करत आहे.अवघ्या २६ वर्षीय करिश्‍माचे लग्न तिच्या आईने गेल्या वर्षी मोठ्या थाटात सोफ्टवेअर अभियंता असणा-या साकेत तामगाडके याच्यासोबत लावून दिला.करिश्‍माला ती तीन वर्षाची असताना पासूनच वडील नव्हते. बापाच्या प्रेमाला लहानपणापासूनच पोरखी झालेल्या करिष्माचे आईनेच स्थळ शोधून साढे चार लाखांचा खर्च करुन मोठ्या थाटात तिचे लग्न लाऊन दिले,लग्नाला फक्त तीनच महिने झाले होते आणि एवढं भयंकर क्रोर्य तिच्यासोबत घडलं.

साकेत याने तिला लग्नानंतर पुण्याला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला, माझ्या आई-वडीलांना सून हवी होती म्हणून लग्न केलं,तुला मी पुण्याला सोबत नेणार नाही,असं सांगून तो पुण्याला निघून गेला.करिश्‍मा ही नव-यासाठी आपल्या खोलीत रडत बसायची मात्र तिने आपल्या आईला आपल्या दू:खांची जाणीवच होऊ दिली नाही.आपल्या आईने वडीलांच्या पश्‍चात जी हालअपेष्टा सहन करुन आपल्याला व धाकट्या बहीणीला मोठे केले,शिकवले,आपल्या पायावर उभे केले,त्या आईला आणखी दू:खं होऊ नये म्हणून करिश्‍मा हिने चार भिंतीच्या आत दू:खांचा हूंदका आतच दाबला.

मात्र स्वत: प्राध्यापक असून देखील भीमराव तामगाडगे याने माणूसकीलाच काळीमा फासणारे क्रोर्य केले,हुंड्यासाठी करिश्‍माची सासू ललिता तामगाडगे,नणद प्राची राहूल वासनिक व नणदोई राहूल वासनिक यांनी छळ सुरु केला असल्याची नोंद या घटनेनंतर,हूडकेश्‍वर पोलिसांना दिलेल्या करिश्‍माच्या एफआयआरमध्ये  आहे.

सासरे भीमराव तामगाडके यांनी तिला मानेवाडा रोडवरील वैरागडे हॉस्पीटलमध्ये भर्ती केले व फरार झाले.हूडकेश्‍वर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या चार्टशीटमध्ये मात्र करिश्‍मा हिने स्वत: उडी घेतली असल्याचे नमूद करीत या घटनेचा साक्षीदार असल्याचे न्यायालयाला सांगितले,परिणामी चारही आरोपींना न्यायालयातून जामीन मिळाला.

हे पण वाचा…..

गणतंत्र दिवस…आंबेडकरी कन्या आणि…क्रोर्याची परिसीमा!

तामगाडके कुटुंबियांनीच पोलिसांना साक्षीदार असल्याची खोटी नोंद करण्यासाठी पैसे दिले असल्याचा गंभीर आरोप कल्पना गायकवाड यांनी केला आहे.यानंतर एक प्रदीर्घ लढाई करिश्‍मा हिच्या आईची या भ्रष्ट व्यवस्थेशी सुरु झाली.एकीकडे करिश्‍मावर उपचारासाठी लोकांकडे मदत मागितली,दूसरीकडे अंथरुणावर खिळलेल्या करिश्‍माला कुलूपात बंद करुन धाकट्या मुलीसोबत कोर्टात तारखेवर जाऊ लागल्या.

जवळपास २३ लाखांचा खर्च त्यांनी करिश्‍माच्या उपचारावर केला.नातेवाईक,शेजारी,वस्तीतील लोकांनी वेळोवेळी त्यांना सढळ हाताने आर्थिक मदत केली,बेडसोर्समुळे करिश्‍माच्या पाठीला खूप मोठे छिद्र झाले त्याची देखील शस्त्रक्रिया केअरमध्ये करण्यात आली.करिश्‍मा गेल्या ११ महिन्यांपासून कॅथेटरवर होती,मूत्रविसर्जनासाठी सतत नळी लागून असल्याने देखील हळूहळू इतर भागात संसर्ग पसरु लागला.असहनीय वेदनेने करिश्‍मा ही विव्हळत होती.जेव्हा जेव्हा करिश्‍माला घरुन ॲम्बूलेंसमधून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत होते,ती वेदनेने ओरडत होती.

एम्समध्ये पाच दिवसांपूर्वीपर्यंत ती सतत आईला म्हणत होती ‘ममी ॲम्बूलेंस मागव ना…मला घरी घेऊन जा’रात्रभर ‘ममी ममी’म्हणून विव्हळत असणा-या करिश्‍माचा आवाज पहाट होता होता कायमचा बंद झाला आणि ती कोमामध्ये गेली…!

सत्ताधीश’ने शुक्रवार दि.५ नोव्हेंबर रोजी एम्सला जाऊन तिच्या प्रकृतीची चौकशी केली असता ती गुढ अश्‍या अनंताच्या प्रवासाला निघाली असल्याचे कळले.आई कल्पना या, ती शुद्धीवर नसताना देखील तिच्या चेह-याला लोशन,पावडर लाऊन देत होती,तिचे केस विंचरुन ठेवत होती….!त्यांची करिश्‍मा ही शेवटच्या श्‍वासापर्यंत सुंदरच दिसत होती…..!

सत्ताधीश’कडे व्यक्त होताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना अनेकवेळा निवेदन देऊनसुद्धा आर्थिक मदत मिळालीच नाही,त्यांच्या मदतीच्या निकषात करिश्‍माची वेदना बसलीच नसल्याची हताशा त्यांनी व्यक्त केली.कितीवेळा कागदपत्रे,रुग्णालयांचे बिल त्यांच्या दोन्ही स्वीय सहायकांना नेऊन दिले,या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून पाठपुरावा केला मात्र मला गडकरी यांच्याकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.ह्दयाची शस्त्रक्रिया करायला ते अनेकांना मदत करतात ,माझी करिश्‍मा तर फक्त २७ वर्षांचीच आहे,तिला जगवण्यासाठी कोणीच माझी मदत केली नसल्याची हताशा या आईने व्यक्त केली..मी लोकांकडून कसे पैसे मागितले,करिश्‍माचे कॅथेटर दर पंधरा दिवसांनी बदलावे लागत होते,साधे कॉटन आणण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे रहात नव्हते,तिला ॲण्टिबाॅयटिक द्यावे लागत होते,औषधांची बिले मी थकीत ठेवत होती पण करिश्‍माला कधीही काहीही कमी पडू दिले नाही,ऋतूस्त्राव होत असल्याने तिला डायपर घालून ठेवावे लागत होते.

या जगात ज्यांच्याकडे पैसा,त्यांनाच चांगल्यात चांगले उपचार मिळवण्याचा हक्क आहे,अगदी मंत्री-संत्री आपला कर्करोग ही विदेशात बरा करुन शंभर वर्ष जगत आहेत पण माझ्या करिश्‍माला जगण्याचा अधिकार नाही कारण माझ्याकडे आता तिच्या चांगल्यात चांगल्या उपचारासाठी पैसा नाही,असे सांगून कल्पना या कोलमडून पडल्या.महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे १ मार्च रोजी निवेदन दिले असता त्यांनी लगेच दुस-याच दिवशी ५० हजार रुपयांची मदत आयुष रुग्णालयात पाठवली होती,त्यातून लाखो रुपयांच्या बिलामधून मला ते पैसे भरुन थोडे ओझे कमी करता आल्याचे कल्पना सांगतात.

इतर कोणत्याही आमदारांकडे मदत मागायला गेलेच नाही,गडकरी हे अनेकांच्या दू:खाचे तारणहार असल्याचे सांगितल्या जातं,त्यामुळे फक्त त्यांच्याचकडे मदत मागितली होती मात्र एका आंबेडकरी कन्येचे दू:खं,वेदना त्यांच्या मदतीच्या निकषात बसलीच नाही. शहरातील तीस लाखांच्या लोकसंख्येत घरोघरी दु:खं आहेत हे मलाही माहिती आहे पण माझी करिश्‍मा फक्त २७ वर्षांची आहे हो,तिने तर आयुष्याला अजून सुरवात ही केली नाही….ती जगलीच पाहिजे…सगळे सुखं उपभोगण्याचा तिलाही हक्क नाही का…!औषधांची किंमत थोडी कमी करुन देऊ,हूडकेश्‍वर पोलिसांना योग्य तपास करण्यासाठी साहेब सांगतील,असे आश्‍वासन गडकरी यांच्या स्वीय सहायकांनी दिले होते मात्र कोणी काहीही केलं नसल्याचा आक्रोश कल्पना यांनी व्यक्त केला.

नियतीनेच जणू अखेर करिश्‍मा आणि कल्पना यांची या जगण्या-मरण्याच्या हतबलतेतून आज सुटका केली,उद्या सोमवारी करिश्‍मा हिच्या पार्थिवाचे शवविच्छेदन होणार असल्याने अद्याप एम्समधून तिचे पार्थिव प्लाट क्र.३५,मेहर कॉलनी,मेहर किरण अपार्टमेंट,पंचदीप नगर,वर्धा रोड येथील तिच्या घरी नेण्यात आले नाही,उद्या सोमवारी पोलिसांतर्फे शवविच्छेनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिचे पार्थिव घरी आणण्यात येईल.

आता तरी हूडकेश्‍वर पोलिस हे करिश्‍मा हिने घटनेच्या दोन दिवसांनंतर २५ डिसेंबर २०२० रोजी रोजी पोलिसांना दिलेल्या जबानीत चारही आरोपींवर हत्येचे ३०२ कलम दाखल करणार आहेत का?कि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची ३०६-३०७ कलम दाखल करुन करिश्‍माच्या मृत्यूला जवाबदार असणा-या आरोपींना सुटण्याचा मार्ग मोकळा करुन देणार आहेत?असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या