फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमऐसा भी होता है....

ऐसा भी होता है….

Advertisements

(रविवार-विशेष)

हूडेकश्‍वर पोलिस दाखल करतात महिलांच्या विरोधात ३२४:डीसीपी करतात कलम रद्द!

संपत्तीच्या वादात फिर्यादीच झाले आरोपी:बिल्डरने हडपला ७०० चौरस फूटाचा मोक्याचा प्लाट

कैकाडे भांवडे कुटुंबियांसोबत दोन खोल्यांमध्ये बंदिस्त

नागपूर,ता. ३ ऑक्टोबर: असं म्हणतात शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये,पोलिस ठाण्याची तर मुळीच चढू नये मात्र काही फिर्यादी एवढे कमनशीबी असतात की त्यांनी जरी पोलिस ठाण्याची पायरी नाही चढली तरी पोलिसच त्यांच्या घरी हजेरी लावताना दिसतात. त्यांच्यावर,त्यांच्या घरातील महिलांवर ३२४ ची कलम दाखल करतात,सायंकाळी सुर्यास्तानंतर पोलिस वाहनात बसवून पोलिस जिमखान्यात घेऊन जातात,पुन्हा रात्री पावणे नऊ वाजता परत घरी सोडून देतात,धमकावतात,लाच ही मागतात तेव्हा…त्या घरातला तरुण कुटुंबप्रमुख हताश होऊन सांगतो ‘मनात येतं संपूर्ण मुलाबाळांसह भर रस्त्यात स्वत:ला जाळून घेऊन प्रकरणच कायमचं संपवून देऊ’तेव्हा….या समाजातील गुंड प्रवृत्तीची माणसे,खाकी वर्दीतील काही भ्रष्ट माणसे कसे एखाद्या सज्जन कुटुंबाच्या मागे केवळ एका मोक्याच्या जागेवरील जमीन हडपण्यासाठी सरसावतात,याची प्रचिती येते.

हा वाद आहे न्यू सुभेदार मधील भंगी सुदर्शन कॉलनी,प्लाट क्र १२८ मध्ये राहणा-या मनपातील एका स्वच्छता कर्मचारी असणा-या संजय सोहनलाल कैकाडे व समाजातील रसूख असणा-या अजय खरे व अविनाश खरे यांच्यामधील.संजय कैकाडे यांची आई या देखील २००० मध्ये मनपात स्वच्छता कर्मचारी होत्या.ऐन रस्त्यालगतच्या मोक्याच्या जागेवर कैकाडे यांचा १४०० चौ.मी.चा प्लाट आहे मात्र यातील अर्ध्या जागेवर अजय खरे याने अवैध कब्जा केला.

१९९५ मध्ये हा वाद दिवाणी न्यायालयात गेला.२०२१ पर्यंत ही या वादाचा निकाल लागला नाही.२०२० मध्ये अजय खरे याने वकीलांमार्फत कोर्टाच्या बाहेर तडजोडीचा प्रस्ताव मांडला.एवढी वर्षे कैकाडे ही दोन्ही स्वच्छता कर्मचारी असणारी भावंडे वादाचा तोडगा न निघत असल्यामुळे मानसिकरित्या थकली होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या वकीलामार्फत हा प्रस्ताव स्वीकारला.

२०१९ मध्ये या दोन्ही फिर्यादीमध्ये एकमेकांविरुद्ध हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात वादावादी,मारपीट इ.च्या कलमा लागल्या होत्या.याची देखील केस कोर्टात अद्याप सुरु आहे.खासगी नोकरीमुळेच सचिन व संतोष कैकाडे भावांना ही केस देखील मागे घ्यायची होती त्यामुळे ते तडजोडीसाठी राजी झालेत.

त्यांनी कोर्टामध्ये १४०० पैकी ७०० चौ.मी.जागा ही खरे यांना देत असल्याचे लिहून दिले व उर्वरित जागेमध्ये आपल्या घराचे बांधकाम सुरु केले.भिंत ही झाली.पिल्लर ही उभे झाले मात्र अचानक तिसरा पक्ष विलास ठाकरे हा उभा झाला.२०१९ मध्येच भंगी सुदर्शन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुनील घनश्‍याम डेलीकर यांनी उपरोक्त जागेची ठाकरे यांच्या नावाची रजिस्ट्री करुन दिली!

डेलीकर यांना कैकाडे भावांनी कोर्टाचा निकाल दाखवला यात ७०० चौ.मी.खरे व ७०० चौ.मी जागा कैकाडे यांच्यात समान वाटप करण्याचे निर्देश होते तरी देखील डेलीकर यांनी ७०० चौ.मी.जागा ही ठाकरे यांच्या नावे करुन दिली.यावर कैकाडे यांनी आक्षेप घेतला.
मात्र ठाकरे यांची पहोच हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील पोलिस आयुक्त भोसले यांच्यापर्यंत होती आणि येथूनच पोलिसांचा प्रवेश सज्जनांच्या पायरीपर्यंतच नव्हे तर घराच्या आतपर्यंत झाला!पीआय भोसले यांना कैकाडे भावांनी कोर्टाची कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न केला असता ‘मै देखता ही नही‘अश्‍या शब्दात या सज्जन भावांना त्यांनी दुत्कारुन लावले!

ठाकरे याने दबंगिरी दाखवत कैकाडे यांचे काम बंद पाडले.याच वर्षी जून महिन्यात भिंत बांधली होती,कॉलम उभे केले होते फक्त कॉलमच्या पेट्या लावायचे काम बाकी होते तेव्हा रमेश भलमे या ठेकेदाराला व तेजराम नागासे या सुपरवाईजरला काम बंद करण्यास ठाकरे याने धमकावले.

या विरोधात कैकाडे हे दोन्ही भाऊ आपापल्या पत्नीसोबत ललिता व अर्चना कैकाडे यांच्यासह ७० वर्षाच्या वर वय असणा-या सोहनलाल कैकाडे या आपल्या वडीलांसोबत हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात गेले असता पीआय भोसले यांनी ‘र्पुरे खानदान को अंदर कर दूंगा‘अशी धमकी फिर्यादींनाच दिली,त्यामुळे या कुटुंबियांची हिम्मत खचली.

ठाकरे यांनी कैकाडे कुटुंबातील महीलांना मारहाण करुन जागेवरुन हूसकावून लावले.एव्हाना ठाकरे यांनी बांधलेल्या भिंतीला लाथा घालत पाडून टाकले होते.हतबल कैकाडे कुटुंब त्याची ही दबंगशाही बघत उभे राहीले तेवढ्यात पीआय आपल्या पोलिस वाहनाने तिथे उपस्थित झाले,आल्या बरोबर त्यांचे शब्द होते ‘बोला था मैने ये दिवार जरुर टूटेगी,अब तुमको जहां जाना है वहां जाओ!’

पोलिस विभागाचे ब्रिद वाक्य आहे ‘सज्जनांचे रक्षण दूर्जनांचे निर्दालन’मात्र येथे तर सज्जनांवरच पोलिसांकरवी आपत्तीची कु-हाड कोसळली.त्यांनी आमदार माेहन मते यांच्याकडे धाव घेतली.मतेंनी त्यांना पोलिस उपायुक्त यांच्याकडे पाठवलं.पोलिस उपायुक्तांना संपूर्ण कोर्टाची कादपत्रे दाखवल्यानंतर त्यांनी भोसलेंना रिपोर्ट घ्यायला लावतो,असे आश्‍वासन दिले.भलमे या मानलेल्या मामांसोबत कैकाडे यांनी हुडकेश्‍वर पोलिस ठाणे गाठले असता ‘कोणता मामा आहे?चल गेट आऊट’म्हणून बाहेर घालवले.डीसीपींच्या आदेशाला देखील भोसलेंनी जुमानले नसल्याचे कैकाडे बंधू सांगतात.

यानंतर वकीलामार्फत कैकाडे भावांनी महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह न्यायालयात या संपूर्ण अन्यायाविरोधात केस टाकली.७०० पैकी सध्या फक्त ४०० चौ.मी.जागा कैकाडे यांच्या कब्ज्यात असून त्यावर या भावांनी दोन खोल्यां बांधल्या असून त्यात त्यांच्या मुलांसह एकूण दहा जण राहत आहेत!खरे याला लिहून दिलेल्या ७०० सोबतच ठाकरे याने कैकाडे यांची उर्वरित ३०० चौ.मी.जागेवर देखील अवैध कब्जा केला आहे व या ३०० चौ.मी.जागेवर तो कैकाडे भावांना कोणतेही बांधकाम करु देत नाही.

 

विशेष म्हणजे ठाकरे याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीस्वरुपाची असून कैकाडे भावंडे ही मुले लहान लहान असल्यामुळे व मुली अाता तरुण झाल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कारवाईला भितात.ज्या दिवशी ठाकरे याने भिंत पाडली त्या दिवशी कैकाडे भावांनी त्याचा विरोध केला होता.या भांडणात ठाकरे याच्या कडील मंडळींनी विट फेकून मारली,तीच विट कैकाडे भावाने उचलली व ठाकरे याच्या दिशेने भिरकावली,नेमकी ती ठाकरे याच्या डोक्याला खरचटून गेली व त्यातून थोडेसे रक्त निघाले.

या विरोधात कैकाडे भावांविरोधात कलम ३२६ तर त्याच्या घरातील दोन्ही महिलांविरोधात कलम ३२४ चा गुन्हा दाखल झाला.एकाच विटेने ठाकरे याचे डोके ही फूटले,कंबरेला ही मार लागला,पायाला ही जबर मार लागल्याची चमत्कारीक मेडीकल रिपोर्ट ही तयार झाली!ही तीच रिपोर्ट आहे जी बघून डीसीपींनी कैकाडे कुटुंबातील दोन्ही महिलांना कलम ३२४ मधून मुक्त केले व कैकाडे भावावर कलम ३२६ राहू दिले कारण ठाकरे यांच्या डोक्यातून थोडेसे रक्त निघाले हाेते.

एकीकडे हुडकेश्‍वर पोलिस दोन महिलांविरोधात ३२४ दाखल करते दूसरीकडे त्याच विभागातील डीसीपी त्यांना मेडीकलची रिपोर्ट बघून चक्क मुक्त करतात,म्हणूनच म्हणतात ‘शहाण्यांनी पोलिस ठाण्याची ही पायरी चढू नये’.विशेष म्हणजे घटना सोमवारी घडली,हुडकेश्‍वर पोलिसांनी फिर्यादींची मेडीकल बुधवारी केली!डीसीपींनी मालमत्तेची सर्व कागदपत्रे आणि मेडीकलचा अहवाल मागवला नसता तर..या दोन्ही महिला व सहा मुलांच्या आया या देखील कायद्याच्या फे-यात अडकल्या असत्या….!

ज्या दिवशी ठाकरे याने कैकाडे यांची भिंत तोडली त्या दिवशी पीआय भोसलेंनी सायंकाळी ७ वाजता अर्चना कैकाडे हिला खरे यांच्या मुलीसह पोलिस वाहनात बसवले व पोलिस जिमखान्यात घेऊन गेले.अर्चना यांनी स्वत:सोबत वयोवृद्ध ७० वर्षीय सासरे यांना घेतले होते.जिमखान्यात गेल्यावर वारंवार भोसलेंनी अर्चना यांना ‘तुझ्या नव-याला फोन करुन बोलव’म्हणून तकादा लावला मात्र तिने चक्क नकार दिला.विलास ठाकरे हा दबंग देखील जिमखान्यात उपस्थित होता.रात्री ९ पर्यंत या महिलेला पोलिस जिमखान्यातील हॉलमध्ये बसवून ठेवल्यानंतर पीआय भोसलेंनी ‘साहेबांना अर्जेंट काम आहे ते आता भेटू शकणार नाही‘असे सांगितले व अर्चनाला परत घरासमोर आणून सोडले…..!रात्रीच्या ९ वाजता!महिलांच्या अटकेबाबतीत कायद्या काय सांगतो?

दुस-या दिवशी पुन्हा कैकाडे भावांना फोन येतो ‘तुरंत ये…नही तो पुरे खानदान को उठा के लेके जाऊंगा…..’’मेरे को २५ होना’असा ही निरोप कैकाडे भावांना मिळतो…..!स्वच्छता कर्मचारी असणा-या दोन्ही भावांना महीनाकाठी १२-१२ हजार पगार मिळतो,त्यातही १० जणांचे कुटुंब,त्यात दोन तरुण मुली तसेच इतरही पाल्य शिक्षण घेत असलेले…….!तरीही त्यांनी ‘१२’ची सोय केलीच…….!हे दोन्ही स्वच्छता कर्मचारी पहाटे ५.३० वाजता उठून उपराजधानीतील रस्ते झाडतात,ही त्यांच्या कष्टाची कमाई होती……!

ऑन रोड प्रॉपर्टी,अगदी कॉर्नरची जागा,त्यावर धनदांडगे,व्हाईट कॉलर गुंडांचा डोळा,या सर्व वादात कैकाडे भावांची मनस्थिती इतकी खराब झाली की ‘रोडवर संपूर्ण फॅमिली जाळून टाकून स्वत:मरुन जाण्याची ईच्छा होते’अशी हतबलता तो व्यक्त करतो…..!

हेच काय कमी होते की पीआय भोसलेंनी सीसीटीव्ही कॅमरे शेजारच्या इमारतीत लावायला लावले.आता कैकाडे महिला भांडी घासतात,लहानश्‍या अंगणात वावरताना सतत ठाकरे याच्या निगराणीत असतात…यासाठी एवढं जुनं व अनेक पक्ष्यांचे वास्तव्य असणारं सीताफळाचं डौलदार झाड एका रात्रीत गुपचूप त्याने आरीने कापून ही फेकले…….!

सोसायटीवाला कबूल करताेय त्याने चुकीने ठाकरे याच्या नावाची रजिस्ट्री करुन दिली,त्याने चूक सुधारण्यासाठी ठाकरे याला नोटीस देखील पाठवली,चुकीच्या प्लॉटवर त्याने सेलडीड भरुन दिला पण?त्याच्या या हेतूपूर्वक किवा अनावधानाने केलेल्या चुकीचे अतिशय वाईट परिणाम कैकाडे कुटुंबिय भोगत आहेत.

२७ सप्टेंबर रोजी पुन्हा ठाकरे याने पहाटेच २-३ माणसांना घेऊन लाेखंडी गेट बसवले.एंगल टाकून,विटा लाऊन कैकाडे यांच्या हक्काच्या ३०० चौ.मी.ची पाठीमागची जागा ही कायमची बळकावली.आम्ही भोसलेंना १० फोन लावलेत मात्र ते आले नाही…ठाकरेंच्या मात्र एका फोनवर पीआय हजर……!

मूळात ही शासकीय जागा असून झुडपी जंगलात मोडते…..यावर नासुप्रने अनुसूचित जातीच्या लोकांसाठी घरकूल वसवण्याचा नियम असताना याच जागेवर ठाकरे याचे अफाट साम्राज्य पसरले आहे…..भव्य मोबाईलचे शो-रुम दिमाखात उभे आहे,भव्य कमर्शियल कॉम्पेल्कसनी तर मनपाच्या फूटपाथची जागा ही पूर्णत:गिळंकृत केली असताना मनपाच्या अतिक्रमण विभागाला मात्र हे अनाधिकृत बांधकाम दिसतच नाही…त्यांना दिसते गरीबांची झोपडी…हातावर पोट असणा-या हॉकर्स तसेच दिव्यांगाची फूटपाथवरची दूकाने…..!
अनुसूचित जातीसाठी राखीव असणा-या जागेवर ठाकरेने जे भव्य कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवले आहे त्या विरोधात आता कैकाडे कुटुंबिय जिल्हाधिकारी विमला आर.यांच्याकडे तक्रार नोंदवणार असल्याचे सांगत आहेत.

थोडक्यात, उपराजधानीत प्रापर्टीच्या वादात कधीही स्वत:चा मुडदा पडेल या भीतीने हक्काची १४०० चौ.मी.ज़ागा असताना व न्यायालयाने त्यातील ७०० चौ.मी.जागा अधिकृतपणे त्यांच्या नावे केली असतानाही कैकाडे कुटुंबिय हे आज फक्त ४०० चौ.मी.जागेवरील दोन खोल्यांमध्ये आपलं जीवन व्यापन करण्यासाठी मजबूर आहेत,असे अनेक अनुसूचित जातीच्या शेकडो कैकाडेंना शहरातील बिल्डर लॉबीने आयुष्यातून पार उधवस्त केल्याची शेकडो उदाहरणे आहेत.

दूर्देवाने ज्यांच्यावर त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची संवैधानिक जवाबादारी आहे तो पोलिस विभाग देखील त्यांच्या रक्षणा ऐवजी गुंडंाना संरक्षण देताना ठलकपणे दिसून पडतोय.त्यामुळेच पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे कितीही सज्जन व कर्तव्य कठोर असले तरी ज्यांच्या भरवश्‍यावर पानिपतची लढाई ते लढत आहेत तेच आयुक्तांच्या विश्‍वासाचं ‘न भूतो ना भविष्यती’असे ‘पानिपत’ करताना दिसून पडतात आहेत,असेच आता म्हणावे लागेल.

(तळटिप-उपरोक्त बातमी ‘सत्ताधीश’ने ऑन द स्पॉट जाऊन संपूर्ण १४०० चौ.मी.जागेचे,त्यावरील धनदांडग्यांनी केलेल्या अतिक्रमणाचे निरीक्षण करुन,कोर्टाचा निकाल,पोलिस ठाण्यातील एफआयआर संपूर्ण कागदपत्रे बघून तसेच कैकाडे कुटुंबियांच्या सांगण्यानुसार मांडली आहे.बातमीत फक्त सत्य घटना मांडण्याचा प्रयत्न असून कोणाच्याही बदनामीचा हेतू नाही.बातमीवर आक्षेप असणा-यांची बाजू देखील ‘सत्ताधीश’प्रसिद्ध करण्यास कटीबद्ध आहे.
-संपादक)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या