

गंगा-जमुना वारांगणांचा पोलिस आयुक्तांना सवाल
नागपूर,ता. २६ ऑगस्ट:उपराजधानीतील गंगा-जमुना या वारांगणांच्या वस्तीला काल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिसूचना काढून सार्वजनिक ठिकाण घोषित केले,याचे तीव्र पडसाद वस्तीत उमटले आहे.ही वस्ती ३०० वर्ष जुनी आहे,आधी ही वस्ती वसली यानंतर येथील वारांगणांच्या व त्यांच्या पाल्यांच्या सुविधेसाठी शाळा,धर्मस्थळे वसवल्या गेली त्यामुळे पोलिस आयुक्तांची अधिसुचना ही गैरकायदेशीर असून या विरोधात न्याय मागणार असल्याचे ‘नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स इंडियाच्या’ अध्यक्ष्ा किरण देशमुख यांनी प्रसार-प्रचार माध्यमांना सांगितले.
गेल्या ३ दिवसांपासून त्या गंगा-जमुना वस्तीत तळ ठोकून बसल्या आहेत.वस्तीतील वारांगणासोबत बैठका घेत आहेत मात्र काल बुधवारी पोलिस आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेमुळे येथील वारांगणा अधिकच बिथरल्या असून आता या पुढे आम्हाला कोणाचीही जेवणाचीही मदत नको,असे सांगून ‘भूके मरेंगे..कोई भी खाना खिला खिलायेगा तो भी नही खायेंगे’अशी उद्विग्नता व्यक्त करीत आहेत.
गेल्या ११ आॅगस्ट पासून ही वस्ती चारही बाजूने सील झाल्याने येथील वारांगणा या मानसिक धक्क्यात आहेत.देशातील विविध भागातील वारांगणांच्या संघटनेचे पदाधिकारी त्यांची नागपूरात येऊन भेट घेत असून त्यांच्या लढ्याला आपला पाठींबा देत आहेत.किरण देशमुख यांनी तर पोलिस आयुक्तांनी जी कायदेशीर लढाई सुरु केली आहे त्याचे उत्तर आम्ही देखील कायद्यानेच देऊ असे सांगून आता न्यायालयातच याचा निकाल लागेल,असे सांगितले.
पोलिस आयुक्तांच्या या अधिसूचनेचे मात्र परिसरातील रहिवासी तसेच व्यापा-यांनी जोरदार स्वागत केले आहे.बुधवारी हे वृत्त इतवारी भागात पसरताच नागरिक व व्यापा-यांनी अमितेशकुमार यांचे आभार मानले.
गंगा-जमुनातील बालाजी मंदिर,चिंतेश्वर मंदिर,बाबा कमलीशाह दर्गा,दुर्गादेवी मंदिर,शारदादेवी मंदिर,राधास्वामी सत्संग,महापालिकेची चिंतेश्वर हिंदी प्राथमिक शाळा,हिंदुस्थान हायस्कूल इत्यांदी धार्मिक स्थळे व शाळांसह पोलिस चौकी,महावितरणची चिंतेश्वर शाखा इ.सार्वजनिक ठिकाणे आहेत.
या ठिकाणांपासून २०० मीटरच्या परिसरात अनैतिक देहव्यापाराला कायद्यानुसार बंदी आहे.त्यामुळे ही अधिसूचना काढण्यात आली.देहव्यापारासाठी या ठिकाणी कोणी प्रवेश केल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल,असे नमूद करुन ही अधिसूचना ६० दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे.
याबाबत आक्ष्ेप असल्यास ३० दिवसात छावणीतील पोलिस आयुक्त कार्यालयात लेखी स्वरुपात आक्ष्ेप नोंदवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
गंगा-जमुनाबद्दल तक्रारी आल्यानंतर हा परिसर सील करण्यात आल्यामुळे अनेक वारांगणांनी आधीच आपापले गांव जवळ केले मात्र अनेक वारांगणा अद्यापही ठाम निर्धार करुन ‘जीव गेला तरी हटणार नाही’ या भावनेतून अडून बसल्या आहेत.
या वारांगणांना सहेली संघ,बुधवार पेठच्या पदाधिका-यांचा देखील संपूर्ण पाठींबा प्राप्त असून आजच अमितेशकुमार यांच्या या अधिसूचनेविरोधात कायदेशीर सल्ला घेणल्यात आला असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष्ा भारती यांनी सांगितले.
गंगा-जमुनाच्या गल्लीबोळ्यातून सुरु झालेला हा वाद किवा निग्रहाची लढाई आता लवकरच न्यायालयीन पटलावर लढली जाणार असल्याचे चिन्ह उमटले आहे.उपराजधानीतील हा बाजार उठला तर हे महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमध्ये देखील घडेल अशी आशंका व्यक्त केली जात असून,असा पायंडा देशात पडू द्यायचा नसेल तर वारांगणांना ही अस्मितेची व अस्त्विाची लढाई जिंकावीच लागेल,अशी भावना या ठिकाणी उमटली आहे.
त्यामुळेच ‘आधी वस्ती की सार्वजनिक स्थळे’ याचा कागदोपत्री शोध ही सुरु झाला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
