

शंभरचा स्टॅम्प पेपर हजार रुपयात!
नागपूर,ता. २५ मे: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जुन्या तारखांच्या स्टॅम्प पेपरची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. आरोपी १०० रुपयांच्या एका स्टॅम्प पेपरची १ हजार रुपयात विक्री करताना आढळून आले. नोंदवहीची तपासणी केली असता एकाच नावाने अनेक स्टॅम्प पेपरची विक्री करण्यात आल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.
काही वेंडर्स हे जास्त किंमतीत जुन्या तारखांच्या स्टॅम्प पेपरची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती.त्याप्रमाणे सापळा रचून साेमवारी सायंकाळच्या सुमारास पंचांना साेबत घेऊन छाप टाकण्यात आला.यावेळी बिना यशवंत अडवाणी(६०)रा.उत्कर्ष वलय अपार्टमेंट,खरे टाऊन,धरमपेठ,भीमा वानखेडे(५३)रा.भिलगांव रेल्वे लाइनजवळ,आशिष शेंडे(२७) रा.सुभाषनगर व हिमांशू सहारे(२०) रा.खलासी लाईन,मोहननगर हे १ एप्रिलचा स्टॅम्प असलेला १०० रुपये दराचा पेपर १ हजार रुपयांत विकत असल्याचे दिसून आले.
स्टॅम्प पेपर वेंडर बिना अडवाणी यांच्या घराची झडती घेतली असता तब्बल ४७ जुन्या तारखेचे व खोट्या नावाने नोंद केलेले स्टॅम्प पेपर आढळून आले.सदर ठाण्यात गुन्हा नोंदवित आरोपींना अटक करण्यात आली.
एकाच नावाने अनेक स्टॅम्प पेपरची विक्री-
स्टॅम्प पेपरचा वापर प्रामुख्याने शासकीय कार्यालये,न्यायालयीन प्रक्रिया व मालमत्तेसंदर्भातील अभिलेख तयार करण्यासाठी होतो.जुन्या तारखेच्या स्टॅम्प पेपरच्या विक्रीमुळे नागरिक किंवा शासनाच्या फसवणूकीची शक्यता असते.याची पुरेपूर जाणीव असूनही आरोपी हा गुन्हा करीत होते.विशेष म्हणजे शासनातर्फे देण्यात आलेल्या नोंदवहीची तपासणी केली असता एकाच नावाने अनेक स्टॅम्प पेपरची विक्री करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले.




आमचे चॅनल subscribe करा
