

नागपूर,ता.१३ मार्च: जवळपास ६० कोटी रुपये किंमतीची शासकीय जमीन नागपूरच्या पूर्वीचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या संगनमताने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘खास’ टोळीने हडपली आणि विक्री केली , यात मुळ मालक आणि एका व्यक्तीचा खून करण्यात आला यात हनीट्रॅपचा सुद्धा उपयोग करण्यात आला होता. या टोळीने आतापर्यंत ५ खून करण्यात आणि लपविण्यात यश मिळविले असून या संपूर्ण जमिन विक्रीची सखोल चौकशी करण्याची मागणी ॲड.सतीश उके यांनी शनिवार दि. १३ मार्च रोजी पत्रकार भवन येथे आयोजित पत्र परिषदेत केली .
या जमीन घोटाळ्याबाबत मी तहसीलदार आणि उप. वि. अधिकारी नागपूर ग्रा. यांना तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारीत त्यांनी फडणवीस यांचे खास धरमदास रामाणी , मुन्ना यादव या टोळीच्या सदस्यांनी जिवंत सविता तनेजा या स्त्रीस मृत असल्याचे प्रमाणपत्र बनवून खोटा नातेवाइक उभा करून तिची सोमलवाडा येथील संपत्ती सन २००३ साली हडपली असल्याचा दावा उके यांनी केला. ती संपत्ती धरमदास रामाणीचे संगनमताने विकली होती . यात गुन्हा दाखल झाला पण मुन्ना यादवला पोलिसांनी आरोपी बनविले नाही. यात धरमदास रामाणीचा नौकर दिनेश हटवार याला चुकीच्या पद्धतीने आरोपी बनविण्यात आले असल्याचे माहिती त्यांनी दिली.
दिनेश हटवार हा जिवंत राहिला असता तर तो सुटला असता आणि मुन्ना यादव , धर्मा रामाणी व इतर हे कधी ना कधी अडचणीत आले असते त्यामुळे हटवार याला स्लो पॉयझन देवून जीवाने मारण्यात आले,असा खळबळजनक आरोप उके यांनी केला .
या हत्येचे साक्षीदार दिलीप गौडीया आणि विकास यादव हे होते, त्यांनीच ही बाब मला सांगितली होती,असे ॲड.सतीश उके यांनी सांगितले .
या टोळीने दिलीप गौडीया आणि विकास यादव यांच्याशी सबंधित जमीन मौजा : द्रुगधामणा ,ता. नागपूर (ग्रा.) ख. क्र. १०८ क्षेत्र ११.१० हे.आर. (२७-२८ एकर ) ही जमीन धर्मा रामाणीची कंपनी ,जी सविता तनेजा प्रकरणात वापरली होती, त्या धर्मा कंस्ट्रक्शन ॲण्ड हाऊसिंग फायनांस प्रा.लि. या नावाने नोंदणीकृत विक्रीपत्र करून मुळ मालकांशी धोकाधडी करून बळकाविली असल्याचा आरोप त्यांनी केला .
मी केलेल्या तक्रारीवरून दि. १५ सप्टेंबर २००३ रोजी उप. विभागीय अधिकारी नागपूर यांनी धरमदास रामाणीची शेतजमीन खरेदीची परवानगी नाकारली होती त्यामुळे रामाणी ही शेतजमीन विकत घेवू शकला नाही,असे त्यांनी सांगितले.
द्रुगधामणा ,ता. नागपूर (ग्रा.) ख. क्र. १०८ क्षेत्र ११.१० हे.आर. (२७-२८ एकर ) जमीन विकत घेतल्यावर, दि. १५ सप्टेंबर २००३ चे आदेश लपवून नायब तहसीलदार नागपूर (ग्रा) यांनी दि. १ जुलै २००३ रोजी आदेश पारीत केला व ७/१२ उतारा तयार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न मी अर्ज करून हाणून पडला असल्याचे ते म्हणाले.
या आदेशाचे दि. १.०७.२००३ रोजी नायब तहसीलदार राहाटे यांनी पुनर्विलोकन केले. त्यानंतर ही जमीन सरकारजमा व्हावयास पाहिजे होती, तसा प्रस्ताव ही पाठविण्यात आला होता , पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात खास रमाणी व टोळीने राजकीय दबाव आणून असे होऊ दिले नसल्याचा, आरोप त्यांनी केला.
यानंतर , ती जमीन अन्य मार्गाने बळकाविण्या करिता या टोळीने प्रयत्न केले,त्यात राजश्री अमरदीप कांबळे यांच्या नावावर ४१६.००.०० चौ. मीटर जमीन करण्यात आली . यावेळी ते पूर्वीचे आदेश लपविण्यात आले आणि ही शासनाच्या हक्काची जमीन विकण्यात आली. यात कोट्यावधी रुपयांचा लाभ लाटण्यात आला.
यात तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दि. १६.१०.२०१६ रोजी या जमिनीला अकृषिक परवानगी दिली . सचिन कुर्वे यांनी नागपूर महानगर पालिका , शिक्षक मतदार संघ आणि इतर निवडणुकीचे काम देवेंद्र समूहाच्या फायद्याकरिता कायद्याच्या विरोधात जाऊन केले असा गंभीर अारोप पत्र परिषदेत उके यांनी केला .
वरील द्रुगधामणाची जमीन बळकावण्यासाठी या टोळीने जमीनीचे मालक दिलीप गौडीया आणि त्याचा मित्र विकास यादव याचा खून घडवून आणला . यात हनीट्रॅपचा सुद्धा उपयोग करण्यात आला .
या संपूर्ण प्रकरणात पोलिस ख-या आरोपींपर्यंत राजकीय दबावात पोहोचले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
अश्याच पद्धतीने सोनेगाव येथील बलत्कार आणि मृत्यू प्रकरण आणि त्या ठिकाणी नवीन मृतदेह प्रकरण पोलिसांनी फडणवीस यांच्या खास टोळीला वाचविण्यासाठी राजकीय दबावात दाबले,असा खळबळजनक अारोप करीत
५ खून व जमीनींचा हा संपूर्ण घोटाळा शासनाच्या आदेशांच्या विरोधात करण्यात आले. हा जवळपास ६० कोटीचा घोटाळा आहे . या संपूर्ण प्रकरणाची लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही तक्रार करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
(अस्वीकरण: वरील बातमीत आलेली संबंधितांची नावे ही पत्र परिषदेच्या अनुषंगाने ॲड.सतीश उके यांनी घेतलेली आहे.‘सत्ताधीश’चा उद्देश्य हा कोणाचीही बदनामी करण्याचा नसून वाचकांना फक्त माहिती पुरविणे हा आहे.बातमीत उल्लेखीत संबंधितांनी त्यांची कोणतीही बाजू असल्याच ‘सत्ताधीश’ला संपर्क साधावा,‘सत्ताधीश’त्यांची बाजू देखील प्रसिद्ध करेल)




आमचे चॅनल subscribe करा
