

न्यायदंडाधिकारी हिंगणा नागपूर यांनी दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश
नागपूर,ता. २ जानेवरी: नागपूर – भंडारा भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने एका फौजदारी प्रकरणात दोषारोप तयार करण्यासाठी तसेच अभियोगपूर्व परवानगी मिळविण्यासाठी १०० रुपयांच्या बनावट स्टँम्प पेपरचा उपयोग केला.विशेष म्हणजे भंडारा जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा या बनावट स्टँम्प पेपरचा उपयोग करण्यात आला. अर्जदार एकनाथ दत्तात्रय कातकडे , वय ३२ वर्षे , व्यवसाय – नौकरी , भंडारा यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिंगणा , नागपूर येथे फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १५६(३) अन्वये अर्ज सादर केला होता , त्यात अनेक गंभीर मुद्दे आणि घटना नमूद करीत न्यायालयास संभाव्य आरोपींच्या विरोधात पोलीस स्टेशन अधिकारी हिंगणा यांनी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश जारी करण्यास न्यायालयाला विनंती केली होती. या अर्जावर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिंगणा श्री.एन.के. मेश्राम यांच्या समक्ष ॲड. सतीश उके व ॲड. वैभव जगताप यांनी अर्जदाराच्या वतीने युक्तिवाद केला.न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या आदेशात नमूद दोघांच्या विरुद्ध भा. दं. वी. चे कलम ४६७, ४६८, ४७१ सह कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे तसेच तपासातील गुन्ह्यात वापरलेला स्टँम्प पेपर बनावट आढळल्यास तपास अधिकारी, कलमे वाढवू किंवा कमी करू शकतात ही मोकळीक देत आदेश जारी केले. तक्रारीत अनेकांच्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
अर्जदाराचा भाऊ नवनाथ कातकडे हे २०१९ साली तहसील मोहाडी , भंडारा येथे नायब तहसीलदार या पदावर कार्यरत होते आणि अर्जदार तेथेच कनिष्ठ लिपिक म्हणून असतांना तेथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या एका अधिका-याला त्यांच्याकडून मासिक हफ्ता हवा होता . या अधिका-याने अनेक लोकांकडून निरोप पाठवूनही अर्जदाराचा भाऊ नवनाथ हे त्यांच्याकडे गेले नाहीत व कोणताही मासिक हफ्ताही दिला नाही. याचा राग त्या अधिका-याच्या मनात होता. नरेश माणिकराव ईश्वरकर ,वय ३८ हा भंडारा परिसरात अवैध रेती आणि गौण खनिज व्यवसाय करीत होता. त्याच्या या अवैध कामात मदत करणा-या लोकांशी या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अधिका-याचे सलोख्याचे सबंध होते, ही माहिती अर्जदाराला ही होती.
दि. ३ मार्च २०१९ च्या रात्री अंदाजे १० वा. अर्जदाराचा भाऊ नवनाथ यांना अवैध गौण खनिज याची चोरी होत असल्याची माहिती मिळाली , रात्रीची वेळ असल्याने तहसीलदार नवनाथ यांनी अर्जदारास सोबत चलण्यास म्हटले. रात्री एक जे सी बी नोंदणी क्र. एम एच ४० बी. एफ. ३२९९ त्या ठिकाणी अवैध उत्खनन करताना नायब तहसीलदारांना आढळले. त्यावर नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी तो जे सी बी पोलीस स्टेशन मोहाडी येथे जमा करण्याची कारवाई केली त्यावेळी रात्रीचे १२.०० वाजले होते .
या जे सी बी च्या संदर्भात नरेश ईश्वरकर हा दि. ५.०३.२०१९ रोजी तहसील कार्यालय मोहाडी येथे अर्जदाराकडे आला आणी जे सी बी बाबत बोलू लागला,मात्र अर्जदाराने नरेश ईश्वरकर याला हे कामकाज त्याचे नाही असे सांगून संबधित बाबू आणि तहसीलदार साहेब यांच्याशी भेटण्यास म्हटले. तरी नरेश ईश्वरकर जाणून बुझून अर्जदाराशी वारंवार जे.सी.बी बाबत बोलत राहिला . ती जे सी बी , हिंगणा नागपूर येथील योगीराज पराते यांच्या मालकीची होती तसेच कोणीही ती जे सी बी सोडविण्याकरिता तहसील कार्यालय मोहाडी येथे अर्ज ही केला नाही.
तरीही नरेश ईश्वरकर याने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या भंडारा येथील कार्यालयात खोटी तक्रार दि. ४ मार्च २०१९ रोजी अर्जदाराचा भाऊ नायब तहसीलदार नवनाथ कातकडे,अर्जदार व अन्य एका बाबूच्या विरोधात दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची ही तक्रार होती. या तक्रारीच्या पडताळणीत भंडारा भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या संबधित अधिकारी यांनी, नरेश ईश्वरकर याने तहसील कार्यालय मोहाडी येथे तो जे सी बी सोडविण्याकरिता काही अर्ज केला आहे का? तो जे सी बी सोडविण्याकरिता नरेश ईश्वरकर याला काही हक्क-अधिकार आहे का? याबाबत काही कागदपत्रे अस्तित्वात आहेत का? याबाबत कोणतीही चौकशी न करता अर्जदार व त्यांच्या नायब तहसीलदार भावाच्या विरोधात सापळा लावला. परंतु नरेश ईश्वरकर याची तक्रार खोटी असल्याने हा सापळा सफल झाला नाही. नरेश ईश्वरकर याने दि. १३.०३.२०१९ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, भंडाराला केलेली तक्रार परत घेतली व जमा केलेली लाच रक्कम ही परत घेतली.
दि. १६ मार्च २०१९ रोजी नरेश ईश्वरकर याच्यावर पोलीस स्टेशन मोहाडी, भंडारा येथे रेती चोरी प्रकरणात आणि सरकारी अधिकारी यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कार चढवणे या आरोपात रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात अर्जदाराचे भाऊ नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांचा हाथ आहे असे समजून सूड घेण्याच्या उद्देशाने नरेश ईश्वरकर याने भंडारा भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या संबधित अधिकारी यांच्या सोबत मिळून दि. २२ एप्रिल २०१९ रोजी दि. ४ मार्च २०१९ ची व दि. १३ मार्च २०१९ रोजी परत घेतलेली तक्रार, अर्जदार आणि अन्य एक यांच्या विरोधात नोंदविली . या तक्रारीवर अर्जदारास आणि अन्य एक बाबू यांना अटक ही करण्यात आली
४ मार्च २०२० चा मुद्रांक दाखवला ४ मार्च २०१९ चा!
दि. ४.०३.२०१९ ची खोटी घटना खरी दाखविण्यासाठी तसेच दि. ४.०३.२०१९ रोजी नरेश ईश्वरकर याचा त्या जे. सी. बी. मशीन सोबत कागदोपत्री सबंध दाखविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय , लाचलुचपत विभाग , प्रशासकीय इमारत क्रमांक १ , सिविल लाइन्स , नागपूर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी अभियोग पूर्व परवानगी करिता पत्र जिल्हाधिकारी भंडारा यांना दि. ४ मार्च २०२० रोजी लिहित असतांना, त्यापूर्वी बनावट १००/- रुपये किंमतीचा स्टँम्प पेपर (मुद्रांक ) जुन्या तारखेत दि. ४.०३.२०१९ रोजी तयार केल्याचे दाखवून त्यावर खोटा लेख किंमतीचा दस्त तयार करून त्याचा उपयोग करण्यात आल्याचे अर्जदाराने न्यायालयाच्या लक्ष्ात आणून दिले.
यात त्यातील तपास अधिकारी , स्वाक्षरीकर्ता व त्याचा उपयोग करणारे सहभागी असल्याचे तक्रारीत नमूद केले. त्याआधारे पुढे निवासी जिलाधिकारी भंडारा, शिवदास पडोळे व जिल्हाधिकारी प्रछीप चंद्रन यांनी त्याचा उपयोग करून अभियोगपूर्व परवानगी दिली . त्याचा पुढे पोलीस उपअधीक्षक महेश चाटे व इतर यांनी याच मुद्रांकाचा उपयोग केला.
मुद्रांक विक्रेत्याने ४ मार्च २०१९ रोजी मुद्रांकाची विक्रीच केली नसल्याचे लिहून दिले-
या बनावट मुद्रांका बाबत अर्जदाराने दुय्यम निबंधक, हिंगणा यांनी संबधित मुद्रांक विक्रेता याने मुद्रांकावर असलेला ४.०३.२०१९ रोजी यादिवशी विक्री केली नाही असे दि. ८.१०.२०२० रोजी लेखी लिहून दिले आहे.
तरी अर्जात नमूद करण्यात आलेल्यांनी अर्जदारास या खोट्या प्रकरणात फसवण्या करिता हे अपराधिक षड्यंत्र रचून हे कृत्य केले आहे आणि बनावट स्टँम्प पेपर जुन्या तारखेत तयार करून, त्यावर किंमतीचा बनावट लेख लिहून सरकारी दफ्तरी पोलीस अधीक्षक कार्यालय , लाचलुचपत विभाग , प्रशासकीय इमारत क्रमांक १ , सिविल लाइन्स , नागपूर येथे वापरला, असे अर्जदाराने न्यायालयात म्हणने मांडले.
या दरम्यान पुन्हा अर्जदारास तसेच त्यांच्या भावाला त्रास देण्याकरिता त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग भंडारा येथे उघड चौकशी सुरु करण्यात आली . यात त्या चौकशी बाबत त्याच पोलीस अधिकारी यांनी अर्जदाराच्या नायब तहसीलदार भावास लाच मागितली . अर्जदाराचे भाऊ यांनी याची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार दिली असता ते सावध झाल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही . यानंतर उघड चौकशी भंडारा येथून नागपूरला बदलविण्यात आल्या.
अर्जदार तसेच त्यांच्या नायब तहसीलदार भावास जरब बसावा या करिता बनावट स्टँम्प तयार करून सरकारी दफ्तरी उपयोगात आणला गेला . अर्जदाराचे नुकसान व्हावे आणि अर्जदारास खोट्या आरोपात फसवावे याकरिता खोटा अहवाल संपूर्ण कायदे पायदळी तुडवत तयार करण्यात आला, त्यात या बनावट स्टँम्पचा उपयोग करण्यात आला. या स्टँम्पपेपरवर बनावट खोट्या किंमतीचा लेख लिहून त्याचा सरकारी दफ्तरी उपयोग करण्यात आला . याप्रमाणे फौजदारी दखलपात्र गुन्हे अपराधिक षड्यंत्र रचून करण्यात आले. यात सरकारी अधिकारी सुद्धा सहभागी आहेत, या कटात सहभागी सरकारी नोकर यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी, त्यांची नाव आरोपींच्या यादीत सहभागी करण्यासाठी, त्यांच्या संपूर्ण कृत्यांचा तपास पोलिसांकरवी करण्याची मागणी अर्जदाराने केली होती.
सध्या स्थीतीत ज्या व्यक्तीच्या नावाने स्टँम्प पेपर आहे ते योगीराज उदारामजी पराते , रा. हिंगणा आणि ज्याने त्यावर लेख लिहून तयार केला ते नरेश ईश्वरकर रा. रोहणा तह. मोहाडी जि. भंडारा आणि त्या दोघांनी केलेले कृत्य याबाबत भा. दं. वी. चे कलम २५५, २५६, २५९, २६०, १२०-ब, ४६७, ४६८, ४७१, ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करणे, गैर अर्जदार पोलीस स्टेशन हिंगणा नागपूर यांना आदेश करण्याची विनंती अर्जदाराने केली आहे .
दि. ७ डिसेंबर २०२० रोजी अर्जदाराने पोलीस स्टेशन हिंगणा , नागपूर येथे कारवाई करिता रिपोर्ट दिली असून त्यावर कारवाई बाबत ती पोलीस उपायुक्त परी. क्र. १ नागपूर यांना रिपोर्ट दिली आहे. त्याच्या हस्तप्रती सुद्धा त्यांना दि. ८.१२.२०२० रोजी सादर केल्या आहेत .
बनावट स्टँम्प पेपर जुन्या तारखेत तयार करून हिंगणा येथील मुद्रांक विक्रेता किशोर बि. ठाकरे ,प. क्र. ५ / २००४ कोड नं. ४६०८०० यांच्या पासून दि. ४/०३/२०१९ रोजी खरेदी केला असे त्यावर नमूद करण्यात आले आहे व त्याची त्यावर स्वाक्षरी आहे, त्यावर सब ट्रेजरी ऑफिसर हिंगणा असे नमूद असून स्वाक्षरी असल्याचे अर्जदाराने स्पष्ट केले.
थोडक्यात कुंपणानेच शेत खालल्याचा हा प्रकार असल्याची अशी ही संपूर्ण घटना असल्याचे अर्जदाराचे म्हणने आहे.




आमचे चॅनल subscribe करा
