फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमॲड.उके यांची पत्र परिषद आणि ‘मंत्री मिडीया'चा ‘आर्थिक’ लाभ

ॲड.उके यांची पत्र परिषद आणि ‘मंत्री मिडीया’चा ‘आर्थिक’ लाभ

Advertisements

उके यांचीच चौकशी व सूटका:मुंबईवरुन हलली सूत्रे

नागपूर,ता. ३१ जानेवारी २०२२: भारत या देशात मोदी पर्व २०१४ पासून सुरु झाले.त्या पूर्वी देशात काँग्रेस व काँग्रेसप्रणीत आघाडीचे राज्य होते.त्या वेळी देशातील प्रसार व प्रचार माध्यमांसाठी एकूण बजेटमधून फक्त ३०० कोटी रुपयांचे बजेट होते.एवढ्या पैश्‍यांमधूनही विविध वृत्तपत्रे व वाहिन्यांमध्ये सरकारी जाहीराती मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होती. देशात मोदी पर्व सुरु झाले आणि पहिल्या कालखंडात हे बजेट ३ हजार व दुस-्या कालखंडात १४ हजार कोटींपर्यंत गेले असल्याचे आकडेवारी सांगते,देशातील तज्ज्ञ सांगतात.यावरुन काँग्रेस काळातील बजेटपेक्षा हे बजेट जवळपास ४६ पटींने अधिक आहे त्यामुळेच हल्ली देशातील माध्यमांवर ‘मोदी मिडीया’चा ठपका बसला .याच धर्तीवर महाराष्ट्राच्या उपराजधानीत देखील एका माजी मंत्र्याने गोदी मिडीयाचेच अनुकरण करीत नागपूरातील काही माध्यमकर्मींना आपले धार्जिण कश्‍याप्रकारे बनवले आहे याचेच एक संतापजनक उदाहरण आजच्याच घटनेतून देता येईल.

ॲड.सतीश उके यांनी आज दूपारी ४.३० वाजता प्रेस क्लब येथे एका माजी मंत्री महोदयाविरुद्ध पत्र परिषद घेतली.यात त्यांनी माजी मंत्री यांचे सख्खे मावस भाऊ यांनाच हजर करुन माजी मंत्र्यांनी मंत्री पदावर असताना विविध विभागातील कंत्राटदारांकडून कश्‍या प्रकारे बेहिशोबी माया जमवली याचे दावे केले.या पत्रपरिषदेत उके व माजी मंत्र्यांच्या या भावाने खळबळजनक असे अनेक घटना बयाण केले.सोन्याच्या बिस्किट्यांपासून तर कोट्यावधींच्या जमीनी,संपत्ती,रोकड याचे सामान्य माणसाचे डोळे विस्फरुन जावे असे विवरणच सादर केले.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काही अधिकारी या मंत्र्यांकडे कश्‍याप्रकारे कोट्यावधींची रक्कम घेऊन येत होते,मंत्री व त्यांच्या कुटुंबियांना कश्‍याप्रकारे हजारो एकर जमीनी बक्षीस म्हणून मिळू शकल्या,मंदिरामधील जागेवर कश्‍याप्रकारे डल्ला मारण्यात आला,शेत जमीनी कश्‍याप्रकारे लाटण्यात आल्या,शासनाच्याच विविध विभागात कंत्राट देताना कश्‍याप्रकारे बेहिशेबी माया जमविण्यात आली,याचा उलगडला धक्कादायकरित्या मंत्री महोदयाचा सख्खा मावस भाऊच माध्यमांसमोर करीत होता,याच वेळी ‘मंत्री मिडीया’चे मॅसेज या माजी मंत्री व विद्यमान आमदारांच्या मोबाईलवर धडकत होते.

अश्‍याप्रकारे आपल्याच मावस भावाला ॲड.सतीश उके यांनी माध्यमांसमोर आणल्याने माजी मंत्र्याचे धाबे दणाणले.

पत्र परिषद संपताच गुन्हे शाखा अन्वेषनचे उपायुक्त चिन्मय पंडीत यांनी ॲड.उके व त्यांच्या भावाला प्रेस क्लबमधून ताब्यात घेऊन कार्यालयात आणले.ही वार्ता वा-यासारखी सर्वदूर पसरली.उके यांच्यावर एका विशिष्ट समुदायाच्या महिलेचा विनयभंग करण्याचा आरोप १४ वर्षांपूर्वी लावण्यात आला होता.कालच या आरोपाची सुनावणी होऊन ॲड.उके यांना या प्रकरणात जामीन देखील मिळाला होता.अचानक त्या आरोपी महिलेने फिर्यादी होऊन पुन्हा तक्रार नोंदवली असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.जी महिला काल पर्यंंत उके यांच्या तक्रारीमुळे आरोपी सिद्ध झाली होती,तीच अचानक फियार्दी होऊन तक्रार नोंदवते,उके यांना तात्काळ प्रेस क्लबमधूनच ताब्यात घेतलं जातं,हा सर्व प्रकार सुज्ञ नागपूरकरांना ‘अनाकलनीय’ असाच होता.

विशेष म्हणजे ही संपूर्ण घडामोड प्रेस क्लब येथे घडत असताना नागपूरातील ‘मंत्री मिडीया’हा मंत्र्यांच्या घरी पोहोचला होता.पांढ-या रंगाच्या जाडजूड पाकिटे मिळविता झाला व त्यांच्या-त्यांच्या मराठी वाहिन्यांवर ’उके यांची अटक’ ही ब्रेकिंग न्यूज फ्लॅश ही होऊ लागली.मात्र त्या पूर्वी पत्र परिषदेत माजी मंत्र्यांवर किती खळबळजनक आरोप लावण्यात आले होते,याचा मागमूस ही लोकशाहीच्या या चौथा स्तंभ म्हणून मिरवून घेणा-या माध्यमांवर झळकली नाही.

ॲड.उके यांच्यावर अतिशय गंभीर अारोप ठेवण्यात आले असून शस्त्र बाळगण्याचा यासोबतच त्या महिलेच्या डोक्यावर पिस्तूल रोखण्यासारखे अतिशय गंभीर आरोप लावण्यात आले. २००७ मध्ये म्हणजे तब्बल १४ वर्षांपूर्वी उके यांनी तिच्या गुप्तांगाना स्पर्श करुन विनय भंग करण्याचा आरोप लावला आहे.आज पत्र परिषद घेताच अचानक गुन्हे अन्वेषण विभाग सक्रिय होऊन न्यायालयातून कालच या प्रकरणरात जामीन मिळालेल्या उके यांना पुन्हा ताब्यात घेतले जातं.गुन्हे अन्वेषण शाखेत आणून रात्री १२ वा.पर्यंत बसवलं जातं,त्यांची चौकशी केली जाते,याच दरम्यान राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या नेत्या ज्वाला धोटे हे गुन्हे अन्वेषण शाखेत आपल्या कार्यकर्त्यांसोबत येऊन धडकतात,यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन फिरवला जातो,नानांचा संताप अनावर होतो,पोलिस आयुक्तांना फोन लावला जातो,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,मंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत वृत्त पसरतं,मुंबईवरुन हालचाल होते,उके यांना काही अटींवर सोडल्या जातं,उद्या मंगळवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वा.पुन्हा ॲड.उके यांना हजर होण्याची सूचना दिली जाते,एवढ्या सर्व घडामोडी फक्त एका माजी मंत्र्यांच्या विरोधात पत्र परिषद घेण्यामुळे घडतात,असे आता सांगितले जात आहे.उके यांच्यावर शस्त्र बाळगण्याचे व महिलेच्या डोक्यावर रोखण्यासारखे गंभीर आरोप लावण्याच हेतूच त्यांना अटक करण्याचा होता,अटक झाल्यावर न्यायालयातून त्यांचा रिमांड सहज पोलिसांना मिळवता आला असता मात्र मुंबईवरुन सूत्रे हलल्याने पोलिसांचा हा कयास व्यर्थ गेल्याचे बोलले जात आहे.

या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकाराची मुस्कटदाबी फक्त सरकारी यंत्रणाच करीत असते असे नाही तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरविणारे काही वृत्तपत्राचे पत्रकार व वाहीनींचे माध्यमकर्मी कश्‍याप्रकारे संघटितरित्या करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही घटना आहे.

आपल्या वाचकांना आणि आपल्या प्रेक्षकांना ‘सत्य‘सांगण्या व दाखवण्याऐवजी ‘सोयीस्कर’असं अर्धसत्य सांगण्यात येत आहे.हा प्रकार म्हणजे आपल्या आईलाच वेश्‍येच्या बाजारात नेऊन बसवण्याचा किळसवाणा व अनैतिक प्रकार आहे,असेच आता म्हणावे लागेल.
पत्रकाराचे काम हे बातमीप्रति प्रामाणिक राहणे,जो जसा बोलला,तेच दाखवणे,तेच प्रसिद्ध करणे हे असून पैशांच्या जाडजूड पाकिटासाठी आपली नीतीमूल्ये मंत्री,आमदार,खासदार यांच्या चरणी अर्पित करने असा होत नाही.असे करायचेच असल्यास पत्रकारितेला बदनाम करण्यापेक्षा गंगा जमुनात जाऊन वेश्‍येची दलाली करुन इमानदारीचा पैसा मिळवावा व त्या पैश्‍यांनी घर चालवावे,मुला बाळांचे शिक्षण आणि शौक पूर्ण करावे मात्र पत्रकारितेसारख्या पवित्र क्षेत्राला पैश्‍यांच्या पाकिटासाठी राजकीय नेत्यांच्या चरणाची दास बनवण्याचा कोणातही एक अधिकार पत्रकार म्हणून घेणा-या या काही माणसांना नाही.उके यांच्या या प्रकरणानंतर एका नामांकित वृत्तपत्राचा पत्रकार म्हणून घेणारा ‘दलाल’ हा गुन्हे अन्वेषण शाखेतच घुटमुळत असल्याचे अनेकांनी बघितले.एवढंच नव्हे तर त्याला तिथे बघून त्या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी पत्रकारांसाठी ज्या शब्दांचा वापर केला ते ऐकून कोणत्याही स्वाभिमानी पत्रकाराची मान शरमेने खाली झूकून जाईल,अश्‍या त्या टिका होत्या.

उके यांची पत्र परिषद संपण्यापूर्वीच काही माध्यमकर्मींनी ज्या ‘वेगाने’माजी मंत्र्यांचा बंगला गाठला ते बघता पत्रकारितेच्या वेगापेक्षा पैसा मिळवण्याचा ‘आवेग‘हा किती खोलवर रुजला आहे याचेच ओंगळवाणे आणि किळसवाणे दर्शन घडले.प्रेस क्लबमध्ये हजर नसताना व मंत्र्यांच्या बंगल्यावर पाकिट मिळताच प्रेस क्लब येथे काय घडले हे त्यांनी महाभारतातील ‘संजय’च्या दिव्यदृष्टिनेच बघितले व ब्रेकिंग न्यूज फ्लॅश केली तेव्हा ॲड.उके यांच्यासारख्यांनी आता तरी अश्‍या या झोपलेल्या समाजाला,मतदाराला जागृत करण्याच्या भानगडीत पुन्हा पडू नये,अशीच हताशा प्रेस क्लबमधील काही सच्ची पत्रकार मंडळी व्यक्त करीत होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या