खासदार औद्योगिक महोत्सव’ची तिसरी आवृत्ती
नागपूर,ता.१८ जानेवरी २०२६: असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) यांच्या वतीने ‘‘ॲडव्हान्टेज़ विदर्भ २०२६ – खासदार औद्योगिक महोत्सव’ची तिसरी आवृत्ती ६,७ व ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी–अमरावती रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या भव्य महोत्सवाचा उद्देश विदर्भाला भारताच्या औद्योगिक नकाशावर एक सशक्त आणि उदयोन्मुख विकास केंद्र म्हणून स्थापित करणे हा आहे. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना “एम्पावरिंग ग्रोथ” ही आहे.या महोत्सवा संदर्भातील सविस्तर माहिती आज पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
इंडस्ट्रीयल एक्स्पो – एमएसएमई व जिल्हास्तरीय स्टॉल्स –
ॲडवॉन्टेज विदर्भ अंतर्गत ३५० हून अधिक स्टॉल्सचे भव्य औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्यामध्ये २० एमएसएमईचे स्टॉल्स तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांचे ४० जिल्हास्तरीय स्टॉल्स असतील. या प्रदर्शनात डिफेन्स पब्लीक सेक्टर युनिट्स, सेबी, बीएसई, एनएसई, एमसीएक्स, एनसीडीएक्स, एएमएफआय, एमएसई, एनएसडीएल, सीडीएसएल सह इतर आघाडीच्या वित्तीय संस्था, सियान अॅग्रो, सौरऊर्जा उत्पादक तसेच वस्त्रोद्योग, प्लास्टिक, खनिज, कोळसा, विमानन, लॉजिस्टिक्स, आयटी, आरोग्य, फार्मास्युटिकल्स, संरक्षण, रिअल इस्टेट, अक्षय ऊर्जा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांतील उद्योगांचा सहभाग राहणार आहे. याशिवाय, पेटंट गॅलरीदेखील राहणार आहे.
बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये द्विपक्षीय व्यापार बैठका-
खासदार औद्योगिक महोत्सवात बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि तांत्रिक सत्रे आयोजित केली जाणार असून त्यात उद्योगांतील नव्या प्रवाहांवर, आव्हानांवर आणि संधींवर चर्चा करण्यात येणार आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये २५ पेक्षा अधिक सत्रांमध्ये २२५ तज्ज्ञ वक्ते, अंदाजे ५,५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. जागतिक गुंतवणूकदारांसोबत २० पेक्षा अधिक द्विपक्षीय व्यापार बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. यामुळे B2B, आणि B2G सहकार्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हायड्रोजन इकोसिस्टम, मायनर मिनरल पॉलिसी, स्टार्टअप्स, संरक्षण उत्पादन आणि विकसित भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या विषयांवर विशेष गोलमेज चर्चा होतील.
उद्योग क्षेत्रातील या मान्यवरांची उपस्थिती-
उद्घाटन सत्राला अदानी समूह संचालक (एअरपोर्ट्स) जीत अदानी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे कार्यकारी संचालक व सीईओ ऑटो व फार्मा सेक्टर श्री राजेश जेजुरीकर, तसेच सॅफरॉनस्टेजचे संस्थापक देवेन परुळेकर तसेच, दुग्ध व संलग्न क्षेत्रांवरील चर्चासत्रांमध्ये पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायचे सचिव डॉ. रामास्वामी एन. (IAS), इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. बी. प्रजापती, अमृतधारा डेअरीचे संस्थापक प्रवीण भंडारी, आणि इंदुजा मिल्कचे सीईओ सिकंदर मुलानी, सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध बिझनेस मेंटॉर, सुरेश मानशरमानी प्रेरणादायी वक्ता म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावर्षी पहिल्यांदा ॲडवॉन्टेज विदर्भमध्ये मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय सहभाग राहणार आहे. रशिया, चीन,ब्राझील, इजिप्त, उरुग्वे, नायजेरिया, झांबिया, व्हेनेझुएला, टोगो, गयाना, बेनिन इत्यादी सुमारे २० देशांतील ॲम्बेसेडर, व्यापार प्रतिनिधी येत आहेत.
या महोत्सवाला महाराष्ट्र शासन, एमएसएमई मंत्रालय आणि जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) यांचे सहकार्य लाभले असून लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर, नागपूर हे प्रमुख प्रायोजक आहेत. नागपूर विद्यापीठ, आयआयएम नागपूर तसेच विदर्भातील विविध औद्योगिक व व्यावसायिक संघटना नॉलेज पार्टनर्स आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेकरिता ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF) हे ग्लोबल पार्टनर असून नागपूर मेट्रो, एमआयडीसी, एनएमआरडीए, एनएमसी, टाटा स्टाईव्ह आणि नागपूर स्किल सेंटर हे सहयोगी भागीदार आहेत.
गेल्या तीन वर्षांत एआयडी ने पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरच्या धोरणाकरिता दिलेल्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या असून नागपूर विमानतळ पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती, नागपूर स्किल सेंटरची स्थापना, गडचिरोली येथे स्वतंत्र स्टील क्लस्टरचा प्रस्ताव, आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक भागीदारी बळकट करणे तसेच नागपूरमध्ये CDSCO व बौद्धिक संपदा कार्यालय स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर, यंदाच्या अॅडव्हांटेज विदर्भला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्यालयाशी संपर्क साधावा—शॉप क्र. ८२, वर्ल्ड ट्रेड सेंटर, लोअर ग्राउंड फ्लोअर, ग्लोकल स्क्वेअर मॉल, सीताबर्डी, नागपूर किंवा ७ किंग्सवे, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, रेल्वे स्थानकाजवळ, नागपूर. संपर्क क्रमांक 9998559288 / 9326546448 किंवा ई-मेल president@aidnagpur.in, secretary@aidnagpur.in, honsecretary@aidnagpur.in.
पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री व खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रवर्तक गडकरी यांनी संबोधित केले. मंचावर आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, किशोर मालवीय, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता, प्रशांत मोहता, शाम मुंदडा, बिपेन अग्रवाल, भावेश शहा, राजेश रोकडे, आदींची उपस्थिती होती. यावेळी ॲडवॉन्टेज विदर्भच्या टीझरचे लोकार्पण करण्यात आले.
प्रास्ताविक आशिष काळे यांनी केले तर सूत्रसंचालन एआयडीचे सचिव डॉ. विजयकुमार शर्मा यांनी केले. आभार अजय कपूर यांनी मानले.
………………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
