
(रविवार विशेष)

आयुष्य हे सुंदरच.. दुस-यांदा मिळालेले जीवन आनंदी घालवणार:यशचा निर्धार
डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.७ मार्च: यश मदनकर हा अवघा २० वर्षांचा तरुण कलावंत.कलाकार असल्यामुळे मूळातच संवेदनशील आणि हळव्या मनाचा.ऐन लॉक डाऊनच्या काळातच पाच महिन्यांपूर्वी त्याने स्वत:चा ड्रेम सेट घेण्यासाठी ५० हजारांचं कर्ज काढलं.तीन महीने त्याने पाच हजार रुपयांचे हप्ते ही फेडले पण?पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ७ मार्चपर्यंत मायबाप सरकारने लॉक डाऊन घोषित केलं!सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुन्हा एकदा बंदी आली,हळूहळू रुळावर येणारे सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा एकदा बंद पडलेत आणि…..करोना महामारीची ही परिस्थिती आता कधीही सुधरणार नाही असं नैराश्य आलं,४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.१५ मिनिटांवर घरातच असलेली ऑल आऊटची बाटली तोंडाला लावली…..मला सगळं काही संपवायचं होतं…मनातली घालमेल..पराकोटीची हताशा…कर्ज फेडण्याची चिंता…करोनाचा त्रागा…पण?
मानेवाडा रोडवरील केशव रुग्णालयात जेव्हा जाग आली तेव्हा जवळच बसलेली आई आणि धाकटा भाऊ हे रडताना दिसले आणि…माझं काळीज हललं!हे मी काय करत होतो?यांना दुखवायचा मला अधिकार होता का?मला जर काही झालं असतं तर हे कसे जगले असते?माझी आई तर रडून रडूनच मरुन गेली असती..माझ्या जन्मदात्रीचा काय दोष आहे?९ महिने मला गर्भात घडवलं,मलमूत्रातून कोरड्यात झोपवलं,माझं संगोपन केलं,माझे लाड पूरवले,माझ्यात संस्कार रुजवले,काबाड कष्ट करुन माझ्या पोटाची भूक शमवली अन् मी तिला भर उमेदीत काय दिलं?आत्महत्येसारखं भेकड पाऊल उचलून पराकोटीचा मानसिक धक्का!
करोनाच आहे ना?आज नाही तर उद्या जाईलच निघून,मी आता या पुढे आयुष्य आनंदी घालवणार,दुस-यांदा मिळालेलं हे आयुष्य आता सार्थकी लावणार,माझ्या आईच्या हाताला साऊथ इंडियन पदार्थांची खूप चव आहे,एक छोटासा ठेला लावील,पुढे त्याचंच मोठं हॉटेल करील….!हा शहानपणा मला ४ फेब्रुवरीच्या आधी का नाही सूचला!पण?या दु:खातून मी आता खूप शहाणा झालो.लहान १८ वर्षाचा भाऊ गॅरेजमध्ये काम करतो,लॉक डाऊनमध्ये गॅरेजही बंद होते…सगळंच बंद होतं..माणसांचं जगणं मात्र सुरु होतं आणि सुरु होता अविरत जगण्या-मरणाशी संघर्ष!यालाच खूप..खूप घाबरलो होतो….!
माय बाप सरकार एकदाच नागरिकांना का सांगत नाही करोना आहे… तुम्ही जगू नका!आमचे कार्यक्रम सुरु झाले होते,मी कर्जाचे हफ्ते ही फेडत होतो ना?मला देवाने म्यूझिक दिले,एवढी मोठी कला दिली,मी माझ्या कलेत आनंदी होतो,कोणासमोर हात पसरवत नव्हतो मग?का आमचे कार्यक्रम पुन्हा सरकारने बंद केले?कार्यक्रम बंद,सभागृह बंद,माझ्या चुलत बहीणीच्या लग्नात फक्त ५० माणसे होती,सहा सहा फूटांवर एक एक खूर्ची होती.त्यात ही पोलीस आणि नागपूर महानगरपालिकेची माणसे येऊन सारखी-सारखी सभागृहात येऊन संख्या तपासत होती!मग दोन पाहूणे बाहेर पडायची.. बाहेर उभे असणारे दूसरे दोन पाहूणे आशिर्वाद द्यायला आत यायचे!
हे सगळं बघून खूपच निराश झालो,करोनामुळे आयुष्यातला आनंदच संपला,म्यूझिक ही खूपच चांगली गोष्ट आहे मला मिळालेली पण, करोना नसता तर खूप चांगलं झालं असतं,हे सगळं सहनच होत नव्हतं.७ मार्च पर्यंतची बंदी आता १५ मार्च पर्यंत केली,हे असंच चालत राहणार,याला अंतच नाही,एकीकडे मायबाप सरकार सांगते ‘आता करोनासोबतच जगायला शिका’मग का आम्हाला करोनासोबतच जगू देत नाही?
करोना वाढतोय सांगून मरणाच्या दारावर आमच्यासारख्यांना ढकलतेय ही सरकार?काम धंदे बंद केले,कार्यक्रमांवर बंदी आणली मग खायचे काय?कर्जाचे हफ्ते फेडायचे कसे?सरकार तर रेशन भरुन देत नाही,कर्जाचे हफ्ते फेडायसाठी पैसे आमच्या बँकेत जमा करत नाही?मग माझ्यासारख्या लहान सहान कलाकाराने करावं काय?चोरीमारी करण्याचे संस्कार मायबापांनी दिले नाही,घराचं भाडं पाच हजार रुपये महिना आहे,स्वत:चं घर ही नाही,कुठून आणायचे पैसे?
विचार करुन डोक्याचा भूगा झाला अन् प्यायलो विषाची बाटली….!पण?आता मी जवाबदार झालो आहे,माझ्या आईच्या अश्रूंनी मला शहाणे केले.कार्यक्रम बंद झाले,खाद्य पदार्थाचा हात ठेला तर चालवू शकतो ना?मी स्वत:सोबत खूप वाईट केलं..माझ्यासारख्या उपाशी मरणा-या माझ्या कलावंतंानी मात्र अशी चूक करु नये,मी इतकंच सांगेल.आपल्या घरचा,कुटुंबियांचा विचार जरुर करा आधी.मला तर वडील ही नाहीत,५ वर्षांपूर्वी त्यांची ह्दयक्रिया बंद पडली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.माझी आईच माझी माय आणि बाप दोन्ही झाली.
माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं….प्यायलो विष…पण?आता माझा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे…मी रुग्णालयात होतो तर एवढी माणसे मला भेटायला आली ज्यांना मी ओळखत ही नव्हतो…अनेकांचे मला फोन येतात…ज्यांना मी पाहीलेसुद्धा नाही…आज मला मी एक ‘कलाकार’असल्याचा अभिमान वाटतो…माझं कलाकारांचं जग माझ्या पाठीशी आहे.आता मी समोरचा विचार करतो…आज नाही तर उद्या होईल पण..आता जीवनात मी काही तरी चांगलं करुनच दाखवणार….!

ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीने केली पाच हजारांची मदत-
यश मदनकर या कलाकाराने विष घेतल्याचे कळताच नागपूरातील कलावंतांची संघटना ऑस्कर अकादमीच्या सदस्यांनी यशच्या घरी धाव घेतली.त्याचे समुपदेशन केले. पाच हजार रुपयांचा धनादेश त्याच्या स्वाधीन केला.तो एकटा नाही किंबहूना…त्याच्यासारखे कलाकार एकटे नाहीत हे समजावले…संघटनेकडून जे काही शक्य होईल ती मदत नक्की करु..हे मनोधैर्य दिलं..जगण्याची आशा दिली...कलाकार कभी मरते नही…कलाकार तो अमर होते है…असे संघटनेचे अध्यक्ष् पी.कूमार यांनी समजावले….परिस्थितीसमोर कलाकाराची हार म्हणजे कलेचा अपमानच.. संघटनेचे सचिव प्रशांत खडसे यांनी सांगितले.यश तुझ्या नावातच ‘यश’दडले आहे रे..मग तूझं नशीब अपयशी कसं?संघटनेचे सदस्य व नागपूर शहरातील ज्येष्ठ ड्रमर अशोक ठवरे यांनी जिव्हाळ्याचे बोल सुनावले….!आम्ही आहोत..कायम तुझ्यासोबत…तुझ्या कलेसोबत…कलाकार म्हणून….संघटना म्हणून आणि…यशची काळजी मिटली…काळजावर जमा झालेली नैराश्याची काजळी दूर झाली आणि नागपूर शहरातील कलावंतांचे एवढे भरभरुन प्रेम,आपुलकी,जिव्हाळा बघून पुढल्या ही जन्मी…आता त्याला…कलाकारच व्हायचं आहे…..!
ऑस्कर संघटनेतील यांचे मानले आभार-
संजय बारापात्रे,प्रणय कुथे, अशोक ठवरे,अभिजीत कडु संदीप मेश्राम, राजू गजभिये, पी. कुमार, शेखर शामकुंवर, संगीता गावंडे,कामीनी बनसोड,एम. कुमार, श्रेयश वानकर.
(यश मदनकर-8237026623)




आमचे चॅनल subscribe करा
