

किंग्जवे रुग्णालयात १२०० रुपयांना श्रीमंतांना लसी उपलब्ध:गरीबांनी कुठे जावे?
या लसी मनपाच्याच :प्रशांत पवार यांचा आरोप
धोरण बदला अन्यथा परिणामांना तत्पर रहा:जय जवान जय किसान संघटनेचा इशारा
नागपूर,ता. ६ जून: केंद्राने व राज्य शासनाने सध्या लशींच्या अपु-या साठ्यामुळे देशातील १८ ते ४५ वयोगटातील तरुणांच्या लसीकरणावर बंदी आणली आहे मात्र नागपूरात किंग्जवेसारख्या खासगी रुग्णालयात १२०० रुपये घेऊन या वयोगटातील तरुणांचे लसीकरण केले जात आहे.एका एका दिवसात ३-३ लाख रुपयांची कमाई हे खासगी रुग्णालय फक्त लसीकरणातूनच कमावत असल्याचे पुरावे ‘जय जवान जय किसान’संघटनेजवळ असून नागपूर महानगरपालिकेने शहरातील गोर गरीबांच्या हक्काच्या लसी या खासगी रुग्णालयांना पुरविल्या असल्याचा धक्कादायक आरोप ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् व राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी पत्रकाद्वारे केला.मनपाच्या या भेदभावपूर्ण व भ्रष्ट धोरणामुळे शहरातील १८ ते ४५ वयोगटातील गरीब तरुणांनी तिसरी लाट आल्यास श्मशानात जावे का?असा जळजळीत सवाल त्यांनी केला.
सध्या मनपाद्वारे विविध लसीकरण केंद्रांवर फक्त ४५ ते ६० व ६० च्या वर वयोमर्यादेतील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे,१८ वर्षाच्या वर वयोमर्यादा असणा-या तरुणाईचा जीव देखील वाचला पाहिजे मात्र तो फक्त श्रीमंतांचाच वाचला पाहीजे असे नसून गोर गरीब,मध्यमवर्गीयांचा जीव देखील तेवढाच मोलाचा आहे.खासगी रुग्णालयांशी मनपाने साटेलोटे करुन गरीबांच्या हक्काच्या लसी खासगी रुग्णालयांना पुरविल्या असल्याचा आमचा सरळ-सरळ आरोप आहे.
या अनैतिक व्यवहारातून मनपातील धनदांडगे व किंग्जवेसारखे खासगी रुग्णालये अमाप पैसा कमावून राहीली आहेत.मूळात ही खासगी रुग्णालये नाव नोंदणीच्या नावावर आधी २०० रुपये वसूलते यानंतर लस दिल्यानंतर १०० रुपयांची सूट देऊन ११०० रुपये उकळते.ही १०० रुपयांची सूट नेमकी कोणत्या कारणासाठी दिली जात आहे?याचा ही टाळेबंद हिशोब या रुग्णालयांकडून मनपाने घ्यावा अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली.
एकीकडे देशातील सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारला अर्थसंकल्पात लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचा हिशेब सादर करण्याचे निर्देश देते दूसरीकडे राज्य सरकार हे नागपूर महानगरपालिकेला गाेर गरीबांसाठी ज्या मोफत लसी उपलब्ध करुन देत आहे ते देखील भाजपचेच सत्ताधारी खासगी रुग्णालयांना मागील दारातून उपलब्ध करुन देत असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला.अद्याप राज्य सरकार असो किवा खासगी रुग्णालये हे कोणत्याही देशी किवा परदेशी कंपन्यांकडून सरळ सरळ व्यवहारातून लसी विकत घेऊ शकत नाही मग किंग्जवेसारख्या खाजगी रुग्णालयाला दर दिवसाला ३-३ लाख रुपये कमाविण्याइतपत लसी कोण उपलब्ध करुन देत आहेत?
‘जय जवान जय किसान’संघटनेने मागे देखील मागणी केली होती किंग्जवे हे मूळात कोणत्या भाजप नेत्याचे रुग्णालय आहे?मनपाच्या मालकीच्या जागेवर ते उभारले आहे का?या सर्वांचे ऑडिट मनपाने करावे तसेच खासगी रुग्णालयांना जनतेच्या जीवावर उदार होऊन नफेखोरी करण्यासाठी मिळणा-या लसींचे देखील ऑडीट महापौर आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी.यांनी तातडीने करावे अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली.
शहरातील गोर गरीब जनतेसाठी लसीकरणाचे धोरण हे एकसारखेच असायला पाहिजे.मनपा ज्याप्रमाणे लसीकरण केंद्रांवर ४५ च्या वर वयोगटातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करीत आहे त्याचप्रमाणे १८ ते ४५ वयोगटातील तरुणांना देखील त्या केंद्रांवर मोफत लस उपलब्ध करुन द्यावी,अन्यथा ‘जय जवान जय किसान‘संघटना मनपाच्या या भेदभावपूर्ण व भ्रष्टाचारी कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडेल,असा इशारा त्यांनी दिला.




आमचे चॅनल subscribe करा
